श्री वेंकटेश्वर - पदे ८१ ते ९०

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


८१
साच राहे ज्याचा । अंतरींचा भाव ।
सोयिरा माधव । होय त्याचा ॥६॥
त्याचा तोचि करू । जाणे मोक्ष बंध ।
कायसा संबंध । आणिकाचा ॥७॥
आणिकाचे येथे । काय प्रयोजन ।
भक्तीचे साधन । घ्यावें हातीं ॥८॥
हातीं ज्याच्या शोभे । धनुष्य शारंग ।
तोचि रमारंग । आळवावा ॥९॥
दास हा गणेश । सांगतो हितार्थ ।
पुरवी मनोरथ । कृपासिंधू ॥१०॥

८२
आमुचा पूर्वज । दातार वंशींचा ।
घरी भाव साचा । तुझ्या पायीं ॥६५॥
होऊनि उदास । विटला अंतरीं ।
राहे गिरीवरी । भक्तिभावें ॥६६॥
प्रपंचाकारणें । स्वकीय गृहासी ।
जाणे घडे त्यासी । निरुपायें ॥६७॥
विरहाचे दु:ख । पोटीं न समाये ।
मोकलिया धाये । व्यंकटेशा ॥६८॥
वाहे नेत्रांतुनी । अश्रु जळ-पूर ।
केवीं दु:खभार । साहवेल ॥६९॥
म्हणे मजसम । देखवेना जगीं ।
पतित अभागी । क्षीणपुण्य ॥७०॥

८३
घडीं घडीं पायीं । घाली लोटांगण ।
उबग संपूर्ण । प्रपंचाचा ॥७१॥
जाणूनि तद्‍भाव । तूचि कृपावंत ।
भेटसी स्वप्नात । मूर्तिमंत ॥७२॥
‘न करावा शोक । आहो आम्ही संगें ।
जाई घरी वेगें ’ । सांगितले ॥७३॥
निर्माल्य प्रसाद । बांधोनि वस्त्रात ।
निघतां, मार्गात । चोज घडे ॥७४॥
निर्माल्याभीतरी । मूर्ति प्रगटली ।
भाक साच केली । दयाशीला ॥७५॥
आमुच्या कुळाचा । स्वामी जाहलासी ।
कृपेने राखीची । तैंपासोनी ॥७६॥

८४
चोळराय तुझा । भक्त हा जीवा़चा ।
शांत दांत साचा । परमोदार ॥८३॥

८५
नेत्रीं जलभार । घाली पायीं मिठी ।
तेव्हा जगजेठी । गहिवरें ॥९४॥
घालूनि चैतन्य । उठविली भार्या ।
निर्वाणीच्या कार्या । पावलेती ॥९५॥
अनंत पवाडे । ऐसे किती गावे ।
म्हणोनि मागावे । तुझे पायीं ॥९६॥
जाळूनि पातकें । काढी भवशल्य ।
मज द्या कैवल्य । ऐक्यरूप ॥९७॥

८६
करी व्यंकटेश । शेषाचलीं वास ।
नलगे सायास । पहावया ॥१॥
राहे उभी मूर्ती । धरूनी आकार ।
सौंदर्याचे सार । अंगीं वसे ॥२॥
शोभतसे तनू । सुंदर विशाल ।
वर्ण वाढ नील । दीप्तिवंत ॥३॥
रंभास्तंभापरी । पोटिर्‍या सुढाळ ।
वरी इंद्रनील । कांती फाके ॥४॥
ध्वज वज्रांकुश । ब्रीदाचा तोडर ।
चरणीं सुकुमार । शोभतसे ॥५॥
कटीं कटिदोरा । किंकिणी विराजे ।
वेष्टूनिया साजे । सर्पाकार ॥६॥
दिव्य पीतांबर । प्रभूचा झळाले ।
माळ वरी लोळे । वैजयंती ॥७॥

८७
प्रसीद लक्ष्मीरमण! प्रसीद, प्रसीद शेषाद्रिशय प्रसीद ।
दारिद्रयदु:खादिभयं हरस्व, तं व्यंकटेशं शरणं प्रपद्ये ॥

८८
जो जगदीश रमेश सुकुंद । कुड्‍मलदंत लसत मुकुंद ।
मुक्त करो निज भक्तजनांतें । भक्तितविना न च जो घरि नाते ॥
अनन्यनिष्ठ भक्तांना व्यंकटेशाने मुक्त करावे, ही स्वामींची प्रार्थना आहे.

८९
करी नित्य जो त्या गिरीमाजि वास
तया दर्शनें सौख्य वाटे जिवास ॥
स्वभक्तासि तारी, हरी सर्व दोषां ।
नमस्कार सप्रेम श्रीव्यंकटेशा ॥

९०
सुर-मणी रमणीय गिरीवरी ।
स्मरत जा, रत ज्या पदिं श्री असे ॥
भजनिं त्या, जनित्यास विधीचिया ।
वश करा, न करा, अळसा तया ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP