अप्रकाशित कविता - ताई, कां रडतेस

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


“ताई, कां रडतेस तोण्ड करुनी भिंतीकडे साङग ना !
कोणाचे कडु बोल हे रडविती ? कोणी तुला मारिलें ?
आऊने बघ हा दिला अनरसा, जो आवडीचा तुझ्या,
खावूं केविं तुझ्याशिवाय म्हणुनी शोधीत आलों तुला.
अर्धा खा न गडे ! नको ?तर तुझ्या तोंडांत घालीन मी !
मी नाही कधि सोडणार तुजला, खावच लागेल हा.
पत्त्यांचा तुज बङगला सुबकसा येतो कराया, मला
येऊना पडतो क्षणोक्षणिं तरी जाऊं कराया चल.
किंवा तू चल अङगणात यमुने ! पाण्डू, सदू, रावजी,
गोदू आणि मथू, मुलेंहि दुसरीं आहेत आलीं तिथे
खेळायास लपाछपी, बघ किती रङगामधे डाव तो
आला खास असेल ! तू चल तिथें - कां गे तुझें हें असें ?”
“ येतें मी पण थाम्ब माधव ! तुझी घाऊ सदाची अशी !
डोळे मी पुसतें, अगोदर तुझा दे भाग अर्धा मला !”

४ सप्टेम्बर १९१४

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP