मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
चतुर्थ किरण

दीपप्रकाश - चतुर्थ किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरूनाथायनमः --
सद्गुरूनाथा तूं कृपामूर्ति । तव कृपेनेंच येई स्फूर्ति । तव कृपा नसतां त्रिजगतीं । होईल अंधार ॥१॥
चंद्रप्रभा तव कृपा - दृष्टी पाहतां । वृत्ति कमलिनीस येई प्रफुल्लता । प्रभूशिरीं जाऊन बैसे तत्वतां । ऐसी तियेची कीर्ति ॥२॥
मजजवळीं कृपानिधान नसतें । तरी मग कोण विचारितें । जडहि मज धिःकारितें । ठायीं ठायीं ॥३॥
तुझ्या कृपेचें दिव्य सुदर्शन । मज रक्षी रात्रंदिन । ना तरी षडरींचें कारस्थान । पूर्ण विजयी होतें ॥४॥
तव कृपेचे घेवोनी रथ । जाईन गा योजनें शत । तव कृपा साध्य करणें निश्चित । हाच माझा पंथराज ॥५॥
जेवी समुद्रावरी कराया प्रवास । सिद्ध केली नौका विशेष । परी कर्णधारावीण उदास । तेवीं तव कृपेविण ॥६॥
सजविली सुंदर नोवरी । तिच्या भाळीं तिलक नसे जरी । ती त्याज्य सर्वतोपरी । तेवीं तव कृपेविण ॥७॥
तरी त्या कृपेचें ठिकाण । मज दाखवी नारायणा । येतो काकुळती चरणा । प्रेमभावें तुझीया ॥८॥
झाला नाथ प्रसन्न । म्हणे करी मम लीलेचें वर्णन । हेंचि तव कृपास्थान । शोधोनी पाही ॥९॥
गत किरणीं श्रीनाथ । करी अलौकिक कृत्य । सद्यः किरणीं वाढवीत । भागवत महिमा ॥१०॥
माधवास भजनांची आवडी । नाम गजर करी घडोघडी । नामाविण पळही जाऊं नेदी । बालयोगी ॥११॥
नाम हेंचि जीवन । नाम हेंचि सायुज्य साधन । नाम ही भक्तीची खूण । अंतरीची ॥१२॥
नाम हें भवसागर तारूं । नाम हें मारी भवकुंजरू । नाम पाडील हो विसरू । सर्व रसां ॥१३॥
नाम जपे श्रीशंकर सर्व युगां नाम हें आधार । नामाचा महिमा ज्ञानेश्वर । वाढवी कलीयुगीं ॥१४॥
वाढलें कर्माचें थोतांड । माजलें वादाचें बहुत बंड । म्हणोनी ज्ञानदेवें घेतला दंड । हरिनामाचा ॥१५॥
त्या दंडातें नामदेव संत । करी स्थापन भारतांत । जरीपटक्याचा ध्वज फडकत । वरी तुकयाचा ॥१६॥
आधीच नाम हे मानस - सरोवर । त्यांत माधव हंस पोहणार । मग श्रोतृवृन्दहि जलचर । कां न व्हावा ॥१७॥
ऐकोनी माधवाचें भजन । सर्व श्रोते होती तल्लीन । विसरती देहभान जाण । आपुलाले ॥१८॥
पांगरीस असती भजन मेळे । तेथें जाऊन नाथ खेळे । प्रेमानंदें नाचे डोले । भजनरंगी ॥१९॥
जन म्हणती ही नवलाई । नव वर्षांची बालमूर्ती ही । नाना रागरंगात गाई । ताल सुस्वर ॥२०॥
याचा गुरु कोण । ज्यानें केला तानसेन । तो वाटे धन्य धन्य । त्रिलोकीं या ॥२१॥
एक म्हणती तो स्वयेंच गुरु । त्यास कोणी न लागे थोरू । ऐसा अद्भूत किमयागारू । नाथ होई ॥२२॥
सदा अभंगाचा नाद । नाथास अभंगांची आवड । जेथें जाई तेथें हाची छंद । गाई गोड गीतांत ॥२३॥
‘ नाथसखा विसरू नका ’ । हा भजनाचा धरी ठेका । यांतच स्वरूपीं राही देखा । माधव कुमर ॥२४॥
एके दिनीं भजन - मंडळ । करी ललिताचा खेळ । दाविती हरिलीला विमल । नटवेषें ॥२५॥
माधवा म्हणती तूं घेई सोंग । येरू वदे मज नको हे ढंग । तूं प्रत्यक्ष गोरक्ष होई मग । ऐसें कौतुके विनविती ॥२६॥
ऐकतां गोरक्षाचें नाव । नाथ विसरला देहभाव । म्हणे माझी शैलीश्रृंगी आणावी । जातों सोह्म् - भिक्षेला ॥२७॥
आणारे माझी कोपिन गांठितों प्रमिलेचें भुवन । जागवितो सद्गुरु चरण । अल्लख घोषे ॥२८॥
नाथ भूषणांनीं शोभवी काया । गेला रंगभूवरी गावया । ‘ अल्लख जागे गुरुजी गोरख आया ’ । हें पद्य गाई माधव ॥२९॥
बाळमूर्ति गातां स्थिर झाली । वृत्ति ठायींच निमाली । तेथेंच समाधि लाविली । योगेंद्रानें ॥३०॥
देखोनी हा चमत्कार । घाबरती परिजन फार । म्हणती दृष्टावलें पोर । आतां कैसें करावे ॥३१॥
आणिती लिंबू जाऊन । करिती नाथास लिंबलोण । पंचाक्षरी बोलविती धांवून । मंत्राक्षदा टाकिती ॥३२॥
कोणी म्हणती दृष्ट काढा । कोणी म्हणती कुक्कुटकंठ मोडा । कोणी सांगती मरीआईस रोडगा धाडा । म्हणजे बाळ उठेल ॥३३॥
ऐसे नाना तर्क करिती । तामसी यत्नांची होई पूर्ति । मायेंत सारे गुरफटती । खरें तत्व निराळेंचि ॥३४॥
मग नाथें वायु उतरविला । पाहतां नयनीं हा सोहळा । बालस्वभावें हंसूं लागला । म्हणे काय करितसां ॥३५॥
त्या दिवसापासून । नाथ ललिती न जाई आपण । जनही गेले भेदरून । म्हणती नको ही कटकट ॥३६॥
कांहीं काल लोटल्यावरी । मल्हारदादास येई ज्वर । त्यांतची कैलास शिखरीं । जाई तो महात्मा ॥३७॥
मथुरा मातेवरी दारूण । कोसळली कुर्‍हाड आकाशांतून । म्हणे देवा केलीस कुटकरणी । आघात हा सोसवेना ॥३८॥
तूं नेणसी माझ्या प्राणेश्वरा । फिरविला संसारावरी नांगर । मज नेतासी जरी ईश्वरा । तरी भलें होतें ॥३९॥
कुलस्त्रीस पति हें दैवत । पति - पूजन हें तियेचें व्रत । पतीचें भोजन उच्छिष्ट । हेंच पक्वान्न तियेचें ॥४०॥
ऐसा नानापरी शोक करी । आपटी कपाळ धरणीवरी । म्हणे मी आतां सहगमन करीं । कोणी न आड यावें जी ॥४१॥
जातां पति मम चैतन्य । जाहला देह काष्ठासमान । आतां काय करावें ठेवून । मृत्तिकेसी ॥४२॥
घेंवोनी पतीस अंकावरीं । बसेन चिता - सिंहासनावरी । लावीन मळवट सौभाग्याकारी । मज निरोप द्यावा ॥४३॥
ऐसे विनवी परिजना अबला । नेत्रीं चालल्या अश्रुमाला । बघोनी ऐशा करुण दृश्याला । पाषाणहि द्रवेल ॥४४॥
देखोनी मातेचा विलाप । जाई माधव समीप । दावी ब्रह्मज्ञान दीप । बाळ बोले ॥४५॥
जैसें नृसिंह सरस्वती देवें । मातेसी ज्ञान कथिलें बरवें । तैसें बोधिलें नाथदेवें । जननीसी ॥४६॥
जाऊन बैसे लडिवाळपणें । कंठी मिठी मारिली बाळानें । म्हणे मज अंकावरी घेणें । जननीगे ॥४७॥
मग सन्मुख बसे जाऊन । पाही नेत्र टवकारून । जणूं संचरला भगवान । बोधरूपें ॥४८॥
कासया शोक करिसी आई । तुज कोण सोडुनी जाई । तुझें तुजपाशींच आहें । पाहीं नेत्र उघडोनी ॥४९॥
कोण कुणाचा पती । कोण कुणाची असे पत्नी । याचा विचार करीं चित्तीं । विवेकानें ॥५०॥
तुज पति कधी नव्हता । तुज पत्नीपणही नव्हतें तत्वतां । मग कां करिसी आकांता । अज्ञानत्वें ॥५१॥
माते कलेवर हें भाड्याचें घर । त्याचा मालक आत्मा थोर । तो गेला दुसरें मंदिर । शोधावया ॥५२॥
पाही वो दृष्टि उघडून । सर्वत्र तूंच भरलीस जाण । मग तुझा पति अंतरून । जाईल कैसा ॥५३॥
देह ही अभ्राची साउली । क्षणभंगुरत्वाची खोली काल - वायूनें निरसितां उरली । आकाशरूप ज्योति ॥५४॥
लटिकाची हा सर्व व्यवहार । लटिका सारा संसार । उगीच नसतां अभिमान थोर । माझें माझें म्हणूनी ॥५५॥
जैसीं बाळें भातकुली खेळती । काष्ठपाटांची घरें बांधिती । आनंदाने संसार करिती । तेवढ्याच स्थलीं ॥५६॥
घेवोनी वस्त्रांच्या बाहुल्या । त्यांस बांधिती मुंडावळ्या । म्हणती नवरानवरीचा लग्न सोहळा । करूं या साजणी ॥५७॥
करिती आनंदें मंगल विवाहा । बोलाविती व्याही जांवया । तेवीं सकल सोयरियां । समारंभासी ॥५८॥
घालिती लटुपटीचें भोजन । किंवा सत्तूचें पक्वान्न । होती याआनंदीं तल्लीन । योग्यापरी ॥५९॥
इतुक्यांत दुसरी दिसतां मौज । सोडुनी जाती वधुवरां सहज । मोडिती आपलें गृह ताजें । जें इंद्रभुवनापरी होतें ॥६०॥
ही बाळांची त्यागी वृत्ति । पाहोनी येई जागृती । जे लीलेनें सहज शिकविती । माया कार्य ॥६१॥
माते सोडी हें दुःख दरुण । करी स्वरूपानुसंधान । तुझें हरपलें ध्येय जाण । हृदयमंदिरीं ॥६२॥
ऐकोनी शिशूचा आत्मबोध । माता सोडी शोक संवाद । घेवोनी अंकावरी बालक सिद्ध । भेटें त्यातें प्रेमानें ॥६३॥
माता म्हणे कुमारासी । तूं मातें ईश्वर गमसी । परी केवळ पुत्र झालासी । लौकिका - कारणें ॥६४॥
तुवां बोधिलें जें मजसी । तें ठसावलें हृदेशीं । धन्य मी माझ्या कुशी । योगिनाथ जन्मला ॥६५॥
केले सकल संस्कार । दानें दीधलीं अपार । चालविली आपुली कष्टतर । देहयात्रा ॥६६॥
नाशिक प्रांती सटाणें गांव । तेथें होता यशवंत देव । मामलेदारी करीं अभिनव । धन्य तो गृहस्थाश्रमीं ॥६७॥
गृहस्थाश्रमाचें वर्णन । करी भर्तृहरि कविभूषण । त्याचा मतितार्थ सांगेन । प्राकृतांत ॥६८॥
सदा आनंद ज्यांचे चित्तीं । गृहीं असे विपुल संपत्ती । कन्यापुत्रही नांदती । प्रेम भावें ॥६९॥
कांता बोले मधुर वचन । पतिसेवेसी तत्पर जान । जी गृहिणी हें नामाभिधान । सार्थ करी ॥७०॥
लाभती उदार सन्मित्र । जे प्रेम ठेविती सर्वावस्थेत । सेवकसमूह वर्तत । आज्ञेनुसार ॥७१॥
सदा चाले अतिथीपूजन । मिळे भोजन मिष्टान्न । महेशचरणीं तन - मन - धन । वाहती प्रेमें ॥७२॥
करिती संतसमागम । संत हें तयांचें विश्रामधाम । हाच गृहस्थाश्रम उत्तम । जाणिजें सर्वथा ॥७३॥
परी ऐशा गृहस्थाश्रमाचें सौख्य । क्कचितांत भोगी नर एक । इतर ते सोशिती दुःखे अनेक । कर्मानुसार ॥७४॥
म्हणोनी ऐशा आपत्कालीं । ठेवावी वृत्ति स्थिर आपुली । गुंतूं त्यांत नये कदाकाळीं । मुमुक्षूनें ॥७५॥
हें कार्य वाटेल प्रथम जड । परी करितां अभ्यास दृढ । देईल यश गोविंद । गृहस्थाश्रमीं ॥७६॥
ऐशा गृहथाश्रमाचा पंथ । चालवी महाराज यशवंत । कोणा न दुखवितां सावचित्त । राहे अंतर्यामीं ॥७७॥
देखोनी साधूचें शुद्धाचरण । नमिती भाविक अभाविक जन । प्रेमें घालिती लोटांगण । यशवंत पदीं ॥७८॥
यमनियमाचें करोनी पालन । करी अचल सेवा तो मुनि । परी अंतरी अंतर रुझवुनी । राहे सदा स्वानंदी ॥७९॥
गौरजनही होती चकित । म्हणती त्यातें ख्रिस्त सत्य । कोणी मानिती प्रेषित । परमेशाचा ॥८०॥
तो देवगृहींचा मामलेदार । म्हणोनी म्हणती देव मामलेदार । औदार्यी कर्णाचा अवतार । शांती तुकया परी ॥८१॥
यशवंताचें औदार्य थोर । लाजवी तो धनिकां उदार । कथितो एकच प्रसंग सुंदर । सादरें परिसावा ॥८२॥
एके दिवशी यशवंत मूर्ति । जाई देव दर्शनाप्रति । सवें आपुली पत्नी घेती । जी प्रत्यक्ष देवता ॥८३॥
परतोनी येता मंदिरीं । भेटला एक ब्राह्मण भिक्षेकरी । म्हणे ऐकोनी औदार्याची भेरी । आलो भिक्षेस्तव ॥८४॥
मज येथेंच भिक्षा एक द्यावी आपण । भिक्षापात्राचा अपमान । करितां जाईल ब्रीद जाण । आपुलें जीं ॥८५॥
चिंता पडली यशवंताला । नव्हता जवळी फुटका अधेला । विनवी ब्राह्मणातें चलावें गृहाला । देईल यथाशक्ति ॥८६॥
परी तो द्विज न ऐके वचन । म्हणे मी न पाही परतोन । द्यावी यावर नथ काढून । पत्नीच्या नाकांतुनी ॥८७॥
याचकाची ऐकोन याचना । प्रसन्न झाला यशवंतराणा । प्रियेसी म्हणती तुष्टवी साजणी । अतिथी महाराजा ॥८८॥
जवळी होते भक्तजन । म्हणती हा ब्राह्मण लटिका जाण । याते देऊं नका दान । रत्नालंकार ॥८९॥
मातुश्रींच्या शरीरावर । आहे एवढाच अलंकार । तोहि देणें अविचार । नका करू स्वामिया ॥९०॥
देवी म्हणे माझा अलंकार । माझ्या कपाळीं आहे सुंदर । हें चंचल विनाशी घर । ठेऊन काय करूं ॥९१॥
काढोनी नथ हिर्‍यांची । तृप्ती केली ब्राह्मणाची । धन्य त्या उभयतांची । होते साक्षात् लक्ष्मीनारायण ॥९२॥
ऐशा महासाधूचें दर्शन । घ्यावया जाती अनेक जन । प्रत्यहींच होई यात्रा रात्रंदिन । सटाण्याची ॥९३॥
वंदाया साधूचरण । माता जाई माधवास घेऊन । देखोनी मातापुत्र दोघे जन । येती सामोरे यशवंत ॥९४॥
हंसून म्हणती श्री महाराज । अरे हा गादीचा मालक आज । गृहीं चालुनी आला सहज । यातें फार फार सांभाळा ॥९५॥
नेलें प्रेमे माधवास । बसविलें गादीवरी त्यास । विचारी कुशल प्रश्नास । जणूं जिवलग भेटला ॥९६॥
मथुरा मातेनें केले वंदन । म्हणे करावें बाळाचें रक्षण । देव सांगे अंतरींची खूण । हाच उज्जनीचा प्रसाद ॥९७॥
पटली ओळख देवीस । विनवी कर जोडुनी साधूस । त्यावेळीं आपणची जगदीश । यतिवेषें येणें केलें ॥९८॥
दिधला कन्येतें पुत्र प्रसादी । तेवी श्रीमहादेवाची पिंडी । आतां गृहस्थाश्रमाची कुडी । घेतली गा ॥९९॥
तुम्ही संत केवळ ब्रह्मरस । सर्वात आपुला आहे वास । जैसी मूल तैसा वेष । घेतसां जी ॥१००॥
दीधला आपण कन्येतें वर । परी पुत्र दिसे वेडा फकीर । नाहीं चिंता तया तिळभर । निज देहाची ॥१॥
न जाई नित्य शाळेंत । न बैसे कधीं गृहांत । सदा सेवी एकांत । शिवालयीं ॥२॥
जैसा चुकलेला फकीर । सांपडे मशीदींत सत्वर । तैसा माधव अनिवार । सांपडे मंदिरात ॥३॥
तरी त्यासी देवें तारावें । काम्हीं सन्मार्गीं लावावें । वडिलांचे नाव राखावें । माधवानें ॥४॥
मज पुत्र असती चार । परी हाचि करी विडेचार । तूं अनाथांचा दातार । पुरवी आस आमुची ॥५॥
धन्य माधवाच्या कौतुका । दिधला मातेसी अनुभव इतुका । परी देई मायेचा गिरका । क्षणोक्षणीं ॥६॥
ऐकोनी मातेच्या वचना । गदगदा हंसला योगीराणा । म्हणे बाई तुझा कान्हा । मार्गावरीच असे ॥७॥
तुज वाटे तो वेडा पीर । परी पीर नव्हे पीरेश्वर । तुज अनुभव येईल साचार । या वचनाचा ॥८॥
न करी वो चिंता माये । आतां अवधी थोडा आहे । जाई चित्रकुटी लवलाहे । मग पाहशील मौज ॥९॥
आश्वासूनी मातृदेवी । यशवंत माधवातें ठेवून घेई । नित्य करी नवलाई । पक्कान्नाची ॥११०॥
करी आग्रह माधवास । घाली तयाच्या मुखीं घास । सोडोनी सर्व अट्टाहास । खाई नाथबालक ॥११॥
ऐसे एक सप्ताह ठेवून । केली मातापुत्रांची बोळवण । दिलीं वस्त्रें तेवीं वाहन । साधुवर्ये ॥१२॥
तों पांगरीस आलें पत्र । कीं चित्रकुटी यावें त्वरित । बोलविती बाळकृष्णपंत । माधवाचे पितृव्य ॥१३॥
श्रीयशवंत देवाचें भविष्यवचन । त्यावरी झाला हा शुभशकुन । केला त्वरित मार्ग आक्रमण । माधवमातेनें ॥१४॥
चला चला हो श्रोतृजन । जाऊं चित्रकूट - त्रिकूटीं आपण । पाहूं सिंहासनीं आरोहण । भगवंताचें ॥१५॥
प्रथम मुक्काम ‘ मूलाधारपुरीं ’ । तेथें पाहूं गणेशमूर्ति साजिरी । आणूं क्रियेची ‘ सामग्री ’ । पूजावया ॥१६॥
दुसरा मुक्काम ‘ स्वाधिष्ठाननगर ’ जें ब्रह्मदेवें केलें स्थिर । तदनंतर ‘ मणिपुर ’ । विश्रांतीस योग्य ॥१७॥
श्री महाविष्णु देवें । वसविलें हें बरवें । तेथून ‘ अनाहत ’ गांवी जावें । करूं रात्रीस मुक्काम ॥१८॥
अनाहतापासून ‘ विशुद्धपुरीं ’ । आहे जराशी दूरी । परी सर्व गांवांहूनी विचित्र खरी । तीच नगरी ॥१९॥
तेथें जीवेश्वर हुकुम करी । महा उदार अंतरी । तो नेईल चित्रकूटपूरीं । त्रिकुट - प्रासादीं ॥१२०॥
‘ आज्ञा ’ नामक असे कामगार । आपुले करील स्वागत थोर । करील ब्रह्मरंध्रांतूनी स्थिर । योगींद्राच्या ॥२१॥
सवें घेऊं निवृत्तिकामिनी । विवेक - पुत्रा लागुनी । तीं सांभाळतील प्रेमानें आपणांसी ॥२२॥
मार्ग आहे थोडा बिकट । म्हणोनी घेणें लागे सोबत । नातरी प्रवृत्तीचा घाट । लोटील खळग्यांत ॥२३॥
ऐसा सुप्रसंग पुनरपि । नाहीं येणार कदापि जे चुकवितील ही आनंद - दिप्ति । ते मंदभाग्य ॥२४॥
सोडा सोडा मायेचे पाश । चला वेगें चित्रकूटास । चाखू नित्य सुखाचा रस । म्हणे नाथसुत ॥२५॥
इति श्रीमाधवनाथदीपप्रकाशे नाथसुतविरचिते बाललीलावर्णनं नाम चतुर्थ किरण समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP