भक्तवत्सलता - अभंग २६ ते ३०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२६.
दुर्योधना मारी । पांडवासी रक्षी हरी ॥१॥
पांडवा वनवासीं जाये । तयापाठीं देव आहे ॥२॥
उणें न पडे तयांचें  । काम पुरवी हो मनाचे ॥३॥
जनी म्हणे विदुराच्या । कण्या भक्षी हो प्रीतीच्या ॥४॥
२७.
वर स्कंधी ऋषि तो वाहिला । बळीनें द्वारपाळ केला ॥१॥
भक्ता आधीन होसी । त्याच्या वचनीं वर्तसी ॥२॥
त्याचे गर्भवास सोसी । कष्टी होता अंबऋषी ॥३॥
सर्व दु:खासी साहिलें । जनी म्हणे बरणें केलें ॥४॥
२८.
भक्तीसाठीं याति नाहीं । नाहीं तयासी ते सोई ॥१॥
रोहिदास तो चांभार । त्याचा करी कारभार ॥२॥
जो कां भक्त यातिहीन । देव करी त्याचा मान ॥३॥
त्यासी भक्ताचा आधार । वाट पाहे निरंतर ॥४॥
जनी म्हणे भक्तासाठीं । विठो सदा गोण्या लोटी ॥५॥
२९.
चोखामेळा अनामिक । भक्तराज तोचि एक ॥१॥
परब्रम्हा त्याचे घरीं । न सांगतां काम करी ॥२॥
रोहिदास तो चांभार । पाहे मोमिन कबीर ॥३॥
नेंई जबी बीच दासी । रंगीं वेढी नांगर पिशी ॥४॥
३०.
देव तारक तारक । देव दुष्टांक्षी मारक ॥१॥
गीतेमध्ये आदि अंत । ऐसें बोले तो भगवंत ॥२॥
शत्रुलागीं आधीं मारी । भक्तसंकटीं रक्षी हरी ॥३॥
जनी म्हणे कृपा करी । भाव पाहोन अंतरीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 31, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP