नासिकेतोपाख्यान - अध्याय ५

महीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .


श्रीगणेशाय नमः ॥

वैशंपायन म्हणे जनमेजयासी ॥ नासिकेत आला मातेपासी ॥ उद्दालक अति उल्हासी ॥ अयोध्येसी निघाला ॥१॥

उद्दालक तपोराशी ॥ संतोषयुक्त मानसी ॥ सर्व मेळवूनियां महाऋषी ॥ दूरदर्शी तापस ॥२॥

देशोदेशीचे तपोधन ॥ आणिले मुळे पाठवून ॥ त्यांची नांवे कोण कोण ॥ संक्षेपे सांगेन अवधारा ॥३॥

अत्रि गौतम भरद्वाज ॥ रोमहर्षण मार्कंडेय द्विज ॥ काश्यप कात्यायन भूभुज ॥ आले समाजा ऋषींचे ॥४॥

तैसाच दधीचि ऋषि जन्हुवर्ण ॥ गोभील आणि वर्तन ॥ मरीचि दुर्वासा ये जाण ॥ ऐसे अनेक महाऋषी ॥५॥

याज्ञवल्क्य विश्वामित्र ॥ शक्तिऋषि पाराशर ॥ भुशुंडी अंगिरा ऋषीश्वर ॥ आले सत्वर लग्नासी ॥६॥

यापरी असंख्य तपोधन ॥ आले तयी विवाहालागोन ॥ एकासी वेष्टण कृष्णाजिन ॥ एक तो नग्न दिगंबर ॥७॥

कित्येक उघडे बोडके ॥ एक ते केवळ सुडके ॥ तैसेच अत्यंत रोडके ॥ आले कौतुके लग्नार्थ ॥८॥

कंदहारी फळहारी ॥ पवनाहारी निराहारी ॥ नखी मौनी ब्रह्मचारी ॥ आले अग्निहोत्री तापस ॥९॥

जळवासी स्थळवासी ॥ विवरवासी अहर्निशी ॥ उद्दालकाच्या लग्नासी ॥ आले ऋषिसमुदाये ॥१०॥

ऐसे मेळवूनि सकळ ऋषि ॥ उद्दालक आला आयोध्येसी ॥ शरयूतीर नगरप्रदेशी ॥ सुखसंतोषे राहिले ॥११॥

मात जाणविली रायासी ॥ ऋषि आले समुदायेसी ॥ येरु उल्हासयुक्त मानसी ॥ सामोरा त्यांसी निघाला ॥१२॥

राजा येऊनिया सामोरा ॥ तयां अतिसन्माने आणिले नगरा ॥ पूजा करोनियां द्विजवरां ॥ दीधले आहारा षड्रसभोजन ॥१३॥

मग जोडूनियां करांजुळी ॥ मृदुमधुरवाणी मंजुळी ॥ बोलता झाला तयेवेळी ॥ ऋषिमंडळीसंमुख ॥१४॥

म्हणे धन्य म्या तुह्नां पाहिले ॥ सकळ पुण्य फळासी आले ॥ कोटियज्ञांचे फळ लाधले ॥ दर्शन झाले संतांचे ॥१५॥

आजि माझी सफळ धर्म ॥ सफळ माझे क्रिया कर्म ॥ आजि माझा सफळ जन्म ॥ संतसमागम जाहला ॥१६॥

भाग्ये झाली संतभेटी सकळ पुण्याच्या सुटल्या गांठी ॥ आजि मी सुभाग्य सकळसृष्टी ॥ दुर्लभ भेटी साधूंची ॥१७॥

आपण स्वामी कृपा करुन ॥ केले पतितासी पावन ॥ तरी कोणाकार्यासी आगमन ॥ ते मज संपूर्ण सांगावे ॥१८॥

मी तंव सेवक निकटवर्ती ॥ कांही आज्ञा करावी कृपामूर्ती ॥ ऐकोनि रायाची विनंती ॥ ऋषि बोलती संतोषे ॥१९॥

ऐकोनि रायांचे भाषण ॥ सकळ ऋषि म्हणती कल्याण ॥ तुझे धर्मे धनधान्य ॥ सर्वही असे आश्रमी ॥२०॥

ऐके राजचूडामणी ॥ तुझी ख्याती त्रिभुवनी ॥ भूतदया अंतःकरणी ॥ ब्राह्मणभजनी विश्वास ॥२१॥

वीर्य धैर्य गुणगांभीर्य ॥ दया दक्षता परमशौर्य ॥ ऐकोनि तुझे औदार्य ॥ आलो ऋषिवर्य समुदाये ॥२२॥

तुज मागावे कन्यादान ॥ सकळ दानांमाजी जे प्रधान ॥ यालागी हे तपोधन ॥ आले संपूर्ण समुदाये ॥२३॥

अन्नदान वस्त्रदान ॥ गो भू रत्ने हिरण्य दान ॥ सकळ दानांमाजी जाण ॥ कन्यादान विशेष ॥२४॥

तू दानशूर गा नृपती ॥ ऐकोनि तुझी उदार किर्ती ॥ ऋषि आले कन्यादानार्थी ॥ संकल्प तदर्थी करावा ॥२५॥

ऐसे ऐकोनि ऋषींचे वचन ॥ राजा स्वये बोले आपण ॥ गज अश्व हिरण्यदान ॥ भूमिदान मागावे ॥२६॥

यावेगळे माझ्या गृही ॥ जे जे अपूर्व आहे संग्रही ॥ ते ते देइन ये समयी ॥ परी मज नाही कन्यारत्न ॥२७॥

कन्या एक सुंदर होती ॥ तियेसी झाली दैवगती ॥ ऐकोनी रायाची वचनोक्ती ॥ ऋषि गर्जती जयजयशब्दे ॥२८॥

ऋषि म्हणती गा नृपती ॥ तुझी कन्या जे प्रभावती ॥ ते आहे ऋषिआश्रमाप्रती ॥ ऐके ख्याती तियेची ॥२९॥

यौवनदशायुक्त सुंदरी ॥ सत्यव्रते व्रतधारी ॥ तेचि द्यावे सदाचारी ॥ निजनिर्धारी ब्राह्मणा ॥३०॥

ऐकोनि ऋषींचा वचनार्थ ॥ राव पुसे हर्षयुक्त ॥ सत्य कन्या आहे जिवंत ॥ ऋषि वृत्तांत सांगती ॥३१॥

ब्रह्मयाचा मानससुत ॥ उद्दालक नामे अति विख्यात ॥ तप केले अत्युद्भुत ॥ संतत्यर्थ ऋषिवर्ये ॥३२॥

तेणे ब्रह्मा संतोषुनी ॥ नवल वरद वदला वाणी ॥ आदौ पुत्र पश्चात पत्नी ॥ विचित्र करणी ते ऐका ॥३३॥

स्त्रीध्यानी अहर्निशी ॥ वीर्य स्त्रवले एके दिवशी ॥ तेणे घालुनी कमळकळिकेसी ॥ दर्भे ग्रंथी बांधिली ॥३४॥

ते कमळ घेऊनि जाण ॥ गंगेमाजि केले निमग्न ॥ चंद्रप्रभा करितां स्नान ॥ तिणे परिमळार्थ अवघ्राणिले ॥३५॥

श्वास वोढितां सुंदरी ॥ वीर्य गेले नासाग्री ॥ तेणेचि ते सगर्भ कुमारी ॥ तुवां दोषमिषे त्यागिली ॥३६॥

रुदन करितां वनप्रदेशी ॥ भेटी झाली धर्मऋषीशी ॥ तेणे आणूनियां आश्रमासी ॥ कन्या यत्नेसी पाळिली ॥३७॥

ऋषिसेवा करितां ते सुंदरी ॥ नवमास भरले गरोदरी ॥ पुत्र जन्मला नासिकाद्वारी ॥ ऐसे आश्चर्य भारी वर्तले ॥३८॥

त्याचे नांव नासिकेत ॥ तो तपोनिधि अतिविख्यात ॥ तेणे सांगीतला वृत्तांत ॥ आलो येथे कन्यार्थी ॥३९॥

ऐसा पूर्वील वृत्तांत ॥ ऋषि सांगती हर्षयुक्त ॥ ऐकोनि राव सद्गदित ॥ मोहे मूर्च्छित पैं झाला ॥४०॥

मग सांवरुनिया शोकलहरी ॥ राव प्रवेशला अंतःपुरी ॥ वृत्तांत सांगता निजनारी ॥ तेही करी अतिशोक ॥४१॥

अहाहा कमललोचनी ॥ निरपराधे तुज टाकिली वनी ॥ शोक करितां ती जननी ॥ हृदय फुटोनी आक्रंदे ॥४२॥

मिळूनियां सुहृद सकळ ॥ अतिदुःखे करिती कोल्हाळ ॥ एक करिती तळमळ ॥ पिटिती कपाळ करतळे ॥४३॥

रायासी म्हणे त्याची पत्नी ॥ शुभवार्ता आणिली मुनींनी ॥ कल्याण राखिली नंदिनी ॥ कीर्ति त्रिभुवनी न समाये ॥४४॥

यांचिया उपकारा उत्तीर्ण ॥ जीवापरते न दिसे जाण ॥ कायावाचामने करुन ॥ कन्या अर्पण करावी ॥४५॥

राया अवधारी माझी विनंती ॥ कांही विकल्प न धरावा चित्ती ॥ वेगे आणूनियां प्रभावती ॥ ऋषिप्रति अर्पावी ॥४६॥

राव म्हणे ऐक कांता ॥ कन्या अर्पिता न अर्पिता ॥ हा दोष नाही आमुचे माथा ॥ पूर्वी विधात्याने निर्मिले असे ॥४७॥

ऐसा करुनियां इत्यर्थ ॥ सभेसी आला नृपनाथ ॥ अतिमोहे शोकाकुलित ॥ असे बोलत ऋषींप्रती ॥ ४८॥

म्हणे धन्य धन्य तुमचा महिमा ॥ थोर जीवदानी झालेति आम्हां ॥ कृतोपकारी द्विजोत्तमा ॥ देखोन तुम्हांसी जाहलो ॥४९॥

मन वाचा आणि काया ॥ याहीं शरण मी तुमच्या पायां ॥ कन्या दिधली द्विजवर्या ॥ हर्षे गर्जूनि बोलत ॥५०॥

ऐकोनि रायाचे प्रत्युत्तर ॥ ऋषि करिती जयजयकार ॥ सकळही आनंदे निर्भर ॥ राये दळभार पाल्हाणिला ॥५१॥

घाव घातला निशाणी ॥ नानावाद्ये मंगळध्वनी ॥ आनंद झाला अयोध्याभुवनी ॥ मांडिला जनी महोत्सव ॥५२॥

रत्नखचित सुखासन ॥ सर्वे ऋषि तपोधन ॥ आणि दीधले सकळ सैन्य ॥ कन्यारत्न आणावया ॥५३॥

दूती जाऊनि आश्रमासी ॥ वृत्तांत सांगितला राहिल्या सकळांसी ॥ राये पाठविले आम्हासी ॥ लग्नसोहळ्यानिमित्त ॥५४॥

ऐसी ऐकोनियां मात ॥ सकळ जाहले हर्षयुक्त ॥ ऋषि जयजयकारी गर्जत ॥ मानिती अद्भुत ऋषिपत्न्या ॥५५॥

सकळश्रृंगारे सालंकृत ॥ चंद्रप्रभा सुशोभित ॥ सुखासनी मिरवत ॥ ऐसी नगरांत आणिली ॥५६॥

ब्राह्मण म्हणती शांतिपाठ ॥ वंशावळी पढती नगरीचे भाट ॥ याचकांचे दाटले थाट ॥ न फुटे वाटे मार्गाभीतरी ॥५७॥

नगरी गुढिया तोरणे ॥ घरोघरी बांधावणे ॥ परम उत्साहें रायेम तेणें ॥ ऋषिपूजनें आरंभिली ॥५८॥

अधिकारपरत्वें पूजा ॥ अति संभ्रमे करी राजा ॥ अर्घ्यपाद्यादिके वोजा ॥ करी भूभुज नृपवर ॥५९॥

गंधाक्षता सुमनमाळा ॥ वस्त्रालंकारी परिमळा ॥ राये पूजोनि ऋषींचा मेळा ॥ पूजिले सकळ नृपवर ॥६०॥

रत्नखचित सिंहासनी ॥ मधुपर्क विधिविधानी ॥ पूजूनियां उद्दालकमुनी ॥ वस्त्राभरणी भूषविला ॥६१॥

वेदघोषे गर्जती अपार ॥ ऋषी करिती जयजयकार ॥ विमानी दाटले अंबर ॥ दुंदुभी अपार गर्जती ॥६२॥

चंद्रप्रभा सालंकृत ॥ दिव्यालंकारी सुशोभित ॥ विधिविधाने मंत्रोक्त । लग्न त्वरित लाविले ॥६३॥

ऋषिमंत्रांचा घडघडाट ॥ दोघां भरिले शेषपाट ॥ उद्दालक ऋषिवर्य वरिष्ठ ॥ प्रभावती श्रेष्ठ पतिव्रता ॥६४॥

गीत नृत्य वाद्य ध्वनी ॥ नाचती स्वर्गीच्या नाचणी ॥ परमानंद अयोद्याभुवनी ॥ कन्या मुनीसी समर्पिली ॥६५॥

कोट्यानुकोटि गोदाने ॥ रत्ने मुक्ताफळे सुवर्णे ॥ दिधली ब्राह्मणांसी दाने ॥ याचकजन सुखी केले ॥६६॥

जामातासी आंदण ॥ गज सहस्त्र श्रृंगारुन ॥ कोट्यानुकोटी दाने ॥ तुरंगम जाण लक्षोलक्ष ॥६७॥

कोटि अयुते सुवर्ण ॥ सवे दासी सेवकजन ॥ वस्त्रालंकारभूषणे ॥ दीधली आंदण जामाता ॥६८॥

ऋषिग्रंथी सविस्तर ॥ दानप्रयोग बोलिला अपार ॥ तितुका धरिला नाही विस्तार ॥ संक्षेपयुक्त बोलिलो ॥६९॥

लग्न सांगावे सविस्तर ॥ तरी होईल ग्रंथविस्तार ॥ मूळग्रंथीचा विचार ॥ तोचि अर्थांतरे निरुपिला ॥७०॥

एवं करुनि विवाह सोहळा ॥ अत्यादरे गौरविले सकळां ॥ आनंद न माये भूंडळा ॥ विचित्रलीला अनुपम्य ॥७१॥

यापरी हे कन्यादान ॥ जाहले प्रभावतीचे पाणिग्रहण ॥ ऋषि घेऊनि आज्ञापन ॥ निघाले जाण आश्रमा ॥७२॥

राये घालुनी लोटांगण ॥ केले ऋषिश्वरांसी नमन ॥ सवे देऊनि कन्यारत्न ॥ जामात आपण बोळविला ॥७३॥

आनंदे निर्भर सकळ ऋषी ॥ उद्दालक आला आश्रमासी ॥ चंद्रप्रभा लावण्यराशी ॥ आश्रमवासी राहिली ॥७४॥

ऐसी दिव्यकथा गहन ॥ सांगे जनमेजयासी वैशंपायन ॥ श्रद्धायुक्त करितां श्रवण ॥ होय दहन महादोषां ॥७५॥

मुनि म्हणे गा नृपनाथा ॥ पुढे काय वर्तली कथा ॥ ऋषीने शापिले नासिकेतां ॥ गेला यमपंथी स्वदेही ॥७६॥

भेटोनियां यमधर्मासी ॥ मागुता आला पितयांसी ॥ वृत्तांत सांगितला सकळांसी ॥ त्या कथेसी अवधारी ॥७७॥

पुण्यपावन हे कथा ॥ होय पावन श्रोतावक्ता ॥ मुनि म्हणे गा भारता ॥ सावधान अवधारी ॥७८॥

श्रवणमात्रे पुण्यसंपत्ती ॥ जोडे धर्म यश किर्ती ॥ होय पावन त्रिजगती ॥ भारती परिसतां ॥७९॥

तुकासुंदर रामी शरण ॥ जाहले प्रभावतीचे पाणिग्रहण ॥ पुढे नासिकेतोपाख्यान ॥ श्रोते सज्जनी परिसावे ॥८०॥
॥ इति नासिकेतोपाख्याने चंद्रप्रभाविवाहो नाम पंचमोऽध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP