अध्याय ४६ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


प्रलंबो धेनुको‍ऽरिष्टस्तृणावर्तो बकादयः । दैत्याः सुरासुरजितो हता येनेह लीलया ॥२६॥

सुरासुर अजिंक म्हणता ज्यांतें । ऐसे दैत्य कृष्णनाथें । शस्त्रेंवीण मारिले हातें । ऐक संकेतें उद्धवा ॥२६०॥
पूतनाराक्षसी महथोर । दीड योजन क्रूर शरीर । उल्बण विषाचा स्तनपाझर । प्राशूनि समग्र मारिली ॥६१॥
शकट भंगिला कोमल चरणें । तृणावर्त घेतला प्राणें । रिठासुर फोडिला दशनें । यमलार्जुन उन्मळिले ॥६२॥
वत्सासुर त्राहाटिला । बकासुर चाभाडीं चिरियला । वत्सें वत्सप कृष्ण गिळिला । तो अघ वधिला प्राणरोधें ॥६३॥
धेनुक झुगारिला तालाग्रीं । असंख्या रासभमांदी आसुरी । निमाली रामकृष्णांच्या करीं । निमेषामाझारीं तालवनीं ॥६४॥
कालियविषाचा कडकडाट । गगनीं खेचरां न फुटे वाट । उभय तटीं घडघडाट । स्थिरचरसंघाट भस्मती ॥२६५॥
तैं विषाचें पिऊनि पाणी । गोप गोधनें पडलीं धरणीं । कृष्णें कृपेनें अवलोकूनी । अमृत वर्षोनि वांचविलीं ॥६६॥
तया कालैयविषचिया ह्र्दीं । रिघोनि दंडिला खगेंद्रदंदी । तयासि वसति ओपूनि अब्धि । केली नदी सुखसेव्य ॥६७॥
तेथ रात्रीं जाळितां वणवा । कृष्णें गिळिला व्रजजनकणवा । प्रलंब कपटी पशुपभावा । क्रीडतां रामें मारिला ॥६८॥
अश्वरूपी तो केशी दुष्ट । कपटी व्योमासुर वरिष्ठ । वृषभरूपी तो अरिष्ट । अरिष्टकर्ता सुरासुरां ॥६९॥
ऐसे मारिले सांगों किती । रामकृष्णांची अद्भुत शक्ति । ईश्वरावतार मानवाकृति । दोन्ही मूर्ति प्रत्यक्ष ॥२७०॥
अगाध वेधक शक्ति यांची । चित्तें वेधलीं व्रजजनांचीं । गोपगोधनगोपिकांची । स्मृति सर्वांची कृष्णमय ॥७१॥
ऐसा रामकृष्णांचे क्रीडे । स्मरतां नंद विसंज्ञ पडे । तें शुक सांगे रायापुढें । मानस वेडें हरिवेधें ॥७२॥

श्रीशुक उवाच - इति संस्मृत्य संस्मृत्य नंदः कृष्ण्नुरक्तधीः ।
अत्युत्कंठोऽभवत्तूष्णीं प्रेमप्रसराविह्वलः ॥२७॥

ऐकें कुरुकुळनरशादूर्ला । ऐसी क्षणक्षणा कृष्णलीला । स्मरोनि मूर्च्छित वेळोवेळां । नंद पडिला धरणिये ॥७३॥
कृष्णीं प्रियतम नंदबुद्धि । यालागीं म्हणिजे अनुरक्तधी । उत्कंठेचा मोहउदधि । भरे प्रबळयाब्धीसारिखा ॥७४॥
तेणें वदनीं शब्द न फुटे । उत्कंठित कंथ दाटे । नेत्रीं बाष्पपूर लोटे । हृदय फुटे संस्मरणें ॥२७५॥
प्रेमसंरंभें विकळवृत्ति । नंद मूर्च्छित पडे क्षितीं । उद्धवें देखोनि अनन्य भक्ति । आपुले चित्तीं कळवळिला ॥७६॥
म्हणे धन्य धन्य याचा प्रेमा । याचिया तपाची नेणवे सीमा । प्रेमें विंधिला परमात्मा । येवढी गरिमा पुण्याची ॥७७॥
देवासि ज्याची अवसरी लागे । न विचारितां वृत्तांत सांगे । तो आजी प्रेमा देखिला आंगें । धन्य अनुरागें व्रजपति ॥७८॥
नंदमुखें हे कृष्णगुण । वर्णितां यशोदा करी श्रवण । मोहें व्यापिलें अंतःकरण । तिचें लक्षण अवधारा ॥७९॥

यशोदा वर्ण्यमानानि पुत्रस्य चरितानि च । शृण्वंत्यश्रूण्यवास्राक्षीत्स्नेहस्नुतपयोधरा ॥२८॥

वर्ण्यमानें चरितें ऐके । स्नेह दुणवटोनि तंव तंव तवके । आपणही वर्णी मुखें । वियोगदुःखें तळमळी ॥२८०॥
इये नाहाणीं नाहाणिला कृष्ण । येथें कृष्णा उद्वर्त्तन । जावळ माखीं स्नेहें करून । पाणी उष्ण प्रिय कृष्णा ॥८१॥
पालवें परिमाजीं कृष्णांग । कृष्णासि तिलक रेखीं चांग । कृष्णा आभारणें लेववीं सांग । कृष्णापांग आठवती ॥८२॥
हें कृष्णाचें बैसतें पीठ । हें कृष्णाचें जेवितें ताट । रत्नखचित वाटिया नीट । कृष्णासि अवीट आवडती ॥८३॥
हें कृष्णाची कनकझारी । रत्नजडित उपपात्र वरी । कृष्ण जैं कां भोजन करी । तैं स्वीकारी जळ येणें ॥८४॥
कृष्णा आवडे घारी पुरी । कृष्णा आवडे रोटी उखरी । कृष्णा प्रियतम कुशिंबिरी । आळणें सांबारीं आवडती ॥२८५॥
बोटवे देंटवे मालतिया । गहुंले नखुले चौकडिया । पुष्पें सरवळी सेवया । क्षीरी ऐसिया आवडती ॥८६॥
कृष्णासि आवडे शाल्योदन । सोलींव डाळीचें वरान्न । दुग्धपाचित पायसान्न । घृतपक्कान्न गर्भादि ॥८७॥
तैलवरिया सांजवरिया । फेण्या अनारसे गुळवरिया । लाडु खाजें करंजिया । विडोरिया प्रिय कृष्णा ॥८८॥
पेढे बत्तासे मिठाई । सितापाचित अच्युत पाहीं । कृष्ण मागे जे जे समयीं । तें लवलाहीं देतसें ॥८९॥
वाघारणीपूर्वक कथिका । कृष्ण भोक्ता विविधां वटकां । पर्पट सांडया लवणशाका । यदुनायका आवडती ॥२९०॥
मेथी चाकवत चिमकुरा । पोकळा बसोळा राजगिरा । ऐसिया पत्रशाका अपारा । श्रीयदुवीरा आवडती ॥९१॥
पुष्पां फळां मुळांचिया । शाका आवडती यदुवर्या । रायतीं मेतकुटें चटणिया । आंवळकाठिया नेलचटें ॥९२॥
व्यंजनपाचित चित्रोदन । कृष्णासि प्रिय दध्योदन । सुंठी मिरें रामठ लवण । दहें कालवन ठोंबरा ॥९३॥
कृष्णासि भाकरी आवडती । दिवे ढोंकळे धिरडीं रुचती । बहुविध सिदोरियांची प्रीति । संवगडे आणिती त्य अजेवी ॥९४॥
लोणकदें सद्यस्तप्त । कृष्णासि आवडे गोघृत । हैयंगर्वान नवनीत । दुग्ध सुतप्त आणि साय ॥२९५॥
सघन सव्यंजन साजुक तक्र । ज्यालागिं स्वर्गीं सकाम शक्र । अत्यंत कृष्णासि तें प्रियकर । परम सादर तत्पानीं ॥९६॥
ऐसे पदार्थ सांगों किती । श्रीकृष्णाची ज्यांवरी प्रीति । जे जे कृष्णासि नावडती । त्ते त्रिजगतीं अपवित्र ॥९७॥
आंग्या टोप्या पिंपळपानें । इयें कृष्णाचीं पायतनें । हें कृष्णाचें बाळलेणें । कोणाकारणें लेववूं ॥९८॥
हे कृष्णाची कांबळी काठी । शृंग मोहरी वेणु वेताटी । सदन्नजाळी हे घाली पाठी । गाई तापटी जे समयीं ॥९९॥
हें कृष्णाचें पीतांबर । बलरामाचें नीलांबर । कांच धातु गुंजाहार । पिच्छसंभार मोरांचे ॥३००॥
ऐसें जें जें दृष्टीं पडे । आठवे कृष्ण ठाके पुढें । एवं कृष्णें लाविलें वेडें । मागें पुढें स्मरेना ॥१॥
हे कृष्णाची मंचकशय्या । गोपी गडिणी कृष्णसखिया । श्रीकृष्णाची विनोदचर्या । जाकळी हृदया आठवतां ॥२॥
कृष्ण नाचे सदनांगणीं । कृष्ण सुस्वर गाय गाणीं । कृष्ण रुचिकर सांगे काहणी । कृष्णबोलणीं आठवती ॥३॥
कृष्णविहारमंडित धरणी । कृष्णक्रीडा यमुनाजीवनीं । कृष्णें प्राशन केला वह्नि । सुगंध पवनीं कृष्णाचा ॥४॥
कृष्णप्रभा भासुर गगनीं । कृष्णमूर्ति कोंदली नयनीं । कृष्णक्रीडा भरली मनीं । कृष्णावांचोनी स्मरों नेदी ॥३०५॥
जिकडे पाहों तिकडे कृष्ण । सबाह्य अवघा भरला पूर्ण । श्रीकृष्णाचें क्रियाचरण । कदा विस्मरण हों नेदी ॥६॥
खातां पितां आठवे कृष्ण । आसनीं शयनीं भोजनीं कृष्ण । जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं कृष्ण । कृष्णें तनुमन वेधलें ॥७॥
ऐसी यशोदा उद्धवापुढें । कृष्णचर्या वर्णितां तोडें । कृष्णानुरागें विकळ पदे । कृष्णीं जडे तादात्म्यें ॥८॥
नेत्र पाझरती बाष्पांभें । हृदय व्यापिलें कृष्णबिंबें । स्तनीं पान्हा सुटला लोभें । कृष्णवालभें तो न धरे ॥९॥
कौरवकुळांबरभास्वता । श्रवणासक्ता अभिमन्युसुता । नंदयशोदा हरिगुण कथितां । उद्धव चित्तामाजी द्रवे ॥३१०॥

तयोरित्थं भगवति कृष्णे नंदयशोदयोः । वीक्ष्यानुरागं परमं नंदमाहोद्धवो मुदा ॥२९॥

षड्गुणैश्वर्याचा निधि । त्या श्रीकृष्णीं अनन्यसिद्धि । परमानुरागें जदली बुद्धि । भवोपाधि विसरोनी ॥११॥
ऐसी नंदयशोदेची । कृष्णीं प्रीति देखोनि साची । कुंठित प्रज्ञा उद्धवाची । सीमा भाग्याची कल्पितां ॥१२॥
शिव विरंचि पद्मालया । कधीं न लाहती प्रेमा यया । तो येथ नंदयशोदा उभयां । फावला अनायासें करूनी ॥१३॥
ध्यानीं नाकळें ध्याननिष्ठां । योगी न फवे ऐसी काष्ठा । अनेक तपांच्या सोसितां कष्टां । प्रज्ञा प्रतिष्ठा दुर्लभ हे ॥१४॥
योगयागतपीं न लभे । तो हा प्रेमा हरिवालभें । नंदयशोदा यांसि शोभे । पुत्रलोभें वेधिलिया ॥३१५॥
पुत्रलोभें तो अविद्याभ्रम । परंतु वस्तुमहिमा अगाध परम । कृष्ण केवळ परब्रह्म । पुरुषोत्तम परमात्मा ॥१६॥
यास्तव कृष्णीं जैं अनुराग । तेव्हांचि भवभ्रमाचा भंग । जोडे कैवल्यपद अभंग । नंद सभाग्य या लोभें ॥१७॥
उद्धवें ऐसें मानूनि चित्ता । म्हणे कृष्णें मज ज्या अर्था । येथें पाठविलें तत्त्वता । तो विवेक आतां यां बोधूं ॥१८॥
ऐसें निर्धारूनियां मनीं । नंदाप्रति चातुर्यखाणी । उद्धव बोले प्रबोधवाणी । ते श्रोतीं श्रवणीं परिसावी ॥२९॥

उद्धव उवाच - युवां श्लाघ्यतमौ नूनं देहिनामिह मानद ।
नारायणेऽखिलगुरौ यत्कृता मतिरीदृशी ॥३०॥

पात्रापात्र विचारून । करी यथोचित सम्मान । मानद ऐसें संबोधन । यालागून नंदासी ॥३२०॥
उद्धव म्हणे मानदा नंदा । देहवंतांचिया वृंदा । माजी तुम्ही नंद यशोदा । श्लाघ्यें सर्वदा हरिभजनें ॥२१॥
इया मनुष्यलोकाच्या ठायीं । देहधायी जे असती पाहीं । त्यांमाजी श्लाघ्यता तुमचीच कांहीं । लोकीं तिहीं वाखाणें ॥२२॥
तुमचेंचि श्लाघ्य जन्मकर्म । तुमचाचि सफळ सर्व धर्म । बहुतेक तुम्हीच पुरुषोत्तम । निष्काम भजनें तोषविला ॥२३॥
ज्ञानसंपन्न त्रिजगीं साध्य । एक ऐश्वर्यें परम सभाग्य । श्लाघ्यतम तुम्ही त्यांहूनि सुभग । जे पूर्णानुराग भोगीतसां ॥२४॥
तुमच्या पुण्याची नेणिजे सीमा । श्लाघ्यतम हा तुमचाचि महिमा । ज्या कारणास्तव पुरुषोत्तमा । लाविला प्रेमा सुतमोहें ॥३२५॥
जीवसमूहा जो आयतन । यालागीं म्हणती नारायण । जगत्पिता जगत्कारण । तो कृष्ण भगवान अखिलगुरु ॥२६॥
तया श्रीकृष्णाच्या ठायीं । अनुरक्त मति तुमची पाहीं । तुम्हां ऐसीं भुवनत्रयीं । देखिलीं नाहीं विधिशक्रें ॥२७॥
तुमची अभंग कृष्णीं निष्ठा । यालागीं श्लाघ्य त्रिजगीं श्रेष्ठा । ऐसाचि भजेल जो वैकुंठा । तो हे प्रतिष्ठा पावेल ॥२८॥
आपुलें विसरोनि जातिकुळ । विद्या वयसा लावण्य शीळ । निष्काम भज जो गोपाळ । तन्मय केवळ तो होय ॥२९॥
एवं भगवान अखिलगुरु । कर्मसाक्षी नियंतारु । ते हे दोघे सहोदरु । रामकृष्ण प्रत्यक्ष ॥३३०॥
तेंचि अखिलगुरुत्व कैसें । जगत्पितृनियंतृदशे । आणूनि वर्णील तें मानसें । श्रोतीं विशेषें परिसावें ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP