अध्याय ४६ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


स्मरतां कृष्णवीर्याणि लीलापांगनिरीक्षितम् । हसितं भाषितं चांग सर्वा नः शिथिलाः क्रियाः ॥२१॥

श्रीकृष्णाचीं स्मरतां यशें । जन्मादारभ्य कृताशेषें । मानस विरे तत्संतोषें । सप्रेमरसें समाधिस्थ ॥९१॥
लीलेकरूनि पाहतां कृष्ण । सस्मित अपांगविमोक्षण । स्मरतां मूर्च्छित होय मन । प्रवृत्तिभान मग कैंचें ॥९२॥
उद्धवासि अंग म्हणोन । नंदें कोमळ संबोधून । म्हणे प्रियतम तुजही श्रीकृष्ण । यास्तव अभिज्ञ मम हृदया ॥९३॥
आठवे कृष्णाचें पाहणें । व्यंकटकटाक्षविमोक्षणें । पांगपातें ज्यां स्पर्शनें । अमृतपानें त्यां होती ॥९४॥
शुद्धसत्त्वाचा हर्षोत्कर्ष । तैसें श्रीकृष्णाचें हास्य । जिहीं भोगिला तो सुखलेश । ब्रह्मानंदास ते विटती ॥१९५॥
तें आम्हांसि डोळे भरी । येथें फावलें अद्यापिवरी । आतां झुरतसों अंतरीं । क्रिया व्यवहारीं न स्फुरती ॥९६॥
श्रीकृष्णाचें बोलणें मधुर । सत्य हित मित मनोहर । सबाह्य निर्मळ जाह्नवीनीर । तेंवि सुखकर स्वानंदें ॥९७॥
संवगडियांसी बोले हरि । कीं गोपींसी मर्मोत्तरीं । कलभाषणें मानस हरी । आम्ही पितरीं आळवितां ॥९८॥
सुस्वर मुरलीचिया गायनीं । कृष्ण आळवितां न मानी । तो रस स्मरतां अंतःकरणीं । लागे उन्मनी अनायासें ॥९९॥
तेणें शरीरीं बाणे काष्ठा । विकळ होती इंद्रियचेष्टा । पारुषे प्रपंचप्रवृत्तिनिष्ठा । इष्टानिष्टा अनोळखी ॥२००॥
ठेला व्यवसायसंभ्रम । शिथिल आह्निक नित्यनेम । हव्याकव्यादि नैमित्त कर्म । पावलें विराम सर्वत्र ॥१॥
राहिला कुळींचा कुळाचार । ठेला लौकिक वृद्धाचर । शानतिकपौष्टिककर्मचार । देशाचार स्मरेना ॥२॥
कृष्णाकार झालें मन । कृष्णक्रीडाअनुस्मरण । दृष्टीपुढोनि न वचे ध्यान । हास्यभाषणमंडित ॥३॥
शिखंडमंडितमूर्धजमुरडी । विरचित किरीट पुष्पपरवडी । कर्णीं कर्णिकारें देव्हडीं । गुंजावतंस मिरवती ॥४॥
कुटिल कुंतल आकर्ण न्यन । विशाळ भाळ सरळ घ्राळ । कुंडलमंडित गंड सघन । कान्ति निर्घन्नभसाम्य ॥२०५॥
स्फुटविद्रुमासमान अधर । दशन वज्रप्रभाभासुर । कोटिकंदर्पशशिभास्कर । वदनपरमा मांदुळवी ॥६॥
चिबुक हनुवटी सकुमार । कम्बुकण्ठ स्कंध सधर । आजानुबाहु विस्तीर्ण उर । उद्र पीवर त्रिवळीसीं ॥७॥
नाभि गंभीर मध्य सूक्ष्म । पृथुळ नितंब जघन सम । पीतवसन पुरुषोत्तम । पादपद्मीं पंकजभा ॥८॥
वांक्या नूपुर अंदु चरणीं । कृष्ण विचरतां गर्जे धरणी । तेणें नादें अनुहत ध्वनि । फावे श्रवणीं लालसित ॥९॥
कटिमेखळे क्षुद्रघंटी । अंगदें शोभती बाहुवटीं । त्रिधार कंकणें मनगटीं । पुरटरत्नीं सुघटितें ॥२१०॥
नवरत्नांचे कंठीं हार । वनमाळादि वन्य शृंगार । विचित्र धतु तिलकाकर । सर्व शरीर मिरविती ॥११॥
काच गुंज पल्लव पिच्छ । नवकिंजल्ककुसुमगुच्छ । कृष्णतेजें शोभती स्वच्छ । त्यापुढें तुच्छ स्मरकांति ॥१२॥
आठवें कृष्णाचें आळी क्रणें । आठवे कृष्णाचें थाया घेणें । आठवे कृष्णाचें रांगणें । काहाणी सांगणें आठ्वे ॥१३॥
येणें सकळ शिथिल क्रिया । इहपरकामना लोपलिया । मानसें कृष्णमय झालिया । गेला वायं संसार ॥१४॥
आम्ही विसरों दाटूनि जरी । कृष्ण सहसा न वचे दुरी । दिसे जंगमीं स्थावरीं । सबाह्यांतरीं तें ऐक ॥२१५॥

सरिच्छैलवनोद्देशान्मुकुन्दपदभूषितान् । आक्रीदानीक्षमाणानां मनो हाति तदात्मताम् ॥२२॥

कृष्णविसर पाडितां मनीं । तंव सरितातटावलोकनीं । कृष्णपादाब्जभूषिता अवनी । देती स्मरोनि हरिक्रीडा ॥१६॥
तेणें वियोगभडका उठे । क्रीडा स्मरतां हृदय फुटे । पुन्हा कृष्ण भेटेल कोठें । ऐसें वाटे हृत्कमळीं ॥१७॥
पाहतां गोवर्धनाचळ । श्रीकृष्णाचें क्रीडास्थळ । वाटे प्रत्य्क्ष घननीळ । सहगोपाळ क्रीड्तसे ॥१८॥
लागतां तद्रूपीं अनुसंधन । कृष्णाकार होय मन । तेव्हां नाठवे प्रपंचभान । मन उन्मन हरिबोधें ॥१९॥
यमुनातटीं कदंबातळीं । कृष्ण खेळला चेंडूफळी । कोठें हमामा हुंबली घाली । कोठें कुरवाळी धेनूतें ॥२२०॥
निंबुटिंबुं चुंबचुंबी । विटीदांडू सुरपारंबी । स्तोककृष्णेसीं घेत झोंबी । बळसुबळेंसीं सरिपाडें ॥२१॥
हुतुतु खेळती वाळवंटीं । लपंडाईं टिपिती पाठी । त्या त्या क्रीडाकौतुकगोष्टी । स्मरतां पोटीं तन्मयतां ॥२२॥
कृष्णक्रीडा वनोद्देशीं । तें तें वनें स्वानंदराशि । लाजविताति सुरविपिनासी । सुकृतें आणि सौंदर्यें ॥२३॥
मधुबन तालवन कुमुद्वन । बेलवन भांडीरवन बहुळवन । कामवन क्षुद्रवन मुंजावन । क्रीडास्थानें कृष्णाचीं ॥२४॥
नीपवन बृहद्वन वृंदावन । ऐसीं द्वादश वनें जाण । श्रीकृष्णाचें क्रीडास्थान । देखोनि स्मरण होतसे ॥२२५॥
परम दरा गोवर्धन । शंतनुकुंड पिहिताक्षस्थान । मानासीं गंगसेतुदर्शन । कदंबद्रोणीनिकुंज ॥२६॥
धीर समीर अढळ विहार । यज्ञपत्नींचा अन्नोपचर । घेतला म्हणोनि नामोच्चार । भातरोट हे देशभाषा ॥२७॥
राधाविनोदविहारस्थानें । श्यामतमाल कुंजसदनें । वैकुंठदर्शन कालियमथनें । इयें उपवनें क्रीडेचीं ॥२८॥
मम गवेषण ब्रह्मांडह्रद । अघासुराचें चर्म विशद । वत्सबकांचा केला वध । सर्वत्र गोविन्द क्रीडला ॥२९॥
आतां कोणीकडे जावें । कैसें कृष्णातें विसरावें । मानसें हिरोनि नेलीं सवें । पिसें माधवें लाविलें ॥२३०॥
श्वापदा पक्ष्यांचे अनुकार । मृगमयूरभ्रमराकार । दृष्टी पडतां प्राणिमात्र । कृष्ण सात्वर आठवतो ॥३१॥
कालियमथनाचिये समयीं । कीं मम मोक्षणीं वरुणालयीं । वैकुंठदर्शनीं यमुनाडोहीं । क्रीडानवाई कृष्णाची ॥३२॥
कृष्ण दावी खगानुकर । ते आठवती पाहतां खेचर । भूचरानुकारें भूचर । पाहतां श्रीधर आठवतो ॥३३॥
जळीं स्थळीं नभपोकळीं । स्थावरजंगमीं वनमाळी । विसर न पडे कोणे काळीं । करणीं सकळीं हरि भरला ॥३४॥
काष्ठवृषभ गाडे घोडे । गोठ्या भिंगुरिया चंपे कवडे । क्रीडोपकरणें दृष्टीपुढें । दिसतां वेडें मन होय ॥२३५॥
कृष्णा आवडे दुग्धसाय । कृष्ण हैयंगवीन खाय । भोजनीं रुचिकर पदार्थ होय । कृष्णा प्रिय तो वाटे ॥३६॥
स्मरे कृष्णाचा शौचाचार । स्मरे कृष्णाचा पदसंचर । स्मरे कृष्णाचा करव्यापार । शब्द नागर आठविती ॥३७॥
जी ग्राहकता परिमळाची । कृष्ण चोजवी विविधारुचि । रूपग्रहणीं श्रीकृष्णाची । नेत्रचतुरता आठवे ॥३८॥
कृष्ण डोळियांचा डोळा । कृष्ण त्वचेची चैतन्यकळा । श्रवणीं श्रोतव्यजिह्वाळा । ज्ञातृत्वलीला कृष्णाची ॥३९॥
श्वसोच्छ्वासीं कृष्णस्मरण । कृष्ण प्राणांचा निजप्राण । कृष्णसंक्ल्प वाहे मन । होय लीन श्रीकृष्णीं ॥२४०॥
कृष्णाकार बुद्धीसी बोध । कृष्णानुसंधानें चित्तासि वेध । कृष्णाभिमानें प्रसिद्ध । संसार विरुद्ध न वाटे ॥४१॥
ऐसी कृष्णीं तन्मयता । क्रीडास्मरणें होय चित्ता । ऐसाचि अनुराग समस्तां । पुरुषां वनितां व्रजपुरींच्या ॥४२॥
लेंकुरें असती घरोघरीं । परी रामकृष्णांची वेधकपरी । अद्भुत देखिली संसारीं । उपमा दुसरी यां नाहीं ॥४३॥
कृष्ण विसरों बहुतां परी । परि तो सबाह्य अभ्यंतरीं । स्मार्य स्मारक अवघा हरि । न उरे संसारा ॥४४॥
तस्मात् रामकृष्ण नव्हती नर । वयें न म्हणावे किशोर । नव्हती बल्लव ना वृष्णिकुमर । ऐक निर्धार तयांचा ॥२४५॥

मन्ये कृष्णं च रामं च प्राप्ताविह सुरोत्तमौ । सुराणां महदर्थाय गर्गस्य वचतं यथा ॥२३॥

निर्धार केला म्यां निजमनें । रामकृष्ण हे अमरराणे । येथें सुरकार्याकारणें । मनुष्यपणें अवतरले ॥४६॥
यासि प्रमाण काय म्हणसी । तरी गर्गें एकांतें मजपासीं । करितां यांचियां नामस्मरणासी ॥४७॥
दिवसेंदिवस नंदा तुज । यांचें ऊर्जित प्रतापतेज । कळों येईल सहजें सहज । वदला मुनिराज संकेतें ॥४८॥
केवळ गर्गोक्तिमात्र प्रमाण । ऐसें उद्धवा सहसा न म्हण । प्रत्यक्ष देखिलें ऐश्वर्य पूर्ण । तुझे नयन तुज साक्ष ॥४९॥

कंसं नागायुतप्राणं मल्लौ गजपतिं तथा । अवधिष्ठां लीलयैव पशूनिव मृगाधिपः ॥२४॥

दहा सहस्त्र गज प्रचंड । तत्तुल्य एकला कुवलयापीड । वज्रासमान अंबष्ठ दृढ । कृष्णें झोडून पाडिले ॥२५०॥
तैसेचि नागायुतबळिष्ठ । चाणूर मुष्टिक मल्लवरिष्ठ । रामकृष्णेंसीं समरनिष्ठ । झाले पिष्ट स्वप्रहरीं ॥५१॥
जिसें सिंहाचें उत्प्लवन । भंगी मत्तगजांचें सैन्य । तेथ कंस पशुसमान । लीलेकरून निवटिला ॥५२॥
खड्ग खेटक पडताळून । कंसें करितं निर्वाणकदन । कृष्णें आंसुडिला केश धरून । पावला मरण न वधितां ॥५३॥
शलतोशलप्रमुख मल्ल । समरीं मारिले शालभतुल्य । फेडितां कंसनिष्कृतिशल्य । कंकन्यग्रोध निमाले ॥५४॥

तालत्रयं महासारं धनुर्यष्टिमिवेमराट् । बभंजैकेन हस्तेन सप्ताह्मदधाद्गिरिम् ॥२५॥

वज्रकठोर धनुष्यपृष्ठी । तालत्रय सलंब कठी । गजेंद्र भंगी इक्षुयष्टि । तेंवि जगजेठी हरि भंगी ॥२५५॥
एकाचि हस्तें लीलेकरून । भंगिलें कठोर शरसन । कृष्णप्रताप ऐसा गहन । कीं तुमचे नयन देखती ॥५६॥
आणि प्रत्यक्ष व्रजपुरीं । सप्त दिवस धरिला गिरि । इंद्र वर्षतां मुसळधारीं । आणिल हारीं प्रतापें ॥५७॥
एकाचि हस्तकें करून । पाषाणमूर्तिहस्तीं सुमन । तैसा पर्वत सप्त दिन । धारूनि व्रजजन वांचविला ॥५८॥
गोकुळवासी जाणती सर्व । रामकृष्णांचें गौरव । जन्मादाराभ्य अभिनव । लीलालाघव तें ऐक ॥५९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP