अध्याय ४६ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


मा खिद्यतं महाभागौ द्रक्ष्यथः कृष्णमंतिके । अंतर्हृदि स भूतानामास्ते ज्योतिरिवैधसि ॥३६॥

महाभाग या संबोधनें । यशोदानंदांसि उद्धव म्हणे । तुम्हीं भाग्याचीं याचि गुणें । जें कृष्णीं तनुमनें वेधलां ॥१७॥
खेद न करावा मानसीं । कृष्ण पहा आपणांपासीं । सर्वभूतांच्या हृदयावकाशीं । ज्योति एधसि तेंवि नांदे ॥१८॥
म्हणाल सर्वभूतांतरीं । समान नांदे जरी श्रीहरि । तरी कां भूतें दैवानुसारी । श्रम संसारीं भोगिती ॥१९॥
ऐसी शंका मानाल झणें । काष्ठीं नांदतां हुताशनें । काष्ठ तयासि सहसा नेणे । काष्ठाभिमानें भ्रम भोगी ॥४२०॥
गुरुशुश्रूषासंवादमथनीं । प्रकटे ज्योतिरूप ज्ञानाग्नि । तैं काष्ठत्वदेहाभिमानी । करी जाळूनि शून्यता ॥२१॥
सप्रेम भजन परस्परें । वस्तुसामर्थ्य सहज संस्कारें । मथन घदे तैं हृदयीं स्फुरे । निजनिर्धारें श्रीकृष्ण ॥२२॥
कृष्णज्योति झळकल्या भजनीं । कृष्णप्रभाचि दिवसरजनी । शून्य पदे प्रपंचभानीं । तुम्हांलागोनि ते दशा ॥२३॥
अखंड समाधि तें या नांव । तुम्हां फावली स्वयमेव । आतां किमर्थ साधनीं हांव । देहात्मभाव कां धरितां ॥२४॥
येईन म्हणोनि बोलिला कृष्ण । यदर्थीं शंका धरील मन । जें मातापितरें प्रियतम स्वजन । कां पां त्यागून येईल तो ॥४२५॥
तरी हें ऐसें मानूंच नका । हृदयांतील सांडूनि शंका । यदर्थीं मद्वचनें आइका । स्थिति व्यापकता कृष्णाची ॥२॥

न ह्यस्यास्ति प्रियः कश्चिन्नाप्रियो वाऽस्त्यमानिनः । नोत्तमो नोधमा नाऽपि समानस्यासमोऽपि वा ॥३७॥

मान म्हणिजे देहाभिमान । जो भेदाचें जन्मस्थान । ज्याचेनि आप्त इतर स्वजन । तो निपटूनि ज्या नाहीं ॥२७॥
अमानासि अत्यंत प्रिय । किंवा अत्यंत अप्रिय । दोहींचाही अप्रत्यय । जें तो अद्वय परमात्मा ॥२८॥
अद्वयासि अधमोत्तम । न्यून पूर्ण असम सम । म्हणणें हाचि केवळ भ्रम । तो निस्सीम निखिलाद्य ॥२९॥
माती आप्त कवणा घटा । कीं तंतु अनाप्त कवणा पटा । नभ अनुत्तम कवण्या मठा । कोण्या चोहटा उत्तम तें ॥४३०॥
पाणि कवण्या तरंगा सम । कवण्या बुद्बुदामाजी विषम । कवणे अळंकारीं हेम । स्वपरनाम प्रियाप्रिय ॥३१॥
आपण झालेनि स्वप्नींचीं रूपें । प्रियाप्रियत्वें कोणतें घे पें । तेंवीं अखिलाद्य चिन्मात्र आपें । ब्रह्मांड जोपे भ्रमगर्भी ॥३२॥
यालागीं कृष्ण सर्वांचा आदि । तेंचि श्लोकार्थें प्रतिपादी । सावध होऊनि विद्वद्वृंदीं । पदीं विशदीं परिसावें ॥३३॥

न माता न पिता तस्य न भार्या न सुतादयः । नात्मीयो न परश्चापि न देहो जन्म एव च ॥३८॥

जयापासूनि जिये ठायीं । जन्म पावे जो कां देही । आदिकारण तया दोहीं । लागीं पाहीं म्हणिजेत ॥३४॥
तरी कृष्णासि देहचि नाहीं । मा तो जन्मला कोठोनि कांहीं । माता पिता त्यासि काई । कोणे समयीं कल्पावी ॥४३५॥
कैंची भार्या देहातीता । कैची तयासि पुत्रदुहिता । कैंचा भ्राता आप्त चुलता । द्वैतरहिता कें शत्रु ॥३६॥
म्हणसी प्रत्यक्ष देहधारी । यावत्काळ आमुचे घरीं । आतां वर्ते मथुरापुरीं । मातापितरीं कुळयुक्त ॥३७॥
तरी हें नंदा सावधान । होऊनि ऐकें निरूपण । देहाधारी म्हणिजे कोण । तें लक्शण तुज कथितों ॥३८॥
संचित प्रारब्ध क्रियमाण । या तिहींसि कर्माभिधान । येणें निबद्ध प्राणिगण । देह होऊन विचंबती ॥३९॥
सुखदुःखांचें अधिष्ठान । कर्मनिर्दिष्ट देह जाण । षड्विकारी त्रिधाभिन्न । देवतीर्यग्मनुजादि ॥४४०॥
काम्य सुकृतें देवयोनि । दुष्कृततमें तिर्यग्योनि । पापपुन्यसमतेसरूनी । मनुजयोनि मिश्रकर्में ॥४१॥
देवां तिर्यगांण क्रियमाण नाहीं । पुण्यपापांचा क्षय दो ठायीं । दोन्ही समान तैं नरदेहीं । भोगी सर्वही सुखदुःखें ॥४२॥
सुकृतफळें सुखाभिव्यक्ति । दुष्कृतें घडे दुःखावाप्ति । एवं न चुके पुनरावृत्ति । कर्में भ्रमती बहुयोनि ॥४३॥

न चास्य कर्म वा लोके सदसन्मिश्रयोनिषु । क्रीडार्थः सोऽपि साधूनां परित्राणाय कल्पते ॥३९॥

तें कर्मचि नाहीं कृष्णीं । जें क्रीडार्थ बीजसाधनीं । म्हणसी तरी कां देह धरूनी । जीवनीं भुवनीं अवतरे ॥४४॥
स्वभक्त तारावया कारणें । जगदुद्धरणार्थ क्रीडा करणें । आणि साधूंच्या परित्रानें । आविर्भवणें निष्कर्मा ॥४४५॥
मत्स्य कच्छ वराह सिंह । इत्यादि तिर्यग्योनिप्रभव । दुष्कर्मासि नसतां ठाव । आविर्भव स्वजनेच्छा ॥४६॥
वामन भार्गव भूदेववंशीं । जन्मले महर्षींचिये कुशीं । सुकृतफळाची नसतां राशि । सुरकार्यासी अवतरे ॥४७॥
रामकृष्ण मनुजां घरीं । जन्मले मनुष्यदेहधारी । मिश्रकर्मफळाधिकारी । केवीं चतुरीं मानावे ॥४८॥
जो अविद्याकामकर्मातीत । तोही साधुपरित्राणार्थ । जन्मे नानायोनींआंत । जन्मरहित अयोनि ॥४९॥
अगाधलीलाचरितें करी । श्रवणें पठनें जगदुद्धारी । भक्तां रक्षी दैत्यां मारी । परी निर्विकारी उभयात्मा ॥४५०॥
जन्म धरूनि जन्मातीत । कैसा म्हणोनि कल्पील चित्त । तरी आपुलीच पाहें प्रतीत । कृश्ण तव सुत कीं नोहे ॥५१॥
जैसा जन्मला तुमचे उदरीं । वोरसें क्रीडला तुमचेच घरीं । तैसाचि वसुदेवदेवकीजठरीं । परी नोहे श्रीहरि कवणाचा ॥५२॥
म्हणाल जन्मकर्माविरहित । तरी त्या कैसें क्रीडाचरित । तुम्ही ते सावध ऐका मात । जे माया स्वीकृत गुणमयी ॥५३॥

सत्त्वं रसस्तम इति भजते निर्गुणोगुणान् । क्रीडन्नतीतोऽत्र गुणैः सृजत्यवति हंव्यजः ॥४०॥

गुणातीत कैसा क्रीडे । तरी हें मायांगीकारें घडे । मायमाजी गुण देव्हडे । चिन्मात्र उजेडें प्रकाशी ॥५४॥
अनेकगुणविकार जड । मायेमाजी भरले निबिड । चित्प्रकाशें होती रूढ । कर्ता दृढ  तैं म्हणती ॥४५५॥
जड रामठ अचेतन । शुद्ध साधु करी सेवन । मग तो करू कां गंगास्नान । परी हिंगटपण नवजाय ॥५६॥
कीं कनकबीज विकारवंत । जडत्वें विकाररूपा न येत । सचेतन नर जईं भक्षण करीत । तैं विकार तेथ प्रकाशती ॥५७॥
कीं लटिकाचि स्वप्नभ्रम । परी निद्रावशें मनोधर्म । अधिष्ठूनि करवी कर्म । सम विषम भोगवी ॥५८॥
तैसा निर्गुणही मायावशें । गुणविकारां भजला दिसे । मज गुणकार्य गुणावेशें । करी आपैसें गुणनिधि ॥५९॥
रजोगुणें करी स्रुजन । सत्वगुणें करी अवन । तमोगुणें सर्व निधन । करी आपण अजन्मा ॥४६०॥
म्हणसी मायागुणें निबद्ध झाला । तैं जीवाहूनि कें वेगळा । तरी जो श्रेष्ठीं विचार केला । तया बोला अवधारीं ॥६१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP