गरुडसत्यभामागर्वहरण

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


प्रथम प्रणमितां गणपति । देइल सद्बुद्धीसी स्फूर्ति. । वंदूं सरस्वति आदिशक्ति, । जे मूळ माया. ॥१॥
परब्रह्म, परात्परु, । लीलाविग्रही, साकारु, । तो सद्भावें सद्गुरु । वंदूं आतां. ॥२॥
नमितों श्रोते, साधुसंत, । जे दीनदयाळ मूर्तिमंत, । जे कां सत्यज्ञानानंत । जगदोधारी. ॥३॥
ज्यांची होतां कृपादृष्टि, । जाहली परमामृतें वृष्टि, । केली चिन्मय अवघी सुष्टि, । तन्मय झालों. ॥४॥
मी एक भक्त, मी एक मुक्त, । मी एक अनन्यसाधनयुक्त, । हाही स्फुंद विरला, विरक्त । होउनि ठेला. ॥५॥
तिळतुल्य जो अभिमान, । तो दु:ख देईल मेरुसमान. । भक्तवत्सल तो जगजीवन । अंतरसाक्षी. ॥६॥
तेषांमहं समुद्धर्ता, । योगक्षेम मी पावविता, । भयकृद्भयनाशन तत्वता । भगवद्वाक्य. ॥७॥
निरसी भक्तांचा अभिमान । पतीतपावन श्रीभगवान् । यदुकुलतिलक नंदनंदन । रुक्मिणीरमण जो. ॥८॥
ऐसी ऐकुनि नवरसवाणी, । श्रोते सादर झाले श्रवणी, । कथा परिसावया डफगाणीं । पावनकारी. ॥९॥
वक्ता विनवी अनन्यभावें. । “ श्रोतीं श्रवणीं सादर व्हावें. । मज हें कृपादान । द्यावें अवधानाचें. ॥१०॥
गरुडसत्याभामेचा गर्व । हरिनें हरिला जो अपूर्व, । तें सादर होउनि सर्व । परिसा आतां. ॥११॥
सत्यभामेच्या मानसीं । “ जो हा दुर्लभ सदाशिवासी । तो मज पूर्व पुण्यें फळासि । आला आता. ॥१२॥
ब्रह्मादिकांसि नये ध्याना, । अतर्क्य तर्केना अनुमाना, । त्या मीं अनुभवितें मधुसुदना, । माधवराया. ” ॥१३॥
“ अनंतब्रह्मांडनायक हरी । स्कंधीं वाहें, जैसी मोहरी. ” । ऐसा गरुडाचे अंतरीं । दुरभिमान. ॥१४॥
“ ‘ तन्न, तन्न. ’ ऐसें श्रुति । ‘ नेति ’ शब्दें ज्या गर्जती, । त्या मी श्रीविष्णूची मूर्ति । स्कंधीं वाहें. ” ॥१५॥
ऐसा उभयतांचे मनीं । गर्व झालासे, म्हणवूनि । विचित्र विनोद चक्रपाणि । करिता झाला. ॥१६॥
रामअवतारीं श्रीरामें । प्रयान करितां पुरुषोत्तमें, । हनुमंतासि वाचानेमें । नेम केला. ॥१७॥
“ कृष्णअवतारीं मी तुज । भेटी दईन अधोक्षज. ” । ऐसें ऐकुनि अंजनीतनुज । बैसे ध्यानीं. ॥१८॥
कृष्ण म्हणे “ वैनतेया, । भक्तशिरोमणि, ममप्रिया, । हनुमंतासि आणावया । जावें वेगीं. ॥१९॥
तूं अगाध पराक्रमी, । सुरवर जिंकुनियां संग्रामीं । अमृत आणिलें, अतर्यामीं । जाणतसों. ” ॥२०॥
गरुड म्हणे “ देवें बरवें । कार्य समजोनि सांगावें. । योग्यायोग्य हें जाणावें । लागे आधीं. ॥२१॥
पालेखाइर प्लवंगम । आणायाचें कोण काम ? । आज्ञा समर्थ. ” विहंगम । म्हणे आता. ॥२२॥
ऐसीं बोलुनि उद्धत वचनें, । वेगीं जाऊनि दुरभिमानें, । समुद्रतीरीं देखे नयनें । हनुमंतासि. ॥२३॥
तंव ध्यानस्थ अंतरीं, । मुद्रा लावुनियां खेचरी, । समाधिसुमनाच्या अरुवारीं । बैसलासे. ॥२४॥
कायावाचामनें हनुमंता । एक भक्तिर्विशेषता. । आणिक नेणे सीताकांता - । वांचुनि कांहीं ॥२५॥
अशनीं, शयनीं, गमनाsगमनीं, । जागृति, सुषुप्ति आणि स्वप्नीं, । जनीं, वनीं तो दिनरजनीं । राम देखे. ॥२६॥
ऐसा देखोनियां मारुती, । गरुडें समीप जाउनि, हातीं । धरूनि, म्हणे “ तुजप्रति । आलों आम्ही. ॥२७॥
द्वारकाधीशें राधारमणें । तुज बोलाविलें कृष्णें. । अपूर्व दर्शन त्याचें घेणें । आजि आतां. ॥२८॥
सोळा सहस्त्र अंत:पुरें, । अष्टनायका, सहपरिवारें । सहीत बैसुनियां यदुवीरें । सभाकेली. ” ॥२९॥
हातें उठवितां ढकलूनी । हनुमान् ध्यान विसर्जुनि, मनीं । सावध होउनि, पाहतां नयनीं, । देखे पक्षी. ॥३०॥
“ सर सर परता. रे, तूं कोण ? । कृष्ण आणिला तो कोठून ? । अंतर पडलें करितां ध्यान । श्रीरामाचें. ” ॥३१॥
म्हणउनि सहजस्वभावें हातें । गरुडा निवारितां हनुमंतें, । चडकण बैसुनियाम जेवी तें । फुटलें त्याचें. ॥३२॥
तेणें जाउनियां चांचरी, । डोळा पडियेली अंधारी. । भयभीत होउनि गगनोदरीं । भरला पक्षी. ॥३३॥
रुधिर वाहत नाकीं तोंडीं । अवचित जाउनिया मुरकुंडी । कृष्णासन्मुख पडिली उडी; । कुंडी जैसी. ॥३४॥
कृष्णें धांवुनियां लवलाहीं । आलिंगिला दोहीं बाहीं. । म्हणे, “ सखया, हें तुज कायी । केलें कवणे ? ” ॥३५॥
येरू म्हणे, “ पुरुषोत्तमा, । तुझा महिमा अगम्य निगमा. । कुंठित झाला शेष ब्रह्मा । वर्णूं जातां. ॥३६॥
पुच्छकेंत तो मजभवंता । कैंचा निर्मिला, हो, तां ? । त्याचें अगाध बल तत्त्वता । कळलें नव्हतें. ॥३७॥
कृष्णें बोलाविलें तुजला. । म्हणता, हातें हाणितां मजला, । पुढें विचार कैसा झाला । तें मी नेणें. ” ॥३८॥
केशव म्हणे, “ तुझें बल पूर्ण ; । परी हा वेळेचाचि गुण. । तुझी जाणें सर्वही खुण । मी जगदात्मा. ॥३९॥
आतां ऐक एक मात. । पुनरपि जाउनियां तूं त्वरित । अनन्यभावें अंजनीसुत । नमस्कारीं. ॥४०॥
‘ वासरमनिकुलभूषण, राम, । अयोध्याधीश, पूर्णकाम, । तो हा मुनिजनमनविश्राम । सीताकांत, ॥४१॥
लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, । बंधुसहित चौघे जण. । अठरा पद्में वानरगण । जयापाशीं, ॥४२॥
तेणें बोलाविलें तुज. । दर्शन होईल सहजीं सहज. । ऐसें बोलतां अंजनीतनुज । येईल वेगीं. ॥४३॥
तरी तूं जाईं गा, पुनरपि । आणुनि भेटवीं तो कपि. । वाट पहातसे अद्यापि । दर्शनाची. ” ॥४४॥
गरुड म्हणे, “ माझा भोग. । मागुती पाठवितो श्रीरंग । असो. चालिला तो, लगबग । झाली त्यासि. ॥४५॥
तेथें सिंधूच्या परिसरीं । वेगें जाउनि तो सर्पारि । अनन्यभावें नमस्कारी । हनुमंतातें. ॥४६॥
“ नमो नमो, जी बलभीमा, । महारुद्र, प्लवंगमा; । रघुवीरदर्शन होईल तुम्हां । पूर्वपुण्यें. ॥४७॥
तुम्हांसि दाशरथी रघुवीरें । बोलाविलें अत्यादरें. ” । ऐसें ऐकोनि समीरकुमरें । नमिलें गरुडा. ॥४८॥
परस्परें अभिवंदन, । येरयेरां समाधान । रामरूपीं अनुसंधान । धरूनि ठेले. ॥४९॥
विनतात्मज । आणि बलभीम । निघाले आक्रमित व्योम, । भक्तकामकल्पद्रुम । पाहवयासि. ॥५०॥
येरीकडे यदुनायकें । सत्यभामेसि कौतुकें । पाचारुनियां सविवेकें । आज्ञा केली. ॥५१॥
“ दर्शन घ्यावया हनुमता । तुम्हांसि होणें लागे सीता; । आम्हीं रामरूप तत्वता । होणें लागे; ॥५२॥
समस्त यादव, वानरगण; । बळीराम तो लक्ष्मण; । द्वारकेची अयोध्या जाण । करणें आतां. ” ॥५३॥
सत्यभामा म्हणे, “ हरि, । विलंब कायसा ? अवधारीं. । जनकात्मजा क्षणाभीतरीं । मी होईन आतां. ॥५४॥
म्हणवुनि उठोनियां लवलाहीं । प्रवेशली अंतर्गृहीं । नाहणें, धुणें, उटणें, पाहीं, । करिती झाली. ॥५५॥
नानाअलंकारलेणीं । घाली फेडी वस्त्राभरणीं, । काजळकुंकूं, वेणीफणी । करिती झाली. ॥५६॥
आज्ञा करितां वरिचेवरि । झाली लगबगां घाबरी । अभिमानाची जाती वैरी । निजभक्तांसि. ॥५७॥
भाळीं काजळ, कुंकूं नयनीं, । नाकीं बाळी, मोतीं कानीं, । कंठीं कडदोरी घालूनि । दर्पण देखे. ॥५८॥
पुसती झाली सखियांप्रति, । “ ऐसी असेल सीता सती ? ” । कृष्णें बोलावितां निगुती । बाहिर आली. ॥५९॥
अवयव दिसती अस्ताव्यस्त; । पाहती सभाजन समस्त; । हास्य करिताति नेमस्त । अधोवदनें. ॥६०॥
श्रीहरि लाघवीं विंदाणीं । रूप विटंबिलें चौगुणीं । लज्जायक्षिणी झडपणी । करूनि गेली. ॥६१॥
लाजोनियां निजमंदिरीं । गेली सत्यभामा नारी. ॥ “ विनोद मांडिला पूतनारी । ” म्हणती सर्व. ॥६२॥
गर्वपरिहार जाहल्यवरि । समीप रखुमाई सुंदरी, । आदिमाया, सिंधुकुमरी । सेवा करीत. ॥६३॥
कृष्ण म्हणे, “ वो रुक्मिणी, । सीता व्हावें येच क्षणीं. । सर्व सालंकृतलक्षणीं । लक्षणोक्त ” ॥६४॥
आज्ञा करितां ते अवसरीं । रुक्मिणी हरिचरणांबुज धरी । म्हणे, “ स्वामी, श्रीमुरारी, । आज्ञा तुमची. ॥६५॥
‘ जेथें भाव, तेथें देव. ’ । हाचि सिद्धांचा स्वानुभव. । एक नेणती, ते अभिनव । म्हणती यासि. ॥६६॥
रुक्मिणी झाली जनकात्मजा; । कृष्ण झाला रामराजा; । रीस वानर झाले वोजा । यादवगण ते. ॥६७॥
द्वारावते, अयोध्या नगरी । झाली त्या क्षणामाझारी. । सभा घनवटली परिवारीं । शोभा आली. ॥६८॥
तों नभपंथें अकस्मात । आले गरुड आणि हनुमंत, । रामनामस्मरणें गर्जत । पाहती दृष्टी. ॥६९॥
सुग्रीव, जाबुंवंत, बिभीषण, । सीता, राम, लक्ष्मण, । अंगद, नळ, नीळ, सुषेण । हनुमान् देखे. ॥७०॥
पाहतां रघुवीररूप नयनीं । हनुमान् आला लोटांगणीं; । मिठी पडली रघुवीरचरणीं । अनन्यभावें. ॥७१॥
उचलुनि श्रीरामें निजकरें । क्षेमालिंगन अति आदरें । देतां, प्रेमाच्या पडिभरें । स्फुंदन आलें. ॥७२॥
अवघ्या निजभक्तांसि क्षेम । देउनि बैसविला बलभीम. । स्वागत पुसे राजा राम । हनुमंतासि. ॥७३॥
येरू म्हणे, “ जी रघुपति, ।अखंड न खंडें कल्पांतीं. । कृपादृष्टीनें संतृप्ति । होऊनि ठेली. ॥७४॥
रामरूपीं रमलें मन. ॥ झालें निजानंदघन. । जनीं, वनीं मग जगजीवन । अवघा भासे. ॥७५॥
अंतर जाणोनियां श्रीरामें । आज्ञा देतां, पुरुषोत्तमें, । हनुमान् चालिला सप्रेमें । अधिष्ठाना.॥७६॥
तेव्हां सीता जनकनंदिनी । कृपे द्रवली संतोषोनी. । म्हणें “ तुजऐसा त्रिभुवनीं । नाहीं भक्त. ॥७७॥
रामदूत ऐसें वचन । तुजला साजे, गा, संपूर्ण. । दास्य घडलें तुजलागून । अंजनीतनया. ॥७८॥
प्रथम सीताशुद्धिमिसें । बनकर मरुनि वनविध्वंसें । लंका जाळुनियां त्वां कैसें । कौतुक केलें ? ॥७९॥
शक्ति लागतां लक्ष्मणा, । एका रात्रीमध्यें जाणा, । द्रोणागिरि आणिला. कवणा । होईल ऐसें ? ॥८०॥
जाउनि आणुनि, नेउनि ठेविला; । वानरदळभार वांचविला, । लोकत्रयीं पवाड केला । अवताराचा. ॥८१॥
तुझिया उपकारां उतराई । कवणें व्हावें, कैसें ? पाहीं. । काय द्यावें हें मज कांहीं । नकळे आतां. ” ॥८२॥
ऐसें ऐकुनियां उत्तर । काढुनि नवरत्नांचा हार । कंठीं घाली रामचंद्र । हनुमंताच्या. ॥८३॥
हनुमंत पाहे लवडसवडी । रत्नें घेउनि दशनीं फोडी; । जीं न धनकोडी । देतां एका. ॥८४॥
तें तृणतुल्य मानुनी, । हनुमान् फोडुनि टाकी अवनी. । म्हणे, “ माझा रामनयनीं । न दिसे येथें. ॥८५॥
जेथें नाहीम रामस्मरण । ते केवळ, जाण, पाषाण. । काय करावे घेऊन । निजभक्तांसि ? ॥८६॥
नवविध नवरत्नांची माळा । नित्य नूतन घालुनि गळां, । अखंड भोगावा निजसोहळा । निजभक्तांनीं. ” ॥८७॥
जानकी म्हणे, रे “ वायूकुमरा, । अमोल्य नवरत्नांच्या हारा । फोडोनि टाकिलें अविचारा; । काय म्हणोनि ? ” ॥८८॥
मारुती म्हणे, “ माते, जाण. । आत्मप्राप्तीचें साधन । नव्हे म्हणवुनियां फोडून । टाकूनि देतों. ॥८९॥
अलक्षलक्षें लक्षापति । दिव्य चिद्रत्नाची ज्योति । अखंड न खंडे कल्पांतीं । तेजोमय जे. ” ॥९०॥
ऐशा स्वानुभवें मारुती । जाणोनियां सीतापति । आज्ञा देता झाला निगुती । हनुमंतासि. ॥९१॥
जयजयकारें रामस्मरणें । दुस्तर भवसागर हा तरणें, । कोटिकुळांतें उद्धरणें । श्रवणमात्रें. ॥९२॥
ऐसी करूनियां गर्जना । हनुमान् बोळवितां स्वस्थाना । अष्टै भावे भाविकजना । स्फुंदन आलें. ॥९३॥
गेला स्वस्थळासि हनुमंत. । मागें बितला जो वृतांत, । तो परिसा साधुसंत, । श्रोतेजन हो. ॥९४॥
पूर्वी होतें जैसें, तैसें । केलें सर्वहि जगन्निवासें. । याचें चोज मानावें कैसें । सर्वज्ञांनीं ? ॥९५॥
‘ हरि करील, तें नव्हे काय ? ’ । हा मुख्य, जाणा अभिप्राय; । इच्छामात्रें मायामय । हें रचिलें जेणें. ॥९६॥
कृष्णअवतार द्वापारीं; । यादवकुळीं, द्वारकापुरीं, । सत्यसंकल्प श्रीहरि । तो करूनि दावी. ॥९७॥
भगवंत भक्तांचा साहकारी । उणें पडों नेदी तिळभरि; । गर्व परिहरूनी त्यांवरि । दया करित. ॥९८॥
दीनानाथ, दीनबंधु, । भक्तवत्सल, करुणासिंधु, । पतीतपावन, आनंदकंदु, । रंगलासे. ॥९९॥
सहजीं सहज पूर्णरंग । सर्व रंगीं तो नि:संग, । सच्चित्सुखमय अभंग । होउनि ठेला. ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP