मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
पंचदश किरण

दीपप्रकाश - पंचदश किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथायनमः --
धन्य माझा सद्गुरुनाथ । जो कर्म मन वाचायुक्त । सर्व भक्तांचें साधाया हित । राहे रत सर्वदा ॥१॥
जो सर्वांशीं करी नित्य स्नेह । सर्व - हित हें जयाचें हृदय । तयासीच धर्मरहस्य अभिनव । कललें जाणावें ॥२॥
कर्मात्मक नामरूपक । हें केवळ विनाशी चक्र । परि तयाच्या बुडाशीं निःशंक । अमृत भरलें ॥३॥
त्या सुधेचें कराया पान । मानव जीवाची इच्छा दारूण । परि न कळतां तयाचें ज्ञान । भ्रमित होई ॥४॥
शब्दज्ञानाचें अनेक डोंगर । परि ते शब्दींच करिती विहार । जो अंतरीं करील अंतर । तोच ज्ञानदाता ॥५॥
ऐसें कराया ज्ञानदान । सद्गुरुवांचोनि नाहीं आन । तयाच्या चरणीं नमन । साष्टांग भावें ॥६॥
जयजयाजी कर्मदहना । तुझा पार न कळे कोणा । घेवोनि नाना रूपगुणा । कर्माचे पाश तोडिसी ॥७॥
तूं अससी स्वयें अव्यक्त । परि अज्ञानी म्हणती व्यक्त । म्हणोनि तुझें स्वरूप श्रेष्ठ । ओळखों न शकती ॥८॥
घेवोनी योगमायेचें वस्त्र । आच्छादिसी स्वरूप सत्य । परि तूं केवळ जन्मरहित । अव्यक्त अविक्रय ॥९॥
ऐसा तूं जन्मरहित परि कर्माचा करावया अंत । होऊनी माया - अधिष्ठित । येसी व्यक्त स्थितींतें ॥१०॥
तूं केवळ कळवळ्याची जाती । भक्ताची कराया तृप्ती । घेसी असत्य रूपाप्रती । माधवनाथा ॥११॥
तुज करिती भक्त नाना विकारी । तैसाचि तूं होसी आकारी । अपकारास्तव उपकारी । होसी तूंची ॥१२॥
ऐसी तुझ्या कृतीची सीमा । कोठोनि आणावी उपमा । सर्व चराचर आत्मारामा । तुझ्यापासुनी ॥१३॥
तुज उपमा द्यावी रवीची । तो करी वस्ती तव नेत्राची । तुज समता द्यावी सागराची । तो सागर तव मंदीर ॥१४॥
ऐसा तूं अनुपमेय । आगमही मूक होय । तेथें तुझा करणें स्तव । हें वेडेपण ॥१५॥
परि तूं स्तुतींत आलासी । म्हणोनि करीन स्तुतीसी । परि कर्ता करविता असशी। तूंच नाथा ॥१६॥
तवं कृत्य स्वयंप्रभाकर । मज वर्णवेना साचार । फुलवातीची आरती करी । तुज भास्करा ॥१७॥
तव आंगीं नये मोठेपण । आम्हाकारणें लहानाहुनी लहान । म्हणोनि ही आरती मिणमिण । स्वीकारी आदरें ॥१८॥
गत किरणीं श्रीगुरूनाथ । बाळा नाइका करिती पात्र । मग पंढरीसी जाती त्वरित । आषाधी यात्रेसी ॥१९॥
पंधरी हे मुक्तीचें सरोवर । संत महानुभाव हे हंस थोर । करिती नानापरी विहार । या सरोवरीं ॥२०॥
पंढरी हा भक्तिसागर । भक्त हे पाणबुडे साचार । नाम शिंपली घेऊनी सादर । निवृत्ति मोतीं काढिती ॥२१॥
पंढरपूर हे गगन सुंदर । तेथें प्रकाशे विठ्ठल सुधाकर । भक्त चंद्रिका विविधतर । चमकती गोजिर्‍या ॥२२॥
पंढरपूर हे संतांचें राज्य । श्रीपांडुरंग हा अधिराज । तयाचा प्रधान ज्ञानराज । एकनाथ हा चिटणीस ॥२३॥
दामाजी करिती खजिनदारी । नामदेव जाहला पाहरेकरी । अखंड राही पायावरे । कोठें न हाले ॥२४॥
हे जाहले राजसूत्रधार । आतां ऐकावे जे आधार । चालविती संसार । श्री विठ्ठलाचा ॥२५॥
नरहरी भक्त सोनार । करी प्रभूचे अलंकार । वस्त्र विणोनि कबीर । देई राजेश्वरा ॥२६॥
बोधलेबुवाने जमीन । नांगरूनी पेरिली जाण । पिकलें रसाळ धान्य । भक्तिवर्षावानें ॥२७॥
तुकारामबोवा पाटील । घरोघरीं फिरती चपळ । करिती नाम धान्य वसूल । जनतेकडूनी ॥२८॥
सावत्यानें बाग केला । नानापुष्पें भाजी लाविल्या । प्रभुकंठी घातल्या माळा । शाका फळेंही देई ॥२९॥
गोरा कुंभार महाचतुर । पुरवी भांडी घागर । जीं कालत्रयीं टिकणार । ऐसीच देई ॥३०॥
जनाबाई करी पक्वान्न । कर्माबाईची खिचडी छान । मिराबाई त्रयोदशगुणी । तांबूल देई ॥३१॥
चोखोबा हातीं डफ घेती । रात्रीं गस्त घालिती । ऐसी राज्याची स्थिति । चालली असे ॥३२॥
पंढरी राज्य सुधारणेचे आगर । जेथें जातिभेदा नाहीं थार । खानपानाचा विचार । कोणी न पाहती ॥३३॥
येथें सर्वांची एक जात । भोजनाचें एकच पात्र । राजा बसे महारांत । खाई भाकरी त्यांसवें ॥३४॥
ऐशा राज्याची कीर्ती । गातां स्फुरें वाणी प्रीती । याची नसेबा अंती । त्रिकाल राहिल अखंड ॥३५॥
हें निर्वैर राज्य भूतली । येथें अवर्षणें कधीं न पडलीं । सदा सौख्याची साउली । दुःखताप नाहीं ॥३६॥
या नगरीस असे मुक्तद्वार । सर्वांसि मिळे आधार । जेथें नांदे सर्व भांडार । तेथें उणें केवी ॥३७॥
भेटावया पंढरीराजा । चित्रकूटीचा जाई राजा । माधवनाथ सद्गुरू माझा । अत्यादरें ॥३८॥
पंढरपुरी येतां नाथ । जाई प्रथम राऊळांत । जाहला समरूपांत । नाथराया ॥३९॥
तेथेंही करी अलौकिक कृत्य । काढिल्या तुलशी बहुत । सांगें भक्तास मात । मज दिधला प्रसाद ॥४०॥
नाथ करीं कांहीं नसतां । कोठोनि आणिली आतां । ही नकळे कोणा वार्ता । म्हणती धन्य नाथा तूं ॥४१॥
नारायणराव बडवे । श्रीविठ्ठल पुजारी बरवे । तयाचे घरीं देवें आसन ठेविलें ॥४२॥
जाहली वर्षे पंचेचाळीस । नसे गृहीं दीपप्रकाश । होई अंतरी उदास । रात्रंदिन ॥४३॥
जयासी नाही पुत्र । तयाचा जन्म व्यर्थ । नसे तया स्वर्ग प्राप्त । पुन्नाम नरकीं पडे ॥४४॥
जवळीं द्रव्य होतें बहुत । घरादारा नाहीं मिती । परि नाहीं पोटी संतती । व्यर्थ संसार ॥४५॥
प्रपंचवृक्ष मोठा झाला । परि तो फलावीण राहिला । कोण पुसे तयाला । निंद्य म्हणोनि ॥४६॥
निपुत्रिकाचें न पहावें वदन । तयाचे न खावे अन्न । घेऊं नये तयाचें दान । निंद्य म्हणती ॥४७॥
जातां लोकगृहीं पाहुणें । आधी विचारिती संतानें । तेथें मुख लाजिरवाणें । सांगतां निपुत्रिक ॥४८॥
मंगल कार्यांत निपुत्रिक । नसती कदापि मांगलिक । त्या सुवासिनीसही लोक । अशुभ मानिती ॥४९॥
निपुत्रकातें त्रिलोकीं । नाहीं सन्मान लौकिकीं । म्हणोनि केले अनेकीं । यज्ञ तपें दानही ॥५०॥
केल्या तयानें चार नारी । जाहल्या बहुत पुत्र पोरी । परि कालें नेली बिचारी । ओढोनिया ॥५१॥
बडव्यांच्या गृहीं ब्रह्मसमंध । करी चेष्टा बहुविध । म्हणे मी न ठेवी तुझा संबंध । पुत्रादिकाशीं ॥५२॥
मी होतों वारकरी । तुझा पूर्वज मज मारी । हरिली मम संपत्ति सारी । लोभरुपें ॥५३॥
तयाचा मी सूड घेईन । गिळीन सर्व संतान । तुम्हासही मारीन । पुत्र - पुत्र म्हणतां ॥५४॥
या धाकें झाला जर्जर । केले अनेक उपचार । पंचाक्षरी जादूगार । आणिले बहु ॥५५॥
घातल्या प्रदक्षिणा पिंपळा । तयाचा पार बांधिला । व्रतबंधही केला । मुंजोबाचा ॥५६॥
केले पुत्रवंतीला तोडगे । भोलावे फासले मार्गे । नवसाचेही बहुत धागे । जोडिले गा ॥५७॥
परि कोणी न होती फलदायी । ब्राह्मण मनीं कष्टी होई । मग नाथासी विनवी । मज मुक्त करावे ॥५८॥
नसे मज आता पुत्राशा । व्यर्थ पडलों पाशीं ऐशा । तुज शरण मी जगदीशा । मज सोडवी ॥५९॥
नेत्रीं चालल्या अश्रुधारा । अभिषेकिती चरण सुकुमारा । कळवळली प्रेमधारा । नाथमाता ॥६०॥
जिला होता भूतसंचार । तिला पाचारी योगेश्वर । सांगे मी पुत्र देणार । मम बालका ॥६१॥
मग समंध करी बहुत चेष्टा । परि तीर्थाचा मारा करितां । ते दीन होऊनी माथा । चरणीं ठेवी ॥६२॥
बडव्याची चतुर्थ पत्नी । जी होती सुलक्षणी । तिच्या ओटीत प्रभूनी । नारळ दिधले ॥६३॥
सांगती त्या समंधास । तुझें तुज मिळेल खास । परि छळितां मद्भक्तास । बांधीन हातपाय ॥६४॥
समंधाच्या मतानुसार । केला द्रव्याचा धर्म थोर । त्यातें मुक्त करी योगीश्वर । देई पुत्र भक्तासी ॥६५॥
दिधली पुत्र कन्याही । ब्राह्मण सुखावला देहीं । प्रपंच परमार्थाची नवाई । साधिली तयानें ॥६६॥
प्रभूंचा लागता हात । कोण राहील बा अपवित्र । जेथें वर्षे अमृत । तें अमृतमय ॥६७॥
कंस होता दुराचारी । पूतना केवळ अघोरी । परि तयांनाही मुरहरी । सद्गती देई ॥६८॥
कालिया होता कालकूट । परि प्रभुपदें जाहला अमृत । मग समंधाचा तेथें । पाड काय ॥६९॥
ऐशी करोनी कारागिरी । नाथ जाई पळूसपुरीं । भेटावया बाह्यात्कारी । धोंडीबुवासी ॥७०॥
मार्गी देखिला एक ब्रह्मचारी । जो जलदेवतेचा अधिकारी । अर्भकाही उदकावरी । चालवी मौजेनें ॥७१॥
तें देखोनी नाथ हंसला । या बाह्य सिद्धीचा त्याग करावा । अंतरींच्या जलदेवा । आधी वश करावें ॥७२॥
हा नव्हे इष्ट मार्ग । अंतीं करील तुमचा भंग । अधोगतीचा संग । घडेल गा ॥७३॥
घेतला एक नारिकेल । टाके नदींत वेल्हाळ । म्हणे मध्यभागी जाई बाळ । तों चालला तेथेंच ॥७४॥
पुनरपि सांगे तयातें । परतावें त्वां येथें । नारळ धांवला तीरातें । यावया ॥७५॥
दुरोनीच सांगे त्यास । आंत बसावें तळास । मग येवोनी सावकाश । मज भेटावें ॥७६॥
तैसेच नारळ जड । करोनि कृती अगाध । शेवटीं घेई नाथपद । तांतडीनें ॥७७॥
ब्रह्मचारी झाला लज्जित । पडला प्रकाश हृदयांत । मज उचली समर्था । खळ्यातुनी ॥७८॥
घेवोनि त्या भक्तासी । नाथ आले पलूसासीं । धोंडीबुवा बघतां प्रभूसी । चालूं लागले ॥७९॥
म्हणती आमुचे बडे सरकार । आज आले सादर । तयांचा करावा पाहुणचार । आदरानें ॥८०॥
भेटती प्रेमें परस्पर । त्या आनंदा नाहीं पार । ज्यांनी नेत्रीं चाखिलें सार । धन्य ते महाभाग ॥८१॥
मग पाटावरी नाथ । बसविती पलुसकर समर्थ । करिती मेजवानीचा थाट । अपूर्वसा ॥८२॥
मग उघडूनी आपुली झोळी । काढली बाजरी भाकरी शिळी । ठेवुनी चटणी वरी । करावें म्हणे भोजन ॥८३॥
भातही कठिण जयातें । तो खाई भाकरीतें । बघोनी मनीं उल्हास दाटे । हें दृश्य ॥८४॥
तीं नव्हे गा जड भाकरी । दळिली सोहं बाजरी । भाकरीरूपें उदरीं । सांठविली ॥८५॥
ऐसा भोजनाचा सोहळा । मग परस्पर खुणेच्या लीला । तें रहस्य जाणत्याला । इतरां तें अज्ञ ॥८६॥
असो ऐसी झाली भरतभेटी । मग भक्तास्तव गोदातटीं । सदाशिव रंगनाथ म्हणती । वानवळे उपनाम ॥८७॥
श्रीनाथ शिष्यगणाग्रेसर । हेंचि एक रत्न थोर । होता अंग्लपदवीधर । धर्मनिष्ठ ॥८८॥
शालागृहाचा अधिकारी । जयाच्या शिस्तीचें भय भारी । शिक्षकां वाटे केसरी । बालकां पित्यासम ॥८९॥
गणितशास्त्रपारंगत । भाषा जयाच्या मुखोद्गत । आमरणांत सत्य । सोडीलें नाहीं ॥९०॥
सत्य हेंचि त्याचे धन । सत्य हें तयाचें भजन । सत्यस्वरूप हें ध्यान । भक्तोत्तमाचें ॥९१॥
तयाची भार्या पार्वतीमाई । ती सकलां वाटे आई । वाटे दुसरी रखुमाई । यशवंताची ॥९२॥
ऐसे कुटुंब सद्गुणी फार । प्रपंचाचा वाहती भार । साधु - संतांची आवडी थोर । उभयतांसी ॥९३॥
श्रीगोपाल परमहंस । त्यावरी भक्ति विशेष । रमती तेथे अहर्निश । सेवेस्तव ॥९४॥
गोपाल लीलेचें किरण । तुम्हां दावितो प्रकाशून । चहा आवडे पोटांतून । परमहंसा ॥९५॥
एके दिनीं सदाशिव तात्या । प्रभु सेवेसीं जातां । म्हणती चहा करावा आतां । सत्वर गा ॥९६॥
ठेविलें पाणी धुनीवरी । त्यांत मृत्तिका मूठभर । मक्षिकामय दुग्ध साचार । टाकी तयांत ॥९७॥
त्यांत गांजाचीही पुडी । मग चहाची भुकटी थोडी । शर्करेची कृत्रीम गोडी । कधीं नसे ॥९८॥
ऐसा चहा तयार केला । त्यांत ज्वालाग्राही रस ओतिला । स्पिरिट म्हणती तयाला । आंग्लजन ॥९९॥
ऐसा चहा आपण प्राशिती । तात्यासही प्रेमें देती । घेई भक्त सुमती । अत्यादरें ॥१००॥
ऐसें विष उभयतां प्याले । परि कोणाही तयें न पीडिलें । अमृतकर लागतां झालें । अमृतची ॥१॥
रंगीं रंगला गोपाळ । सदाशिवाचा करी लडीवाळ । प्रसन्न होउनी दयाळ । सांगे तया ॥२॥
तुझ्यासाठी माझा भाई । येईल लवलाही । कपाट उघडोनि पाही । तुझी वस्तु देईल ॥३॥
तुला घालीतों तयाच्या पदरीं । मग घेईरे रसमाधुरी । वाजवुनी बाजा अंतरीं । राही सुखरूप ॥४॥
सदाशिवानें खूणगांठ । बांधोनि विनविला समर्थ । आतां न पहावा अंत । त्वरित उद्धरावे ॥५॥
आश्वासोनि सदाशिवा । म्हणे थोडा धीर धरावा । पान चहा - रत्न ठेवा । तुज मिळेल आज ॥६॥
मग मारिली एक चापट । घालवी बाहेर भक्त । सदाशिव म्हणे हा मुहूर्त । श्रीदर्शनाचा ॥७॥
वंदोनीया रामपाय । तात्या आपुले गृही जाय । आले एक साधुराय । ऐकिली वार्ता ॥८॥
न घेई अन्न जल । दास्यत्वाचा तोडिला गळ । येई जेथें दीनदयाळ । उतरला ॥९॥
पाहोनि वदला नाथ । तुज भाईनें पाठविलें येथ । ते नसती असमर्थ । तव कार्या ॥११०॥
ही ओळख पटतां । प्रफुल्ल जाहलें मनीं तात्या । तूंच माझा समर्था । मायबाप ॥११॥
जैसें चक्र गोलाकार । फिरोनी येई स्थानावर । तैसा आलों मूळ पदावर । आतां न जाय ॥१२॥
तूंच माय माझी दयाळा । अंकावर घेई हा तान्हुला । परमार्थ दुधाचा पान्हा फुटला । तो घालीं मम मुखीं ॥१३॥
तापलों मी भवतापानें । छाया मिळाली पूर्वपुण्यें । आतां येथेंच विश्रांति घेणें । मज योग्य ॥१४॥
विषय - धोतर्‍याची फळें । म्यां खादिली गे बळें । वांकडें तिकडे हात केले । भ्रमी होउनी ॥१५॥
मज परमहंसे दिधला चहा । उतरविलें वीख महा । परि समूळ विनाहाया । धाडिलें तुजपाशी ॥१६॥
मज मोकलूं नको सद्गुरू । देई चिद्रस वोगरू । विस्मरणीं देई विसरू । आठवीं आठव ॥१७॥
तूं माझें शुद्ध पांघरूण । मी उघडा असे त्यावीण । घालीं घालीं आच्छादन । योगेंद्रा ॥१८॥
नाथ झाला मनीं संतुष्ट । करी त्यातें अनुग्रहीत । पत्नीचेंही चित्त । शांत केलें ॥१९॥
पत्नीस होती कन्या एक । परी नव्हता कुलदीपक । नाथ म्हणे तुझा तो बालक । मीच आहे ॥१२०॥
मज न्हाऊ घाली देवी । पाळण्यांतही निजवी । तुज रूचतील तीं घालावी लेणीं सदा ॥२१॥
चित्तीं न ठेवावी खंत । तुज मी दावीन स्वर्गपंथ । ठेवी मातें हृदयांत । सदैव तूं आदरें ॥२२॥
हा केवळ व्यवहार । गुंफिती ऋषी चतुर । परि वेदांताचें सार । अन्य असे ॥२३॥
आपुलाच आपण उद्धारीं । आपणची जाई घोरी । जाई मायेच्या बाजारी । आपणची ॥२४॥
माई होती केवळ निवृत्ति । विनवी प्रेमें नाथाप्रती । तुज ऐसा पुत्र जगजेठी । मिळतां भाग्य अपार ॥२५॥
माझा पुत्र श्रीनाथ । मग कां व्हावें सचिंत । नको नको तो मायिक सुत । मजलागी ॥२६॥
माझा पुत्र मोठा गाढा । त्रिखंडी जयें लाविला झेंडा । मी पुत्रवंती झाले सदा । धन्य धन्य ॥२७॥
आधीच नाथांची बालवृत्ती । त्यावरी वदला बालोक्ती । या वात्सल्यप्रेमाची महती । किती गावी ॥२८॥
निर्व्याज प्रेमाचे पुतळे । जगीं असती तान्हुलीं बाळें । विश्व तयांच्या पायीं लोळें । विश्वनाथ ते खरे ॥२९॥
सुखदुःखाची नाहीं भीती । नको गरिबी वा श्रीमंती । पंचतत्त्वाची आवड मोठी । धूली पाणी प्रकाश ॥१३०॥
सर्वांतरीं ठेवी वात्सल्या । असो काष्ट वा सजीव पुतळा । सुवर्ण मृत्तिकेचा घोटाळा । दूर ठेविती ॥३१॥
समवृत्तीचा एक लळा । ऐशा वृत्तींत जो रंगला । तोचि म्हणावा भल । महासाधू ॥३२॥
माई केवळ सात्विक सती । दावी तिजला निज ज्योती । परमानंदी वस्ती । महासाध्वीची ॥३३॥
होतां अनुग्रह तात्यासी । वृत्ति बनली एकदेशी । गेली शिस्त तामसी । सत्वोदय होतां ॥३४॥
ऐसा कांहीं काळ क्रमितां । समर्था प्रार्थिती तात्या । त्वां यमनियमाच्या नाथां । पायर्‍या चढविल्या ॥३५॥
आतां पुढील पायरीवरी । मज नेई रे सत्वरी । तुझ्यावांचोनि शांती खरी । मिळणार नाहीं ॥३६॥
परि नाथ न देई प्रत्युत्तर । लावी समाधी स्थिर । ऐसेही जातां दिवस चार । करी नवल ॥३७॥
येतां माई नाथ कन्या । नाथ सांगे सदाशिवांना । येथुनी जावें दुज्या भुवना । द्वार घ्यावे लावुनी ॥३८॥
माई ठेवी चरणीं डोई । तिच्या शिरीं प्रभू कर ठेवी । लाविली समाधी बरवी । चतुर्दश घटी ॥३९॥
तात्या जाहले विस्मित । म्हणती काय करावें येथ । समर्थ आज्ञा मज तद्गृहांत । यावयाची नसे ॥१४०॥
आतां येथ काय करावें । स्वस्थ कैसें बैसावें । गवाक्षद्वारें पहावें । म्हणोनि उठले ॥४१॥
तात्या होते शुद्ध पुत्र । न येती कुतर्क चित्तांत । परि उशिरास काय निमित्त । म्हणोनि उठले ॥४२॥
तात्यानें हालवितां आसन । नाथें केली समाधी विसर्जन । प्रेमें पाचारिती हांसून । पुत्रराया ॥४३॥
तव चित्ताची परीक्षा घ्यावया । मी केली योजना राया । त्यातें शुद्धीची बळकटी देउनियां । मग चढवीन ॥४४॥
तूं स्वयें अससी परीक्षक । तुज कळेल हें कौतुक । विद्यालयाचे वर्ग अनेक । तुम्ही करितां ॥४५॥
घेवोनियां परीक्षण । त्यांत मिळवी जो उत्तम गुण । तितुक्यांचे करितां आरोहण । उच्चवर्गीं ॥४६॥
तैसेच माझें पाहणें । भक्तातें कसोटी लावणें । मग त्यातें चढविणें । सत्य सोपानीं ॥४७॥
मम परीक्षेस नको कागद । अथवा शाई बोरू उदंड । ती नसे कालबद्ध । कदाही ॥४८॥
आमची परीक्षा एक क्षणाची । न करितों गर्दी प्रश्नांची । केवळ दृष्टीयंत्राची । छाया करितो गा ॥४९॥
परि आमुच्यासम झारेकरी । आम्हीच असूं निर्धारी । तुम्ही बहिर्मुखी आम्ही अंतरीं । करूं प्रवेश ॥१५०॥
स्वरूप सुवर्णाचे अलंकार । आम्ही करितों सुवर्णकार । परी त्या तापवोनी वारंवार । कसा लावूं ॥५१॥
त्यावीण गा भक्ता । अलंकार न करूं सर्वथा । ही आमुची व्यवहारता । न सोडूं ॥५२॥
जेसी वेळूची शुष्क यष्टी । आधीं जलसंचयीं ठेविती । मग करिती गोलाकृती हळू हळू ॥५३॥
तैसी तुमची भववृत्ति । अनुग्रहें करितो आर्द्र ती । मग प्रयत्नांची कसोटी । घेउनी वाकवूं ॥५४॥
आतां तुज गुरूवासरीं । मी चढवीन एक पायरी । मनी संशय न धरीं । भक्तोत्तमा ॥५५॥
ऐसें सांगे नाथ प्रेमळ । तों आले दर्शनेच्छु मेळ । नाथ तयांना कुशल प्रश्न । विचारील ॥५६॥
त्यांचीही आवडी पुरवील । श्रोतृजनही विश्रांती घेतील । ना तरी स्मृती हरपेल । प्रभु - प्रकाशाची ॥५७॥
पुढील किरणीं सदाशीवाचा । इतिहास प्रकाश होईल साचा । हा निधि सद्गुणांचा । होईल गुणातीत ॥१५८॥
इति श्रीमाधवनाथ दीपप्रकाशे नाथसुतविरचिते सदाशिव - शिष्यप्रसादनाम पंचदश किरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP