मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४४ वा| श्लोक ४६ ते ५१ अध्याय ४४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५१ अध्याय ४४ वा - श्लोक ४६ ते ५१ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ५१ Translation - भाषांतर त्वया विरहिता पत्या पुरीयं पुरुषर्षभ । न शोभते निवृत्तोत्सवमंगला ॥४६॥म्हणती नाथा कंसासुरा । तूं भर्ता या मथुरापुरा । तुझेनि मरणें दीन दारा । पावली धरा वैधव्य ॥७९॥ऐकें गा ये पुरुषश्रेष्ठा । आम्ही तव जाया वरिष्ठा । पुरीसमान भोगूं कष्टां । सौभाग्यभ्रष्टा न शोभूं ॥२८०॥मखरें तोरणें पताका । मंगळवाद्यें गजर निका । तुझेनि मरणें नगरी शोका । पात्र झाली आम्हांपरी ॥८१॥सौभाग्यलक्ष्मीचें कुंकुम । पुसोनि गेलिया दिसों अधम । केवळ वैधव्याचें धाम । झालों परम अमंगळ ॥८२॥मंगलोत्सवा वोहट पडला । अवदशेचा शृंगार चढला । पूर्वाचरणें दोष घडला । भोगणें पडला तो आजी ॥८३॥तव प्रतापें मंगळ धरणी । विलसे जैसी सुभगा तरुणी । वैधव्यदुःख तुझिये मरणीं । हे तव करणी भू भोगी ॥८४॥तेचि कंसासुराची करणी । स्मरोनि विलपती कामिनी । संक्षेपें तें बादरायणि । घाली कर्णीं नृपाचे ॥२८५॥अनागसां त्वं भूतानां कृतवान्द्रोहमुल्बणम् । तेनेमां भो दशां नीतो भूतध्रुक्को लभेत शम् ॥४७॥कंसप्रेताच्या वदनापुढें । हस्त नेऊनि वदती तोंडें । म्हणती केलें कर्म कुडें । तें रोकडें फळा आलें ॥८६॥निरपराध छळितीं भूतें । भूतद्रोह जो घडला तूतें । आजि नृपासन पालथें । पडोनि आम्हांतें दीन केलें ॥८७॥शरीररक्षणा कारणें । वसुदेवदेवकी निग्रहें छळणें । उग्रसेना निगडबंधनें । कार्याविणें तुवां केलें ॥८८॥यादव लाविले दिगंतीं । ब्राह्मण मारिले स्मार्तश्रौती । पतिव्रता छळिल्या सती । दुष्टनिघातीं प्रेरूनी ॥८९॥बाळें मारिलीं जातमात्र । शत्रु केले स्वकुलगौत्र । दैत्यदुरात्मे जोडिले मित्र । अन्यायपात्र झालासी ॥२९०॥भूतद्रोह निरपराध । आप्तस्वजनासीं विरोध । तेणें दुःखाब्धि अगाध । लंघितां प्रसिद्ध अनुल्लंघ्य ॥९१॥तुझिया इत्यादि आचरणें । आम्ही विपत्ति हे भोगणें । भूतद्रोह करूनि कोणें । सुख संसारीं अनुभविलें ॥९२॥प्राणी पीडितां न धरिसी करुणा । शेवटीं पात्र झालासि मरणा । विधवा अनाथा तवांगना । शरण कोणा जातील ॥९३॥तव संगतीं भोगिलें सुख । तें तंव होवोनि गेलें क्षणिक । आतां अगाध दुःख शोक । भोगितां लोक विलोकिती ॥९४॥रक्षावया स्वशरीर । शत्रु केला परमेश्वर । ऐसा बुद्धिमंद जो नर । दुःख अघोर मग पावे ॥२९५॥सर्वेषामिह भूतानामेष हि प्रभवाप्ययः । गोप्ता च तदवध्यायी न क्कचित्सुखमेधते ॥४८॥कृष्ण हा परमात्मा केवळ । भूतमात्राचा स्थितिलयकाळ । ब्रह्मांडगोळप्रभवनशीळ । स्वपक्षपाळ दैत्यारि ॥९६॥त्याची अवज्ञा करितां मूर्ख । कोठें अणुमात्र न पवे सुख । तो त्वां वधावया प्रत्यक्ष । वसुदेवतोक आणिला ॥९७॥धनुर्यागाचें करूनियां मिष । आणिलें कपटें वधावयास । तुझा तव कपटें झाला नाश । केलें दुःखास पात्र आम्हां ॥९८॥ऐशा विलाप करिती नाना । सानुज कंसाच्या अंगना । आणि तैशाच मल्लललना । करिती रुदना सम दुःखें ॥९९॥असो हा दुःखाचा सागर । निरूपितां न लगे पार । यावरी नृपातें व्यासकुमर । सांगे प्रकार तो ऐका ॥३००॥श्रीशुक उवाच - राजयोषित आश्वास्य भगवॉंलभावनः । यामाहुर्लौकिकीं संस्थां हतानां समकारयत् ॥४९॥राया कुरुकंजवनगभस्ति । श्रवणसुभगा परीक्षिति । तुझेनि श्रोतेपणा विश्रांति । माझ्या चित्तीं उचंबळे ॥१॥लोकभावन जो भगवन्त । धर्मस्थापक कमलाकांत । नृपांगना करूनि शांत । आश्वासित निजवदनें ॥२॥शास्त्रनिर्णीत जे निष्कृति । जीतें लौकिकी संस्था म्हणती । ते ते मृताच्या स्त्रियांहातीं । करवी श्रीपति विध्युक्त ॥३॥पुत्रसंतति होती ज्यांसी । त्यांचेनि हातें तत्कर्मासी । करविता झाला हृषीकेशी । धर्मज्ञासी विवरूनी ॥४॥कंस आणि कंसबंधु । समल्ल सर्वांचिया वधू । उत्तरकर्मीं योजूनि सिद्धु । पुढें गोविंदु काय करी ॥३०५॥मातरं पितरं चैव मोचयित्वाथ बंधनात् । कृष्णरामौ ववंदाते शिरसा स्पृश्य पादयोः ॥५०॥उद्धव अक्रूर घेऊनि सवें । सहित संवगडे आघवे । बंदिशाळा वासुदेवें । विजयविभवें ठाकिली ॥६॥कारागारींचे रक्षक दूत । भेणें पळाले समस्त । मातापितरें केलीं मुक्त । निगड त्वरित छेदूनी ॥७॥अनुक्रमेंचि उग्रसेना - । सहित समस्त यादवगणा । करूनि बंधविमोचना । समाधाना पावविलें ॥८॥वसुदेव देवकी उग्रसेन । बंधुवर्ग जो यादवगण । त्यातें स्वमौळें रामकृष्ण । अल्प स्पर्शोनि जल्पति ॥९॥तेणें आनंदले सर्व । फिटला कंसभयाचा ठाव । निर्भय पावती वासुदेव । तंव देवकी वसुदेव काय करिती ॥३१०॥देवकी वसुदेवश्च विज्ञाय जगदीश्वरौ । कृतासंवंदनौ पुत्रौ सस्वजाते न शंकितौ ॥५१॥वसुदेवदेवकी जनकजननी । पुत्रभ्रांति सांडूनि मनीं । प्रत्यक्ष जगदीश्वर जाणोनी । लागलीं चरणीं निःशंक ॥११॥पुत्रबुद्धि रामकृष्ण । मानूनि न देती आलिंगन । बद्धांजलि पुढें ठाकोन । करिती स्तवन पूर्णत्वें ॥१२॥म्हणती जयजय जनार्दना । जगदुद्धरणा संकर्षणा । दैत्यदुर्मदनिर्दाळणा । भवतारणा भगवंता ॥१३॥अनेकजन्मींचा सुकृतसांठा । होता म्हणोनि आलेति पोटा । संहारूनि दैत्यां दुष्टां । आम्हां अभीष्टा भेटविलें ॥१४॥नम्रमौळें हे करिती स्तुति । नयनीं प्रमोदकें स्रवती । हें जाणोनि मां भूपति । काय करिती तें ऐका ॥३१५॥पुढिले अध्यायीं ते कथा । शुक सांगे कौरवनाथा । भाषाव्याख्यान तेथींचें श्रोतां । एकाग्र चित्तां परिसावें ॥१६॥प्रतिष्ठान गोदातटीं । सच्चित्सुखयवैकुंठपीठीं । एकनाथकृपादृष्टी । स्वजनसृष्टी निवविता ॥१७॥चिदानंदप्रसाद तेथ । भक्त लाहती स्वानंदभरित । गोविंदवरदे पूर्णतृप्त । होती समस्त दयार्णव ॥१८॥तें हें श्रीमद्भागवत । अठरासहस्र मुनिप्रणीत । परमहंसीं रमिजे तेथ । उपनिषदर्थ सोलींव ॥१९॥त्यांतील हा दशमस्कंध । पूर्ण झाला कंसवध । चतुर्थ एकादशिनी प्रसिद्ध । श्रोता सावध परीक्षिति ॥३२०॥चव्वेचाळिसावा अध्याय । संपवूनियां शुकाचार्य । पुढील कथेचा अभिप्राय । निरूपील तो अवधारा ॥२१॥माथां ठेवूनि श्रोतयां चरणीं । दयार्णवाची हे विनवणी । सर्वभूतीं चक्रपाणि । लक्षूनि बैसावें ॥२२॥विरोध अथवा अनन्यशरण । झालिया सहजीं भवाब्धितरण । तारूं तेथ श्रीनारायण । होय आपण सर्वस्वें ॥२३॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां समल्लकंसवधो नाम चतुश्चत्वारिम्शत्तमोऽध्यायः ॥४४॥श्रीकृष्णार्पणमस्त ॥ श्लोक ॥५१॥ टीका ओव्या ॥३२३॥ एवं संख्या ॥३७४॥ ( चव्वेचाळिसावा अध्याय मिळून ओवी संख्या १९९०६ ) चव्वेचाळिसावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP