मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
नवम किरण

दीपप्रकाश - नवम किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथायनमः --
जय जय श्रीयोगनारायणा । जय जय भवगजमदहरणा । जय जय मोहमधुसूदना । सद्गुरुराया ॥१॥
देवा ! जन्ममरणाच्या वनीं । मातला संसारगज फिरूनी । सद्वृत्ति - इक्षुदंडिनी । खाई मनसोक्त ॥२॥
यातें आतां आवरावें । याचें वनही तोडावें । निज ज्ञानमंदिरीं न्यावें । महाराजा ॥३॥
हा न येईसहजपणें । म्हणोनी कांहीं युक्ति योजणें । स्वतेजाचें जाळें पसरविणें । मग सांपडेल ॥४॥
सांपडतां न घाली वृत्तिचारा । माया - जलाचा बिंदूही जरा । तेणें निर्बल होउनी खरा । होईल तव अंकीत ॥५॥
ऐसा गज वश होता । गंडस्थलीं बैस नाथा मारी अंकुश वा भाता । मार्गीं न्यावया ॥६॥
मार्गाचा देई धडा । शिकवी त्यास आज्ञेचा पाढा । मग स्वामिभक्ति बाराखड्या । सहज गिरवील ॥७॥
ऐसा तयार होता कुंजर । जीव - अंबारी ठेवी वर । त्यांत सोहं कुमर । बसवी आनंदें ॥८॥
मग चिद्रूप - नगरांत । नेई नाथा मिरवीत । ज्ञानरूप प्रासादांत । देई विश्रांती तया ॥९॥
तुझ्याविणें संसार - हत्ती । न होई निर्बल श्रीपती । धांव धांव गा गजपती । योगीनाथा ॥१०॥
भवाचें भयें झालों हिंपुटीं । मज राहिली नाहीं शक्ती । तुजवर भार टाकिला अंतीं । मायबापा ॥११॥
तूं जरी न ऐकसी हे बोल । तरी मग सर्वस्व जाईल । तुझ्या ब्रीदासी लागेल । काळीमा रे ॥१२॥
नाथ भासला समोर । दिसली प्रकाशाची कोर । किरणांचे पुंज थोर । मज दाविलें ॥१३॥
नाथें दिधली कर्तव्यजागृती । दावीन नवम किरणाप्रती । देवगांवाहून नाथ येती । लासूर ग्रामीं ॥१४॥
तेथें वसे लाक्षायनी देवी । जी भक्तांची कामना पुरवी । यात्रा तेथें भरवी । चैत्र कृष्ण पक्षांत ॥१५॥
बघाया यात्रेचा सोहळा । जाई हा योगी आगळा । वंदितां देवीला जाहला । शून्याकार ॥१६॥
तेथें क्रमून कांहीं काळ । यात्रेंत आले योगपाल । तों ऐकिलें मधुर टाळ । वाटे होई भजन ॥१७॥
तेथें गेले योगेश्वर । दिसला एक चमत्कार । बुचड्याचे बोवा सुस्वर । गाती अभिनय करूनी ॥१८॥
सजविला वैरणाचा गाडा । त्यांस बैलांचा चौघडा । ‘ जी - जी ’ चा फोडती हंबरडा । चौघेजण ॥१९॥
पुरुषासी दिधला स्त्रीवेष । वमन करी विषय - विष । प्रेक्षक वदती भले शाबास । मौज जाहली ॥२०॥
त्यास म्हणती तकतराव । हेचि देवाचे उत्सव । शिवदेवी खंडेराव । नाचविती जन ॥२१॥
ही यात्रा नोहे देवाची । परी असे विषयसुखाची । परजन ही करिती छी छी । परि लाज न वाटे आम्हा ॥२२॥
या विषाचा संसर्ग । करी क्षतयुक्त सर्वांग । बालें अथवा स्त्रीवर्ग । भोगिती दुःख हे ॥२३॥
ही नव्हे हो भक्ती । केवळ गमे चैनीची युक्ती । देवासही भ्रष्टविती । ऐशा युक्तीनें ॥२४॥
तरी सावध व्हावें बंधूजन । सोडा सोडा हें अधः पतन । कराया कृतीचें खंडण । परहस्तें करवावें ॥२५॥
देखोनी यात्रेचें दृश्य । नाथा वाटली देवी प्रत्यक्ष । जाई नमन करायास । तों हांसती इतर ॥२६॥
त्या हास्याचें तत्व कळेना । म्हणोनी भ्रमला योगीराणा । धर्मराजासी धर्म जाणा । दुर्योधना अधर्म ॥२७॥
पुनरपि जाई मंदिरीं । तों दिसले माळकरी । हातीं विणा टाळ करीं । कांहींच्या ॥२८॥
करिती भक्तीचा एक गोल । राहती उभे ते भक्त सकळ । करिती नामाचा कल्लोळ । गाउनी नाचुनी ॥२९॥
नाम हेंचि ज्याचें काम । नाम हें जयाचें धाम । नाम हीच विश्रांती परम । त्या महाभागाची ॥३०॥
ऐकोनी ही नामगर्जना । नाथ हृदयीं आनंद मावेना । धांवत आला मनमोहन । भजनरंगीं ॥३१॥
तेथें देखिलें साधू गंगागीर । चाखिलें ज्यांनीं योगसार । बाह्यांतरीं नामाचा गजर । करिती साधुवर्य ॥३२॥
बोवांनीं पाहिला नाथ दृष्टीनें । नाथेंही पाहिलें आपुलेपणें । तारायंत्राचे खुणेनें । ओळखती एकमेकां ॥३३॥
भजन सोडोने गंगागीर । नमविती नाथपदीं शिर । म्हणती यावें योगीवर । भजनी रंगावें ॥३४॥
नाथें मृदंग घेतला । बोवांच्या कंठी विणा शोभला । ‘ आम्ही आळीकर ’ या अभंगाला । गाई माधवनाथ ॥३५॥

अभंग
आम्ही अळीकर । प्रेमसुखाचीं लेंकुरें ॥१॥
पायिं गोंविली वासना । तुच्छ केलें ब्रह्मज्ञाना ॥२॥
येतां देखें मूळा । वाटे पंढरीचा डोळा ॥३॥
तुका म्हणे स्थळ । मग मी पाहीन सकळ ॥४॥

ते गगनभेदी सूर ऐकोन । येती तकतरावा सोडून । विसरती देहभान । श्रोतृवृंद ॥३६॥
या भजनें अज्ञानरात्र । दवडिली कुणाही नकळत । आनंदाची प्रभात । प्रगटविली ॥३७॥
सांगती बोवा भक्तास । हा आहे दिव्य पुरुष । तों धरोनी मनगट साधूस । नेलें नाथें एकीकडे ॥३८॥
विनवी मम अज्ञात दिन । आतां थोडे राहिले जाण । तावत्काल प्रगटीकरण । न करीं बंधुराया ॥३९॥
तूं माझा जिवलग सोयरा । ऐक एवढा बोल खरा । नको करूं व्रताचा चुरा । साधुवर्या ॥४०॥
हंसुनी म्हणती गंगागीरबोवा । सोडीं आतां नाटका या । दावी सत्पथ योगीराया । माधवनाथा ॥४१॥
तेथून वणीस पळाला । जेथें वसे सप्तश्रृंगी विमला । म्हणे आतां येथें राहिला । काळ काढूं ॥४२॥
या आदिदेवींचीं स्थानें । साडेतीन असती विद्यमान । करिती आर्य - भूपालन । नाना प्रकारें ॥४३॥
श्रीमहाकाली देवता । मातापुरीं वसे तत्वता । पुरवी भक्तांच्या आर्ता । कृपाळूपणें ॥४४॥
तुळजापूर परम पवित्र । शोभें महासरस्वती तेंथ । करवीरी अंबाबाई प्रत्यक्ष । महालक्ष्मी ॥४५॥
सप्तशृंग निवासिनी । बैसे गडावरी जाउनी । देई सर्व सिद्धी लागुनी । साधकासी ॥४६॥
या सप्तशृंगगडावरी । नाथ सेवी कल्ककुमारी । न सेवी दुग्धाच्या धारी । कदापीही ॥४७॥
आधींच गड बिकट । त्यावरी असती कंटक । वनपशु देती हांक । भयंकर ॥४८॥
परी आमुचा योगेश्वर । तेथेंच करी स्वैर संचार । ओढे खोरी वृक्ष थोर । न मानी ॥४९॥
कैं भासे झोपडींत । कैं शिरे वृक्षराजींत । कैं भगवतीशीं संयुक्त । दिसे योगीनाथ ॥५०॥
देखोनि वृत्ति अफाट । गडवासी जन विस्मित । रोधिती प्रभूची वाट । दर्शनास्तव ॥५१॥
परि केव्हां जाई केव्हां येई । सर्वांचे तर्क विफल दावी । प्रिय भक्तांची आस पुरवी । कोठें तरी ॥५२॥
एक भक्त होता सुभट । मन करी आपुलें बळकट । साधुरायाची घ्यावी भेट । ऐसी आशा ॥५३॥
उभा राहिला दिवसभर । नाहीं जल वा पोटा भाकर । केला पूर्ण निर्धार । प्रभुदर्शनाचा ॥५४॥
आली मध्यरात्री निशाचरी । या भक्तश्रेष्ठा भिववी भारी । परी तो निर्भय अंतरी । ध्यास योगीश्वराचा ॥५५॥
ऐसा निश्चयी भक्त देखून । नाथें केलें व्याघ्रारोहण । जणूं देवी आली अवतरून । पुरुषवेषें ॥५६॥
देखतां ऐसी उज्वलमूर्ती । भक्ता वाटली पूर्ण तृप्ती । ऐसी करी चमत्कृती । माधवनाथ ॥५७॥
जरी दुग्धाचा लेश नसे । तरी नाथ तेज उणे नसे । लोक म्हणती साधु ऐसे । न पाहिले ॥५८॥
पूर्ण होतां दोन मास । वंदिले श्रीभगवतीस । नाथ येई श्रीनाशिकास । ध्वजारोपणीं ॥५९॥
परि वृत्ति नाहीं सोडिली । कोठें स्नान कोठें वस्ती केली । स्वैरपणें तेथेंही संचली । नाथमाता ॥६०॥
भूमितल केलें शय्यास्थान । नेसला दिशेचें वसन । ज्ञानामृताचें अन्न । घेई नाथराणा ॥६१॥
रविचंद्राचे दीप लावी । नद्यांचें जल सांठवी । वायूचा पंखा हालवी । योगेश्वर ॥६२॥
ऐसा देखोनी दिगंबर । लोक येती थोर थोर । कोणा वाटे विभूती थोर । कोणी वेडा ठरविती ॥६३॥
वृत्त कळतां चिघ्दनास । तेवी गंगागीर बोवांस । येती धांवत हे परमेश । परमेशाकारणें ॥६४॥
विनविती श्रीयोगीराजा । आपुलें वचन पाळा महाराजा । सोडा ऐसी वृत्तिर्‍भाजा । घ्यावा वेष साजिरा ॥६५॥
परि नाथ नसे देहावर । म्हणे न कळे वचन साचार । कोण देता कोण घेता नर । मीच सर्वस्व ॥६६॥
मग हांसले ते संत । धरोनी प्रभूचा हात । नेती सत्वर मंदिरांत । लक्ष्मीनारायणाच्या ॥६७॥
सांगितले गूज प्रेमें । दाविलीं तयांनीं वर्मे । मग नाथें मंगलधामें । मान्य केली विनवणी ॥६८॥
आतां माझा नाथ सद्गुरु । अवतारांत घेईल अवतारू । लीलेंत लीलेचा भास्करू । दावील निश्चयें ॥६९॥
प्रगट झालें माझें बीज । आतां घेईल चिन्मय - नीज । जागवील तो ज्ञानराज । जागेपणें ॥७०॥
सावध असावें संतजन । पुढील किरणापासून । नाथ कार्याचें अधिवेशन । होईल नाना प्रकारें ॥७१॥
नाथ होईल आपुल्यासम । नाथ करील आपुल्यासम । नाथ आपणांतच आश्रम । करील हांसोनियां ॥७२॥
इति श्रीमधवनाथदीपप्रकाशे नाथसुविरचिते अज्ञातवासत्यागवर्णनंनाम नवम किरण समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP