मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
दशम किरण

दीपप्रकाश - दशम किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथयनमः --
अजिं मद्भाग्य उदेलें । सद्गुरु - प्रभाकर प्रकाशले । भ्रांति रात्रीतें दवडीलें । कृपाळूपणें ॥१॥
या भ्रांती - तमाची कथा सुरस । कथितों प्रेमें संतांस । परिसावी जी सावकाश । श्रोतृजनें ॥२॥
येतां भ्रांति - निशा पटल । म्यां आलस्य - शय्या केली मृदुल । पहुडलों त्यावरी अचल । अज्ञान झोपेंत ॥३॥
तंव एक आली सुंदरी । मज मोही नानापरी । तिजसवें मी क्रीडा करी । मनसोक्त ॥४॥
तिनें मज मोहुनी । आणिलें एक्या भयद वनीं । जाहली गुप्त मग पापिणी । तत्क्षणींच ॥५॥
घातल्या मी येरझारा । बाहिली ती सुंदरा । परी कोणी न देती उत्तरा । मनीं भीती दाटली ॥६॥
फिरतां फिरतां श्रमलों वनीं । विषय - तरूखालीं राहे बसुनी । तों सहा रिपू आले धांवुनी । मज लुटावया ॥७॥
कामें धरिलें शरीर । क्रोधें घेतलें अंतर । मोहें दवडिली सत्वर । चिद्रुप कुंडलें ॥८॥
लोभानें काढून घेतली । माझी मनन - भीकबाळी । मदें निदिध्यास - मुक्तावली । तोडुनी पळविली ॥९॥
साक्षात्कार - रत्नहार । घेई महा मस्तर । मज केला दिगंबर । तत्करांनीं ॥१०॥
पाचारिला विवेक सखा । परी तो पूर्वींच रुसुनी देखा । ब्रह्मांडवनाच्या कौतुका । बघाया गेला ॥११॥
आता विवेकहीनही झालों । तेणें अंतरीं तळमळलों । असहाय्य वनीं सांपडलों । शत्रू - करीं ॥१२॥
मग निर्भ्रांचीती दिशा उजलळी । वैराग्य - अरुणाची स्वारी आली । मज आज्ञापी चिंता सगळी । सोडी बालका ॥१३॥
तुझे चोर पळविले दूर । आतां शंका करी दूर । इच्छिसी तुझें रत्नहार । तरी प्रार्थी सद्गुरु - दिनकरा ॥१४॥
पाठवील तो निज किरण - दूत । सद्भावादि गण समस्त । आणतील शोधून तस्कर दुष्ट । देतील तव वस्तु ॥१५॥
श्री अरुण - वैराग्य देवें । मज कथिलें जीवें - भावें । तदनुसार झाला उदय । सद्गुरुचा ॥१६॥
प्रगटतां सद्गुरुचें तेज । मीहि जाहलों सतेज । विनवी गुरुमहाराज । माधवनाथ ॥१७॥
नाथा तुझा उदय तो माझा उदय । तुझा अस्त तो माझा अस्त होय । तुझ्यावरी माझा काय । आहे अवलंबुनी ॥१८॥
तुझा उदय सदैव होता । परी नील घनांची शाल पांघरता । मजला दिसला अस्तमान ताता । तूं सद्गुरु - प्रभाकर ॥१९॥
असो आतां संदेह फिटला । तूं स्वयें प्रगटला । देई मम रत्नचतुष्टयाला । आणोनी दयाळा ॥२०॥
त्यावीण मी निराधारी । नागवलों सर्वस्वीं हरी । ऊठ ऊठ चातुर्यें करी । तस्करांचा शोध ॥२१॥
नाथ सोडी योग - निद्रा । पाही पदीं बालक वेडा । म्हणे तुज देईन रोकडा । अलंकार ॥२२॥
मम लीला तुझे तस्कर । शोधोनी देतील त्यास मार । करी वाड्मय - नगरींत संचार । तिजसवें ॥२३॥
ऐकोनि प्रभूचें वचन । प्रफुल्ल झाला नाथ - नंदन । श्रीनाथ लीला किरण । घेई आनंदयुक्त ॥२४॥
आतां गांठितो वाड्मय - नगर । श्रोते तुम्हीहि यावें बरोबर । तुम्ही कृपाळू उदार । मज चोर दाखवावे ॥२५॥
गत किरणीं श्रीनाथ प्रबुद्ध । लक्ष्मीनारायण मूर्ति सन्निध । टाकी अज्ञातवास - बंध । तोडूनियां ॥२६॥
मग बोवांनी नाथ सजविला । शिरीं ठेविलें रुमाला । आंगी आंगरखाही पिंवळा । लेवविला हो ॥२७॥
सुवर्णाची पीतकुंडलें सुवर्णासुत्रीं तुलसी - मणि गोविलें । हस्तीं नवरत्न - चक्र बांधिलें । प्रभुरायाच्या ॥२८॥
पिंवळा दिला पितांबर । पिंवळी शालही जरतार । पिवळें गंध भालावर । रामानंदी कस्तुरी ॥२९॥
नेसविलें शुभ्र रेशमी धोतर । उपवस्त्राची तैशी कोर । पायीं चंद्रप्रभाकर । शोभल्या मुद्रिका ॥३०॥
जो स्वयें असे पिंवळा ज्याचा कार्यभाग असे पिंवळा । राजयोगाचा जिव्हाळा । पिंवळाच असें ॥३१॥
ऐसा सजून नाथराव । गांठे तेथून थेरगांव । अमृत वृक्षाखालीं विश्रांतिस्तव । बसला आनंदें ॥३२॥
देखिती जन योगेश्वर । म्हणे कोणीतरी नरवर । तेथील कुळकर्णी शिखरेकर । आणिती गृहीं प्रेमानें ॥३३॥
त्या दिवसापासुनी । नाथ ऐके गार्‍हाणीं । पुरवी भक्ताचे चोज मनीं । नानाप्रकारें ॥३४॥
कोणी येतां दर्शना । आपण होऊनी सांगे त्याची वासना । दावी गृहींच्या सर्व खुणा ॥३५॥
प्रगट होतांचि कल्पद्रुमें । केले दिनचर्येचे नियम । भक्तांसाठीं विविध कर्में । सारिली प्रभूनें ॥३६॥
प्रभातीं उठोनी श्रीराम । करी प्रातः कर्म नियम । मग - धौति - विधि योग - विराम । करी आनंदें ॥३७॥
जो केवळ परम शुद्ध । तो अंतरीं करी शुद्ध । टाकोनी वस्त्रांचे खंड । करी सव्यापसव्य ॥३८॥
श्रोते म्हणती बाह्यांतरी शुद्ध झाला । त्यास धौति - पाश कशाला । वृथा कष्टविणें देहाला । योग्य नव्हे ॥३९॥
श्रोतयांनी आशंक घेतली । ती पाहिजे निरसली । जैसा वेष तैसी केलि । केली पाहिजे ॥४०॥
राजा रंगभूवरी जाई । सेवकाची भूमिका स्वयें घेई । दाविता निजरूप त्याही । जन हांसती ॥४१॥
तैसें नाथ ही परब्रह्म मूर्ति । परी धरिली मानव कृती । तदुपरी निज राहटी । ठेविली पाहिजे ॥४२॥
धौतीनें धुता आंतडी । कफदोषाची होई शुद्धी । जी प्राणवायूची कोंडी फोडी आदरें ॥४३॥
ऐशी धुती सारून । मग कटु निंबाचें करी सेवन । निंब हें भू - लोकीचें अमृत जाण । म्हणती विद्वज्जन ॥४४॥
सेवितां निंबाचीं पत्रे । काया ही अमृत होते । तीस वायूचें मिळता भरतें । सुवर्ण - देही होय नर ॥४५॥
अमृत - पत्राचा घेतां कल्क । साधक होई निष्कल्क । त्यास विष न बाधी निःशंक । विषारी जंतूंचे ॥४६॥
नाथ स्वयें अमृत । त्यावरी घेई अमृत । मग तो प्रभू परमामृत । कां व्हावा ॥४७॥
करी अल्प दुग्ध प्राशन । श्रीनाथ राजयोग - भूषण । दुग्ध - प्राशनाचें महिमान । किती वर्णावें ॥४८॥
दुग्ध हें ओजस वाढवी । दुग्ध वृत्तीला पोषवी । दुग्ध तामसाची यादवी । निर्मूलन करी ॥४९॥
मग येई दरबारांत । कराया भक्तांचे इच्छित । कोणा सहजीं लावी उचित । मार्गावरी ॥५०॥
कोणी असती कामुक । त्यासही सांगे परमार्थविवेक । सांगोनि भक्तीचा दंडक । करी तत्कार्य ॥५१॥
कोणा श्रीगुरुचरित्र । जें धर्माचें सार निश्चित । गृहस्थाश्रमाची पूर्ण वाट । ज्यांत दाविली ॥५२॥
जेथें आर्यांचीं व्रतें । सांगितलीं साद्यंते । भाविकातें निधान भेटे । परिशीलनें ॥५३॥
गुरुचरित्र केवळ कल्पतरू । भक्त - मनोरथाचा आधारू । सांगे श्रीपाद श्रीगुरू । दत्तावतार ॥५४॥
गुरुचरित्र ऐसा वरद । न दिसे दुसरा ग्रंथ प्रसिद्ध । धन्य गंगाधरनंद । करी लोकोपकार ॥५५॥
कोणा सांगे दासबोध - पारायण । तेच नाथांचें प्रियस्थान । दासबोधीं रममाण । नित्य होई स्वयेंच ॥५६॥
सकल तत्वांचें सार । सकल गूजांचे गूज थोर । स्वधर्माचें बीज सुंदर । दासबोधीं लाविलें ॥५७॥
राष्ट्राचा दाखविला संसार । नरजातीस शिकवी धडा थोर । राजकारणाही आधार । समर्थे दिधला असे ॥५८॥
वेदांत धादांत सिद्धांत । शोधोनी सकल शास्त्र । समर्थे काढिले नवनीत । दासबोध - रूप ॥५९॥
प्रचीतीचे शब्द लिहून । आत्म - चरित्र त्यांत गोंवून । केलें उत्तम पक्कान्न । रामदासें ॥६०॥
आबालवृद्धां केला बोध । दावी कर्माचें स्वरूप शुद्ध । ऐसा निःस्पृहपणाचा वाद । अन्यत्र न सांपडे ॥६१॥
या धर्मग्रंथाचें वाचन । नाथ करवी भक्तांकडून । मग करी शुद्ध स्नान । सिद्धनाथ ॥६२॥
राहे नंतर आत्मारामीं । निजपद पूजी स्वामी । मग बाह्य पूजा नामीं । करी योगेश्वर ॥६३॥
घेई पंच प्राणाहुती । केवळ भाताची तृप्ती । न ठेवी इतराची आसक्ती । कंदमुळें तीं ॥६४॥
नाथमूर्ती ही शर्करा । नाथकृतीही मधुरतरा । त्यास कैसी रुचावी शर्करा । बाह्यात्कारी ॥६५॥
ऐसा युक्ताहारविहार । एकदांच करी ईश्वर । मग तांबूलादिक साचार । खाई प्रीतीनें ॥६६॥
नाथा वाटे भातही वमन । परी न ऐकती भक्तजन । गंगागीर स्वामीं चिद्घन । आग्रहें भोजन घालिती ॥६७॥
मग येई पुनरपी आसनीं । निद्रेची करी आटणी । निद्रा न ठावें स्वप्नीं । योगेश्वर ॥६८॥
नाथ कधीं झोंपेना । नाथ झोंपतां सृष्टिही शून्या । म्हणोनी नाथ जागृत राहून । जागवी भक्तराया ॥६९॥
भक्तांचे संकट हरण । हीच वामकुक्षी करी आपण । होवो श्रीमंत वा निर्धन । प्रेम सर्वावरी ॥७०॥
नाथ केवळ भावाचा भुकेला । नाथा न रुचे दंभ सोहळा । शुद्ध बुद्धिला विकला । नाथ माझा ॥७१॥
नाथ पाहे कळवळ्याची जाती । नाथा न आठवे उच्च नीच जाति । भक्तहृदयाची स्फूर्ती । नाथ पाहे स्फूर्तीनें ॥७२॥
घेवोनी भक्तांची कसोटी । नाथ सांठवी बीजें गोमटीं । आपण शिष्य सेवकांप्रति । करी गुरु नाथ माझा ॥७३॥
जो जैसा नाथा भजेल । तैसें फल त्यातें विमल । भगवंताची वाणी अचल । सांभाळीं नाथराय ॥७४॥
भक्तांची आवडी पुरवून । मग सायंसंध्या करी आपण । जो निःसंदेह पूर्ण । परी लौकिक सांभाळीं ॥७५॥
मग माझा नाथ शंकर । सोडी बोधगंगा - धार । तृषितांचे अंतर । तृप्त करी ॥७६॥
सांगे योगाभ्यासिया योग । ज्ञानिया ज्ञान सांग । भक्तियोगिया भक्ति संग । घडवी आदरें ॥७७॥
दाखवी वायूचे खेळ । क्षणांत शरीर सबळ । क्षणांत वायू खेंचून दुर्बळ । रूप दाखवी ॥७८॥
ज्यानें वायुतत्व जिंकिलें । त्यापुढे प्राणवायू बाहुलें । ज्यानें सर्व योगाचें केले दोले । त्यापुढें योग हें सूत्र ॥७९॥
ऐसी दिनचर्या अभिनव । नाथ करी सदैव । या नियमाचा अंतराय । घडला नाही कधीही ॥८०॥
येवो कसाही प्रसंग । परि प्रभू राहिला अभंग । धरी हा एकचि मार्ग । दिनचर्येचा ॥८१॥
जो आहे नियमातीत । नियम हे जयाचे अंकित । तोहि होई नियमयुक्त। लोकास्तव ॥८२॥
ज्या नियमातेम सिद्ध वंदिती । ज्यातें सिद्ध बांधून घेती । त्या नियमाचें महत्व किती । पहावें साधकें ॥८३॥
नियम हें अंतीचें साध्य । नियम हें दैवत आराध्य । नियमेंच यमाचें बंध । तुटतील ॥८४॥
अंतकाळीं वाचा अडे । गात्रांची होतीं लाकडें । नयनावरी शाई चढे । मृत्यूची ॥८५॥
यातनांचे होती पवाडे । नाड्या ओढती भलतीकडे । जीव जीवांतची अडे । रहावया ॥८६॥
ऐशा या कठिण काळी । जो नियमीं असेल भूतलीं । तयाची जागृती सगळी । राहील हें सिद्ध ॥८७॥
यासाठीं गा मनराया । तूं नियमाच्या जा आश्रया । तेणें अंतकालींच्या दुःसहा । वेदना न होती ॥८८॥
जो नियमबद्ध प्राणी । तो श्रीगीतेची वाणी । अंतकाळी स्मरोनी । करील आपुला उद्धार ॥८९॥
तूं केलें अनेक पाठांतर । नियमांचा जरी झाला विसर । तरी तें पोपटापरी निर्धार । समज गा ॥९०॥
नियमास न लागे बहुत काळ । अथवा द्रव्याचें बळ । इच्छा होता प्रबळ । नियमीं सहज स्थिती ॥९१॥
नियम बहुविध असती । परी घ्यावे एका प्रती । जे सद्गुरुनाथ दाविती । तेंच मान्य असावें ॥९२॥
ऐसा सर्वातीत माझा सद्गुरु । नियमाचा करी दृढ अंगिकारू । जैसा रविचंद्राचा प्रचारू । तैसा राहे नियमबद्ध ॥९३॥
थेरगांवी श्रीगुरुनाथ । करिती अनेक सनाथ । देखोनि शिष्य सत्पात्र । बीज तेथे ठेविती ॥९४॥
थेरगांवी असतां आसनीं । नाथें केली अद्भुत करणी । ती परिसावी सज्जनी । अत्यादरें ॥९५॥
अवचित सोडलें स्वस्थान । गेलें पाटिल गृहीं आपण । ज्याचा पुत्र दारुण । यातना भोगी ॥९६॥
पाटील होता श्रीनाथ - शिष्य । श्रीनाथजी हाच त्याचा जगदीश । होवोनी सचिंत - मानस । करी प्रार्थना श्रीगुरुची ॥९७॥
भक्तवत्सला नाथराया । मज कोणीही नसे सखया । तूंचि माझी तातमाया । कैवारिया ॥९८॥
जरी याच ग्रामीं आहेसी । तरी येथूनची विनवी चरणांसी । तूं त्रिकाल ज्ञानी अससी । तरी धांव रे माधवा ॥९९॥
निज देवगृहीं जाऊन । घाली भावें सहजासन । करोनी श्रीगुरूचें ध्यान । प्रार्थी अनन्य ॥१००॥
ऐसा देखतां भक्त संकटीं । त्वरित आली माधवमूर्ती । न करी चिंता आतां चित्तीं । दैन्य तूझें हरपलें ॥१॥
देऊनी भक्तां अभयदान । दिली विभूति अवलोकून । घेतांचि दुःख विमोचन । जाहले पाटीलपुत्राचें ॥२॥
मग आज्ञा दिली शिष्यास । तुमच्या पूर्वजें मारिले ब्राह्मणास । त्याचें फळ आपणास । भोगावें लागें ॥३॥
ब्राह्मणाजवळी होतें धन । ठेविलें त्वत् - पितयापाशीं विश्वासोन । तयानें चित्ती लोभ धरू । मारिला ब्राह्मण युक्तीनें ॥४॥
ब्राह्मण जाहला ब्रह्मराक्षस । तो पीडितो सर्व कुलास । घ्यावें आतां अनुभवास । अस्थी पहाव्या तयाच्या ॥५॥
खोदितां पाटलाचे गृहींचा भाग । तेथें सांपडला अस्थीचा भाग । पाहतां विस्मित जन - भाग । म्हणती अपूर्व वर्तलें ॥६॥
त्या अस्थी घेऊने । पाटलासी पाठवी नाथ झणीं । श्री त्र्यंबकेश्वरा जाऊनी । टाकी गोदातटाकीं ॥७॥
तूं करी रे त्रिपिंडी । त्यातें मुक्ती देई आधीं । मग तुज न पीडी । कदापी हा ॥८॥
ऐकून सद्गुरुचें वचन । श्रीनाथ आज्ञा शिरीं वंदून । करी त्रिपिंडी विधान । विधीयुक्त ॥९॥
पुत्र जाहला रोगमुक्त । होती त्यातें कन्यापुत्र । श्रीचरणीं अद्भुत । प्रेम ठेवी ॥११०॥
जाहले शिष्य सानथोर । अविद्वान तए पदवीधर । सरिता ओढे नाले थोर । मिळती जैसे सागरा ॥११॥
किंवा चंद्रप्रकाशीं मिळती । जैशा अनेक चंद्रज्योती । कीं सूर्यप्रकाशीं काडवाती । मिळोनी जाती ॥१२॥
नाथ - कीर्तीचा सुगंध । करी दाही दिशा धुंद । येई दर्शनाची झुंड । भावयुक्त ॥१३॥
थेरगांवी दुसरे पाटील । आनंदराव नाम विमल । तयाची पत्नी प्रसवली बाळ । पुत्रराया ॥१४॥
परी तीस रोग जाहला । नाथपदां तो भक्त लागला । प्रभूनें तत् गृहांतूनिहि काढिला । अस्थि - समूह ॥१५॥
सुखी करी बाळें बाळंतीण । करवी दान पाटलाकडून । मारुतीचें प्रत्यहीं घ्यावें दर्शन । म्हणोनी आज्ञापी ॥१६॥
दाखवोनी व्यवहार । करवी परमार्थ चतुर । नियमाचे उपजवी अंकुर । नियमेश्वर ॥१७॥
राघोसा नामक गुजराती । करिती वणी ग्रामीं वसती । श्रींचा अनुग्रह घेती । परमार्थ - लोभें ॥१८॥
नाथांचे अपरिग्रह - व्रत । चाललें होतें अव्याहत । शिष्यावांचुनि अन्यत्र । अन्न न सेविती ॥१९॥
त्या भक्तें नेलें सद्गुरुला । वणी - ग्रामा आनंद जाहला । परी कोणाही नच कळला । हाच सप्तश्रृंगीचा वली ॥१२०॥
सप्तश्रृंगीच्या गडाखाली । वणी ग्रामदेवी वसली । नाथमूर्ति अवतरली । अनेकदां येथें ॥२१॥
वणीसही करी नवल । नानासाहेब देशमुख तेथील । त्यांची स्नुषा विकल । जाहली प्रदर रोगें ॥२२॥
ते विनविती या कल्प - द्रुमासी । कृपा दृष्टीनें पहावे स्नुषेसी । प्रभु सांगे सप्त वर्षांची ऐसी । तिज मी पाहतों ॥२३॥
स्नुषा ठेवी पायीं डोई । मज इतुकेच दिन झाले पाही । पीडा भोगीते माझे आई । आतां सोडवी ॥२४॥
नाथदेव मनी हांसले । दिली कन्येसी तीन फुलें । हें खाता तुझे दुःख सरलें । जाण मनीं ॥२५॥
प्रत्यहीं घाली तुळसी प्रदक्षिणा । न करी त्यासमयीं भाषणा । पूजी सदैव श्रीकृष्ण - अंगना । तुळसीमाता ॥२६॥
ऐसा न करितां नियम । रोग बळावेल परम । स्वार्थ परमार्थाचें धाम । मुकशील वो कन्यके ॥२७॥
अवश्य म्हणोनी ती नारी । फुलें खाऊनी व्रत अंगीकारी । रोगाची संपली फेरी । कन्यापुत्र प्रसवली ॥२८॥
शिवलाल दादा वडनेरकर । सवें घेऊनी श्वान थोर । ठेविती डोई चरणांवर । नाथजींच्या ॥२९॥
विनविती भावें योगींद्रासी । पहावें कृपेनें श्वानासी । करी दृष्ट प्रतापासी । घेई चावा अनेकांचा ॥१३०॥
येवो कोणीही द्वारीं । करी दंताचे व्रण शरीरी । त्रस्त झालों याचें असुरी । कृत्य पाहोनी ॥३१॥
तूं सर्व स्थिरचरांचा कर्ता । तुज अशक्य नसे रे समर्था । या श्वानाची वृत्ती आतां । करावी सात्विक ॥३२॥
म्यां भोगिला राजदंड । शापिती मज जन उदंड । हें विकत घेतलें श्राद्ध । म्यांचि आनंदें ॥३३॥
नाथ बोले श्वानासी । सोडावी वृत्ती ऐशी । ताप न द्यावा दादासी । तुमचा अन्नदाता ॥३४॥
तुम्ही एकनिष्ठ चाकर । मग धन्यासी कां कष्ट थोर । पाळावें त्यांचें घर । भुंकोनी केवळ ॥३५॥
हालविली श्वानें मान । पाहती सर्व भक्तजन । जणूं समर्थांचे वचन । मान्य करी ॥३६॥
आणविलीं झेंडूंची फुलें । तयां एका माळेंत गुंफिले । श्वानाचे कंठी बांधिलें । स्वहस्तेंची ॥३७॥
आतां जावें गा घरीं । तूं वेद - पुरुष निर्धारी । सोडी सर्व तामसी लहरी । आज पासोनी ॥३८॥
श्वान झाला निरुपद्रवी । कोणा कदाही न कष्टवी । येतां परस्थ जागवी । भुंकोनी धन्यास ॥३९॥
धन्य धन्य हे योगीराजा । तुझ्या बघोनी अतुल मौज । नवल वाटतें वोजा । निरंतर ॥१४०॥
तुझी कृपा जीवजंतूवर । सर्वांसी तूंच एक आधार । मग श्वानही आज्ञाधार । कां न व्हावा ॥४१॥
मिळावया सार्वत्रिक सुख । करी तेथें हवन एक । सप्तशतीचे पाठक । आणि विद्वान ब्राह्मण ॥४२॥
सप्त - शतीचा ग्रंथ । अद्यापिही असे जागृत । भावें करिती पाठ । अनुभव ये तत्काळ ॥४३॥
लावुनी लोम विलोम । जे भगवती मूळ रूप उत्तम । करवी पाठ लोक - विराम । राम माझा ॥४४॥
सात दिनांचे पाठ होता । स्थापी स्वाहाकारदेवता । शताहुती दे तत्वतां । शतचंडीस ॥४५॥
पूर्णाहुतीचे समयीं । सोडिली घृतधार पाही । ज्वाला उठती दिशा दाही । प्रत्यक्ष देवी प्रगटली ॥४६॥
देवतेचें झालें दर्शन । एकाच सद्भक्ता पूर्ण । ज्याचे काशिनाथ नामाभिधान । शिंपी ज्ञातीचा ॥४७॥
पूर्णाहुती प्रेमें झाली । नाथें अर्पिली साडी चोळी । ती तैसीच राहिली । अग्निकुंडांत ॥४८॥
जेथें प्रत्यक्ष देवी होय । तेथें अग्नि करील काय । परतंत्र होवोनी राहे । हुताशन ॥४९॥
ऐसी लोकोपकार कृती । करोनी निघे जगजेठी । नासिक भूमी पावन करिती । प्रत्यक्षपणें ॥१५०॥
ऐसी सद्गुरु प्रेममूर्ति । पहावी सकल श्रोत्रीं । घेवोनी त्याची प्रचीती । ठेवावा पदीं देह ॥५१॥
गुरु कैसा असावा । हें समर्थे कथिलें सर्वां । दासबोधीं पहावां । दशक पांचवा ॥५२॥
समर्थें कथिलें सद्गुरु - लक्षण । त्यांचें करावें श्रवण मनन । मग तैसा अनुभव घेऊन । करावें वंदन ॥५३॥
जयाच्या प्रतापबळें । अपरोक्ष ज्ञानाचें सुटे जाळें । अज्ञान - अंधार मावळे । दिसे ब्रह्मांड ॥५४॥
जो अनंताची कोडीं । एक्या स्थलीं बैसोनि सोडी । ठेवी शिष्याच्या हृदीं । तोचि सद्गुरु ॥५५॥
सद्गुरुचा अनुभव घ्यावया । व्हावें सच्छिष्य राया । मग चाखावी तुर्या । ज्ञान - गम्य ॥५६॥
तेंही समर्थरायानें । तेथेंच कथिलें स्पष्टपणें । तैंसें नाचरतां अनुमानें । निर्बल होतील ॥५७॥
कोणी अनुग्रह घेती कामनिक । म्हणती त्या योगानें लाभेल तोक । कोणी घेती कायिक । दोष हरावया ॥५८॥
कोणी ब्रह्म - समंधाचें वारें । जावया फुंकोनि घेती कर्णद्वारें । परी नळी फुंकिली सोनारें । त्यासमहोई ॥५९॥
मिळावया धनाचा गोळा । जावया रोगाचा गोळा । विवाहाचा मोठा उमाळा । म्हणोनि घेती उपदेश ॥१६०॥
देऊनिया एक रुपया । म्हणे मज उपदेश द्यावा । आपुला शिष्य करावा । गुरुराया ॥६१॥
कोणी नारळ घेवोनी  । ठेविती गुरुपुढें आणोनी । मज पावन करावे झणीं । म्हणती श्रीगुरुला ॥६२॥
कोणी म्हणती फुंकावे कान । खडीसाखरेचे द्यावे कण । इतुक्या उपचारें ती पूर्ण । झालोंसें वाटती ॥६३॥
परी मंत्र जाई हवेंत । प्रसादाचें होई खत । गुरुची ही अनोळख होत । काळांतरीं ॥६४॥
ऐसा नव्हे बा सद्गुरु शिष्य संबंध । हा अधोगतीचा मार्ग द्वाड । तोडोनी सकळ पाशबद्ध । यावें सद्गुरुसी शरण ॥६५॥
हें ही न साधले जरी । निर्मळ भाव ठेवावा अंतरीं । मग सद्गुरु सर्व करी । शिष्य - काज ॥६६॥
सद्गुरु हाच माझा देव । सद्गुरु हाच माझा शिव । सद्गुरुदेव माझें सर्व । कुलाचार ॥६७॥
सद्गुरु माझी माना । सद्गुरुच माझा पिता । सद्गुरुविण सर्वथा । मज नाहीं सोयरे ॥६८॥
ऐसा सद्भाव ठेऊनी मनीं । व्हावें नाथा लोटांगणीं । निज माळेचें मणी । त्यास म्हणवील ॥६९॥
वाहील त्याची चिंता देईल त्यातें सायुज्यता । त्याचा प्रपंचही सर्वथा । करी नाथराव ॥१७०॥
तो असो आशाबद्ध । वा विषय - कर्दमाचा किडा । परि गुरुपदीं ठेवितां भावशुद्ध । होईल भवपार ॥७१॥
श्रोते हो बोललों मी अधिक । क्षमा करणें मज देख । तुम्ही मायबाप मी बालक । हें नातें स्पष्ट असें ॥७२॥
परी कराया शास्त्रवाद । बोलणें लागे अवघड । चित्तीं किंतु तुम्ही गोविंद । ठेऊं नये ॥७३॥
पुढील किरणीं नाथ । करील नासिक ग्राम पवित्र । मग पळसेग्रामी नाममंत्र । सप्ताह करील ॥७४॥
ती ऐकोनी सोज्वल कथा । तुटतील भवाच्या कथा । मोक्ष लाभेल आयता । मनन योगें ॥७५॥
श्रीनाथ प्रकाशाची किरण - कला । आतां पावेल वृद्धीला । भाव - अंजन घालून दृष्टीला । आणावी शक्ती ॥१७६॥
इति श्रीमधवनाथदीपप्रकाशे नाथसुविरचिते श्रीदिनचर्यानिरूपणं नाम दशम किरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP