मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
चतुस्त्रिंशतितम किरण

दीपप्रकाश - चतुस्त्रिंशतितम किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथायनमः --
धन्य माझी सद्गुरुभूमि । जिला प्रेमें सदा नमीं । राहुनि आपण निष्कामी । करी भक्तिकाम ॥१॥
या भूवरी जो कोणी । उभा राहील सद्भावें झणीं । सद्विचाराची सरणी । चित्ती उद्भवेल तयाच्या ॥२॥
जियेचें अध्यात्मीं जीवन । नीतिधर्माचें सार पूर्ण । जिला नाहीं जन्ममरण । कदा काळीं ॥३॥
सर्व ऐश्वर्यांचें माहेर । सर्व लौकिकांचें सार । सर्व सौख्यांची निकर । मायभूमि ॥४॥
जो ऐहिक सुखा भुलला । त्याचे पुरवुनी कोड सकळ । पुनरपि दावी चिन्मय गोल । हीच ती भूमि ॥५॥
दुर्बलता आणि सामर्थ्य । संपत्ति तें विपत्ति मूर्त । हास्य अश्रु सतत । हें विरोधी भाव ॥६॥
हीं द्वंद्वें उच्छुंखळ । वाहवतां त्या निश्चल । शांति देउनी सांभाळ । करी ही भूमि ॥७॥
जिवित मृत्यूची कोडीं । जेथें सुटतीं गा आधीं । तयाचें मूळ देवी सिद्ध । हीच भूमि ॥८॥
जन्म दुःखाचें सार । येथें सुख नसे तिळभर । या तत्वाची जननी थोर । हीच सृष्टी ॥९॥
विकारा करोनी अविकारी । नेई आत्महृत्सागरीं । दाखवी तत्व - मोत्यांच्या सरी । ती हीच भूमि ॥१०॥
न जाणता भवसागरीं । उडी घेई जो सत्वरीं । त्यातें नौकारूपें तारी । हीच अवनी ॥११॥
षडरी - कंटकें जीव व्याकुळ झाले । प्रेमें बाहता जिनें येणें केलें । अंकीं भक्तपद घेउनी कंटक काढिले । तीच ही प्रेमळ भू माता ॥१२॥
भक्ताच्या सेवनीं जी संतुष्ट । न पाही केवळ जाति गोत्र । ऐसी भूमि पवित्र । हीच असे ॥१३॥
या भूमी ऐसी माता । न सांपडे कोणाहि भक्ता । तिला नसे कोणी चालविता । स्वयंसिद्ध ॥१४॥
इतर भूमि त्या परप्रकाशी । परि सद्गुरुभूमि स्वयंप्रकाशी । हिच्यासम अविनाशी । वस्तु नाहीं ॥१५॥
ऐशा परम पावन भूमींत । जन्म घेई नाथसुत । हें भाग्य तयाचें अद्भुत । खचित आहे ॥१६॥
जय जय वो नाथ - वसुंधर । तूं सर्वांचें निधान खरें । तुझें वर्णवेना यश सारें । मानव जीवा ॥१७॥
मज वाचाही नव्हती पुरती । परि कृपादृष्टीरूप घुटी । पाजून केलास शेवटीं । बोलकां तूं ॥१८॥
रांजणगावीं असतां नाथ । आला चोपडेकर सुत । नाम तयाचें विश्वनाथ । विनवी भावें ॥१९॥
मज कांहीं नियम सांगावे । जेणें गृहस्थाश्रमही होये । योगक्रियेची भीति राहे । हृदयांत ॥२०॥
सद्यः स्थिति भारी बिकट । न साधे गा योगपंथ । तरि व्यवहारासहित परमार्थ । दावीं देवा ॥२१॥
ऐका साधकहो वचन । कां लोळतां प्रपंचीं जाण । स्वसुखाची आठवण । कांहीं ठेवा ॥२३॥
नरदेहा ऐसी श्रेष्ठ । नाहीं योनी अन्यत्र । तीही घालवितां जीवित । व्यर्थ तुमचें ॥२४॥
नरदेहाची शक्ति अपार । त्रिदेवही जिंकी नर । अनसुयेने कुमर । केले जैसे ॥२५॥
नरदेह हा सर्वांचा स्वामी । नरदेहा सर्व नमी । यक्षकिन्नरादि म्हणती आम्ही । नरजन्म घेऊं ॥२६॥
ऐसा नरदेह आहे चोखट । तुम्हीं घालवितां वोखट । याची येईल प्रचीत । अंतकाळी ॥२७॥
तुम्हीं नाथकुळीं जन्म घेतला । परि नाचरितां नियमाला । सकळ जन्म वांया गेला । जाणावें गा ॥२८॥
समुद्रीं जाऊनी कोरडा । राहील तो दीन बापुडा । यासाठीं नित्यकर्माचा विडा । उचलावा ॥२९॥
मी न सांगें प्रपंच सोडाया । न सांगें कष्टतर उपाया । आलस्यातें सोडोनियां । करा नित्यकर्म ॥३०॥
पत्नीसही प्रेमें घ्यावे सवें । परमार्थाचें वळण द्यावें । विषयी मन वळवावें । माझ्याकडे ॥३१॥
आज्ञा द्या विषयवृत्तीला । भेट नाथांच्या पिंडाला । मी आहे समर्थ घ्यावयाला । तुमची दुर्वृत्तीही ॥३२॥
शब्दाशब्दांत राहून । करून घ्याल अकल्याण । सर्व फोल कृतीवांचून । समजावें गा ॥३३॥
तरि नीतिन्यायें वर्तून । करा स्वधर्माचरण । मग पहाल मी कोण । दिव्य नेत्रें ॥३४॥
माझ्या स्वरूपाची ओळखण । नाहीं हो तुम्हा अल्प जाण । तुम्ही ओळखिल्यावांचून । मी अनोळखी ॥३५॥
आचरितां या नियमांसी । सदैव राहीन तुम्हांपाशी । करीन सर्व लीलेसी । तुम्हांसवे ॥३६॥
अजाणत्यासी मी अजाण । जाणत्यासी देईन ज्ञान । आंधळ्यासी आंधळे जन । दिसती जैसे ॥३७॥
नाथ कुलातें दूषण । नका लावूं भक्तगण । तुळशीच्या वनीं धोतरे जाण । निपजूं नका ॥३८॥
तुमच्या पदीं मायेचा कांटा । रूततां मज होई व्याकुळता । तुम्हां सर्वां मिळो सायुज्यता । ऐसें वांछी मम मन ॥३९॥
जों जों तुम्हीं परमार्थ - विन्मुख । तों तों होई मज भारी दुःख । रडतों रात्री किती एक । तुम्हांकारणें ॥४०॥
परि तुम्हां त्याची खंती नाहीं । पशूच बनला हृदयीं । रमता संतत विषयीं । गोमय कृमीपरी ॥४१॥
बेसावध वृत्ती सोडा । चालला आयुष्याचा गाडा । मार्गी लागतां चालेल रोकडा । नातरी खळग्यांत पडेल ॥४२॥
आमुची हे शिकवण । जो करील निष्फल जाण । तरि तो आत्महत्यारा जाण । म्हणती समर्थ ॥४३॥
तीन घटिकांपूर्वीं उठावें । आदरें ध्येयासि वंदावे । मग अजपा जपा घ्यावें । संकल्पयुक्त ॥४४॥
प्रभातींची वेला मंगल । श्वास नियमना उक्त काल । ‘ सोहं हंस ’ जप मंगल । करावा श्वासयुक्त ॥४५॥
‘ ॐ हंसः ’ ही श्वासाची गति । तीच प्राणाची मुख्य शक्ती । आराधितां प्राण ज्योती । प्रगट होई ॥४६॥
सूर्योदया पर्यंत । त्यां संकल्पाची मुदत । ही क्रिया प्रत्यक्ष खचित । दाखवीन ॥४७॥
क्रियाही न सांगतां ये शब्दानें । जें इच्छितील पूर्णपणें । त्यांना प्रेमें सांगणें धर्म माझा ॥४८॥
उक्त क्रियेनंतर । प्रातः स्मरणाचा विचार । भूपावली मधुर । गावी गा ॥४९॥
इष्ट देवतेची काकड आरती । करोनि गावीं स्तोत्रें प्रीती । अथवा नाथसुताच्या प्रभात गीतीं । रमवा मना ॥५०॥
मग प्रातर्विधी करावा । स्नानसंध्येचा लळा लावावा । शुचिर्भूतपणें करावा । हा विधि ॥५१॥
संध्या ही सर्व जातींत । वर्णाश्रम - धर्मानुसार सत्य । आहे परि आचरणांत । कोणीही न आणिती ॥५२॥
जो ब्रह्म जाणे तो ब्राह्मण खरा । केवळ वेषें द्विजत्व न ये नरा । उगीच द्विज - द्विजेतरा । वाद माजविती ॥५३॥
घालोनि सूत्र गळ्यांत । जरि आलें असतें द्विजत्व । तरि सर्वही होतें पुनीत । द्विजरूपें ॥५४॥
संध्येचा विधि पूर्ण होतां । मग पूजावीं आपुली देवता । मानसपूजेचा विधि आतां । सांगेन तुज ॥५५॥
संध्यापात्र पुढें ठेवावें । त्यांत सद्गुरुचरण आठवावें । सर्व पूजेनें पाणी वहावें । दृष्टी भ्रुकुटीं ठेउनी ॥५६॥
षोडश किरणांत मानसीं । पूजा सांगितली तैसी । अंतरींच धरोनी भावनेसी । पूजा करावी ॥५७॥
ऐसे चिंतन पूर्णत्व पावतां । प्रत्यक्ष दिसतील गुरुपद तत्वतां । हें वचन नव्हे अन्यथा । भक्तगणहो ॥५८॥
संध्यापात्रीं जें तीर्थ राहील । तें देऊनी परिजना सकल । मग पुष्प अथवा तुलसीदल । घ्यावें करीं ॥५९॥
गुरुनें सांगितला जो मंत्र । तो लिहावा तीर्थ - जलांत । मुखें म्हणावा मंत्र । सांगेन तो ॥६०॥
“ अज्ञानमूलहरणं जन्मकर्म निवारणम् ।
गुरूपादोदकं पीत्वा महापातकनाशनम् ॥१॥ ”
ऐसा मंत्र म्हणोन । करावें तीर्थ प्राशन । श्रीगुरूनें देतां विभूति जाण । त्यांत टाकावी ॥६१॥
या पूजेनंतर जप करावा । त्याचा विधि सांगेन बरवा । जप हें सर्वांचें मूळ राया । जाण तूं ॥६२॥
पाहिजे गुरूमुख जपासी । नातरी तो उदासी । शास्त्राची रीत ऐसी । कथिली तुम्हां ॥६३॥
जपाचे प्रकार असती तीन । उच्चस्वरें जपती कोणी । कोणी ओष्ठ हालवूनी । तिसरा मनोमय ॥६४॥
या सर्वांत मनोमय जप श्रेष्ठ । तो जपावां अहोरात्र । असो शुद्ध वा अपवित्र । मनोमया दोष नाहीं ॥६५॥
करावा सुखाने व्यवहार । परि मानसें जपावा श्रीहर । मनोलयाचा हा प्रकार । यातें उपांशुजप म्हणती ॥६६॥
जपाचा महिमा विशेष । जप सर्व कार्यांचा कळस । जप प्रकटवी ध्येयास । निश्चयानें ॥६७॥
जपासी काळवेळ नाहीं । जपासी जाति गोत्र नाहीं । असो अस्पृश्य वा स्पृश्यही । तो अधिकारी जपासी ॥६८॥
आधीं ध्येयाचें चिंतन करावें । चिंतनींच जपासी जपावें । मग अनुभवासी चाखावें । निरंतर ॥६९॥
या जपाची संख्या सव्वा कोटी । जो करी भावें पुरती । त्यास भेटेल जगजेठी । ऐसी भाक माझी ॥७०॥
एकोणीस लक्ष जपाची संख्या । पूर्ण करीं बालका । पाहशील प्रेमें कौतुका । परमेशाच्या ॥७१॥
एकोणीस लक्ष्यांचें शेवटीं । पाहशील प्रभुलीला दृष्टांती । पूर्ण होतां सव्वा कोटी । साक्षात्कार ॥७२॥
सव्वा लक्ष जप होतां । करावीं तयाची पूर्णता । अग्नीसि आहुती तत्वतां । द्यावी तुवां ॥७३॥
आधीं तांदुळ धुवावें । त्यांत थोडे घृत टाकावें । हें हवनीय द्रव्य समजावें । या कृत्यासी ॥७४॥
साडेबारा हजार आहुती । द्याव्या वैश्वानराप्रती । मूल मंत्राचे शेवटीं । “ स्वाहा ” म्हणावें ॥७५॥
या हवनाची पूर्तता । विषम दिवशीं करावी सुता ! । पहिल्या तिसर्‍या पांचव्या सातां । दिवसांत करावी ॥७६॥
करीत असतां हवनविधि । चित्त ठेवावें आनंदी । व्रतस्थ रहावें गा आधीं । पवित्र कार्या ॥७७॥
प्रत्येक सव्वा लक्ष जपासी । करावी हवनकृती ऐसी । संकल्प करावा मानसी दंभ दाखवूं नये ॥७८॥
शुचिर्भूतपणें करोनि हवन । विभूति जलाशयीं द्यावी टाकून । हवना वैश्वदेव कुंड जाण । सोईस्कर ॥७९॥
अथवा करावें मृत्तिका कुंड लहान । हवन करितां मूकव्रत धारण । वृत्तीचें करावें पालन । नित्यहीं ॥८०॥
जपसंख्या पूर्ण होतां । हवनासी कांहीं अडचण येतां । न थांबवीं त्याकरितां । पुढील जप ॥८१॥
जपासी असावी तुळसीमाका । अथवा रूद्राक्ष उज्वला । स्त्रियांसि पोंवळ्याची माळा । शुभंकर ॥८२॥
नसावी माळा कांचमण्यांची । अथवा भद्राक्षाची । ती निषिद्ध ऐसी शास्त्राची । ध्वनि असे ॥८३॥
अष्टोत्तरशतमणी माळा घेउनी । ठेवी हात हृदय भुवनीं । बसावें सहजासनीं । स्थित होउनी ॥८४॥
जप होतां परमार्थ - ग्रंथ वाचन । ज्ञानेश्वरी दासबोध जाण । अथवा ध्येयाचें ज्यांत स्तवन । तो विशेष शुभद ॥८५॥
हा प्रातःकाल नियम सारूनी । मग करा रे व्यवहार करणी । सायंकाल होता इष्टकार्या झणी । लागा तुम्ही ॥८६॥
सांयकाळीं सायंसंध्या । मग भोजन सात्विक सदा । रात्रीं पंचपदी स्फूर्तिप्रदा । करावी गा ॥८७॥
मग जप करावा पुनरपी । आळसूं नये कदापि । ही नियमाची रीत सोपी । सांगितली ॥८८॥
श्रीगुरुगीतेचा पाठ । करावा स्त्री - पुरुषें नित्य । तयासी नाही लागत । काल वेळ गा ॥८९॥
पाठासी उत्तम प्रातःकाल । परि परिस्थितीचा पाही काल । मानस जप सर्व काल । हें पूर्वीच कथिलें ॥९०॥

॥ प्राकृत गुरूगीता ॥
अनुष्टुप्छंदः
सांब सांगे भवानीसी, कैलासीं स्थित होउनी ॥
सद्गुरुमहिमा ऐके, कोणा जोनच वर्णवे ॥९१॥
गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुदेव महेश्वर ।
गुरु हाचि परब्रह्म, वंदू त्या गुरुराजया ॥९२॥
अज्ञानांधाचिया नेत्रीं, ज्ञानांजनहि घालुनीं ॥
उघडिले नयन हे ज्यानें, वंदू त्या गुरुराजया ॥९३॥
अखंड मंडलाकारी, व्यापिला जो चराचरीं ॥
दाविले तत्पदा ज्यानें, वंदूं त्या गुरुराजया ॥९४॥
स्थावरीं जंगमीं आहे, नाहीं रिक्त चराचर ॥
दाविलें तत्पदा ज्यानें, वंदूं त्या गुरुराजया ॥९५॥
चिन्मयीं व्यापिला सर्व, त्रैलोकीं सचराचरीं ॥
‘ असि ’ पदा दाविलें ज्यानें, वंदूं त्या गुरुराजया ॥९६॥
सर्वश्रुति रत्नेंही, लोळती पदपंकजी ॥
वेदांत गर्भ सूर्याला, वंदूं त्या गुरुराजया ॥९७॥
जयाच्या स्मरणयोगानें ज्ञान उत्पन्न होतसे ॥
सर्व संपत्तिचा मेरू, वंदूं त्या गुरुराजया ॥९८॥
शांत शाश्वत चैतन्य, गगनातित निरंजना ॥
बिंदुनाद कलातीत । वंदूं त्या गुरुराजया ॥९९॥
स्वामी जो ज्ञान शक्तीचा, तत्वाला भूषवी बहू ॥
भुक्तीमुक्तीचाहि दाता, वंदूं त्या गुरुराजया ॥१००॥
माझा नाथ जगन्नाथ, गुरुमाझा जगद्गुरु ॥
माझा आत्माचि भूतात्मा, वंदूं त्या गुरुराजया ॥१॥
ध्यानाचें मूल श्रीनाथ, पूजेला सद्गुरुपद ।
मंत्र हे सद्गुरु आज्ञा, मुक्ती ही सद्गुरुकृपा ॥२॥
गुरु आदि अनादीही, सद्गुरु श्रेष्ठ दैवत ॥
गुरुहूनि अधिक ना कांहीं, वंदूं त्या गुरुराजया ॥३॥
पदाच्या तीर्थस्नानानें , सप्त सिंधु मिळे फळ ॥
जलबिंदु पदाग्रींचा, अल्पही लाभ दुर्लभ ॥४॥
गुरु हेंचि जगत् सारें, ब्रह्मा, विष्णु महेश्वर ॥
गुरुविना श्रेष्ठ ना कोणी, वंदू त्या गुरुराजया ॥५॥
‘ नेति नेति ’ श्रुती बोले, ऐसा जो वंद्य सद्गुरु ॥
मनानें तेंवि वाचेने, ध्यावा गावा सदोदित ॥६॥
तत्कृपा दृष्टिनें ब्रह्मा, विष्णू मी प्राप्त होतसे ॥
सेवेनें लाभते जीवा, शक्ति अद्भूत केवळ ॥७॥
सद्गुरु भक्तिनें मुक्ती, ज्ञानावांचुनिही मिळे ॥
सद्गुरु नाहिं सामान्य, गुरुमार्गीहि शिष्य तो ॥८॥
कळेना गुरुसेवेचा, मार्ग मानव योनिला ॥
तेंवि किन्नर गंधर्वा, पितरां अमरादिकां ॥९॥
असो ते देव गंधर्व, किंवा पितर यक्षही ॥
नाहीं मुक्ती तयां, जे कां, गुरुसेवा - पराड्मुख ॥११०॥
पार्वती ! ऐक गे आतां, आनंदप्रद ध्यान तें ॥
सर्व सौख्याइ जें देई, भक्तिमुक्तीहि आदरें ॥११॥
निराकारी निराभासी, नित्य शुध निरंजन ॥
नित्यबोध चिदानंद, गुरुब्रह्म नमूं सदा ॥१२॥

श्लोक
हृदयकमलीं शोभे कर्णिका कोमलांगी । बसवि गुरुवरा या आसनीं मध्यभागी ॥ विधुसम चमकें हे गोजिरे ध्यान ध्यातां । पुरविल गुरुराणा चित्सुखादी अभीष्टा ॥१३॥

अनुष्टुप
उत्पत्ति स्थिति संहारी, निदानादिक पंचही ॥
तत्वें शाश्वत ज्यामध्यें, वंदूं तो शिव प्रत्यहीं ॥१४॥
ऐशा श्रीगुरूतें ध्यातां, ज्ञान भेटे तया बळें ॥
तदा कृपाप्रसादानें, मुक्तीही सत्वरी मिळे ॥१५॥
गुरुनें दाविल्या मार्गीं चित्तशुद्धी करीं सदा ।
अनित्य जें दृष्टिला भासे, तयाचा मोह सोड तूं ॥१६॥
सद्गुरु महिमा ऐसा, ऐकोनीही निरंतर ॥
निंदिती निरयीं जायी यावच्चंद्र दिवाकरौ ॥१७॥
श्रुतिचें स्मृतिचें ज्ञान, लाभें सद्गुरु सेवनें ॥
सर्व सौख्यनिधी आहे, सद्गुरु पादपंकज ॥१८॥
नित्य ब्रह्म निराकारी निर्गुणी पाहि सद्गुरु ॥
पूर्णानंदी निराभासी, ज्योतिज्योतींत तो असे ॥१९॥
सद्गुरुच्या कृपायोगें, आत्मारामहि लाभतो ॥
ह्याच सद्गुरु मार्गानें, आत्मज्ञानीहि साधक ॥१२०॥
आब्रह्मस्तम्भपर्यंत, परमात्म स्वरूप तें ॥
स्थावरीं जंगमीं तैसें, वंदू तो विश्वरूपक ॥२१॥
वंदीं त्या सच्चिदानंदा, भेदातीता गुरुवरा ॥
नित्य पूर्णा निराकारा । निर्गुणा आत्मसंस्थिता ॥२२॥
परात्परतरा ध्यावें जो नित्यानंदकारक ॥
हृदयाकाशीं वसे तोची, शुद्ध स्फटीक सम्यक ॥२३॥
स्फटिकीं दर्पणीं जैसे, प्रतिभेचें रूप दिसतें ॥
चिन्मयादर्शही भासे, सोहं रूप शुभंकर ॥२४॥
अंगुष्ठमात्र पुरूषातें, ध्यातां चिन्मय अंतरीं ॥
तयाच्या स्फुरणें येई, सर्व सामर्थ्य पार्वती ! ॥२५॥
अगोचर अगम्यही नामरूपहि ज्या नसे ॥
निःशब्द जाणिजे आत्मा, स्वयंभु गिरिजे ! सदा ॥२६॥
जैसें कुंभक कर्पूर, उष्णशीत स्वभावता ॥
तैसें ब्रह्म हें जाण, स्वाभाविक भवानि ! गे ॥२७॥
सर्वव्यापि असें मीच, भावना दृढ ही करी ॥
कीटकापासुनियां भृंग, तेवि साधक होतसे ॥२८॥
ध्याता होई स्वयें ब्रह्म, गुरुध्यान करोनियां ॥
सर्वस्वी मुक्त तो होतो, नाही संशय यांत गे ॥२९॥
गीर्वाणी गुरुगीतेसी, देउनी रूप प्राकृत ॥
सद्गुरु माधवनाथा, अर्पी मी नाथसुत सदा ॥१३०॥

हा नियम गृहस्थाश्रमीया । आचरितां येईल राया । धरितां एक निश्चया । सहज असे ॥३१॥
उदर सेवेसी तुम्हां । आहे दिवस रिकामा । नाचरितां । याही नियमा । वांया जाल ॥३२॥
माझें पद पहावयासी । सदैव करा या नियमासी । सोडा अवघ्या भ्रमासी । लागा कार्यासी सत्वर ॥३३॥
आतां गुरुवारचा क्रम । तुम्हीं आचरावा उत्तम । शक्यतेनुसार उपवास क्रम । करावा त्या दिनीं ॥३४॥
सायंकालीं पारणें सोडावें । जपादि थोडें आचरावें । नियमांत खंडण व्हावें । हें विहित नव्हें ॥३५॥
मग सर्व परिवारासहित । करावी पूर्णारती भक्तियुक्त । श्रीनाथगीतांजलीत नेमस्त । केली असे ॥३६॥
अथवा आपुलें जें ध्येय असेल । त्याची स्तुतिस्त्रोत्रें गाती रसाळ । मानस पूजेचें तीर्थ विमल । प्रथम करावें ॥३७॥
मज आळवावयासी । गीतांजलीची खेंच तुम्हापाशी । पहाहो या प्रत्ययासी । स्वयें आचरोनी ॥३८॥
पडतां कांही संकट । करावी पूर्णांरती उचित । संकट परिहारी श्रीजगन्नाथ । हें वचन माझें ॥३९॥
नवसाची पूर्णारती कैसी । हेंही सांगेन तुम्हासी । तेरा आण्यांचा खर्च त्या दिवशीं । करावा भक्तीनें ॥१४०॥
आणावी सर्व पूजा । उदबत्ती कर्पूर । प्रसाद समजा । समर्पावीं ऐसी पूजा । पंच गुरुवासरीं ॥४१॥
श्रीकृपेनें कार्यसिद्धी होईल । परि असावें भावबल । त्याविणें सर्व विफल । होईल बाळांनो ! ॥४२॥
प्रपंचाची सेवा करून । हे नियम साधती जाण । आतां तरी अनमान । करूं नका ॥४३॥
योग वाटे तुम्हां कठीण । ज्ञानासी बुद्धीची वाण । म्हणोनि काढिलें शोधून । भक्तीचें सार ॥४४॥
याचा त्याग कराल । आलस्य - शय्येवरी पडाल । तरि तुम्हीच दुर्दैवी व्हाल । आमुचें काय जातें ॥४५॥
श्रीमंत पित्याचा कुमार । जरि निघाला दिवाळखोर । त्यांत दोषी पुत्रचि होणार । जाणावें हें ॥४६॥
सद्गुरु केवळ मार्गदर्शक आहें । तें कर्तव्य मी केले पाहे । आतां सत्वर मार्गस्थ व्हावें । बाळकांनो ॥४७॥
आक्रमितां हा पंथ । तुम्हा वांचवीन नित्य । खळगे अथवा कंटक त्रस्त । करणार नाहीं ॥४८॥
दुर्बलतेचे अश्रु गाळून । गृहीच रहाल जरी बसून । तरि गुरुहि तुमची निंदा जाण । करील गा ॥४९॥
ऐसा कळवळ्याचा उपदेश करी श्रीनाथ योगीश । वळवी भक्त समुदायास । सद्भक्तीकडे ॥१५०॥
श्रीनाथ दीपप्रकाश । जाहली किरणें चौतीस । करी श्रीमाधवनाथ प्रकाश । आपुला आपण ॥५१॥
नाहीं केली योगधारणा । न ठावे मुद्रा आसना । धर्म शास्त्र अवलोकन । रूचलें नाहीं मजसी ॥५२॥
मज वाटे मी ग्रंथ लिहीन । परि नाथे हरिलें माझें ‘ मी ’ पण । नाथसुता निमित्त मात्र करून । लिही आपण ॥५३॥
बंधुभगिनींनो ! पहावें । नाथ कृपेचें फळ कैसें आहे । वाक्शून्यासी वदविलें देवें । करूण दृष्टीनें ॥५४॥
श्रीकृपेनेच हा ग्रंथ । जाहला तुम्हांपुढें प्रगट । एरव्ही मी असमर्थ । सत्य सांगें ॥५५॥
नाहीं केली कधीं क्रिया । नियमाचाही आश्रय । कैसा कळवळला सदय । हें मी नेणें ॥५६॥
गतकालीन संत कवी । ज्यांनीं मिळविली श्रेष्ठ पदवी । त्यांही शालीनता धरावी । हें योग्य ॥५७॥
तैसी नव्हे माझी शालीनता । जैसें आहे तैसें वदतों संता । ज्यांना मी परिचित तत्वतां । जाणतील हें वर्म ॥५८॥
नाथसुताचें कृत्य । या ग्रंथीं कांहीं नाहीं सत्य । माझा कृपाळू समर्थ । तयाची ही लीला ॥५९॥
नाथसुतातें मोठेपण । नका देऊ श्रोतृगण । वृक्षाचें मूळ सोडून । जाऊं नका शाखेकडे ॥१६०॥
यज्ञातें समिधा आणिती । मंत्रोच्चारें त्या शुद्ध करिती । एरव्ही तीं काष्ठेचि असती । जाळायाची ॥६१॥
तैसा नाथसुत कोरडें काष्ठ । परि नाथकृपेचा मंत्र । लागतां झाला पुनीत । ऐसी ही श्रीकृष्णा ॥६२॥
हें महत्व सद्गुरुकृपेचें । नोहें बा नाथसुताचें । करावें स्तवन कृपालक्ष्मीचें । भक्तवृंदें ॥६३॥
पुण्यपतनीं श्रीनाथगृहीं । एक मार्जार असे पाहे । गुरुराणा दुग्धप्रसाद देई । निरंतर ॥६४॥
त्या प्रसादें मार्जारी । आपुलें वृत्तीतें विसरी । न करी कदापि चोरी । अथवा विश्वासघात ॥६५॥
असो दुग्धाचा पेला भरला । कोणी नसो त्यावेळां । परि न जाई चाटण्य़ाला । नाथाज्ञेंवीण ॥६६॥
हें सामर्थ्य नव्हे मार्जारीचें । श्रीसमर्थमाधवनाथाचें । कोण करील मांजरीचें । स्तुति स्तोत्र ॥६७॥
तैसी माझी पशुवृत्ती । घालवी श्रीनाथमूर्ती । भजा भजा हो जगज्योती । माधवनाथ ॥६८॥
पुढील किरणीं किरणानुक्रम जाण । मग दीपप्रकाशस्तवन । श्रीनाथसुत सद्गुरुचरणीं । घेईल विश्रांती ॥१६९॥
इति श्रीमाधवनाथ दीपप्रकाशे नाथसुत विरचिते नित्यनियमकथनं नाम चतुस्त्रिंशतितमः किरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP