करुणाष्टक

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


पांचाळीसि सभेंत दुष्टवचनें दुर्योधनें गांजितां,
तेव्हां सत्वर द्वारकेहुनि उडी घालोनियां तत्वतां ।
लज्जा येउनि रक्षिली भगिनिची, देऊनि वस्त्रें बरीं.
गेली सत्वरता तुझी मजविशीं ते केवुती श्रीहरी ? ॥१॥
नक्रें भीमपराक्रमें निजबळें नेतां गजेंद्रा जळीं,
वैकुंठीहुनि धांवलासि हरि तूं; आलासि हातोफळी. ।
केला मुक्त स्वभक्त नाम स्मरतां भावें तुझें वैखरी.
गेली सत्वरता तुझी मजविशीं ते केवुती श्रीहरी ? ॥२॥
प्रल्हादासि पिता हिरण्यकशिपु द्वेषें बहू त्रासितां,
तेणें तूज मुखें स्मरोनि धरिली निर्वैर एकात्मता, ।
तैं त्वां धांवुनि येउनी, प्रगटणें त्या शुष्क काष्ठांतरीं.
गेली सत्वरता तुझे मजविशीं ते केवुती श्रेहरी ? ॥३॥
वाळीमर्दन, सेतुबंधन जळीं, कीं धर्मसंरक्षणीं,
किंवा अर्जुनसारथीपण तुवां त्या कौरवांच्या रणीं ।
केलें, ते समयीं रथीं फिरविले ते अश्व कैसे परी ?
गेली सत्वरता तुझी मजविशीं ते केवुती श्रीहरी ? ॥४॥
कर्मे व्याधअजामिळादि गणिका, वाल्मीक हे दुष्कृती;
तेही पावन नाममात्र जपतां केले तुवां, श्रीपती ! ।
मीही एक पतीत त्यांत न सरें, तेव्हां तुला तें उणें.
लक्ष्मीकांत, पतीतपावन, ब्रिदें; ते सत्य कोण्या गुणें ? ॥५॥
ऐसे भक्त युगायुगीं बहुत त्वां ते रक्षिले, अच्युता !
देवा ! सांप्रत तोचि तूं; तरि तुझी हे कोण निष्ठूरता ? ।
ते काळीं, हरि, तूं समर्थ बहुधा होतासि त्याकारणें;
आतां दुर्बळता आली तुज, मला हें सांगती लक्षणें. ॥६॥
नेणें ते समयीं विशेष शरिरीं तारुण्य होतें हरी.
आतां सांप्रत कां तुला मजविशीं वार्धक्य आलें तरी ? ।
गेली शक्ति, तनू पराधिन तुझी झाली, असें भासतें;
या हेतूस्तव बोलतों कठिण हें, पावेसिना कां मतें ? ॥७॥
साधू, सज्जन, देव, ब्राह्मण, ऋषी, शास्त्रें, पुराणें, श्रुती,
दीनानाथ, दयानिधान, हरि तूं ऐसीं ब्रिदें गर्जती. ।
तें मिथ्या म्हणतां झडेल रसना तत्काळ हेंही खरें;
ऐसें हें असतां दया न करणें कां त्वां दयासागरें ? ॥८॥
कीर्तीची हरि त्वां ध्वजा उभविली पूर्वींच लोकत्रयीं;
ते आतां निजरंग देउनि पुन्हां संपूर्ण भाग्योदयीं ।
लावावी, दृढनिश्चयें करितसें विज्ञापना मी तुतें.
श्रीरंगा ! करुणाकरा ! गुरुवरा ! तारीं त्वरें तूं मतें. ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP