TransLiteral Foundation

नासिकेतोपाख्यान - अध्याय १४

महीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .


अध्याय १४

श्रीगणेशाय नमः ॥

ऐसी दिव्यकथा परमपावन ॥ जनमेजयासी सांगे वैशंपायन ॥ आतां येताती पुण्यजन ॥ तेंही महिमान अवधारा ॥१॥

नासिकेत उवाच ॥ श्लोक ॥

अतःपर प्रवक्ष्यामि धार्मिकाणां यथा गतिः ॥ शौचाचाररता ये च परार्थे व्यक्तजीविताः ॥१॥

पापभीताश्च ते सर्वे गीतवाद्यजयस्वनैः ॥ पूर्वद्वारेण नीयंते पुण्यात्मानः शरीरिणः ॥२॥ टीका ॥

नासिकेत ह्मणे याउपरी ॥ तया यमाचिये नगरी ॥ घडे धार्मिकां कैसी परी ॥ तेही निर्धारी सांगेन ॥२॥

जे शौच सदाचारी ॥ नित्य वेंचिले परोपकारी ॥ जयांसी पापाचे भय भारी ॥ दोष संसारी नातळती ॥३॥

ऐसे जे पुण्यधर्मात्मशरीरी ॥ ते येताती पूर्वद्वारी ॥ गीतनृत्य वाद्यांच्या गजरी ॥ जयजयकारी गर्जत ॥४॥

अति रमणीय उत्तम स्थाने ॥ तेथे असती दिव्यासने ॥ सघृतक्षीरमिष्टान्नभोजने ॥ उदकपाने उत्तमोत्तम ॥५॥

यथेष्ट पक्वान्नाचियां राशी ॥ यथास्थित भक्षावयासी ॥ दिव्यांबर परिधानासी ॥ नानाविलासमंडित ॥६॥

विचित्रभूषणाभरणी ॥ विराजमान सुखासनी ॥ वीणादि वाद्ये नानाध्वनी ॥ गंधर्व गाती विनोदे ॥७॥

किरीटकुंडले केयूर हार ॥ मुक्तमाळा मनोहर ॥ सर्वाभरणी सालंकार ॥ पुण्यपवित्र विराजती ॥८॥

निजपुण्याची सामुग्री ॥ सत्यधर्मप्रभावे करी ॥ दिव्य अप्सरा नानापरी ॥ सेवा सुंदरी करिताती ॥९॥

हेममय विचित्र आभूषणे ॥ नानापरिमळ दिव्य सुमने ॥ तयां धार्मिकां कारणे ॥ उत्तमस्थाने ते ठायी ॥१०॥

केवळ कामाच्या कळिका ॥ देवांगना मूख्य नायका ॥ सेवा करिताती सात्विका ॥ तया धार्मिकां लागोनी ॥११॥

वापी कूप तडाग ॥ निर्मळ जळे भरले सांग ॥ आराम रमणीय पद्मराग ॥ नाना उपभोग समृद्धी ॥१२॥

सुवर्णदान गोदान ॥ भूमिदान दिव्यवस्त्रदान ॥ करिती जे पुण्यपरायण ॥ ते विराजमान ते ठायी ॥१३॥

धर्मराजप्रसादे पाही ॥ चिरकाळ दिव्यदेही ॥ जरावार्धक्य जयां नाही ॥ स्वसुखे ते ठायी विचरती ॥१४॥

यालागी आत्महितार्थ ॥ करावा धर्मसंग्रहार्थ ॥ तेणे इहपर लोकांत ॥ सौख्य अपार भोगिती ॥१५॥

भावे करावे गुरुभजन ॥ नित्य नमावे संतसज्जन ॥ यथशक्ति द्यावे दान ॥ श्रीनारायणप्रीत्येर्थे ॥१६॥

देवद्विजांची पूजा ॥ गृहस्थाश्रमी करावी वोजा ॥ हृदयी स्मरोनि अधोक्षजा ॥ गरुडध्वजाप्रीत्यर्थ ॥१७॥

गृहासी आलिया अतीत ॥ मधुरवाक्य अति विनीत ॥ आसन द्यावे यतोचित ॥ पूर्वोक्त सन्मानेसी ॥१८॥

सांग करुनि पूजन ॥ यथाशक्ति द्यावे भोजन ॥ फळ , मूळ अथवा जीवन ॥ स्वये अर्पण करावे ॥१९॥

जेणे गृही पूजिला अतीत ॥ तेणे पूजिला लक्ष्मीकांत ॥ देवपितरादि यथोक्त ॥ पूजिले समस्त इंद्रादिकां ॥२०॥

तया धार्मिकाचे माहात्म्य गहन ॥ स्वये चित्रगुप्त वदे आपण ॥ अगाध तयाचे महिमान ॥ धर्मराज आपण वर्णित ॥२१॥

सर्वांभूती समता पूर्ण ॥ जयांसि शमदमादि साधन ॥ जे सत्यधर्मपरायण ॥ ब्राह्मणभजन जयांसी ॥२२॥

ऐसिया धार्मिकांलागी तेथ ॥ नानादिव्यभोग उपचारयुक्त ॥ दिव्यदेह सालंकृत ॥ स्वये सुखभरित विचरती ॥२३॥ श्लोक ॥ क्षत्रियश्च धनुर्धारी शस्त्रपाणिः क्रियापरः ॥ सदयः सत्यशीलश्च प्रजानां पालने रतः ॥३॥

वैश्यः सदा विनीतात्मा देवब्राह्मणपूजकः ॥ सत्यात्मा सदयश्चैव वाणिज्यकृषिसेवकः ॥४॥

शुश्रूषणेन दानेन पूज्यंते शूद्रजा नराः ॥ स्वकर्मानिरताः सर्वे वर्णाः प्रापुः परं पदम ॥५॥ टीका ॥

क्षत्रिय आनि धनुर्धारी ॥ शस्त्रविद्येत निपुण भारी ॥ निजक्रिया अंगीकारी ॥ वर्ते संसारी स्वधर्मयुक्त ॥२४॥

सत्यशील दयापर ॥ प्रजापालन करी निरंतर ॥ देखोनिया महा क्षेत्र ॥ होय उदर जीवित्वासी ॥२५॥

ऐसा क्षत्रियधर्म जो आपुला ॥ सांगोपांग आचरला ॥ तो दिव्यविमानी आरुढला ॥ येतसे वहिला अमरभुवना ॥२६॥

तैसाचि आपुला स्वधर्म ॥ वैश्ये आचरावा यथागम ॥ यथाशक्ति दानधर्म ॥ क्रियानेम सात्विक ॥२७॥

विनीतात्मा शुद्ध सात्विक ॥ देवब्राह्मणांचा पूजक ॥ वाणिज्य आणि कृषिसेवक ॥ तैसा अत्यंत दयापर ॥२८॥

है वैश्याचे आचरण ॥ जेणे यथाविधि आचरिले जाण ॥ तो येत विमानी बैसोन ॥ विराजमान दिव्यदेही ॥२९॥

जयजयकारे शोभिवंत ॥ गंधर्वगायन गीतनृत्य ॥ वस्त्राभरणी सालंकृत ॥ विराजित हेमसदनी ॥३०॥

तैसाचि शूद्र तोही अवधारी ॥ तिही वर्णांची सेवा करी ॥ वर्ते शुद्र स्वधर्माचारी ॥ भावे नमस्कारी द्विजांसी ॥३१॥

ब्राह्मण षट्कर्मे करी ॥ शूद्र तयाते नमस्करी ॥ दोघांतही अवधारी ॥ सरोवरी घडे योग ॥३२॥

ऐसा आपुलाला स्वधर्म ॥ जे जे आचरती यथागम ॥ ते पावती परमधाम ॥ केला नेम श्रुतिस्मृती ॥३३॥

याउपरी मुख्य ब्राह्मण ॥ जो सकळधर्मासि अधिष्ठान ॥ अग्निहोत्रादि क्रियाचरण ॥ सांग संपूर्ण आचरे ॥३४॥

यजन आणि याजन ॥ अध्ययन आणि अध्यापन ॥ दान आणि प्रतिग्रह जाण ॥ हे षटकर्माचरण द्विजाचे ॥३५॥

यापरि चारी वर्ण ॥ करिती आपुलाले विहिताचरण ॥ जो जयाचा विभाग जाण ॥ तो ते संपूर्ण आचरे ॥३६॥

ऐसे आपुलाले विहित ॥ जे अनुष्ठिती यथोचित ॥ ते दिव्यदेही विमानी शोभिवंत ॥ घवघवीत देवसदनी ॥३७॥

आत्मानुसंधानी निरंतर ॥ ईश्वरभजनी तत्पर ॥ ऐसे भक्तिराय पवित्र ॥ देखिले सालंकार विमानी ॥३८॥
नानाभोगसमृद्धि प्रेमळा ॥ दिव्यासने सुमनमाळा ॥ वेष्टित गणगंधर्व सकळां ॥ येतां डोळां देखिले ॥३९॥

यापरी ते पुण्यपरायण ॥ येती इंद्रभुवनालागोन ॥ विराजती सुखसंपन्न ॥ जोंवरी आपण चंद्रसूर्य ॥४०॥

जयांसी घडे गृहदान ॥ भूमिदानादिक गहन ॥ तयां हेमखचित रत्नभुवन ॥ विराजमान ते ठायी ॥४१॥

तेथे आकल्पपर्यंत ॥ नानादिव्यभोग समस्त ॥ ते ते भोगिती पुण्यवंत ॥ सुखे विचरती ते ठायी ॥४२॥ श्लोक ॥

ग्रासार्ध ग्रासमात्रं ये ददंति क्षुधिते सदा ॥ सर्वभूतदयायुक्ताः शरणागतपालकाः ॥६॥

दुःखिनः परदुःखेन परोपकृतिनस्तथा ॥ प्रीताश्च देवतीर्थेषु मूर्तिमंतो हि धार्मिकाः ॥७॥

स्वर्गे मनोरमस्थान क्रीडंतेऽप्सरसांगणैः ॥ मणिप्रवालदानेन तिष्ठंते मणिकुट्टिमे ॥८॥ टीका ॥

ग्रास अर्ध हो कां ग्रास ॥ नित्य जे देती क्षुधितास ॥ जे नुपेक्षिती शरणागतास ॥ दयार्द्र मानस जयांचे ॥४३॥

परदुःखे जे दुःखी होती ॥ घडे परोपकार जयांप्रती ॥ देवतीर्थभजनी अति प्रीती ॥ ते धर्ममूर्ति धार्मिक ॥४४॥

तयांसी स्वर्गी मनोरम ॥ स्थान अति उत्तमोत्तम ॥ स्वये विचरती सुखसंपन्न ॥ निजधर्मप्रसादे ॥४५॥

देवांगना अति सुंदर ॥ सेवेसी नित्य तत्पर ॥ अमरभुवनी त्यां अत्यादर ॥ करिती सुरवर प्रेमाने ॥४६॥

मुक्ते प्रवाले करिती दान ॥ ते रत्नभुवनी विराजमान ॥ दिव्यभोग अति गहन ॥ स्वये आपण भोगिती ॥४७॥

ये ददंति नराः क्षेत्रं पक्वशालिप्रपूरितम ॥ ते यांति परमं स्थानं विमानैः कामसुंदराः ॥९॥

उपानहौ तथा छत्रं शीतं तोयं च भोजनम ॥ अध्वारुढाः संप्रयांति नगरीममरावतीम ॥१०॥ टीका ॥

पक्वशालीचे शेत ॥ जे जे पुण्यात्मे दान देत ॥ ते कामगविमानयुक्त ॥ ऐसे येती परमपदी ॥४८॥

छत्र उपानह दान देती ॥ शीतळ उदक वसंती ॥ प्रतापे अश्वारुढ घवघवीती ॥ मिरवत येत अमरावतींत ॥४९॥

गौ हस्ती तुरंगम दाने ॥ जे देती उष्ट्रादिक वाहने ॥ ते गंधर्वगायने दिव्यविमाने ॥ येताती आपण देखिले ॥५०॥ श्लोक ॥

ये म्रियंते महात्मानो धारातीर्थे महौजसः ॥ ते यांति हि विमानेन स्वाम्यर्थ सूर्यमंडलम ॥११॥ टीका ॥

स्वामीकाजी रणांगणी ॥ धारातीर्थी वेंचिले कोणी ॥ ते सूर्यमंडळा लागोनी ॥ येताती विमानी बैसोनियां ॥५१॥ श्लोक ॥

कन्यादानं कृतं येन रौप्यकांचनसंयुतम ॥ शास्त्रोक्तेन विधानेन कुलीनाय वराय च ॥१२॥ टीका ॥

कन्यादानं सालंकृतं ॥ जो कोणी करी शास्त्रोक्त ॥ सुवर्णरौप्यसंयुक्त ॥ वर कुळवंत पाहोनियां ॥५२॥

ऐसे घडे जयाप्रती ॥ तेणे दान दिधली सकळ क्षिती ॥ तो चिरकाळ अमरावती ॥ पुण्यसंपत्ती भोगितसे ॥५३॥

यालागी कन्यादानासमान ॥ आणिक नाही महापुण्य ॥ तयाते सेविती अमरगण ॥ देवकन्यांसहित पैं ॥५४॥

म्हणोनि दयाधर्मेविण ॥ भूभार जन्म आकरण ॥ देवपितरांते असह्य जाण ॥ काळे वदन इह पर लोकी ॥५५॥

यालागी स्वर्गास्थानी पाही ॥ चत्वारि चिन्हे वसती देही ॥ ती कोण कैसी ते ठायी ॥ ऐका तेंही सांगेन ॥५६॥ श्लोक ॥

स्वर्गस्थितानामिह जीवलोके चत्वारि चिह्नानि वसंति देहे ॥ दानप्रसंगो मधुरा च वाणी विष्ण्वर्चनं साधुसमागमश्च ॥१३॥ टीका ॥

तरी यथाशक्ति दान ॥ विनीतता मधूर वचन ॥ संतसमागम विष्णुअर्चन ॥ जाणा ही चिन्हे स्वर्गस्थांची ॥५७॥

ही चत्वारि चिन्हे जेथे वसती ॥ ते भोगिती स्वर्गसंपत्ती ॥ आणि ज्या लक्षणी नरकप्राप्ती ॥ तींही निश्चिती अवधारा ॥५८॥ श्लोक ॥

कार्पण्यवृत्तिः सुजनस्य निंदा कुशीलता नीचजनस्य सेवा ॥ अत्यंतकोपः कुटिला च वाणी चिन्हानि षड्वै नरकागतस्य ॥१४॥ टीका ॥

तरी वृत्ती जयाची कृपण ॥ स्वमुखे निंदी संतसज्जन ॥ आंगकुत्सित हृदय मलीन ॥ जाय शरण नीचासी ॥५९॥

आणि क्रोधी जो आत्यंतिक ॥ कुटिल वाणी अशुभ देख ॥ या षटचिन्ही तो नरक ॥ पावे अवश्य प्राणी पै ॥६०॥

यापरी स्वर्गनरकादि चिन्हे ॥ उघड सांगती शास्त्रपुराणे ॥ ती यथाविधि ऐकोन सज्ञाने ॥ स्वहित करणे आपुले ॥६१॥

येथे करितां अनमान ॥ अवश्य भोगावे लागेल पतन ॥ पापियां नावडे पुण्यश्रवण ॥ रोगियांसी मिष्टान्न जयापरी ॥६२॥

जगसुखिया चंद्रप्रकाशा ॥ तो उपयोगा न येचि वायसा ॥ दुग्धी उगाळिला कोळसा ॥ स्ववर्ण जैसा न सांडी ॥६३॥
यालागी असोत ते मूढजन ॥ जयांसी नावडे पुण्यश्रवण ॥ नेणोनियां घोर पतन ॥ दुःख दारुण भोगिती ॥६४॥

ऐसी तेथील मात ॥ सांगे ऋषि नासिकेत ॥ याउपरी जो वृत्तांत ॥ तोहि सावचित्त अवधारा ॥६५॥

म्हणे तुकासुंदरदास ॥ अवधान देती पुण्यपुरुष ॥ पुढील कथा अति सुरस ॥ सज्जनी अवकाश मज दीजे ॥६६॥

॥ इति श्रीनासिकेतोपाख्याने सुजनगतिवर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥ ओंव्या ॥६६॥ श्लोक ॥१४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-09-03T21:37:29.9600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दानेको टापै. सवारीको पदै

  • ( हिं.) तोबर्‍यास पुढें व स्वारीस मागें. खावयाच्या वेळीं तयार असणें व कामाची आळंटाळं करणें. 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हार्‍यात कोणते देव पूजावेत आणि कोणते नाही?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.