नासिकेतोपाख्यान - अध्याय २१

महीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .


श्रीगणेशाय नमः ॥

आतां यावरी जो वृत्तांत ॥ तोहि सांगेन निश्चित ॥ म्हणे ऋषि नासिकेत ॥ ऐका समस्त द्विजवरहो ॥१॥

प्रेतनाथ बैसला सिंहासनी ॥ तंव तयाते नारदमुनी ॥ पुसता झाला धर्मवचनी ॥ सावधान सज्जनी परिसावे ॥२॥

म्हणे अहोजी यमनाथा ॥ दारुण हे दुःखावस्था ॥ निवारावया भवव्यथा ॥ निर्गति तत्वतां सांग पां ॥३॥

कोण्या पुण्येकरुन ॥ निवारे हे दारुण पतन ॥ तेंही सांगावे संपूर्ण ॥ तूं परिपूर्ण सर्वांपरी ॥४॥

ऐकोनि मुनीची वचनोक्ती ॥ यमधर्म सांगे तयाप्रती ॥ दारुण दोषांची निष्कृती ॥ ऐके निश्चिती मुनिवर्या ॥५॥

महापातकासी निरसन ॥ धर्मपुण्य वर्धमान ॥ धर्मे दुर्जन करी स्वर्गगमन ॥ त्याचेन तरती मुनिवर्या ॥६॥

तया धर्माचे निज आख्यान ॥ सांगेन तुजप्रती संपूर्ण ॥ महापातकां निर्दळण ॥ श्रवणे पावन त्रिजगती ॥७॥

पूर्वी त्रेतायुगाप्रती ॥ जनक नामे महानृपती ॥ ऐके त्याची पवित्र कीर्ती ॥ स्वधर्मस्थिति सात्विक ॥८॥

गौब्राह्मणांचा परम भक्त ॥ दाता दयाळू कृपावंत ॥ नीतिधर्म आचरत ॥ भगवद्भक्तिपरायण ॥९॥

नित्यनेम जपानुष्ठान ॥ करी अश्वमेधादिक यज्ञ ॥ पुत्रत्वे प्रजापालन ॥ अतिथिपूजन अहर्निशी ॥१०॥

तयाचिया राष्ट्रांत ॥ समस्त लोक भगवद्भक्त ॥ दैन्य दुर्भिक्ष नाही तेथ ॥ प्रजा समस्त सुखरुप ॥११॥

गाई क्षीर विपुल देती ॥ वृक्षवल्ली सदां फळती ॥ सकळां समानसुखस्थिती ॥ दुर्भिक्ष त्याप्रती असेना ॥१२॥

लोक चिरायु समस्त ॥ जरा वार्धक्य नाही तेथ ॥ प्रजापालनी नृपनाथ ॥ स्वधर्मयुक्त सात्विक ॥१३॥

यापरी तो भूपाळ ॥ भूतदयायुक्त भजनशीळ ॥ कीर्ति त्रैलोक्यी प्रांजळ ॥ शास्त्रे सकळ पारंगत ॥१४॥

ऐसा तो पुण्यवंत ॥ जनकनामे नृपनाथ ॥ जितेंद्रिय दृढवत ॥ अति विख्यात तिही लोंकी ॥१५॥

तयाची भार्या सत्यवती ॥ भ्रतारभक्ती जीवप्रती ॥ सर्वालंकारमंडितशक्ति ॥ दुजी प्रतिमा नसेचि ॥१६॥

सर्वलक्षणे संपूर्ण ॥ सर्वांभरणी सुखसंपन्न ॥ पतिव्रता शिरोरत्न ॥ विराजमान निजतेजे ॥१७॥

कदाही नुल्लंघी पतीचे वचन ॥ काया वाचा आणि मन ॥ पतिसेवेसी विकिला प्राण ॥ वचनाधीन सर्वदा ॥१८॥ श्लोक ॥

स्वभर्तृदेवताभक्ता स्वभर्तुश्चाप्यनुव्रता ॥ सुखेन सुखिता नित्यं भर्तृदुःखेन दुःखिता ॥१॥ टीका ॥

स्वभ्रतार स्वदेवता ॥ स्वभ्रतार स्वये भोक्ता ॥ स्वभ्रतार ते पतिव्रता ॥ नाहीं उभयतां भिन्नपण ॥१९॥

पतिसुखे ते सुखसंपन्न ॥ पतिदुःखे दुःखी आपण ॥ पति सुखिया देखोनि जाण ॥ समाधान सुख प्रिये ॥२०॥

सत्य व्रतधर पूर्ण ॥ नित्य करी ब्राह्मणपूजन ॥ नित्यनिष्ठे देवतार्चन ॥ सुखसंपन्न सर्वदा ॥२१॥

गौरीव्रतधरा पूर्ण ॥ नित्य करी गंगास्नान ॥ दे अतीता इच्छाभोजन ॥ करी पूजन सद्भावे ॥२२॥

सर्वांभूती दया युक्त ॥ पति प्राणाधिक दैवत ॥ सर्वाभरणी सालंकृत ॥ परम विख्यात पतिव्रता ॥२३॥

ऐसी ते राजपत्नी ॥ पतिसेवेसी रत अनुदिनी ॥ निघाली अमरावती स्वेच्छे लागोनी ॥ दिव्यविमानी बैसोनिया ॥२४॥

धर्मार्थकाममोक्षांसी ॥ स्वधर्मे साधिले आश्रमासी ॥ स्वेच्छे आली स्वर्गभुवनासी ॥ पुष्पकविमानी बैसोनियां ॥२५॥

देखोनि तियेचे आगमन ॥ महाऋषि आणि देवगण ॥ सुरवर सामोरे येवोन॥ करिती स्तवन दिव्यस्तोत्री ॥ २६॥

यमधर्म म्हणे नारदासी ॥ त्यांचेनि धर्मे पवित्रता आम्हासी ॥ स्वधर्माची ख्याती ऐसी ॥ सादर परियेसी मुनिवर्य ॥२७॥

बैसोनियां विमानी ॥ जे क्रीडा करिती स्वर्गभुवनी ॥ त्यांचेनि दर्शने करुनी ॥ पायधुनी आम्हांसी ॥२८॥

वैकुंठीचे वैकुंठवासी ॥ पूज्यत्वे सन्मानिती त्यांसी ॥ शिवभुवनी कैलासी ॥ वंद्य सर्वांसी ते होती ॥२९॥

सकळही करिती प्रणिपात ॥ जयजयकारे गगन गर्जत ॥ विचित्र वाद्ये गीतनृत्य ॥ आनंदभरित सकळिक ॥३०॥

पतीसहवर्तमान ॥ क्रमोनिया स्वर्गभुवन ॥ ब्रह्मभुवनापर्यंत जाण ॥ विराजमान दिव्यदेही ॥३१॥

सुर नर किन्नर विद्याधर ॥ गण गंधर्व नाग विखार ॥ नित्य सेवेसी अति तत्पर ॥ महिमा अपार तयांचा ॥३२॥

निजधर्मास्तव सकळिक ॥ पूजा करिती इंद्रादिक ॥ महामहोत्सव कौतुक ॥ विस्मित लोक स्वर्गीचे ॥३३॥

जे नागविती विषयार्था ॥ आचारनिष्ठ जे स्वधर्मता ॥ त्यांसी सुर वंदिती माथा ॥ सुखरुप येतां यमपुरी ॥३४॥

म्हणोनि जितंद्रिय जितक्रोध ॥ जयांसी प्राप्त तत्त्वबोध ॥ निजधर्म आचरती शुद्ध ॥ त्यांसी परमपद वस्तीसी ॥३५॥

सदाचारी निष्ठा पूर्ण ॥ जयांसी अनन्य श्रीगुरुभजन ॥ ते पावती निजकल्याण ॥ भवबंधन त्यांसी नाही ॥३६॥

जयांसी विष्णुभक्ति विष्णुव्रत ॥ नित्य नाम स्मरती जे अच्युत ॥ त्यांचे पाय मोक्ष वंदित ॥ मी सनाथ त्यांचेनी ॥३७॥

यमधर्म म्हणे नारदा ॥ ते पावती परमपदा ॥ येरां पापियांलागी आपदा ॥ भोगावयासी यमपुरी ॥३८॥

तुम्ही केला जो प्रश्न ॥ कैसे यमपुरीचे वर्तमान ॥ तरी निजधर्म करावया रक्षण ॥ श्रीहरीने आपणा ठेविले ॥३९॥

जे नित्यधर्मपरायण ॥ शिवतत्वी झाले लीन ॥ त्यांच्या दर्शने मी पावन ॥ सत्य जाण नारदा ॥४०॥

अतीतभजनी जयां विश्वास ॥ भूतकृपा भावित मानस ॥ यमधर्म म्हणे नारदास ॥ मी दास त्यांच्या दासांचा ॥४१॥

अगाध महिमा भगवद्भक्ती ॥ हरिहरभजनी कैवल्यप्राप्ती ॥ यालागी अंतकाळीचा सांगाती ॥ जाणा निश्चिती निजधर्म ॥४२॥

पडलिया भवावती ॥ धर्म सोडवी निजशक्ती ॥ धर्म अंतकाळींचा सांगाती ॥ जाणा निश्चिती नारदा ॥४३॥ श्लोक ॥

विष्णुव्रतधरा ये च गुरुभक्तिपरायणाः ॥ पूजयंत्यतिथींस्तेषां शरणो वै भवाम्यहम ॥२॥ टीका ॥

यापरी सत्यस्वधर्मयुक्त ॥ विष्णुव्रती भगवद्भक्त ॥ तयांचा मी नित्यांकित ॥ जाण निश्चित नारदा ॥४४॥

जयांसी अनन्यभावे स्मरण ॥ भगवद्भावे अतिथिपूजन ॥ तयांसी मी अनन्यशरण ॥ सत्य जाण नारदा ॥४५॥

जे गुरुभक्तिपरायण ॥ नित्य करिती नामस्मरण ॥ जयांसी घडे अतिथिपूजन ॥ मी त्यां शरण जाण नारदा ॥४६॥

तयांसी नाही भवबाधा ॥ तयांसी न पराभव कदा ॥ जे अनुष्ठिती गोविंदा ॥ ते परमपदा योग्य होती ॥४७॥

तयांसी प्राप्त परमस्थान ॥ जे शिवतत्वी जाहले लीन ॥ त्यांचे मस्तकी वंदीन चरण ॥ सत्य जाण मी त्या संतांसी ॥४८॥

जे अनुसरले हरिभजनासी ॥ नाम जपती अहर्निशी ॥ ते न भीती कळिकाळासी ॥ मी त्या संतांसी ध्यातसे ॥४९॥
ऐसे सांगोनि नारदासी ॥ सप्रेम लागला पायांसी ॥ संतोषोनि ब्रह्मऋषी ॥ स्वर्गभुवनासी तो गेला ॥५०॥

ऐसा यमपुरीचा वृत्तांत ॥ सांगे ऋषि नासिकेत ॥ ऐकोनियां महर्षि समस्त ॥ जयजयकार करिती स्वानंदे ॥५१॥

परिसोनि ते महाचरित्र ॥ विस्मित झाले ऋषीश्वर ॥ अवघे करिती जयजयकार ॥ वाचे हरिहर स्मरोनि ॥५२॥

आधीच ते धार्मिक जन ॥ त्यावरी ऐकिले पुण्यश्रवण ॥ तपनिष्ठा विधिआचरण ॥ अधिकाधिक पुण्ये बाणली ॥५३॥

स्नानसंध्या जप होम ॥ स्वकर्मे आचरिती नित्यनेम ॥ आनंदसिद्धहा निजधर्म ॥ उत्तमोत्तम गतिदाता ॥५४॥

ऐसे हे धर्मकीर्तन ॥ ऐकोनि ऋषि तपोधन ॥ घेवोनियां आज्ञापन ॥ केले गमन स्वाश्रमा ॥५५॥

उद्दालकतपाची ख्याती ॥ ब्रह्मवरे पुत्रप्राप्ती ॥ तिही लोकी पावन कीर्ती ॥ स्वये वर्णिती सकळिक ॥५६॥
तेचि कथा परमपावन ॥ जनमेजयासी सांगे वैशंपायन ॥ ऋषिनासिकेतोपाख्यान ॥ जगदुद्धारण परिसता ॥५७॥ श्लोक ॥

इदं सर्वं मयाऽख्यातं पुण्यदं पापनाशनं ॥ तेषां मृत्यरकाले नो नरके न पतंति ते ॥३॥ टीका ॥

वैशंपायन म्हणे जनमेजया ॥ हे पुण्यश्रवण कथिले राया ॥ तुझी श्रद्धाभक्ति देखोनियां ॥ तारावया दीनजन ॥५८॥

हे पुरातन धर्मकीर्तन ॥ श्रवणे जोडे अगाध पुण्य ॥ आणि पठणे पापनाशन ॥ पावनां पावन धर्मकथा ॥५९॥

या श्रवणाचे फळ जाण ॥ न बाधे कदा अवकाळी मरण ॥ त्यांसी न बाधे भवबंधन ॥ नरकपतन त्यांसी नाही ॥६०॥

॥ श्लोक ॥ श्रुत्वा चेमां कथां दिव्यां पवित्रां पापनाशिनीम ॥ सर्वाल्लोकानतिक्रम्य यांति ते चामरावतीम ॥४॥ टीका ॥

हे दिव्यकथा परम पावन ॥ श्रवणे पवित्र पापनाशन ॥ धर्मकीर्तिवर्धमान ॥ पुण्यपरायण ते होती ॥६१॥

तयां सकळां लोकालोकस्थाने ॥ क्रमिती ते हो बहुतां माने ॥ अंतकाळीचे देखणे ॥ तयां भोगणे अमरावती ॥६२॥

आवडी धरितां या ग्रंथी ॥ पापी ते पावन होती ॥ जरामरण भय भ्रांती ॥ संसारगुंती असेना ॥६३॥

अति जुनाट हे दिव्यकथा ॥ भारती इतिहास पुण्यसरिता ॥ मुनि सांगे नृपनाथा ॥ अपूर्व वार्ता स्वर्गीची ॥६४॥

तोचि संस्कृताचा अर्थ ॥ देशभाषेत अति प्राकृत ॥ यथामति केला ग्रंथ ॥ कृपाळु समर्थ गुरुनाथ ॥६५॥

मुनि बोलिला ग्रंथ अपार ॥ तितुका धरिला नाही सविस्तर ॥ मुख्यार्थचि संक्षेपाकार ॥ सत्य साचार निरुपिला ॥६६॥

नेणे व्युत्पत्ति व्याख्यान ॥ नेणे चालवूं अनुसंधान ॥ त्या मज मूर्खाचेनि हाते जाण ॥ ग्रंथार्थ संपूर्ण करविला ॥६७॥

तो कृपाळु सुंदर भारती ॥ अज्ञाननिशीचा गभस्ती ॥ तारावया त्रिजगती ॥ अव्यक्त व्यक्तीसी स्वये आला ॥६८॥

दुष्टवासना निर्दाळून ॥ सुखी करावया दीनजन ॥ यालागी निर्गुण तो सगुण ॥ झाला आपण गुरुनाथ ॥६९॥

कलीमाजी कल्यंश भूते ॥ जाणोनियां श्रीगुरुनाथे ॥ भूतदयाळू कृपावंते ॥ धर्मकथेत प्रगटिले ॥७०॥

कां जे धर्मरक्षण आपुले माथां ॥ बहुत करोनि परोपकारार्थी ॥ प्रगट केली हे धर्मकथा ॥ प्राकृत देशभाषेत ॥७१॥

आतां असो हे बहुबोली ॥ श्रीगुरु कृपाळु माउली ॥ तिणे धर्मकीर्तनाची चाली ॥ माजी उखळिली वाग्देवता ॥७२॥

किंबहुना ते उपकारु ॥ मी काय बोलूं अति पामरु ॥ काय शाखांचा पाहुणेरु ॥ क्षीरसागरु तोषविजे ॥७३॥

म्हणोनि श्रीगुरुकृपेचे महिमान ॥ बोलावया मज कैचे ज्ञान ॥ यालागी धरोनियां मौन ॥ केले नमन निजभावे ॥७४॥

यापरी हे व्याख्यान ॥ झाले श्लोकार्थ संपूर्ण ॥ तुकासुंदर रामी शरण ॥ आनंदघन गुरुकृपा ॥७५॥

हा ग्रंथ करिता श्रवण ॥ तयासी कळेल पापपुण्य ॥ किंवा सत्कर्मद्रुम संपूर्ण ॥ हरतील दोष श्रवणमात्रे ॥७६॥

याचे शास्त्राधारे करिता अनुष्ठान ॥ त्या न बाधी ग्रहपीडाविघ्न ॥ पिशाचबाधा रोग दारुण ॥ न बाधी सर्वथाही ॥७७॥

येथे जो मानील अविश्वास ॥ तो होईल अल्पायुषी तामस ॥ हे निंदी तो चांडाळ निःशेष ॥ त्याचा विटाळ न व्हावा ॥७८॥

शके पंधराशे नव्व्याण्णव ॥ दुर्मती संवत्सराचे नाव ॥ श्रावणशुद्ध दशमी अपूर्व ॥ ग्रंथार्थ सर्वही संपला ॥७९॥

॥ इति श्रीनासिकेतोपाख्याने संकलितार्थवर्णनं नाम एकविंशोऽध्यायः ॥२१॥ ओंव्या ॥७९॥ श्लोक ॥४॥

श्रीशिवार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥

तैलाद्रक्षेज्जलाद्रक्षेत ॥ रक्षेच्छिथिलबंधनात ॥ मूर्खहस्ते न दातव्यं एवं वदति पुस्तकम ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP