अध्याय ४४ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


स श्येनवेग उत्पत्य मुष्टीकृत्य करावुभौ । भगवंतं वासुदेवं क्रुद्धो वक्षस्यबाधत ॥२१॥

जैसा श्येन शकुंतहननीं । क्षोभें निःशंक धांवे गगनीं । तैसा चाणूर मिसळला कदनीं । वळूनि दोन्ही वज्रमुष्टी ॥३६॥
ज्याचें ऐश्वर्य अव्याहत । तो भगवंत वसुदेवसुत । त्याचे हृदयीं मुष्टिघात । ओपी त्वरित चाणूर ॥३७॥
परी त्या न करीच प्रतिकार । वज्रनिष्ठुर मुष्टिप्रहार । वक्षीं साहिले होवोनि सधर । तो प्रकार अवधारा ॥३८॥

नाचलत्तत्प्रहारेण मालाहत इव द्विपः बाह्वोर्निगृह्य चाणूरं बहुशो भ्रामयन्हरिः ॥२२॥

चाणूराचिया वज्रमुष्टि । हृदयीं साहे स्वयें जगजेठी । मेरु न चळे जेंवि वृष्टीं । कीं महाकरटी पुष्पहननें ॥३९॥
तैसा अचळ राहोनि हरि । चाणूरमुष्टि साहोनि समरीं । सवेग त्याचे बाहू धरी । दोहीं करीं प्रतापें ॥१४०॥
बाहू धरूनि उचलिला गगनीं । सव्य अपसव्य भवंडूनी । विक्रम दाविला नागरां नयनीं । तो तूं कुरुमणि अवधारीं ॥४१॥

भूपृष्ठे पोथयामास तरसा क्षीणजीवितम् । विस्रस्ताकल्पकेशस्रगिंद्रध्वज इवापतत् ॥२३॥

बहुधा भवंडूनि चक्रापरी । सुभरें आपटिला भूमीवरी । झाली गात्राची चकचुरी । जयजयकारीं नभ गर्जे ॥४२॥
प्राणाविरहित शरीर । पडिलें विकराळ महाथोर । बाबरझोंटी कंठींचे हार । अलंकार विखुरले ॥४३॥
गौडदेशीं इंद्रध्वज । उत्सव करिती जनसमाज । विशाळ स्तंभ रोवूनि सहज । करिती तद्भुजपताका ॥४४॥
वस्त्राभरणीं पुरुषाकृति । अळंकारूनि आणिती व्यक्ति । पतन पावे उत्सवांतीं । चाणूर क्षितीं तेंवि पडला ॥१४५॥

तथैव मुष्टिकः पूर्वं स्वमुष्ट्याभिहतेन वै । बलभद्रेण बलिना तलेनाभिहतो भृशम् ॥२४॥

तैसाचि अपर मुष्टिकनामा । मुष्टिघातें हाणितां रामा । येरें हस्तें वदनपद्मा । निकरें अधमा ताडिलें ॥४६॥

प्रवेपितः स रुधिरमुद्वमन्मुखतोऽर्दितः । व्यसुः पपातोर्व्युपस्थे वाताहत इवांघ्रिपः ॥२५॥

बलभद्राची ते चडकण । लागतां व्याकुळ झाले प्राण । निर्वाणमूर्च्छा दाटली पूर्ण । गात्रकंपन विवशत्वें ॥४७॥
भडभडां रुधिर वमी तोंडीं । वळली भूतळीं मुरकुंडी । प्राण जातां करपद खोडी । नेत्र भवंडी वैरूप्यें ॥४८॥
चंडवातें वृक्ष उपडे । तैसा पडला सभेपुढें । मल्ल गजबजिले चहूंकडे । कोणी पुढें हो न शके ॥४९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP