मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीनामदेव चरित्र| अभंग ३१ ते ४० श्रीनामदेव चरित्र अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० श्रीनामदेव चरित्र - अभंग ३१ ते ४० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग ३१ ते ४० Translation - भाषांतर ३१ माझा नामा जंव नांवरूपा आला । जंव म्हणों लागला घरदार ॥१॥तंव कैसें विघ्न उठिलें गे माये । नामा पंढरिरायें भुलविला ॥२॥सांग बा विठ्ठला म्यां काय केलें । नामया कां भुलविलें कवण्या गुणें ॥३॥आम्ही गा सिंपिये अनाथें पैं दीनें । करूं सिवने टिपणें पोट भरूं ॥४॥त्यासी देवा तुवां आणियेला क्षयो । कैंचा आम्हां देवो निर्मिलासी ॥५॥असतां चराचर न बुडतां हे सृष्टी । कां गा घेसी पाठी दुर्बळीची ॥६॥एक बाळ माझें धरिली त्याची आस । त्यां कैसी निराश मांडियेली ॥७॥दिसां मासां गर्भ जाणोनियां पोटीं । त्याची आस मोठी करिती लोक ॥८॥एवढा माझा नामा कैसेन विसरेन । देई कृपादान दुर्बळासी ॥९॥तूं अनाथा गोसावी दिनाचा कैवारी । तें ब्रीद श्रीहरी काय जालें ॥१०॥बिघडलें पाडस करी एके ठायीं । विनवितें गोणाई केशिराजा ॥११॥३२ तुझिया नाम्यानें बळी देउनि चित्त । जन्मोनियां आप्त केलें मज ॥१॥इष्ट मित्र बंधु जननी जनक । सर्वव मीच एक करूनि ठेला ॥२॥ऐसी याची करणी अजोनि नेणसी । बाळ माझे म्हणसी चाळविलें ॥३॥प्रेमाचें लाघव लाउनि माझ्या पायीं । बांधलें ह्रदयीं धरोनियां ॥४॥वृत्तिसहित मन लाविलें राखण । केलें जीवें जतन मजलागीं ॥५॥उचंबळले नयन अंतरींच्या अनुरगें । रात्रंदिवस जागे मन माझ्या ठायीं ॥६॥बोले चाले परी लक्ष मजवरी । बाहेरी भीतरीं मज देखें ॥७॥सर्व सुख गुणा रूपा देउनि मिठी । आणि निर्गुंणीं हिंपुटी होऊं नेदीं ॥८॥न मागे न घे न धरी सोय संसाराची । कल्पना देहींची मावळली ॥९॥ऐसें येणें मज विश्वासी गोंविलें । सर्वत्र लाविलें मजचिकडे ॥१०॥निर्गुणीं हा नामा न सोडी सर्वथा । सांपडला आतां एकरूपा ॥११॥३३ बुडविली क्रिया बुडविलें कर्म । बुडविला धर्म पाहा येणें ॥१॥तुझिया नामाचें लागलेसें पिसें । असोनि न दिसे लोकाचारीं ॥२॥नेणों काय कळे तुवां वागविला । संबंध तुटला मज नाम्याचा ॥३॥बुडविला आचार बुडविला विचार । बुडविडा संसार कुळासहित ॥४॥आपुलें पारिखें सर्वथा सारिखें । नेणों कवणें सुखें वेडावला ॥५॥बुडविला मोहों बुडविली ममता । बुडविली अहंता मीतूंपण ॥६॥हा नेणें वेव्हार कां इंद्र्यांचें सुख । अखंड याचें लक्ष तुझे पायीं ॥७॥बुडविली कल्पना समूळीं वासना । बुडविली सेवाअ त्रिविध कैसी ॥८॥हांसे नाचे प्रेमें फुंदतु डुल्लतु । अहर्निशीं गातु नाम तुझें ॥९॥असोनि नसता केला ये संसारीं । म्यां वाहिला उदरीं तैसा नाहीं ॥१०॥गोणाई म्हणे देवा त्वां केली निरास । चाळविलें उदास बाळ माझें ॥११॥३४ ऐके गोणाई म्हणे केशिराज । सदा अरज तुझें नामदेवा ॥१॥संसारादि यासी नावडेचि कांहीं । मिठीच वो पायीं घातलीसे ॥२॥नेणों याच्या जीवें घेतलेसें कांहीं । लोळणींच पायीं घातलिसे ॥३॥पुसे वो जीवीचें काय काय आवडे । उमगोनि कोडें नेई यासी ॥४॥देतां कांहीं न मागे नसतां कांहीं नेघे । गुज पैं न सांगें अंतरीचें ॥५॥जन्मोनि सांकडें घातलें वो कैसें । गिळिल मज ऐसें वाटतसे ॥६॥मी भावासि भुललों सांपडलों याचे हातीं । करिल काय अंतीं न कळे कांहीं ॥७॥एक वेळ मज सोडवीं या पासोनी । दे कां मज लागोनि जीवदान ॥८॥माझिये पैं बोले मजचि गोविलें । यातें आपंगिलें अनाथ म्हणोनि ॥९॥अंगोळिये धरितां खांदा वोळंगिये । आतां माझें केलें न चले कांहीं ॥१०॥तूं आपुलिया मनीं विचारूनि पाही । नामा आपुला नेई आवडता ॥११॥माय लेक दोघे साम्राज्य करा । घ्यावें धरणीवरी सुख याचें ॥१२॥कठिण बोल तुझे बहूसाळ ऐकिले । नाहीं त्वां गे पाहिलें मागेंपुढें ॥१३॥आतां तुझी कैसी झांकोळिली माया । मज करिसी वायां इष्ट तूं गे ॥१४॥ऐसें देवाचें बोलणें ऐकोनि उदास । नाम्या जाले क्लेश तयेवेळीं ॥१५॥नामा म्हणे देवा ऐसें कैसें घडे । सृष्टीहि पैं बुडे तरी न सोडी तुज ॥१६॥३५ विश्वजनमोहना कपटिया नारायणा । काय देवपणा मिरवितोसी ॥१॥दर्शना आलिया हृदयीं संचरसी । देहभावा घेसी हिरोनियां ॥२॥या विश्वावेगळें नवल तुझें करणें । सांगावें गार्हाणें कवणालागीं ॥३॥सर्वांगें सुंदर परी ह्रदयें कठोर । नेणसी जिव्हार मज दुर्बळीचें ॥४॥मज अनाथाचें बाळ वेधोनि मोहिलें । बहुत दुःख जालें सांगों कोणा ॥५॥कासया पितृभक्ति पुंडलिकें केली । विवसी आणिली पंढरीसी ॥६॥माय दुखवुनी मोहिसी बाळकें । देवपण निकें कैसें तुझें ॥७॥यातें अनुसरल्या कैंची बाप माय । नाठवेची सोय संसाराची ॥८॥ऐसियानें संग धरिला तुझा देवा । प्रत्यक्ष अनुभवा आलें मज ॥९॥आतां माझिया जीवीचें जाणसी तें गुज । तरी काई तुज उणें होतें ॥१०॥माझा नामा लावीं संसाराचे सोई । विनविते गोणाई केशवातें ॥११॥३६ बहुत दिवस भरले पैं गोपाळा । अगा ये विठ्ठला कवण न ये ॥१॥नामा माझा वेगीं देई माझ्या हातीं । जाऊं दे परती अनाथनाथा ॥२॥खाऊं जेऊं तुज असोस पैं देऊं । कीर्ति तुझी गाऊं जगामाजीं ॥३॥तुज काय जाणें ब्रह्मांडनायका । नव्हेसी मजसारिखा एकदेशी ॥४॥अनंत ब्रह्मांडें क्षणें घडामोडीसी । कां मज दुर्बळीसी कष्टाविलें ॥५॥तुज दुजेपणाचा सहज आला वीट । तूं तंव एकट एकालची ॥६॥ऐसी कीर्ति वेद वर्णिती पुराणें । तें कां लाजिरवाणें करिसी देवा ॥७॥तूं कृपेचा कोंवळा म्हणति विश्वजन । त्या तुझें निर्वाण कळलें नाहीं ॥८॥मैंद मुद्रा धरणें गळां तुळसीमाळा । निवटितोसि गळा न कळतां ॥९॥आतां आपुला भ्रमु राखे तो शहाणा । झणें माझ्या विर्वाणा पहासी देवा ॥१०॥गोणाई म्हणे माझा नामा देऊनी हातीं । अंगिकारीं कीर्ति पंढरिराया ॥११॥३७ थितें माझें प्रेम घेऊनि बैसला । अझुनि नुठी वाहिला नामा तुझा ॥१॥जीवें भावें सर्वस्वें घेतलें धरणें । म्यां काय करणें ऐशियासी ॥२॥कासया अपराध ठेविशिल मज । शिकवितें तुज नाहीं कोणी ॥३॥संसारा गांजले जन्ममरणा उबगले । म्हणोनी शरणा आले भयाभीत ॥४॥कृपा उपजली जीवें अनुसरला । जीव गुंतला माझे ठायीं ॥५॥दवडितां वेगळे वोसंगा रिघालें बळें । बोलताहे साळे भोळे करुणावाचनीं ॥६॥तेणें माझें ह्रदय कळवळलें । म्हणोनि देखतां डोळे निवती माझे ॥७॥शरणा आलिया ते म्यां जरि अव्हेरावें । कोण कोणें आपंगावें सांग सत्य ॥८॥शत्रुमित्र आदि करूनी सकळ । दुःख अळुमाळ पडों नेदी ॥९॥संसाराची येणें सांडियेली सोयी । प्राणें माझ्या ठायीं अनुसरला ॥१०॥आतां याची लटिकी करी दूर आस । नामा म्हणे उदास सर्वस्वासी ॥११॥३८ निर्गुणपणाचा अभिमान सांडिला । निगम लाजविला नारायणा ॥१॥कपट करोनि भक्तांसि तारिसी । तुझा तूं ठकसी पंढरीराया ॥२॥ठकुनी पुंडलिकासी न्यावया वैकुंठासी । या बुद्धी आलासी पंढरिये ॥३॥तंव त्या भक्तराजें धरियेलें चित्तें । परतोनि मागुतें जाऊं नेदी ॥४॥अठ्ठावीस युगें गेलीं विचारितां । निर्गम सर्वथा नव्हे देवाअ ॥५॥मग कटावरी कर धरोनियां धीर । उभा निरंतर राहिलासी ॥६॥सर्व घे प्रेमें तें हिरोनि बांधिलें । विचारें साधिलें कोणें कोणा ॥७॥द्वारीं द्वारपाळ जालासी अंकित । सांग बुद्धिमंत कोण ऐसा ॥८॥नाथिलेनि करिसी आपणा गोंविसी । बोल कां ठेविसी नामयातें ॥९॥गोणाई म्हणे तुझें नकळे विंदान । देईं कृपादान बाळ माझें ॥१०॥३९ माझें घर तुवां पूर्वींच बुडविलें । जें दर्शनासी आलें बाळ माझें ॥१॥नेणों काय वर्म तुझें सांपाडलें हातीं । रिघालासी चित्तीं जेणें द्वारें ॥२॥लौकिक परिहार देसील कासया । मी तुज ऐसिया बरबें जाणें ॥३॥कटीं ठेउनि कर उभा गरुडपारीं । हें तंव अंतरीं हारपला ॥४॥नाहीं चळणवळण न लावी पात्या पातें । लागलें निरूतें लक्ष तुझें ॥५॥तुझी याची खूण अंतरींची एकी । दाविसी लौकिकीं भिन्नपण ॥६॥सांडियेली येणें लौकिकाची लाज । नव्हे माझा मज कांहीं केल्या ॥७॥तुझेंनि सुखें धाला आनारिसा जाला । अभिमान मावळला समूळ याचा ॥८॥देहीं पैंज असोनी विदेही दिसत । प्रेमें वोसंडत ह्रदयकमळीं ॥९॥तूं अनाथा कैवारी ऐसी वेदवाणी । परी कां नये अजोनी कणव तुज ॥१०॥गोणाई म्हणे माझा नामा देईं हातीं । लागेन पुढता-पुढती तुझे पायीं ॥११॥४० वाचेचेनि बळें बोलसी आगळें । मर्यादे वेगळें वायांविण ॥१॥भ्रमलिस आरजे न पाह्सी आपणाकडे । धारिष्ट केवढें पाहें तुझें ॥२॥नेईं आपला नामा काय चाड आम्हां । जरी आहे तुज भ्रम ममत्वाचा ॥३॥पाहे पां पूर्वींचा कवणिये जन्मींचा । नकळे तुझा याचा ऋणानुबंध ॥४॥तो सरला कींज उरला विचारी आपुला । हा तुज अंतरला कवण्या गुणें ॥५॥येणें सांडिला संसार वेव्हार लौकिक । अविद्या अहंभाविक दोन्ही नाहीं ॥६॥हा प्रपंचावेगळा नकळे याची लीला । लागालसे डोळा प्रेममुद्रा ॥७॥ऐसी याची स्थिति देखोनियां डोळां । मज कां वेळोवेळां छळितेसी ॥८॥जाणसी त्या परी बझावी वो यातें । जेणें सुखें तूंतें ओळखिला ॥९॥याचेनि संसार चालविन म्हणोनी । ऐसी भ्रांती मनीं धरिलीं वायां ॥१०॥नामा अंतरीं निमाला आत्मा असे उरला । तरंग निमाला जेवीं जळीं ॥११॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP