उध्दवगीता - अध्याय अठरावा

उध्दवगीता

श्री भगवान्‍ म्हणाले, नरपुंगवा उध्दवा ! गुणांचा संकर न होता सात्विक, राजसी, तामसी पुरुष कोणकोणत्या गुणांनी होतात, ते सांगतो ऐक. ॥१॥
मनाची शांती, इंद्रियनियमन, सहनशीलता, विवेक, तपाचरण, सत्यभक्ती, दयाळुपणा, स्मरणशक्ती, संतुष्टता, औदार्य, निस्पृहता,  आस्तिक्यबुध्दि, सभ्यता, क्षमा, धैर्य, आत्मस्तुतीचा कंटाळा, आत्मसंतोष हे सात्त्विक पुरुषाचे गुण होत. ॥२॥
वासना, सकाम कर्म , उन्मत्तपणा, असमाधान, मानीपणा, सकामभक्ती, भेदबुध्दी , विषयसुखाची हौस, मनाचा उल्हास, कीर्तीची आवड, साहसप्रियता, युध्दप्रीती विनोदीपणा, बळाच्याच जोरावर उद्योगीपणा हे राजसी पुरुषाचे गुण होत. ॥३॥
क्रोध, लोभ, असत्यता, क्रूरता,न माजरेपणा, दंभ, श्रमीपणाची नावड, कलहप्रियता, शोक, मोह, असंतोष , दैन्य, झोप, हावरेपणा, भेकडपणा, आळशीपणा हे तामसी पुरुषा़चे गुण होत. ॥४॥
हे अनुक्रमे सात्त्विकादिकांचे गुण सांगितले. आता, गुणांचे मिश्रण कसे होते, तो प्रकार ऐक.॥५॥
उध्दवा !‘ हा मी’ हा अभिमान आणि ‘ हे माझे’ ही बुध्दि या गुणात्मक उभयतांच्या साह्याने मन, इंद्रिये आणि पंचमहाभूते, यांच्या व्दारे सर्व लौकिक व्यवहार चालतो. ॥६॥
धर्म, द्रव्यादिकाची इच्छा, किंवा भोगाची हाव, या विषयांत जो गढून जातो, त्याची ती ती निष्ठा ही गुणांचे मिश्रणकार्यच असते. फलही तसेच. (धर्मनिष्ठेचे फल) सात्त्विक श्रध्दा, (कामनिष्ठेचे फल) राजसी विषयप्रेम आणि (अर्थाचे फल ) द्रव्यप्राप्ती. ॥७॥
एकाच विषयाच्या निष्ठेतही गुणभेद होतो. काम्य धर्मनिष्ठा राजसी, गृहस्थाश्रमावरील निष्ठा तामसी आणि नित्यकर्मनिष्ठा सात्त्विक असते. गृहस्थाश्रमातच असा त्रिगुणात्मक सन्निपात होते. ॥८॥
शमदमादि गुण प्रबल असले म्हणजे तो तो पुरुष सात्त्विक होय असे जाणावे; कामादि जोरात असले म्हणजे राजसी असे समजावे आणि क्रोधप्रभृती तमोगुण जास्त असले म्हणजे तामसी आहे असे खुशाल अनुमान करावे. ॥९॥
स्वकर्म करुन जो पुरुष अथवा जी स्त्री माझी निष्काम उपासना करतात ती ती मनुष्ये सात्त्विक होत असे जाणावे. ॥१०॥
विषयभोगाची इच्छा ठेऊन कर्मांनी जो माझी नित्य उपासना करतो, तो मनुष्य राजसी प्रकृतीचा; व जारण , मारण, हिंसा करण्याची इच्छा धरुन माझी उपासना करणारा तामसी होय असे जाणावे. ॥११॥
सत्वादि गुण जीवाचेच आहेत. आत्म्याशी परमेश्वराशी त्यांचा संबंध नाही. ह्या गुणांचा जन्म जीवाच्या मनोभूमिकेत होतो. या मनोनिर्मित गुणांनी सत्त्वादी रज्जूंनी विषयासक्त जीव बांधले जातात. ॥१२॥
तेजस्वी, निर्मळ आणि मंगलकारी सत्त्वगुण पुरुषहृदयांत प्रबल झाल्यामुळे रजोगुण व तमोगुण जेव्हा लय पावतात, तेव्हा तो पुरुष सुखानेच धर्मज्ञानप्रभृती कल्याणकारी वृत्तींनी युक्त होतो. ॥१३॥
विषयांचा अभिलाष, व्दैतबुध्दी आणि आत्माभिमान उत्पन्न करणार्‍या रजोगुणाची सत्त्व- तमावर सरशी झाली म्हणजे दु:ख देणारे कर्म , प्रसिध्दी आणि संपत्ती यांची संगती पदरी पडते. ॥१४॥
मोह उत्पन्न करणारा, ज्ञान नष्ट करणारा आणि आळस वाढविणारा तमोगुण इतराहून प्रबल होतो, तेव्हा, शोक, मोह, निद्रा, क्रौर्य, पोकळ मनोराज्ये यांच्या स्वार्‍या हजर होतात. ॥१५॥
आणि जेव्हा चित्त प्रसन्न असते, इंद्रिये शांत असतात, शरीर भीतिशून्य असते आणि मन सर्व वासनारहित नि:संग असते, तेव्हा माझे स्थान प्राप्त करुन देणारा सत्त्वगुण जोराने विलसत आहे असे समजावे. ॥१६॥
कर्माच्या कटकटीमुळे जेव्हा चित्त विकार पावून विक्षिप्त होते, ज्ञानेंद्रिये असंतुष्ट होतात व कर्मेंद्रिये अस्थिर होऊन मन भ्रमिष्ट होते; असा प्रकार जेथे असतो, तेथे रजोगुणाचा पगडा बसला आहे असे समज. ॥१७॥
जेव्हा चित्त मूढ होऊन ज्ञानग्रहणाला असमर्थ होते, मनाचे व्यापार स्तब्ध होतात, अज्ञान आणि खेद प्रकट होतात, तेव्हा तमोगुण प्रबल आहे असे समज. ॥१८॥
सत्त्वगुण वृध्दिंगत झाला म्हणजे देवांचे (दैवी गुणांचे) व तमोगुण वाढू लागला म्हणजे राक्षसांचे (राक्षसी गुणांचे) सामर्थ्य वाढण्याचा प्रकार होतो. ॥१९॥
सत्त्वाने जागृतावस्था प्राप्त होते, रजोगुणाने स्वप्नावस्था प्राप्त होते आणि तमोगुणाने गाढ निद्रावस्था जीवाला प्राप्त होते. तुरीय म्हणून चवथी अवस्था आहे, ती स्वरुपाने वरील तिन्ही अवस्थात विद्यमान असते. ॥२०॥
सत्त्वगुणात्मक वेदोक्त कर्म करणारे ब्राह्मण श्रेष्ठ लोकी जातात, तामसी स्वभावाचे कर्म करणारे पाषाणादी नीच लोकी जातात आणि राजसी वृत्तीचे कर्मानुष्ठानी भूलोकी जन्म घेतात. ॥२१॥
तसेच सात्त्विक वृत्तीत देहत्याग करणारे प्राणी स्वर्गाप्रत जातात, रजोवृत्तीत मरणारे मनुष्यलोकाप्रत जातात, तमोवृत्तीत मरणारे असतात. ॥२२॥
वर्णाश्रमविहित कर्म ईश्वराला अर्पिले अथवा निष्काम बुध्दीने केले, तर ते सात्त्विक कर्म होय; पण सकामत: कर्म केले तर तेच राजसी आणि परोपकारी बुध्दीने केले, तर तेच कर्म तामसी होते. ॥२३॥
केवल म्हणजे निरुपाधिक ज्ञान सात्विक होय , सोपाधिक ज्ञान राजसी होय, सामान्य माणसाचे ज्ञान तामसी होय आणि परमात्मज्ञान निर्गुण होय. ॥२४॥
तसेच अरण्यवास सात्त्विक होय. गावात- शहरात राहणे राजसी होय. जुगाराच्या अड्‍डयात राहणे तामसी आणि परमात्मस्थानी वास्तव्य ते निर्गुण होय. ॥२५॥
ह्याचप्रमाणे नि:संग कर्मकर्ता सात्त्विक होय. कामाच्या अभिमानाने कर्म करणारा राजस होय. धोरण नसलेला कर्ता तामसी होय आणि माझा एकनिष्ठ भक्त निर्गुण स्वरुप होय. ॥२६॥
तसेच आत्मस्वरुपावरील श्रध्दा सात्त्विक होय. कर्म व तत्फल यावरील श्रध्दा राजसी होय.अधर्मावरील श्रध्दा तामसी होय आणि एकनिष्ठ ईशभक्तीवरील श्रध्दा निर्गुण होय. ॥२७॥
याचप्रमाणे आरोग्यकारक, स्वच्छ व सहज प्राप्त होणारा आहार सात्त्विक होय, जिव्हेचे चोचले पुरविणारा आहार राजस होय, मागाहून दु:ख देणारा आणि जातीचा अमंगळ असा आहार तामसी होय. ॥२८॥
आत्मस्वरुपजन्य सुख सात्त्विक , विषयजन्य सुख राजस, मोह व दैन्य यापासून होणारे सुख तामसी असते, भक्तीच्या योगाने होणारे सुख निर्गुण होय. ॥२९॥
पदार्थ, देश, काल, फळ, ज्ञान, कर्म,कर्ता,  श्रध्दा, जीवावस्था, देवादी स्वरुपनिष्ठा ह्यांपैकी प्रत्येकाचे सत्त्वादी गुणांनी तीन तीन प्रकार होतात. ॥३०॥
उध्दवा ! ज्ञाता व ज्ञेय यांच्या अधिष्ठानामुळे उत्पन्न होणारे सर्व दृष्ट, श्रुत व मनोनिर्मित भाव, गुणात्मक आहेत.॥३१॥
ह्या सर्व संसृती, सर्व अवस्था, गुण व कर्मे यांच्यामुळे अस्तित्वात येतात व जगतात. उध्दवा ! हे चित्तापासूनच जन्म पावलेले गुण ज्या विवेकी पुरुषाने जिंकले आणि शुध्द भक्तियोगात; जो मत्पर झाला, तो मद्रूप, आत्मरुप होऊन मुक्त होतो. म्हणून उत्तम प्रकारचे ज्ञान व उत्तम अनुभव देणारा नरदेह प्राप्त झाला असता शहाण्या माणसाने गुणांचे जाळे तोडून माझ्या भजनी अखंड एकनिष्ठ असावे. ॥३२-३३॥
सदैव दक्ष असून इंद्रियदमन करणार्‍या विवेकी पुरुषाने निरहंकार व निर्मम होऊन माझे भजन करावे; नंतर सत्त्वगुणच वाढवून इतर गुणांचा निरास मुनी होऊन करावा. ॥३४॥
शेवटी, आत्मस्वरुपाशी युक्त होऊन आत्मज्ञानाने बुध्दीसह सर्व इंद्रियगणांचा उपशम करावा. तात्पर्य गुणनाश करावा. याप्रमाणे निर्गुण झालेला जीव आपल्या सर्व जीवोपाधी टाकून देतो आणि मद्रूपास येतो. ॥३५॥
कारण जीवत्व आणि गुणीपणा या दोन उपाधींनी मुक्त झालेला जीव माझ्या ब्रह्मस्वरुपाने पूर्णत्व पावतो. ॥३६॥
अध्याय अठरावा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP