TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

शुकरंभासंवाद

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


ओव्या
जयजया गिरिजात्मजा । अनन्यभावे तुझी पूजा । करुनियां आत्मकाजा । शरण वोजा रिघालो ॥१॥
ॐ नमो वाग्विलासिनी । वीणा, पुस्तकधारिणी । जिव्हे नवरसदायिनी । होई जननिये जगदंबे ॥२॥
महानुभाव विद्वज्जन । तयांसि करुनिया नमन । गुरु परब्रह्म परिपूर्ण । सच्चित्सुवर्ण जग नग ॥३॥
अभिवंदिला तो स्वामी । जो निजानंदधार्मी । रंगला अनामनामी । विराजे कमी निष्कर्मी ॥४॥
स्तवन करितां आर्जव जने । संतोषोनि प्रशस्त मने । शारदा गुरु गजानने । सुप्रसन्न बोलिजे ॥५॥
स्फूर्ति पावेनि प्रसादे । कथाकौतुक विनोदे । वर्णाक्षरी विचित्र पदे । पैल ती द्वंद्वे प्रमेयासि ॥६॥
कोणे एके दिवशी । नारद आला इंद्रसभेसि । कलिकालाचे गमन त्यासि । वृत्तांतासि जाणत ॥७॥
इंद्र पुसे मुनिवर्या । कांही सांगावे आश्चर्या । कोण करितो तपश्चर्या । अपर सूर्यासारिखा ॥८॥
मृत्युलोकी तपोनिवि । कवण आहे सांगा सुधी । नारद म्हणे रे महोदधि । तुज बुध्दि स्फुरेना ॥९॥
राहूं नको निजपुरा । नेणसी शुकयोगीद्रा । सिध्द- वनी त्यासि थारा । जगदोध्दारा अवतरला ॥१०॥
अमानित्वादि दैवी । संपत्तीचा गोसांवी । मुक्त - मौक्तिक अनुभवी । चिदर्णवी जन्मला ॥११॥
देहादि भुवनत्रय । जाणोनियां तृणप्राय । स्वरुपान्वये निर्भय । वर्णू काय तयासि ॥१२॥
शापानुग्रहार्थ । कदाचित धरिला स्वार्थ । तुझिया पदासि अनर्थ । जाणे यथार्थ वोढवला ॥१३॥
ऐसी लावूनियां कळा । गमन केले तयेकाळी । या उपरि इंद्र शोकजाळी । पडला मेळी चिंतेच्या ॥१४॥
तेचि रसाळ कथा गहन । श्रोती होऊनि सावधान । सर्वागाचे श्रवण । द्यावें अवधान ग्रंथासि ॥१५॥
शुक योगीद्राचे तप । झाले झाले जाणोनि अमूप । अमरनाथ विक्षेप । सचिंतरुप सर्वदा ॥१६॥
वेदशास्त्रासंपन्न । सभेसि आलिया ब्राह्मण । अल्पज्ञाचे दुश्चित मन । तैसे जाण इंद्रासि ॥१७॥
शतमख सांग घडे ज्यासि । इंद्र - पद प्राप्त त्यासि । ऐशा पुण्याच्या राशी । शुकापाशी जाणवल्या ॥१८॥
स्वसामर्थ्ये माझे स्थळ । घेईल लागतां वेळ । विघ्न करावें प्रबळ । सुनिश्चळ होऊनि ॥१९॥
मग विचारुनि मानसी । पाचारियले रंभेसि । छळावया श्रीशुकांसि ।तत्क्षणी योजिली ॥२०॥
अति सुंदर लावण्यगुणे । दिव्य अलंकार भूषणे । सुगंधद्रव्ये वस्त्राभरणे । बाळसूर्यासादृश्य ॥२१॥
नेत्रकटाक्षबाणे । ह्रदय भेदी जीवे प्राणे । पंचविषयांचे धांवणे । निघे दर्शने जियेच्या ॥२२॥
ऐसी रंभा स्वरुपे सुंदर । पाठविली सत्वर । देवोनि उपकरण सामग्री समग्र । योगेश्वर छळावया ॥२३॥
मग मनोबगे चालिली । जैसी विद्युतप्रभा झळकली । विडा पैजेचा उचलोनि गेली । आज्ञापिली ते समयी ॥२४॥
श्रीशुकाचा तपप्रभाव । वना दशा आली अपूर्व । कल्पलता वृक्ष सर्व । हें अपूर्व वर्तले ॥२५॥
ते काननीच सरोवर । अमृताहूनि गोड नीर । पक्षिगायने किन्नर । देहभाव विसरले ॥२६॥
अचळ राहिला वसंत । तेणे सकळ वृक्ष जात । सिध्दचारण मुनी तेथ । अंतर्भुवनी विश्रामिले ॥२७॥
कीटक पक्षी जळचर । चतुष्पादादि वनचर । कोण्ही नाही क्षुधातुर । तृषारहित ॥२८॥
जीवमात्रांसि तारुण्य । शोभे यापरी अरण्य । महिमा शुकाची अगण्य । अपार पुण्य तपाचे ॥२९॥
तेथिचे विचित्र पाषाण । वैडूर्यतेजसंकीर्ण । प्रकाश शशीसूर्येवीण । अणुप्रमाण तम नाही ॥३०॥
नक्षत्रांमाजी सोम । दशावतारी कृष्णराम । अपरसूर्य पूर्णकाम । विश्रामधाम साधकां ॥३१॥
ऐशिया श्रीशुकापाशी । रंभा आली छळावयांसि । तेथिची विचित्र चर्या कैसी । अभिप्रायेसि परियसा ॥३२॥
आली शुकाचिया गुंफेसि । तंव तो ध्यानस्थ मानसी । ऋध्दि वोळंगती दासी । चरणापाशी जयाच्या ॥३३॥
अखंड स्वरुपाकार दृष्टि । ब्रह्मरुप देखे सृष्टि । पाहतां परमामृतवृष्टि । होय पुष्टि जीवांसि ॥३४॥
सच्चिदानंद तनु । जैसा दिसे बाळ जानु । निजतेजे शोभायमानु । मनमोहन साधकां ॥३५॥
निर्विकार मनोवृत्ति। देही विदेही आत्मस्थिति । अभंग भंगेना कल्पांती । ऐसी मूर्ति देखूनि ॥३६॥
कला कौशल्य गीत नृत्य । संगीतगायने रमवी चित्त । हास्यविनोदे रंजवीत । परि तो मुक्त यदर्थी ॥३७॥
नाना वाद्यांचे गजर । परम रमणीय मनोहर । नूपुरांचे झणत्कार । कर्णद्वारी प्रवेशती ॥३८॥
शब्द पडतां श्रवणी । शुक सावध जाहला मनी । काय कौतुक या वनी । म्हणूनि नयनी विलोकिले ॥३९॥
इंदुवदना सुलोचनी । रंभा देखिली नयनी । स्त्रीपुरुषभाव कानी । शुक स्वप्नी नायके ॥४०॥
मुकुट कुंडले कुसरी । तिन्ही नामे अलंकारी । सुवर्ण एक चराचरी । तैशापरी जग देखे ॥४१॥
संकल्प सन्निपात भेद । जल्पती ते मतिमंद । अकल्प बोधे तत्वविद । बोधले स्वपद पावूनि ॥४२॥
ऐसे जाणूनि येरी । पूजन केले षोडशोपचारी । अमृत नैवेद्य वोगरी । उदक सारी प्राशना ॥४३॥
प्रतिमा पाषाण जैसा । मुनी पूजा घे तसा । तेथ कायसी विषयाची आशा । प्राप्त पुरुषा बोलणे ॥४४॥
स्वसुखासनारुढ जाण । तो कां करी वृषभरोहण । नित्य तृप्त भिक्षाटण । करी कवण विचारे ॥४५॥
मळ मूत्नवायस भक्षी । हंस तयांते न लक्षी । पाहतां दोघे पक्षी । सज्ञान दृष्टी जाणती ॥४६॥
मुक्तमोतियांचा चारा । तयां राज हंसा सुकुमारा । वास मानस सरोवरा । रहित थारा न माने ॥४७॥
तैशापरी या योगींद्रा । रंभा दावी काममुद्रा । अवस्थातीत योगनिद्रा । चित्सुखभद्रा ते काळी ॥४८॥
ऐशा योगेश्वराप्रति । रंभा वदे कुश्चळ उक्ति । नपुंसक होसी तूं ये जगती । पुरुष व्यक्ति होऊनि ॥४९॥
आम्हां ऐशा नारी । धुंडितां दुर्लभ चराचरी । एकांतस्थळ त्याहीवरि । वनांतरी असोनि ॥५०॥
सौंदर्य आमुचे विचित्र । श्वान केला विश्वामित्र । न साहे वियोग क्षणमात्र । त्याहूनि अन्यत्र योग्य कोण ॥५१॥
आमुचे नेत्रकटाक्ष । वारी ऐसा कोण दक्ष । इंद्र जाहला साक्षेप । हे प्रत्यक्ष सर्वासि ॥५२॥
मृत्युलोकीचे राय । मानूनि जैसे तृणप्राय । गणना इतरांची काय । कोणीही न जाय जिंकोनी ॥५३॥
जन्मा आलिया पुरुषे । भोग भोगावे सावकाशे । इंद्रिये कोडितां आक्रोशे । महादोषे आकळिजे ॥५४॥
ईश्वरे निर्मिली इंद्रिये । त्यांही करावी आपली कार्ये । न करित प्रत्यवाये । द्रोही निश्चये होशील ॥५५॥
ऐसी मदोन्मत्त प्रमादे । वचन बोलताहे विनोदे । शुक निर्भय स्वच्छदें । अति आल्हादें बोलत ॥५६॥
रंभे तूं प्रत्यक्ष मोहिनी । सकळ कळा प्रवीण गुणी । अंकुर इच्छिसी पाषाणी । घालूनि पाणी सर्वदा ॥५७॥
भस्मी घृतचिया धारा । घातलिया काष्ठभारा । पेटणे नाही वैश्वनरा । भ्रम वोसरा तेवी तुझा ॥५८॥
रंभे तुझे उपाय । निष्फल झाले सांगू कार्य । इंद्रजाळीचे राय । छाये अंगे मारिसी ॥५९॥
ऐसे बोलतां योगेश्वरे । रंभा वदे प्रत्योत्तरे । तूं क्लैव्य होसी निर्धारे । हे मज बरवे कळो आले ॥६०॥
तुझिया मनीचा भाव । मज कळो आला सर्व । हाही मनुष्यलोकीचा जीव । काय अपूर्व मानावा ॥६१॥
ऐसे भाविशील झणी । नहो मृत्युलोकीच्या कामिनी । मळमूत्रे पै धणी । भरिल्या सौंधणी रजकाच्या ॥६२॥
दंतधावन मुखशुध्दि । न करितां ये दुर्गधि । कफ, वात, पित्ते कधी । सांपडल्या त्रिशुध्दि नवजाती ॥६३॥
ऐशा नव्हो आम्ही नारी । स्वर्गलोकीच्या सुंदरी । म्हणोनि आवेशे नखाग्री । उदर चिरी तात्काळ ॥६४॥
दोन्ही करे दोन्ही भाग । करोनि दावी अंतरंग । नानापरिमळ भोग । सुवासें चांग नभपरे ॥६५॥
बावन्न चंदन अपर । जवादि कस्तूरी अगर । विचित्र परिमळ कापूर । सुंगध अपार निघाले ॥६६॥
जाई, जुई, शेंवती । मोगरे चंपक मालती । बकुल पुष्पे केगती । ऐसे येती सुवास ॥६७॥
रंभा बोले श्रीशुकाते । अविश्वास असेल तूते । तरि येऊनि स्वहस्ते । पाहे मागुता एकदां ॥६८॥
शुक ह्मणे विदित झाले । पूर्वी असते जरि कळले । तुझिये पोटी नाही केले । जन्म घेणे ईश्वरे ॥६९॥
बारा वर्षे उदर - कुहरी । श्रमलो मातेच्या उदरी । मळमूत्र नवद्वारी । नरकघोरी न पचतो ॥७०॥
ऐसे बोलतां शुकमुनी । अनुतापे तापली मनी । मग प्रवतेंनियां स्तवनी । येऊनि चरणी लागली ॥७१॥
धन्य धन्य तुम्ही संत । अखंड स्वरुपी शांत । तेथे कायसी हे मात । नित्य तृप्त तयांसि ॥७२॥
स्वामिसेवेचेनि निमित्ते । पूर्वकर्म शुध्द होते । तरीच देखिले चरणाते । पूर्ण चित्ती निवाले ॥७३॥
ऐसे बोलोनि आज्ञा । घेऊनि गेली स्वस्थापना । पतन नोहे योगी - जना । अधिष्ठाना पावलिया ॥७४॥
शचीपति पुसे वृत्त । रंभे सांग यथोचित । तंव ते प्रेमे सद्गदित । हर्षयुक्त बोलत ॥७५॥
सांगो काय कळानिधि । शुकयोगींद्राची बुध्दि । सदां निमग्न तो सुखाब्धी । माजी देहबुध्दि त्या नाही ॥७६॥
आत्मलाभे नित्यतृप्त । लोकाचरणी तो प्रसुप्त । त्याची दशा अति गुप्त । असे लुप्त योगियां ॥७७॥
सदाशिवा छळिती भूते । क्षुधेते पीडिले अमृते । तरिच छळणोक्ति श्रीशुकाते । निश्चयाते पावेल ॥७८॥
वागुरे आंतुडे वारा । शीते पीडिजे हिमकरा । तमे दाटिजे भास्करा । तै शुक योगीद्रा छळणोक्ति ॥७९॥
पतंगाचेनि पक्षवाते । शांत कीजे प्रळयाग्नीते । जंबूकभये पंचाननाते । सुखनिद्रा न लागेचि ॥८०॥
चित्रीचे छाया कृष्णसर्पे । गरुड भयाभीत कीजे दपे । तरिच श्रीशुकाते कंदपे । विकलता दीजे देवेशा ॥८१॥
भक्ति विरक्ति आणि प्रबोध । शुकाचे ठायी शुध्द । न कळे महिमा अगाध । त्यासि बाध कवण लावी ॥८२॥
ऐकोनि रंभेचा वाग्विलास । सहितसुरगुरु देवेश । धन्य बोलती श्रीशुकास । मुक्त सर्वासि मानला ॥८३॥
सहजी सहज पूर्णरंग । निजानंद जो नि:संग । सर्व संगी तो अभंग । ग्रंथ सांग पै तेणे ॥८४॥

समाप्त.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-16T21:01:05.3230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

beveloid

  • शंकुघन 
  • बीव्हलॉइड 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site