अध्याय ४४ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तं खङ्गपाणिं विचरंतमाशु श्येनं यथा दक्षिनसव्यमंबरे । समग्रहीद्दुर्विंषहोग्रतेज सायथोरगं तार्क्ष्यसुतः प्रसह्य ॥३६॥

खङ्गविद्येचा अभ्यास । परमप्रतापी जाणे कंस । सव्य दक्षिण भ्रमरिकांस । दावी अशेष लाघवें ॥२॥
माथा वाहोनियां वोडण । बैसोनि छेदूं पाहे चरण । सवेंचि करी उत्प्लवन । शिरीं कृपाण हाणावया ॥३॥
शूळप्राय अग्रभागीं । खङ्ग मुष्टी झाडी वेगीं । घाव दाऊनि दक्षिणांगीं । प्रहार वामांगीं करूं धांवे ॥४॥
ऐसा खंडा खङ्गपाणि । कंस परजी मंचस्थानीं । मल्लविद्येची कडसणी । चक्रपाणि निःशस्त्र ॥२०५॥
जैसा ससाणा निःशंक गगनीं । मारी शकुंता झडपोनी । किंवा गरुड महाफणी । समरांगणीं आकर्षी ॥६॥
तेंवि आंगीं न लगतां खड्ग । बलात्कारें कमलारंग । कंसा आंगीं अतिसवेग । उग्रवीर्य झगटला ॥७॥
ज्याच्या उग्रतेजाचा लेश । लाहोनि कृतांतादि अशेष । आंगीं मिरविती उग्रत्वास । तो हा परेश श्रीकृष्ण ॥८॥
झडपेसरिसी पडली मिठी । मुष्टी कवळिली वीरगुंठी । आंसुडितां महाहठीं । वर्तली गोठी ते ऐक ॥९॥

प्रगृह्य केशेषु चलत्किरीटं निपात्य रंगोपरि तुंगमंचात् ।
तस्योपरिष्टात्स्वयमब्जनाभः पपात विश्वाश्रय आत्मतंत्रः ॥३७॥

केश मुष्टी कवळूनि हरि । आंसुडितां दक्षिणकरीं । मुकुट पडला धरणीवरी । झाली विखुरी सुमनांची ॥२१०॥
उच्च मंचाहूनि निकरें । रंगभूवरी टाकिला करें । त्यावरी स्वयेंचि दामोदरें । केलें स्वगात्रें उत्पतन ॥११॥
अनंतब्रह्मांडें ज्याचे उदरीं । तो विश्वाश्रय स्वयें हरि । अब्जनाभि या हेतुमाझारी । सूचना करी शुकवक्ता ॥१२॥
कंसावरी तेणें उडी । घालितां कंस दडपला बुडीं । पतना सरसा प्राण सोडी । पडिली कुडी अचेतन ॥१३॥
कृष्ण नोहेचि परतंत्र । योद्धा लोटूं शके गात्र । लक्षूनि कंसाचें प्राणसूत्र । आत्मतंत्र स्वयें लोटे ॥१४॥
उडी घालितां कंसावरी । कंसप्रेत पडलें समरीं । राहिली युद्धाची अवसरी । गोष्टी पुढारीं अवधारीं ॥२१५॥

तं संपरेतं विचकर्ष भूमौ हरिर्यथेभं जगतो विपश्यतः ।
हाहेति शब्दः समुहास्तदाभूदुदीरितः सर्वजनैर्नरेंद्र ॥३८॥

रंगोत्सव पहावयासी । नागर आले मथुरावासी । निःसंशय त्यां कळावयासी । कंसप्रेतासि हरि दावी ॥१६॥
पाहती रंगभूमीमाझारी । कंसप्रेत ओढी हरि । जेंवि मदोन्मत्त महाकरी । ओढी केसरी निवटूनी ॥१७॥
नरनारींचे बहुधा यूथ । ज्ञातिपरत्वें पृथक्स्वस्थ । बैसले तितुके अकस्मात् । हा हा करीत ऊठिले ॥१८॥
हाहाकार झाला थोर । राजवर्गीं भयातुर । समस्त गजबजिले नागर । म्हणती नृपवर निमाला ॥१९॥
तये समयीं परीक्षिती । परमचातुर्याची मूर्ति । विचारूं पाहे शुकाप्रति । सद्गति दुर्गति कंसाची ॥२२०॥
हें जाणोनि अंतरवेत्ता । भूतभविष्यत्रिकालज्ञाता । प्रश्न न करितां झाला वक्ता । तें येथें श्रोतां परिसावें ॥२१॥

स नित्यदोद्विग्नधिया तमीश्वरं पिबन्वदन्वा विचरन्स्वपञ्श्वसन् ।
ददर्श चक्रायुधमग्रतो यतस्तदेव रूपं दुरवापमाप ॥३९॥

राया पूर्वींच द्वितीयाध्यायीं । गर्भींच असतां शेषयायी । कंस प्रवर्ते तद्वदोपायीं । परि तो ते समयीं असाध्य ॥२२॥
गर्भिणी आणि आपुली बहिणी । वधितां अपकीर्ति सर्वत्र जनीं । यश लक्ष्मीआयुष्यहानि । ऐसें विवरूनि परतला ॥२३॥
तैंहूनि तीव्र भगवद्ध्यान । कंसा हृदयीं लागलें जाण । तो तेणेंचि नित्य उद्विग्न । भयें करूनि न विसरे ॥२४॥
साक्षात् ईश्वर देवकीउदरीं । शंखचक्राब्जगदाधारी । प्रकट होवोनि मजला मारी । वाहे अंतरीं हे धडकी ॥२२५॥
प्राशन करितां पाहे आपा । देखे नारायणस्वरूपा । भयें भावी सत्यसंकल्पा । वदनीं जल्पामाजी स्मरे ॥२६॥
अन्न ब्रह्म विष्णु रस । भक्षण करितां आठवे दंश । स्मरणासरिसा आदिपुरुष । सायुध सावेश पुढां देखे ॥२७॥
चरणचालीं अथवा यानीं । स्वेच्छा विचरों जातां अवनीं । चहूं दिग्भागीं चहूंही कोनीं । दचके देखोनि गदायुध ॥२८॥
निद्राकाळीं शयनीं अवनीं । माजी देखोनि चक्रपाणि । मानसीं भयाची कणाणी । उठे दचकोनि वोथरला ॥२९॥
जागृति स्वप्नीं आणि सुषुप्ती । माजी देखोनि श्रीपति । भयें क्म्साचिये चित्तीं । ध्यानस्थिति दृढ झाली ॥२३०॥
श्वासोच्छ्वासीं देखे हरि । सहज अजपाहंसाक्षरी । वाहतां कंसासी अहोरात्रीं । चक्रधारी पुढां दिसे ॥३१॥
भयें पूर्वीहूनि हा वेध । लागतां मानस हरिरूप शुद्ध । होतें म्हणोनि तो प्रसिद्ध । पावला वध हरिहस्तें ॥३२॥
जया रूपाचें तीव्र ध्यान । भयें भाविलें अनुसन्धान । कंस तन्मय झाला पूर्ण । जें इतरालागून दुराप ॥३३॥
योगयागतपाच्या श्रेणी । करितां जें रूप न पवती कोणी । कंस तद्रूप होवोनी । आनन्दघनीं समरसला ॥३४॥
भिंगुरटीच्या भयें कीटकी । अन्तरींचें ध्यान न टकी । तेही भ्रमरी होय नेटकी । हे गोष्ठी लटकी म्हणूं नये ॥२३५॥
हा तंव चैतन्यघन श्रीकृष्ण । भयें कंसासि करितां ध्यान । कृष्णहस्तेंचि पावला मरण । मीनला सम्पूर्ण कृष्णरूपीं ॥३६॥
यालागीं कंसा कवण गति । करणें न लगेचि हे प्रश्नोक्ति । पुढील कथा परिसिजे श्रोतीं । जे कुरुपती शुक सांगे ॥३७॥

तस्याऽनुजा भ्रातरोऽष्टौ कंकन्यग्रोधकादयः । अभ्यधावन्नभिक्रुद्धा भ्रातुर्निर्वेशकारिणः ॥४०॥

इतस्तता कंसप्रेत । रंगीं कर्षितां कृष्णनाथ । तंव कंसाचे बन्धु दृप्त । आठही त्वरित धांविन्नले ॥३८॥
खड्ग खेटक गदा परिघ । प्रास पट्टिश वज्र अभंग । तोमर मुद्गर शस्त्रें अनेग । घेऊनि सवेग ऊठिले ॥३९॥
घ्या घ्या म्हणोनि कृष्णावरी । सरोख चवताळले समरीं । निर्भय निःशस्त्र कैटभारि । जैसा गिरि घन पडतां ॥२४०॥
चक्रें त्रिशूळ शक्ति लहुडी । एक टाकिती बालें धोंडी । म्हणती कंसाचिये सुडीं । झोडा प्रौढी बळकृष्णा ॥४१॥
अरे हे गोरक्षक मातले । नधरत नृपावरी पातले । नृपा मारूनियां जिंतले । केंवि मिरविती भूतळीं ॥४२॥
आम्ही प्रतापवीरकेसरी । रामकृष्णांतें वधूनि समरीं । नंदव्रजाची बोहरी । करूं पुढारी कंसाज्ञा ॥४३॥
ऐसे कंकन्यग्रोधप्रमुख । अष्टही बंधु धरूनि तवक । वाहिला बंधुत्वाचा अंक । त्यासी उत्तीर्ण व्हावया ॥४४॥
मदोन्मत्त जैसे करी । नधरत लोटले देखोनि समरीं । तेव्हां संकर्षणकेसरी । काय करी तें ऐका ॥२४५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP