मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
चतुर्विंशतितम किरण

दीपप्रकाश - चतुर्विंशतितम किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथाय नमः --
जयजयाजी राजयोगेश्वरा ! । तव कृतीला नसे पार । योग - मंदिराचा आधार । तूंच अससी ॥१॥
यम नियमांचा खोदिला पाया । केला आसन चौथरा राया । मग प्राणायामाचे ताल सहा । बांधियेले ॥२॥
मंदिरद्वार श्रीकुंडलिनी । तें उघडूनी जाई वरी प्राणी । प्रथम तालीं गणेश वंदुनी । दुसर्‍या तालीं ब्रह्मदेव ॥३॥
तृतीय तालीं श्रीविष्णु भगवान । चतुर्थी श्रीशिव भासमान । पांचव्या मजल्यांत जीव आपण । करी वास्तव्य ॥४॥
सहाव्यांत परमात्मा वसत । चढतां आनंद तेथ । लागे सौध बळकट । प्रत्याहार ॥५॥
तेथें धारणा दूती भेटली । ती नेई ध्यानबंधू जवळीं । तो दाखवी समाधीरूप खोली । त्यांत वससी राजेंद्रा ॥६॥
तुज पहाया भगवंत ! । तुज समानची लागे द्रष्टा । किंवा कृपा - विमान पाठवितां । येईल बसुनिया ॥७॥
गत किरणीम योगेश्वर । बोधी वासुदेव कुमर । मग विचार करिती जयपूर । पहावें बालक भेटीस्तव ॥८॥
इंदुर शहरीं माधवराव पागनीस । श्रीनाथांचें थोर शिष्य । ऐकावा त्यांचा इतिहास । श्रोतृजनीं ॥९॥
पूर्वीं श्रीनाथ जातां । घेती अनुग्रह तत्वता । केला अपूर्व थाट श्रीमंता । शोभेल ऐसा ॥१०॥
नाथदेवा भरजरी वस्त्रें । तेवीं पूजेचीं स्वतंत्र पात्रें । स्वगृह श्रृंगारिलें नेटें । मनी म्हणें दावूं वैभव ॥११॥
घेवोनी पालखी छत्र चामरें । सद्गुरू चरणीं येती तोरें । म्हणती चलावें गृहीं योगीवरें । पहावें वैभव आमुचें ॥१२॥
देखोनि तयाची गर्व वृत्ती । नाथा दया उपजली चित्तीं । मनीं म्हणती ही अहंमती । खाईल माझ्या बालका ॥१३॥
परी बाह्य वृत्तीनें कोप घेतला । म्हणे मज दाविसी वैभवाला । मी खेळवीन जगाला । तेथें विभवाचा पाड काय ॥१४॥
वैभव माझ्या पायातळीं । मी न येई तव स्थलीं । तुज परमार्थाची चाड असली । तरी येथें यावें ॥१५॥
त्वां पत्नीसह व्हावें पादचारी । यावें मम झोंपडीचें द्वारीं । मग अनुग्रहाची माधुरी । तुज देईन ॥१६॥
विभव दों दिसांचें घर । त्यांत ठेवितां अंतरं । जें असेल गुप्तधन थोडेफार । तेही जाईल ॥१७॥
आम्ही वसतों सृष्टी - मंदिरीं । तीपुढें या विभवाची काय थोरी । सागरापुढती पंकिलाची सरी । तैसी तव कृती अश्लाघ्य ॥१८॥
सुंदर प्रासादापुढती । जैसी कीटकांचीं घरटीं । किंवा सूर्य प्रकाशीं ज्योति । सणकाडीची ॥१९॥
मज नको हा तोरा । जाई बाळा ! आपुले घरा । घ्यावयातें सत्याचा थारा । त्वां येथ यावें ॥२०॥
जैसी कर्पूराते लागतां ज्योती । ठायींच होई तयाची समाप्ती । तेवी पागनिसांची अहंवृत्ती । जळोनी गेली ॥२१॥
अनुतापें तो तापला । केला नमस्कार सद्गुरुला । सोडुनी सकल वैभवाला । जाहला पादचारी ॥२२॥
आपण नेसला साधें । धोतर । पत्नीही शुभ्र पातळ धारी । येई पायींच सुकुमारी । अनुग्रहार्थ ॥२३॥
त्या दिवसापासुनी । तैसीच वस्त्रें धारण करूनी । श्रीनाथांचीं वस्त्रें जपुनी । पेटींत ठेविती ॥२४॥
त्या पेटीवरी कंबल टाकून । करिती तेथेंच शयन । ऐसें वैराग्य परिपूर्ण । बाणलें अंगीं ॥२५॥
इंदुरीं येई श्रीनाथ । एका कोळश्याचे चाळीत । नाथागमनाची ऐकिली मात । या संतांनीं ॥२६॥
आले पायींच प्रभु चरणीं । आतां चलावें आपुले भुवनीं । नाथ जाई आनंदुनीं । पायींच तत् गृहीं ॥२७॥
घेतली भक्ताची पूजा सर्व । पुरविला त्याचा पूर्ण भाव । राही तेथें दिन द्वय । पूर्णानंद ॥२८॥
तों आले दोन बैरागी । पाहती नाथ राजयोगी । हंसुनी म्हणती एकमेकालागी । हा नव्हे राजयोगी ॥२९॥
वस्त्रें लेवुनी जरतारी । बैसें तैशाच गादीवरी । मुखीं तांबूल बटवा करी । कैसा म्हणावा योगी ॥३०॥
नेसोनी कटी लंगोटी । घ्यावी भिक्षेची लोटी । भिक्षा मागोनी दिन राती । फिरावे चोहोंकडे ॥३१॥
तयासीच होई योग साध्य । इतरां असाध्य । जन जाहले कसे अंध । आम्हाकडे न पाहती ॥३२॥
नाथ सर्वांतर साक्षी मूर्ती । जाणिली तयांची मत्सर वृत्ती । साधुसी हांसोनी म्हणती । मज न्यावें आपुल्यासवें ॥३३॥
मी होईन आपुला चेला । दाखवा मज योगदेवीला । येरू म्हणती या कठिण व्रताला । तुम्हीं योग्य नाहीं ॥३४॥
आम्ही चालतों कंटकांत । आमुचें गृह तरूछायेंत । आमुचेजवळ झोळी लंगोट । आणि लोटी ॥३५॥
प्रभू म्हणे ऐसाच वेष घेऊन । मी आपुलें शिष्यत्व करीन । मग चलावें लंगोट नेसून । सांगती बैरागी ॥३६॥
बैरागी हंसुनी बोलती । ही केवळ भाषेची महंती । ऐशा वैभवाची प्रीती । कोण सोडील ॥३७॥
देखतां नाथ प्रभूची तयारी । आड येती शिष्य कैवारी । न जावें नाथा ऐशा परी । गोसावीयांसह ॥३८॥
हे गोसावी पोटार्थी । प्रभु तुम्ही कल्याणार्थी । कैसी होईल गा साथी । उभयतांची ॥३९॥
नाथ सांगे एकांती सकला । पाहूं बैराग्याचा सोहळा । म्यां भोगिला अनेक वेळा । ऐसा आनंद ॥४०॥
मातुश्रीने उपकार केला । मज अज्ञातवास घडविला । सर्व तपांचा सहजीं साधला । सुखकर आश्रयो ॥४१॥
तुम्हीं चिंता न करावी । मज अनुमती सुखें द्यावी । मी वनीं जरी जाई । तरी तेथें ऐसा योग ॥४२॥
नका कष्टी होऊं मनीं । सत्वर येईन परतुनी । आता गुप्त न राही जनी वनीं । हें वचन साच माना ॥४३॥
लंगोट नेसुनी सिद्ध जाहला । बैराग्यांनी पाहिला । लज्जा वाटली चित्ताला । तयांच्या मग ॥४४॥
आता प्रतिकार करणें अनिष्ट । या विचारें घेती साथ । देवास ग्रामाचा पंथ । आक्रमिती तिघेही ॥४५॥
बैरागी म्हणती नाथासी । करूं वेतनाच्या शकटासी । प्रभू सांगे मजपाशीं । नसे द्रव्य ॥४६॥
बैरागी गाडींत बैसती । आमुचे सद्गुरु पायीं चालती । अयाचित वृत्ती चालविती येथेंही ॥४७॥
आली देवास नगराची सीमा । घेती वृक्षाखालीं विरामा । बसवुनी तेथें आत्मारामा । जाऊं म्हणती नगरांत ॥४८॥
त्वां सांभाळाव्या चिलमी दोन । तेवीं वस्त्रें आमुची जाण । आम्ही आणतों शिधा सामान । भिक्षा मागुनी ॥४९॥
अवश्य म्हणोनी नाथ । तेथें बैसला गीत गात । राही आपुले आनंदांट । आनंदमूर्ती ॥५०॥
पागनीसांचे श्वशुर । देवासनगरींत असती स्थिर । होता तयासी अधिकार । दिवाणगिरीचा ॥५१॥
दिवाणाची कनिष्ठ बाला । जियेचें नाम होतें वत्सला । रथीं बैसुनी जातसे आपुल्या । उद्यानांत ॥५२॥
देखिला सहजीं जगन्नाथ । जाहली बाला विस्मित । उतरूनी रथाखालीं त्वरित । आली प्रभुसमीप ॥५३॥
करोनी साष्टांगें वंदन । विनवी नाथासी आपण । ऐसा वेष घ्यावया कारण । काय नाथासी ॥५४॥
परी नाथ जाहला स्वानंदीं निमग्न । न राहिलें तयासी भान । एक ध्येयासी गायनाची तान । मिळोनी गेली ॥५५॥
ऐसी देखोनी परिस्थिती । कन्या परतली गृहीं शीघ्रगती । नाथागमनाची वार्ता पितयाप्रतीं । सांगे प्रेमभरें ॥५६॥
आश्चर्ययुक्त झाले सारे । घेतले वस्त्रांचे भारे । आणिली शिबिका चामरें । धांवती नाथापाशीं ॥५७॥
देखोनी सर्व सोहळा । नाथप्रभू बहुत हांसला । सांगितली बैराग्याची लीला । भक्तगणांसी ॥५८॥
ऐकोनी प्रभूचे खेळ । जाहला आनंदाचा कल्लोळ । म्हणती नाथा ! तू अचल । राजयोगी ॥५९॥
बैराग्याच्या वस्तूंपाशीं । ठेविलें एक्या दूतासी । मिरवीत आणिती गुरूरायाएसे । नगरामाजीं ॥६०॥
सहजींच हा थाट । पाहती बैरागी अवचित । जाहलें मनीं लज्जित । वंदिती योगीराजा ॥६१॥
न पाहतां अधिकार आपुला । शिणविलें कोमल तनूला । क्षमा करावी तरी दयाळा । अपराध्यासी ॥६२॥
हंसुनी बोले दयेचा सागर । मज कांहीं न कळे साचार । भोगाचा तेवी रोगाचा विसर । नित्य आम्हासी ॥६३॥
कधीं होतों दिगंबर । कधीं दिसतों राजयोगेश्वर । कधीं गृहस्थाश्रमींचा आचार । रूचे आम्हांसी ॥६४॥
जैसी ज्याची असे भावना । तैसें होणें लागे आम्हां जाणा । परि ठेवुनी वृत्ती सावधाना । राहतों अलिप्त सर्वांत ॥६५॥
मी सर्वांतरी करीन वस्ती । सर्व माझ्यांतची सामावती । ऐसी ठेवितां नित्य वृत्ती । सर्व भोग सारखेची ॥६६॥
न जाळितां अंतरींचा मळ । घेतां बैराग्याचा वेष सकळ । त्याचें त्रिलोकीं होईल । हांसे बापा ! ॥६७॥
तरी बाह्यांतर एक करोनी । रहावें आपुल्या अवसानीं । मग स्वानंद सुधेची निर्झरणी । चाखाया मिळेल ॥६८॥
ऐसा केला दिव्योपदेश । वस्त्रें दक्षणा दिली साधूस । राहोनी त्या स्थलीं एक दिवस । येई परतुनी इंदुरीं ॥६९॥
पाहतां वेष जरतारी । चकित होती नरनारी । म्हणती नाथ बसला जरी गिरिकंदरी । तरी तो राजयोगी ॥७०॥
इंदुराहुनी जयपुरासी । जावें ऐसा विचार मानसीं । योजी सद्गुरु हृषीकेशी । होता तेथें भक्त एक ॥७१॥
तयाचे नाम नरसिंगदास । होता नाथांचा पूर्ण शिष्य । राही प्रथम नंदीग्रामास । शिवणकलेंत निपुण ॥७२॥
वासुदेवाची बघोनी वृत्ती । आनंदली तयाची मती । येई नित्यही दर्शनाप्रती । भक्तोत्तमाच्या ॥७३॥
वासुदेवाची नाथांचें वेड । येवो वंद्य अथवा निंद्य । सद्गुरुचा महिमा अखंड । गाई तयाजवळी ॥७४॥
या नियमानुसारें वासुदेवें । कथिले श्रीनाथ चरित्र बरवें । नरसिंग वृत्ती उल्हसीत होये । दर्शनास्तव ॥७५॥
लागली तळमळ अंतरीं । केव्हां भेटेल कैवारी । वासुदेव म्हणे तूं निश्चय धरीं । येईल तितुक्या कालांत ॥७६॥
आधींच भावसुमन फुललें । त्यावरी वासुदेवें जळ सिंचिलें । मग प्रतीज्ञा केली बळें । नरसिंगदासें ॥७७॥
नाथा ! मी करितों अनुष्ठान । येई आठ दिवसांत धांवून । करणार नाही अन्नग्रहण । दर्शनाविणें हो ॥७८॥
महादेव मंदिरी भक्त बैसला । मुखें नाथांचा जप जपला । सप्ताह कालासी एकच दिन उरला । परी प्रभु येईना ॥७९॥
करिती आग्रह बंधूजन । परी न खाई अल्पही अन्न । म्हणे जरी नाहीं आला भगवान । तरी सोडीन प्राण मी ॥८०॥
वासुदेवहि झाला चिंतातुर । करी प्रभूचा धांवा सत्वर । धांव घेई आतां योगेश्वर ! । भक्तवत्सला ॥८१॥
न येसी जरी धांवून । सोडील नरसिंग आपुला प्राण । होईन हत्येसी कारण । सद्गुरुराया ॥८२॥
आतां भक्ताचा अंत न पाही । तूं आमुची कनवाळू आई । माझा शब्द राखीं कांहीं । दीनानाथा ॥८३॥
तूं पुरविलें कोड अनंत । राखिलें आपुलें ब्रीद खचित । आजी कां होसी रूष्ट । दासावरी ॥८४॥
धांव धांव गे जगज्जननी । वायुवरी आरूढ होवोनी । करी दासासी सत्यवाणी । ऐशा काळीं ॥८५॥
त्वां वदविलें तें वदलों । त्वां चालविलें तैसें चाललों । ऐसें असतां प्रभु दयाळा ! । कासया अंत पाहसी ॥८६॥
खाटीके वधिली गाय । तीस जिवंत कराया नामदेव । तुज पाचारी तेव्हां धांव । घेतली विठ्ठला ! रे ॥८७॥
मथुरीचा झाला मोह । तू निवारिसी सदय । काशीनाथाचा पाहुनी भाव । दाविसी निजपद तया ॥८८॥
होतां जेव्हां अज्ञातवासी । तैं भक्त सप्तशृंग गडवाई । तुज बाहतां प्रेमराशी धांवुनी येसी । व्याघ्रावरी ॥८९॥
त्या भक्तें केला एकच उपवास । तोंचि तूं द्रवला योगीश । सात दिवसहि अन्नलेश । सेविला नाही नरसिंगें ॥९०॥
कोठें गेली ती माया । सांग सांग रे कैवारिया । तुझें मृदू हृदय सदया । कठिण कैसें जाहलें ॥९१॥
तूंची माझा विठ्ठल । तूं माझा घननील गोपाळ । तूं मम जीवन वेल्हाळ । मग कोणा आळवूं ॥९२॥
तुझ्यावांचुनी भगवंता । मी आन नेणें सर्वथा । येई तांतडीनें समर्था ! । रक्षावया वचन ॥९३॥
ऐसें आळवितां करूणायुक्त । झाला निश्चल वासुदेव भक्त । तों पाठीवरी मृदुतर हस्त । ठेवुनी कोणी हालवी ॥९४॥
पाही नयन उघडोनी । तों दिसला नाथ चक्रपाणी । साष्टांगें येई लोटांगणी । म्हणे देवा धन्य केलें ॥९५॥
नाथा ! किती कठिण त्वां मन केलें । त्या भक्ताचे प्राण कंठी राहिले । तंव देव बोले तयानें केलें । सप्ताहाचें व्रत सया ! ॥९६॥
मम पुत्राच्या वचनासी ! कैसा बाध आणू समयासी । पूर्ण भरती होता सप्ताहासी । आलों बाळा ! धांवत ॥९७॥
नरसिंगदासा नाथ भेटला । बाला तुवां दृढ निश्चय केला । म्हणोनि येणें घडलें कलेवराला । तांतडीनें ॥९८॥
दृढनिश्चया ऐसें सात्विक शस्त्र । नाहीं दूसरें यथार्थ । महा शत्रुसेनाही निर्बल होत । दृढनिश्चयें ॥९९॥
दृढनिश्चय तामसी रिपूंचा । करील नायनाट साचा । दृढनिश्चय हा धैर्याचा । शोभे मेरूमणी ॥१००॥
दृढनिश्चयें मुक्तीस्वातंत्र्य । सहज मिळवील मद्भक्त । दृढनिश्चय पळवील सारें द्वैत । देईल अद्वैत - रत्नें तो ॥१॥
दृढनिश्चयें गुप्त धन । सहज मिळवील साधक जाण । निश्चयानें योगविद्या संपूर्ण । आकळितां येई ॥२॥
दृढनिश्चय हा कल्पतरू । देईल फलभारू । निश्चया ऐसा सुखकरू । नही पंथ दुसरा बा ॥३॥
दृढनिश्चयें तरला प्रल्हाद । घेई ध्रुव बालही अढळपद । सर्व कार्याचा आदि प्रसिद्ध । दृढनिश्चय ॥४॥
तुझा दृढनिश्चय देखून । मज न थांबवे एक क्षण । परी सप्ताहाचें केलें कुंपण । त्यांत अडकूनी राहिलों ॥५॥
ऐसी पाजोनी बोध सुधा । केला कृतार्थ नरसिंगदादा । तयाच्या पत्नीसीहि उपदेश तदा । देउनी केलें पावन ॥६॥
ऐशा नरसिंगदासें नाथराया । विनविलें अनेक समया । जयपूर शहरीं येउनिया । करावें गृह पावन ॥७॥
भक्ताचें वचन मान्य केलें । परी नाथें जाणें नाही केलें । दावितां निश्चयाचें भय बालें । जाहलें जाणे प्राप्त प्रभूसी ॥८॥
जयपूरीं जातां वाटेंत । भेटेल पुष्करराज तीर्थ । जाई शिष्यासमवेत । सद्गुरुराज ॥९॥
पाहतां गुरूमूर्तीचें तेज तेवीं वेष । वाटे सकलां पुण्यपुरूष । येती तीर्थांचे उपाध्याय विशेष । हातीं वह्या घेउनी ॥११०॥
नाथपूर्वजांची नामाभिधानें । कोणा न सांपडतां गोविंदानें । सांगितली खुणेची सर्व पानें । जाहला हर्ष द्विजांसी ॥११॥
सारोनी स्नानादिक अन्हिक । संतुष्ट केले याचकां । मग रथावरी बैसे नाथसखा । जयपुरी जावया ॥१२॥
वाटेंत भेटला मर्कटमेळा । त्यास आज्ञापी नाथ तीन वेळां । रामदूतांनो घ्या विश्रांतीला । देईन फुटाणे ॥१३॥
ऐकतां वच झाले स्थीर । निज चेष्ठेचा पडला विसर । त्यास श्रीनाथदेव रघुवीररूप । दिसला वाटे ॥१४॥
मरणोन्मुख वृषभ वांचविला । श्वानाचा कुस्वभाव पळविला । त्या प्रभूला मर्कट मेळा । स्थीर करणें अशक्य केवीं ॥१५॥
अजमिराहुनी जयपुरीं । निघाली नाथप्रभूंची स्वारी । अग्रिरथ थांबला फुलारापुरीं । उतरला तेथें नाथ शिष्य ॥१६॥
झाला प्रभातीचा समय । नाथप्रभूच्या मुखमार्जनास्तव । पाही चोहोंकडें जलसंचय । परी न मिळाला बिंदू ॥१७॥
रजपूत प्रांत निर्जल । शुष्क नद्यांचें पुलिन सकल । घ्यावें सदा मृगजल । तृषार्तानें ॥१८॥
देखोनी पुत्र केंविलवाणा । नाथें उघडुनी आपुल्या वदना । काढिलें कलशभर पाणी जाणा । मुखमार्जनासी ॥१९॥
आपुले मुखकमल धुवोनी । देई सर्व शिष्यांलागुनी । म्हणे गंगा आणिली त्रिवेणीहुनी । घ्यावें प्रेमें सर्वानीं ॥१२०॥
जयपुरीं कळविलें आगमन । परी नाथें टाळिला तो दिन । नगरवासी जन होती खिन्न । जाती गृहीं परतुनी ॥२१॥
सांगे प्रभु निजपार्षदगणा । करतील सर्वही भोजना । परी नरसिंगदास अंगना । राहील उपवासी ॥२२॥
ती पतीला आपुलें आगमन । सांगेल निश्चयपूर्ण । परी उपहास करतील जन । बालिकेचा ॥२३॥
तैसीच जाहली हो स्थिती । रथ विश्रामस्थलीं निश्चितीं । कोणीही भक्त नच येती । जाई प्रभु नगरांत ॥२४॥
या यात्रेचें वर्णन । पुढील किरणीं विशद करीन । नाथसुत देई अभिवचन । श्रोतयांसी ॥१२५॥
इति श्रीमाथवनाथ दीपप्रकाशे नाथसुतविरचिते जयपुरागमनंनाम चतुर्विंशतितमः किरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP