मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
पंचविंशतितम किरण

दीपप्रकाश - पंचविंशतितम किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथायनमः --
सद्गुरुनाथें दिलें अभिवचन । परी येईना प्रभु अजून । रूचेना चित्ता त्यावीण । कोठें कांही ॥१॥
घालोनी आंगरखा रूमाल । गळा अंगवस्त्र फिरविलें । कर्णींची हालतीं कुंडलें । ऐसा कैं देखेन ॥२॥
चालण्याची घाई मोठी । सदा आनंदीं तल्लीन वृत्ती । कुणा वाटे चक्कर येती । प्रभूराया ॥३॥
मुखावरीं शोभें मंदहास्य । ऐकुनी बोल चित्तीं उल्हास । भक्तांतरीं अतुल प्रकाश । करी गुरु भास्कर ॥४॥
पायीं नच पादुका वा उपानह । असो भूमि उष्ण तेवीं कंटकमय । परी तैसाची चालून जाय । भक्तरक्षणीं ॥५॥
आतां न येतां श्रीनाथ । करीन नंद्रिग्रामासम दृढ व्रत । ऐसें चिंतीत असता नरसिंग पुत्र । आले नाथराय ॥६॥
जाहला मध्यान्हींचा काल । सर्वांनी पुरविला उदरकाल । परी नरसिंगपत्नी विमल । राहिली उपवासी ॥७॥
श्रीनाथें भविष्य वर्तविलें । तेंचि दृश्यत्वा आलें । मग उद्योगासी लागले । भक्तजन ॥८॥
पूर्वीच सजविलें होते घर । नानापरी हंड्याझुंबर । मध्यें सिंहासन त्यावर । जरतारी बिछाईत ॥९॥
कळतां नाथांचें आगमन । येती धांवुनी नगरजन । जरी तळपला भगवान । सहस्त्ररश्मी ॥१०॥
सोडोनी पडदा अथवा घुंगट । धांवती ग्रामदेवता त्वरित । कटीं घेती कोमल अपत्य । प्रभुदर्शना लवलाहीं ॥११॥
ज्यांची तनू जैसी कोमल वल्ली । जयां न सोसवे उन्हाची झळी । त्या पादचारी होउनी वेल्हाळी । हेती प्रभुपायी दर्शनास्तव ॥१२॥
जरी आर्यस्त्रिया असती सुकुमार । तरी प्रसंगी होती कठिणतर । हा अनुभव येई साचार । पुराणकालापासुनी ॥१३॥
स्त्रीदेवी ही धर्मज्योति । स्त्री ही गृहस्थाश्रमाची शक्ती । स्त्रीवांचूनी नाहीं गति । प्रपंचीं या ॥१४॥
जेथें स्त्री नसें तें गेह । स्मशानासम शून्य होय । जैसें मूर्तीविण देवालय । ओस दिसे ॥१५॥
स्त्रीसारिखा प्रेमभाव । न सांपडे हा निश्चय । स्त्री ही केवळ पूजनीय । भारतियां ॥१६॥
नसतां स्त्रियांचा अवतार । तरी शून्यता सर्वत्र । उदयही पावतें ना विश्व थोर । कदापीहि ॥१७॥
सृष्टी ही केवळ स्त्री जाति । सर्व स्थिरचर तिचें पोटीं । ब्रह्मही न येई रूपाप्रती । मायेवांचूनी ॥१८॥
आहिल्या द्रौपदी सीता । तारा मंदोदरी पतिव्रता । यांच्या स्मरणानेंच तत्वतां । महा पातकें नाशतीं ॥१९॥
आर्य धर्माचें पावित्र्य । राखी एकच स्त्री दैवत । केला स्वाभिमान जागृत । वारंवार तियेनें ॥२०॥
व्रतें उपवास पारणें । हें स्त्रियांचें असें लेणें । सहन करिती तितिक्षासाधनें । सर्व आघात ॥२१॥
स्त्रिया मृत्युला जिंकती । स्त्रिया वीरा प्रसवती । नका करूं हो अवनती । स्त्री रत्नाची ॥२२॥
स्त्रिया भक्तीची मूर्ति । सदा नम्रता स्वीकारीति । सेवा धर्माची महति । जाणती एकची अबला ॥२३॥
प्रेमरसानें जिचें अंतर । सदा असें आर्द्र फार । प्रेम हेंच तिचें सुखसार । धन्य अशा सतीला ॥२४॥
येतां पति उन्हांतुनी कष्टुनी । येई सन्मुख ती शीत चांदणी । “ आणू कां थोडे थंड पाणी ” । ऐसें विचारी मधुवचें ॥२५॥
ऐकोनी हें प्रेम बोल । जरी कठिण हृदयी नर असेल । तरी हृदय तयाचें द्रवेल । होईल श्रम परिहार ॥२६॥
प्रिय बालांचें संगोपन । करिती प्रेमें रात्रंदीन । जरी कष्टविती बालें रडुन । तरी खेद न मानिती ॥२७॥
काढोनी नित्य विष्ठा मुत्र । राखी तान्हुला पवित्र । पुरूष न घेई इतुके कष्ट । काळांतरीं ॥२८॥
स्त्री ही परमार्थ मार्गाची । आहे सहचारिणी साची । जैसी शिकवण पतीची । तैसी होईल स्त्री देवी ॥२९॥
ऐशा स्त्रीरत्नाचा छल । जो पुरूष व्यर्थ करील । तो रौरव नरकीं जाईल । हें शास्त्र वचन ॥३०॥
ऐशा सद्गुण संपन्न बाला । श्रीनाथदर्शना पातल्या । करिती वंदन सद्गुरुला । प्रेमभावें ॥३१॥
गाती निजभाषेची गोड गाणी । करिती । स्तुति नाना शब्दांनी । प्रभुपायांवरी बालकें तान्हीं । ठेविती आनंदें ॥३२॥
विनविती प्रेमें गुरूराया । सुखी राखावें बालां या । मागती चुडेदान । कळवळूंनिया । कर जोडोनी ॥३३॥
पुरवी भक्तांची आवडी । परी घडवी परमार्थ आधीं । कोणा पुजा कोणा व्रतांची उपाधी । देई कळवळूनी ॥३४॥
सहज बोलुनी उपदेश । करी नित्य श्रीयोगीश । स्वार्थ परमार्थाची विशेष । एक वाक्यता करी ॥३५॥
लावोनी द्वारासी अर्गला । श्रीनाथ बसले पुजेला । इतुक्यामाजी एक अबला । विनवी द्वार उघडावें ॥३६॥
प्रभूची जाहली आभासवृत्ती । बालिकेसी प्रेमें वदती । कां गे दूषण देसी मजप्रती । कासया लावूं द्वार तुझें ॥३७॥
तूंच होवोनी मायासक्त । लाविलें आपुलें कपाट । करोनिया कष्ट सतत । तूंच उघडी सत्वरी ॥३८॥
जिचें संसार हेंचि जीवन । तिला कैसें कळालें द्वयर्थी वचन । परी नाथ शिष्य दत्त म्हणोन । होता प्रभुसन्मुख ॥३९॥
दत्त हा संतांचा भक्त । संत हेंच तयाचें सर्वस्व । तो उमजला प्रभुबोलाचा अर्थ । बोले मग विनयानें ॥४०॥
देवा तिच्या द्वारातें । लाविली कडी आपुल्या हस्तें । ती उघडिता सद्गुरूनाथें । मोकळे कपाट ॥४१॥
तुझ्यावांचुनी ब्रह्मद्वार । कोण उघडील योगेश्वर ! । जरी यत्न केले अपार । तरी ते विफळ होती ॥४२॥
ऐकतां दत्ताचें अनुभव वचन । नाथ झाला प्रसन्नवदन । करी कौतुक कुरवाळून । मातेपरी ॥४३॥
मग काष्ठद्वार उघडिले । बालिकेचे हेतु पुर्ण केलें । आपुलें पूजाकर्म संपविलें । गुरूराजें ॥४४॥
नाथ बसतां सिंहासनी । येती भक्त अनेक पूजनी । तेथेही करी अघटित करणी । नित्य नवी ॥४५॥
प्रभुदर्शना आला एक भक्त । तयाचा होता थोटा हात । म्हणे त्वां व्याघ्र बळकट । मारिला रे ॥४६॥
मृगयेस्तव जातां वनासी । भयानक व्याघ्र भेटला तुजसी । वार करितां तरवार खाशी । तुटली अवचित ॥४७॥
ही संधी व्याघ्रें साधुनि । तोडिला तुझा हस्त झणी । मग एक्याच करें झुंझुनी । मारिलें क्रूर पशूसी ॥४८॥
ऐकोनी प्रभूची वाणी । तो वीर गहिंवरला मनीं । तू धन्य रे त्रिकालज्ञानी । जगदीश्वरा ॥४९॥
दहा संवत्सरें जाहली । कोणाही न स्मृति राहिली । परी बापजी ! त्वां कथिली । जैसी घडली आजची ॥५०॥
नाथें करीं सुपारी घेतली । तों सहजीं समाधी लागली । वायूची लहरी उतरविली । अल्पकाळांत ॥५१॥
म्हणे गडावरी आजी गेलों । श्री जगदंबेसी भेटलों । तियेच्या दर्शने झालों । आनंदीत ॥५२॥
कोणा न कळली ही ध्वनी । परी दत्त उमजला तत्क्षणीं । कीं प्रभु आजी सूक्ष्मरूपानीं । गेला असे गडावरी ॥५३॥
जयपूर शहरी एक गड । तेथें देवीचें स्थान प्रचंड । आला होता नाथ योगिवंद्य । तेथुनिया ॥५४॥
कांहीं काळ लोटल्यावर । सहजीं आला किल्लेदार । जो देवीच्या गडावरी अधिकार । गाजवीतसे ॥५५॥
नाथ हंसला त्यासी पाहूनी । प्रतिकृति केली तयानें हंसुनी । भक्तवृंद होती अंतःकरणीं । विस्मित तेधवां ॥५६॥
किल्लेदार विनवी दयाळा ! । अघटित वाटे तुझी लीला । तुझ्या समान पुरूष देखिला । इतुक्यांत गडावरी ॥५७॥
भवानीच्या सन्मुख जाउनि । समर्पिलीं पुष्पें दोन्हीं । मी जाहलों नयन असूनी । आंधळा आजी ॥५८॥
श्रीनाथ समाधीचें कारण । उमजलें सर्व भक्त जन । म्हणती गुरूरायाचें महिमान । कोणाही ना कळे ॥५९॥
प्रभूसी दृष्ट होईल म्हणून । करिती युवती लिंबलोण । कोणी मीठमिरीं ओवाळून । अग्नींत टाकिती ॥६०॥
होते एक ज्योतिषशास्रविशारद । जयांचे नाम पंडित शिवनंद । सांगे फलित ज्योतिष अगाध । सहदेवापरी ॥६१॥
सायन निरयन हे ग्रंथ । असती नित्य मुखोद्गत । राजाश्रय मिळे निश्चित । वंशपरंपरा तया ॥६२॥
तें जयपूर शहराचें भूषण । सर्वही देती त्यांना मान । राजाही करी अभिवंदन । उत्थापन देऊनी ॥६३॥
ऐकोनी योगीराजाची कीर्ती । प्रेमें येती दर्शनाप्रति । जाहला नाथ ज्योतिषशास्त्री । करी वादविवाद ॥६४॥
घेऊनी ग्रंथांचीं वचनें । केले निरूपण प्रभूने । शिवनंदजी मनीं म्हणे । हा नव्हे पढिक जोशी ॥६५॥
केवळ साक्षात्कारी देव । सांगें अंतरीचें हृदय । आजी धन्य भाग्य होय । भेटें मोक्षसुख दाता ॥६६॥
भावें नाथचरणीं लागला । त्यातें देवें अनुग्रह दिधला । मग देवें विचार केला । प्रयाणाचा ॥६७॥
नाहीं झाले दिवस दोन । तोंच निघाला आनंदघन । हें ऐकतां विनविती जन । न जावें योगीश ॥६८॥
रहावें एक सप्ताह तरी । ऐकावी इतुकी विनंति हरी ! । परी नाथ म्हणे आम्हा जाणें सत्वरी । भक्तांस्तव ॥६९॥
देखोनी श्रीगुरूची घाई । दत्तें केली चतुराई । आवरी वस्तु लवलाही । जन क्रुद्ध त्यावरी ॥७०॥
आली एक प्रेमी बाळ । विनवी आदरें दत्ताला । तुम्ही नांवरी आम्हाला । दिसती नाहीं ॥७१॥
जैसें श्रीकृष्णभगवंतासी । नेई अक्रूर द्वारकेसी । नायके भक्तांच्या विनवणीसी । कठोर हृदयी ॥७२॥
तैसें न करावें दत्तराया । राहूं द्यावें देवाधिदेवा । आता अंत न पहावा । जयपूरचा ॥७३॥
तुम्ही येथें आजी राहता । न जाईल सद्गुरु सर्वथा । येवढीं मागणी द्यावी संता । कळवळोनी ॥७४॥
नाथ सदाच तुम्हांजवळी । येथें आला क्कचित काळीं । कां टाकितां दुःखानलीं । बंधूभगिनीसी ॥७५॥
आम्हां दुःखसागरीं लोटून । न्याल जरी करुणाघन । भोगाल तयांचे फल दारूण । ऐका वचन आमुचें ॥७६॥
नका ठेवूं स्वार्थ बुद्धी । स्वार्थानें न येई यश सिद्धी । लावा परमार्थीं मति येवढी । आजीच्या दिनीं ॥७७॥
तुम्ही भक्त तो भगवान । राखील तुमचा सारा मान । तुम्हां आमुच्या गळ्याची आण ठेवूनि घ्या देवासी ॥७८॥
दत्त म्हणे नाथांच्या नियमा । आड न येऊं शके ब्रह्मा । तेथें इतरांच्या पराक्रमा । मोल नाहीं ॥७९॥
पोरी त्या कामिनी चतूर । बोलती बहुत मधुर । ब्रह्मा हें प्रभुचें पोर । त्याची कथा काय ॥८०॥
भक्तांचा ऐसा विक्रम । तो देवासीही करील गुलाम । उठा बंधुराया दुःखतम । निवारा एवढें ॥८१॥
भगिनीचें शुद्ध प्रेम पाहुनी । आला दत्त श्रीचरणीं । सांगितली प्रेमाची कहाणी । गुरुरायासी ॥८२॥
भक्तांचा ठेवावया मान । नाथ म्हणे पूजाविधी करून । होऊं मार्गस्थ आपण । इष्टस्थलीं ॥८३॥
बोलती भक्त परस्परांत । आतां स्तब्ध राहणें उचित । पूजाकर्मासी घटिका सात । अवधि लागे ॥८४॥
इतुकिया अवसरांत । जाईळ निघोनी अग्निरथ । मग राहील सद्गुरु दैवत । अनायासें ॥८५॥
जो जाणे गुपितांतील गुपित । तो कैसा न ओळखेल भक्तचित्त । सारूनी सर्व विधी घटिकेंत । जाहला सिद्ध निघाया ॥८६॥
जैसे दुःक चित्रकुटाहुनी जाता नाथ । तैसेंच जयपूर होई दुःखग्रस्त । आडवे येती जन समस्त । रहावें म्हणती एक दिन ॥८७॥
परी नायके जगन्मोहन । करी रथावरी आरोहण । माझें चिरकाल येथें अवतरण । पहावें एकलक्ष्यें ॥८८॥
कलेवराची करिता माया । तुम्हांस नेईल ती विलया । नित्य ध्यासानें खेंचूनिया । आणावें सन्निध मजलागी ॥८९॥
ऐसा मधुर बोल करोनी । येती ग्वाल्हेरीस निघोनी । तेथेंहि अनेकांसी उद्धरोनी । पुण्यपत्तनीं पातलें ॥९०॥
आला तेथे एक कुमर । ज्याचे नाम असे दिनकर । विनवी देवासी सिंहगडावर । जावे वाटें ॥९१॥
बाळा ! षट्चक्र गडावरी । तूं जाय जाय रे झडकरी । मग तेथें दिसेल सिंहपुरी । दैदीप्यमान ॥९२॥
त्या गडावरी तानाजी केसरी । तुम्ही प्रत्यक्ष बघाल शस्त्रधारी । तेथें शिवरायाचीही स्वारी । प्रगटेल रे ॥९३॥
त्या गडावरी देवटांकें । सदा भरलेलें नेटकें । तें जलपान करावें सुखें । होईल तृप्ती निरंतर ॥९४॥
तो गड आहे केवळ गड । जाहला आजी बेगड । बघोनी तुम्हीही बेगड । होणार काय ? ॥९५॥
ज्या सिंहें तो गड मिळविला । तो चिरकाल तेथेंच राहिला । तो न दिसतां दगडाला । पाहूनि काय मिळे ॥९६॥
आधीं आपण सिंह व्हावें । मग सिंहासी भेटावें । शेळीपरी राहतां जावें । भक्ष्यस्थानीं ॥९७॥
तुम्ही पूर्वी होतां सिंह । परि आज जाहला अजामय । हा संगतीचा परिणाम होय । भक्तराया ॥९८॥
तूं सर्वांचा अससी भूपति । परी वाढला मेंढरांच्या संगती । विसरलासी स्वाभिमान वृत्ती । जाहला मेंढरासम ॥९९॥
तरी सोडुनिया निर्बलता । पाहीं आपुल्या स्वरूपासी सुता ! । मग भोगशील चिन्मयता । सिंहगडाची ॥१००॥
सोडुनी दुबळ्या जीवांचा संघ । घे परमार्थ नंदनवनाचा संग । करितां योग गुंफेचा संयोग । त्यांस सिंह दिसेल ॥१॥
ते तुझ्या स्वरूपाची ओळख । तुज करोनी देखील देख । हें सिंहगडाचें दृश्य मायिक । नव्हे उपेगा खरें ॥२॥
मग बालवृत्ती धरोनी । वदे दिनक्रा गोंजारूनी । तुज सिंहगड भवानी । येथेंच दाखवीन ॥३॥
आपण घातलें सहजासन । बसविला सन्मुख नंदन । म्हणे लावीं आपुले नयन । पाहीं त्रिकूट शिखरीं ॥४॥
मस्तकीं आपुला कर ठेविला । शिष्य तेव्हांच शून्यवत झाला । देहावरी येतां तयाला । विचारी काय देखिलें ॥५॥
प्रभू पायीं डोई ठेवून । सांगे मी देखियलें स्वप्न । गेलों सिंहगडीं आपण । पाहिला गट विशाल ॥६॥
तानाजी वीराची समाधि । वंदिली सतीची मूर्ति साधी । देवटांक्याच्या जलाची गोडी । अपूर्व मज वाटली ॥७॥
तेथें श्रीशिव - देवालय । तैसा उघडा गणेश देव । राजाराम नृप विजय । राही सांबरूपें ॥८॥
घालोनी नयनी ज्ञानांजन । नाथें दाखविला सिंहगड छान । किती वर्णावें यश भगवान ! आपुलें म्यां ॥९॥
करोनी बालकाची इच्छापूर्ति । दाखविली आत्मप्रचीती । तुझ्या लीलेची गती । कोणी जाणती ना ॥११०॥
पुण्यस्थलीं चातुर्मास राहुनी । करिती वास विविध भुवनीं । भक्तमनोरथांच्या श्रेणी । पुरविती देव ॥११॥
नाशिकास येतां दीनानाथ । करी पावन भोसेकर सुत । नानासाहेब नामें वसत । प्रेमळ भारी ॥१२॥
होता महा यंत्रशास्त्रज्ञ अधिकार । परी साधी रहाणी त्यासी प्रियकर । करीं नाना काव्यें सुंदर । परमार्थाचीं ॥१३॥
तयाची कन्या गोदूमाई । जणूं मूर्तिमान् भक्तिदेवी । दुर्दैवाने केली नवाई । विषयपंकी लोटिली ॥१४॥
देखोनी कन्येची दुःस्थिती । नाना अंतरी दुःखी होती । ठेवुनी भार दैवावरती । कंठिती काळ आपुला ॥१५॥
दुःखाच्या विस्मृतीसाठीं । कन्येसी नानापरी बोधिती । गीता - भागवत दासबोध पोथी । देती प्रेमे वाचावया ॥१६॥
माई भगिनी त्यातची रंगली । सुख - दुःखातें विस्मरली । करी मधुतरशी काव्यावली । भक्तिप्रेमयुक्त ॥१७॥
परी फलावीण जैसा तरुवर । किंवा जलावांचुनी विहीर । अथवा पायावीण मंदिर थोर । उपेगा नये ॥१८॥
सूर्य - प्रकाशावीण कमळ । किंवा चंद्राविणे निशाकाल । कर्णधाराविणें नौका दुर्बळ । जाई भलतीकडे ॥१९॥
तैसें सद्गुरुनाथावांचून । कदापि नोहे शिष्यासी ज्ञान । लागली तळमळ म्हणोन । माई भगिनीसी ॥१२०॥
ऐकतां सिद्ध पुरूषाचें आगमन । आली पित्यासवें आपण । ती कथा माईच्या वचनें जाण । रेखाटीन ॥२१॥

अभंग

गोदावरि तीरीं नाशिक तें क्षेत्र । तेथें श्रीसमर्थ पाहियेलें ॥२२॥
तात्यासाहेबांची बहीण धाकुटी । बोलियेली गोष्टी साहजिक ॥२३॥
येथें एक सिद्ध जैसा चंद्रमौळी । जाऊं संध्याकाळीं दर्शनासी ॥२४॥
ऐकुनी ही मात चित्त खळबळें । ध्यान तें लागलें गुप्त रीती ॥२५॥
दिवस सरेना मनही स्थिरेना । सांगवेना कोणा ऐसें झालें ॥२६॥
नावडेची कांहीं श्रीमूर्तीवांचोनी । हुरहुर मनीं वाटतसे ॥२७॥
जैसी कामधेनू चिंतीता धांवली । तैसी स्वारी आली अकस्मात् ॥२८॥
तेजःपुंज मूर्ती पाहोनि वंदिली । परि वाचा गेली बोलवेना ॥२९॥
सर्वहि शरीरीं कंपचि सुटला । नेत्रीं पूर आला आवरेना ॥३०॥
श्रीगुरुदयाळें सर्वही जाणिलें । प्रेमें अवलोकिलें बालिकेसी ॥३१॥
राम राम अक्षरें धरणी पाहिलीं । तीच कानीं मनीं भरियेली ॥३२॥
सांगू नये परी सर्व सांगितलें । स्मरोनी पाउलें तारकाचीं ॥३३॥
पाषाण हा गोटा समर्थे फोडिला । मार्ग तो दाविला उन्नतीचा ॥३४॥
प्राणायामयोग नाहीं शिकविला । नाहीं कथियेला ज्ञानमार्ग ॥३५॥
रामनाम रस ओतिला अंतरीं । तेणें देह चारी वितळती ॥३६॥
दृढ हा विश्वास ठेविला मानसीं । त्याचिया पदांसी नमन माझें ॥३७॥
समर्थ चरणीं देहाच्या पादुका । करूनिया देखां वावरावें ॥३८॥
श्रीसद्गुरुमाउली रामाचें स्वरूप । ठेवूं सुखरूप हृदयांत ॥३९॥
प्रत्यक्ष श्रीराम अवतरूनी आले । दयासिंधु झाले जडजीवा ॥४०॥
पतित मी पापी काय वानूं गूण । निष्काम भजन घेऊं एक ॥४१॥
ऐसे पुनीत करोनी शिष्येसी । येती तियेच्या पितृगृहासी । खेळविती आपुल्या लीलेसी । नित्य नूतन ॥४२॥
एकदां आंग्लवैद्य - विद्यानिपुण । आला प्रभुसी शरण । जयाची कन्या रूपसंपन्न । मिळेना वर तियेसी ॥४३॥
विनवी श्रीनाथ चरणासी । सांगावा कांहीं उपाय यासी । नाथ म्हणे न होय या वर्षीं । आपुलें हस्तानें ॥४४॥
घाबरला मनीं तो ‘ डॉक्टर ’ । देवां ! कांहीं करावा उपचार । जयानें अनिष्ट ग्रह दूर । पळतील गा ॥४५॥
देती नारिकेल फल कन्येजवळी । ठेवीं उशासी निद्रेवेळीं । उठोनी नियमें प्रातः काळीं । करावा जप ग्रहांचा ॥४६॥
त्यायोगें पीडा जाईल । सद्गुणी वरही मिळेल । पित्याच्या मनाचा कल्लोळ । शांतवी दयाघन ॥४७॥
“ तुमचे हस्तें लग्न होईना ” । या ध्वनीचा मतितार्थ कोणा । त्या कालीं कांहीं समजेना । अनुभवेच तो जाणिला ॥४८॥
नवज्वरें पीडिलें वैद्यास । लागले यमदूतांचे पाश । सोडुनी या मृत्युलोकास । जाई परलोकी ॥४९॥
तयाचे हस्तें कन्यादान । नाहीं घडले हें सत्य वचन । मिळाला रूपयौवनसंपन्न । वरही वैद्य - कन्येसी ॥१५०॥
एके दिनीं गोदुमाई । असतां श्वशुरगृहीं पाही । पितृगृहीं आली नाथ आई । ऐसें वृत्त कळलें ॥५१॥
बघाया सद्गुरु आनंदमूर्ति । आली सत्वरीं भोसेग्रामाप्रती । राहिली उपवासी सती । दर्शनास्तव ॥५२॥
दिसतां नथ सुखाचा कंद । पायीं डोई ठेवी अखंड । दत्त वचनें देउनी आर्शिवाद । सांगे वात्सल्ययुक्त ॥५३॥
वत्से ! राहुनी उपवासी । व्यर्थ दंडिसी देहासी । देह हा प्रपंच परमार्थासी । आधार गे ! ॥५४॥
“ ऊठ ऊठ तूं प्रिय बाले । घेई प्रसादाचीं फुलें ” । मुखीं गुलाबपुष्पें घातलें । भक्तवत्सलें ॥५५॥
बघोनी प्रभूचें वात्सल्य । माईचें गहिंवरलें चित्त । विमल । नयनांतून वाहती घळघळ । प्रेमाश्रूधारा ॥५६॥
जन्मदात्या जननीहुनी । जिचे प्रेम अलोट त्रिभूवनीं । ती एकच सद्गुरु - जगज्जननी । हें अनुभविलें तियेनें ॥५७॥
माईचे पितृदेव भोसेकर । सोडिती आपुले कलेवर । अंतीं प्रभुनामें अंतर । रंगवुनी ॥५८॥
तयांचे सुरस पद्य एक । किरणीं ठेवी नाथ - बालक । चाखावा काव्यरस चित्तैक्य । करोनी श्रोतृवृंदानें ॥५९॥

पद ( एडका मदन केवळ पंचानन )

थोर आणि सान । स्मरूं घडिभर नारायण ॥धृ.॥
जो करी सृष्टि निर्माण । तृण काष्ठ तरू पाषाण ।
रविचंद्र तारका गगन । गाऊं तत् गुण ॥१६०॥
कर्मानुरूप परिवारा । दे नरा, घाली संसारा ।
रक्षी हा सर्व पसारा । देउं त्या मान ॥ स्मरूं घडिभर० ॥६१॥
सुखदुःखें तीं जीवींचीं । ही जोड पूर्वकर्माची ।
नको त्यांत भरती पापांची । उमज हें ज्ञान ॥स्मरूं०॥६२॥
कोण वानिल त्याची लीला । दे जीव शक्ति प्राण्याला ।
करि मातृस्तनिं बाळाला । दुग्ध उत्पन्न ॥स्मरूं०॥६३॥
जें घडतें ईशेच्छेनें । अनुसरूं त्या संतोषानें ।
त्याची इच्छा तें कल्याण । समजूं ही खूण ॥स्मरूं०॥६४॥
भक्तांसी पाहि जो कुणी वक्र । त्यासाठीं सुदर्शन चक्र ।
उद्धरीं संकटीं नक्र । दयेची खाण ॥स्मरूं०॥६५॥
कनवाळू भक्तकैवारी । भाव धरितां भवभय वारी ।
स्तवितात वेद ज्या चारी । सेवुं पद जाण ॥स्मरूं०॥६६॥
जो जनक वस्तुमात्राचा । चिच्चालक जड देहाचा ।
संरक्षक या जगताचा । जाऊं त्या शरण ॥स्मरूं० ॥६७॥
नाथसुताचा जन्मदाता । होईल संन्यासी तत्वता । ऐकावी आदरें ती कथा । श्रोतृवृंदें ॥६८॥
सर्व योगांचा स्वामी नाथ । योगी करील आपुले पुत्र । सर्वांसी दावी उच्वल ज्योत । सर्वेश्वर ॥६९॥
जैसी भक्त करील भावना । तैसे देई नाथराणा । किती करावें त्याच्या स्तवना । नाथसुत - वाणी स्थिरावली ॥१७०॥
इति श्रीमाथवनाथ दीपप्रकाशे नाथसुत विरचिते जयपुर प्रवास वर्णनं नाम पंचविंशतितमः किरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP