भक्तवत्सलता - अभंग ११ ते १५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


११.
भक्त जें जें कर्म करिती । तें तूं होसी कृपामूर्ती ॥१॥
हें तों  नवल नव्हे देवा । भुललासी भक्तिभावा ॥२॥
वाग्दोर धरुनी दांतीं । चारी घोडे चहूं हातीं ॥३॥
धूतां लाज नाहीं तुला । दासी जनी म्हणे भला ॥४॥
१२.
देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो  वैकुंठ ॥१॥
पुंडलिकापुढें उभा । सम चरणांवरी शोभा ॥२॥
हातीं चक्र पायीं वांकी । मुख भक्तांचें अवलोकीं ॥३॥
उभा बैसेन सर्वथा । पाहे कोडें भक्त कथा ॥४॥
सर्व सुखाचा सागर । जनी म्हणे शारंगधर ॥५॥
१३.
दु:खासन द्रौपदीसी । घेउनी आला तो सभेसी ॥१॥
दुर्योधन आज्ञा करी । नग्न करावी सुंदरी ॥२॥
आतां उपाय कृष्णा काय । धांवें माझे विठ्ठल माय ॥३॥
निरी ओढितां दुर्जन । झालें आणिक निर्माण ॥४॥
ऐसीं असंख्य फेडिलीं । देवीं तितुकीं पुरविलीं ॥५॥
तया संतां राखिलें कैसें । जनी मनीं प्रेमें हांसे ॥६॥
१४.
ब्राह्मणाचें पोर । मागे दूध रडे फार ॥१॥
माता म्हणे बालकासी । दूध मागें देवापासी ॥२॥
क्षिराब्धीची वाटी । म्हणे जनी लावी ओंठीं ॥३॥
१५.
पंढरीच्या राया । माझी विनवणी पायां ॥१॥
काय वर्णूं हरिच्या गोष्टी । अनंत ब्रम्हांडे याचे पोटीं ॥२॥
सेना न्हावी याचे घरीं । अखंड राबे विठ्ठल हरी ॥३॥
राम चिंता ध्यानीं मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 31, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP