श्री वेंकटेश्वर - पदे १४१ ते १५०

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


१४१
बंकटरमणाचे महिमान । तीस अध्याय केले कथन ।
ते विस्तारें वर्णिता जाण । ग्रंथ गहन वाढेल ॥१.१९॥

१४२
वेडा वाकुडा उत्तरीं । वाचा-सुमनें पूजिला हरी ।
प्रीति पावो हदयांतरीं । जो व्यापक सर्वांच्या ॥११.२३४॥
समाप्तकर्ता श्रीगुरुनाथ । श्रोतीं आवडी ठेविजे येथ ।
प्रीति पावों रुक्मिणीकांत । भीमातीरविहारी ॥२३६॥

१४३
आठां दिवसां शिक्कुरवारीं
धयादुधाची मोरी वाहे ।
तेलंगा राजा नाहे, देव बालाजी ॥
आठवडा शिक्कुरवारीं
लवंगाचं राइतं ।
तेलंग्याला शाकाव्रत, देवा की बालाजीला ॥
आठां दिवसां शिक्कुरवारीं
निवेद खिरीचा, राजा जेवतो गिरीचा । देव बालाजी ॥
आठां दिवसां शिक्कुरवारीं
निवेद खिरी-खिचडीचा ।
घरीं पाहुणा गिरीचा, देव बालाजी ॥

१४४
गिरी चढताना । कमरीं बांधिला शेला ।
पुत्रासाठी नवस केला । देवा ग बालाजीला ॥

१४५
गिरी ग चढताना । गोविंद गोविंद म ( म्ह ) नावं ।
लक्ष नारळ फोडावं । गरुडखांबापाशी ॥
नऊ लाका(खां) ची पायरी । चधता आलाय शीन ।
कवा होईल दरशेन । देवा बालाजी ? ॥
चला ग जाऊ पाहू । गिरीच्या आवारात ।
नंदादीप जळत । देवा ग बालाजीचा ॥
वाजंत्री वाजती । वाजती थोर थोर ।
झेंडा जातो गिरीवर । देवा या बालाजीचा ॥

१४६
तेलंग्या रानामध्ये । हालगीचा परिपाठ ।
आला नौबद वाजवीत । देव बालाजी ॥

१४७
बारीक तांदूळ । गंगाळीं भिजू घाला ।
सखा पारण्याला आला । देव बालाजी ॥
बारीक तांदूळ । जिर्‍याच्या बरोबरी ।
आधी जेवे माझ्या घरीं । देव बालाजी ॥
बारीक तांदूळ । आधानीं आले मोती ।
कारागीर तुझा पती । देव बालाजी ॥
बारीक तांदुळाचा । हंडा शिजतो भाताचा ।
बामन जेवतो गिरीचा । देव बालाजी ॥
बारीक तांदूळ । आधानीं झाला खवा ।
गडबड जव्हा तव्हा । देवा या बालाजीची ॥
साळी कुटुनी भात । गहू दळुनी शिरा ।
आला गिरीचा सोयरा । देव बालाजी ॥

१४८
बाई, गिरीचा यंकोबा । हाये पैशाचा लालची ।
माळ बुक्क्यात संतोषी । पंढरीचा पांडुरंग ॥

१४९
देव मोठा नाटकी झाला,
पद्मावतीला वरण्याला ॥ध्रु.॥
लक्ष्मी गेली रुसूनी म्हणुनी ।
चैन नसे की जीवाला ।
म्हणुनी वारुळीं गुप्तचि झाला ॥१॥
लक्ष्मी पद्मावती हो झाली ।
आकाश-उदरीं अवतरली ।
तिजसाठी वेडा झाला ॥२॥
कुबेरापाशी धन तो घेतो ।
अद्यापी ऋण फेडितो ।
गजराने लग्नहि केला ॥३॥
१५०
पंचगंगेवरूनि पाहिले श्रीकृष्ण
देव पूजिले हरी ।
मंजुळेसंगमीं स्नान करूनिया
पावलो पंढरपुरीं ॥
भीवरेच्या तटीं उभा जो विठ्ठल
कर त्याचे कटेवरी ।
त्याचेपुढें दास पुंडलीक उभा
कर जोडुनि पद्मांजली ॥
चंद्रभागे सरोवरीं जीवें जीवोत्तम ध्यान धरी ।
माझा स्वमी विठ्ठल तो श्रीहरी ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP