TransLiteral Foundation

नासिकेतोपाख्यान - अध्याय १८

महीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .


अध्याय १८

श्रीगणेशाय नमः ॥

ऐसी ऐकोनियां वार्ता ॥ ऋषि म्हणती नासिकेता ॥ पुढे कैसी वर्तली कथा ॥ कैसे घोरपंथा देखिले ॥१॥

दारुण मार्ग अति कठिण ॥ कित्येक योजने आहे प्रमाण ॥ आणि कवण्या पुण्येकरुन ॥ धार्मिक जन तरताती ॥२॥

ते सांगावे ऋषिनाथा ॥ केंवी विस्तारिले घोरपंथा ॥ ऐसे ऋषीश्वर पुसतां ॥ झाला सांगता नासिकेत ॥३॥

म्हणे परिसावे बरव्यापरी ॥ या संसारसागरा माझारी ॥ मृत्यु अनिवार सर्वांपरी ॥ प्रेतपुरी नेतसे ॥४॥

जे जे दृश्य जगडंबर ॥ तितुके जाणावे पृथगाकार ॥ मृत्यु जाणोनि गोचर ॥ स्वहितविचार करावा ॥५॥

तरावया तो यमपंथ ॥ निधडे एक भगवद्भक्त ॥ केलिया संतांची सांगता ॥ तरती समस्त भाविक ॥६॥ श्लोक ॥

विमुखा बांधवा यांति धर्म एकोऽनुगच्छति ॥ परलोकप्रयातस्य सार्ध धर्मेण गम्यते ॥१॥ टीका ॥

तेथे विमुख ते बांधव ॥ विमुख संपदा राज्यवैभव ॥ तरावयास तो दुःखार्णव ॥ धर्म स्वयमेव सांगाती ॥७॥

स्वजन बांधव परम आप्त ॥ कोणीच न येती सांगात ॥ दारुण मार्ग तारावया तेथ ॥ निजधर्माते अनुष्ठावे ॥८॥ श्लोक ॥

न भार्या न पिता तत्र न माता भगिनी ॥ न सुतो न सुता भ्राता पितृव्यो मातुलस्तथा ॥२॥ टीका ॥

माता पिता बंधु चुलता ॥ प्रिय सुत प्रिया कांता ॥ इष्टमित्र भगिनी दुहिता ॥ विमुख सर्वथा तेठायी ॥९॥

मेहुणे मातुळ स्वजन ॥ धन कनक मान सन्मान ॥ गाई म्हैशी द्रव्य सुवर्ण ॥ न येती जाणा ते ठायी ॥१०॥

दास दासी सकळ सैन्य ॥ असतां एकलाचि पावेमरण ॥ यालागी सकळ परिवार त्यजून ॥ आचरावे पुण्य यथायुक्त ॥११॥

देखतां सकळही परिवार ॥ बांधोनि नेती यमकिंकर ॥ दुःखयातना महा घोर ॥ कर्म दुस्तर भोगविती ॥१२॥

आणि पुण्यप्रसंगास्तव ॥ सत्यसुकृती जे मानव ॥ तयांसी आज्ञापी धर्मराव ॥ भोगा वैभव पुण्यस्थळी ॥१३॥

आतां ऐका सकळिक जन ॥ यममार्गाची निर्गति सांगेन ॥ महापर्वत अति संकीर्ण ॥ प्रकाशे पूर्ण हेलावत ॥१४॥

तया पर्वताचा प्रकाश पूर्ण ॥ नगरावरी पडला जाण ॥ अग्नितेज दैदीप्यमान ॥ परम भय ते ठायी ॥१५॥

तेथे नाना देवस्थाने ॥ अति रमणीय शोभायमाने ॥ निर्मिली धार्मिकां कारणे ॥ तेथे विसावणे तयांसी ॥१६॥

पापाष्ठांते भयंकर ॥ प्रेतस्थाने अति दुर्धर ॥ धार्मिकां तेथे सुख अपार ॥ पापियां अनिवार यातना ॥१७॥

एवं पाप पुण्यासी योजुनी ॥ भोग भोगविती तये स्थानी ॥ ते म्यां देखिले आपुल्या नयनी ॥ ऐका मुनिहो सावधान ॥१८॥

तेथे पापात्मया प्रेतपण ॥ धर्मात्मया परम स्थान ॥ पापपुण्यांचे आचरण ॥ यापरी जाणा ते ठायी ॥१९॥

अति रम्य धर्मराजपुरी ॥ दोन्ही स्थाने तियेमाझारी ॥ ती म्यां देखिली नवलपरी ॥ ऐका निर्धारी सांगेन ॥२०॥

पातकी राहती घोरस्थानी ॥ पुण्यस्थळी नारदादि मुनी ॥ सर्वसौख्ये सिंहासनी ॥ धर्मप्रसादे विराजती ॥२१॥

पातकियां तेथे दुर्गती ॥ केली कर्मे भोगविती ॥ घोर महादुःखावर्ती ॥ क्लेशिये होती सर्वकाळ ॥२२॥

गो भू रत्ने हिरण्यदान ॥ अश्व रथ हस्तिदान ॥ जे देती भोजन आणि प्रावरण ॥ ते तेणे मार्गे सुखे येती ॥२३॥

कर्मभूमीसी जे देती कांही ॥ ते उपतिष्ठति तये ठायी ॥ आता अष्टस्थाने दुर्गम पाही ॥ ऐका तीही सांगेन ॥२४॥

सहस्त्र एक योजन प्रमाण ॥ कठिण सर्व मार्ग दारुण ॥ तेथे प्रवेशतां जाण ॥ पापियां संपूर्ण महापीडा ॥२५॥

विशाळ वन दीर्घपर्वत ॥ मार्गी कांटे सणसणीत ॥ अभ्रे दाटली असती तेथ ॥ वाळू तप्त अग्निशिखे परी ॥२६॥

उपानहे छत्रे दान देती ॥ ते सुखे तेणे मार्गे येती ॥ येरासी तेथे दुर्गम गती ॥ महापंथ तरवेना ॥२७॥

तयापुढे दशसहस्त्र ॥ योजने मार्ग सविस्तर ॥ तेथे क्रूरधारा मार्ग दुर्धर ॥ शैय्यादानी नर तरताती ॥२८॥

तेथूनि मार्ग अति दारुण ॥ जळस्तंभ दैदीप्यमान ॥ व्यापूनि दशदिशा आणि गगन ॥ नव्हे निर्गम सर्वथा ॥२९॥

तो मार्ग तरावयासी जाण ॥ वापीकूपदेवार्चन ॥ करिती जे धार्मिक जन ॥ ते त्या मार्गे आपण सुखे येती ॥३०॥

तेथूनि पुढे चतुर्दश योजन ॥ उष्ण घोर महा स्थान ॥ अंधकार परम दारुण ॥ काळरात्र जाण म्हणती तया ॥३१॥

ते निस्तरावया लागोन ॥ देवालयी करिती दीपदान ॥ तेणे धार्मिक जन ॥ सुखे आपण तरताती ॥३२॥

आणि जे धर्म नीतिपंथ ॥ शास्त्राधारे रहाटताती ॥ ते तये काळरात्रीप्रती ॥ सुखे पावती धार्मिक ॥३३॥

तेथुनी पुढां महाक्रूर ॥ कृष्णमेघ अति घोर ॥ महापर्जन्य आणि अंधकार ॥ गर्जना घोर मेघांची ॥३४॥

तेथे तरावया जाण ॥ अश्वदान रथ गोदान ॥ जे मानव करिती आपण ॥ ते तेणे मार्गे सुखे येती ॥३५॥

तेथून पुढे अष्टसहस्त्र ॥ जलार्णव अति घोर ॥ पंथे चालतां अति दुस्तर ॥ तेथे तरताति नर भूमिदाने ॥३६॥

तेथोनि योजन पांच सहस्त्र ॥ मार्ग दुःखदायक अति घोर ॥ वाळू तापली जैसे अंगार ॥ न पावती पार प्राणिये ॥३७॥

तेथे निघतां क्लेश भारी ॥ दूत करिती माहामारी ॥ पार पावती धर्माधिकारी ॥ दाने करिती विविध जे ॥३८॥

तेथे अंधतम जो कोणी ॥ तयासी निर्गम नोहे थोर जाचणी ॥ तेथे तरावयालागोनी ॥ समर्थ दानांनी प्राणियां ॥३९॥

ऐका तो यम मार्ग घोरोंदर ॥ नानादानांनी क्रमिती नर ॥ ऐशासही पावतां पार ॥ पुढां दुस्तर वैतरणी ॥४०॥

अति विख्यात त्रिभुवनी ॥ ऐसी बोलिली वेदपुराणी ॥ तिये नाम कां वैतरणी ॥ ऐका मुनि सविस्तर ॥४१॥

शतयोजने विस्तीर्ण ॥ महापात्र बीभत्स स्थान ॥ पूयशोणिते भरली जाण ॥ नव्हे निर्गम प्राणियां ॥४२॥

तियेमाजी दीर्घ कीटक ॥ महासर्प भयानक ॥ दुस्तर दुर्गम अति आटक ॥ दुःखदायक सकळांसी ॥४३॥

तरी विशेषे पापियां प्रती ॥ अनिवार पीडा तेथे होती ॥ असंख्य बुडाले नेणो किती ॥ नाही मिती तयांसी ॥४४॥

ते तरावयासी जाण ॥ जे कृष्णधेनु देती दान ॥ ते तियेचे पुच्छ धरुन ॥ परपार आपण पावती ॥४५॥

जयासी घडे तीर्थाटण ॥ गंगासागरसंगमी स्नान ॥ धर्मशास्त्री जे प्रवीण ॥ तयांसी आगमन पैलतीरी ॥४६॥

दृढव्रताचे जे विश्वासी ॥ नित्य धर्म जयांचे मानसी ॥ गोब्राह्मणरक्षण जयांसी ॥ ते ते परपारासी पावती ॥४७॥

ऐसे सहस्त्रांचे सहस्त्र पुण्यपुरुष ॥ धरोनियां धेनुपुच्छास ॥ क्षणे पावती परपारास ॥ संकट त्यांस असेना ॥४८॥
रथारुढ दिव्यदेही ॥ विचित्र वाद्यांची एक घाई ॥ अभिनव त्यांची नवलाई ॥ येताती जाणा स्वर्गभुवना ॥४९॥

पातकियां तेथे नव्हे प्रवेशू ॥ दारुण मार्ग अति दुर्धपू ॥ त्यावरी यमदूताचा त्रासू ॥ ताडिती तयांसी मुद्गले ॥५०॥

अग्निकुंडे धडाडित ॥ असंख्यात जळती तेथ ॥ त्यामाजी दुष्कृती अमित ॥ धरोनि कवळिती किंकर ॥५१॥

शुभाशुभ जे किंचित ॥ ते अवश्य भोगविती तेथ ॥ प्राणी नेणोनियां तो वृत्तांत ॥ अपाय अर्जिती सर्वदा ॥५२॥

यालागी जाणा नरदेही ॥ धर्माऐसा सखा नाही ॥ जो अंतकाळी सोडवी पाही ॥ विषमठायी प्राणियां ॥५३॥ श्लोक ॥

धर्म बंधुरबंधूनां धर्मः पापविनाशकः ॥ संसारतापभीतानां धर्मश्च शिशिरस्तरुः ॥३॥ टीका ॥

यालागी धर्म अबंधूंचा बंधु ॥ धर्म क्षुधिताचा अमृतसिंधु ॥ धर्म निरसी पापापराधु ॥ दुःखबाधू निरसिता ॥५४॥

धर्म विचाराचा सांगाती ॥ धर्मे जोडे पुण्यसंपत्ती ॥ अगाध धर्माची निजख्याती ॥ पावन होती तिही लोंकी ॥५५॥

यालागी संसारभयभीतां ॥ धर्म बंधु माता पिता ॥ तो अंतकाळी सोडविता ॥ नानादुरितांपासोनि ॥५६॥

संसारतापदावानळे ॥ तापोनी जो माघारा पळे ॥ तो स्वधर्मतरुच्छाये शीतळे ॥ स्वानंदसोहळे भोगित ॥५७॥

जयांसी निजधर्म पाठिराखा ॥ ते कळिकाळासी नागवे देखा ॥ यालागी अनाथांचा निजसखा ॥ धर्मासारिखा असेना ॥५८॥

जयांसी निजधर्माचे रक्षण ॥ तयांसी नाही भवबंधन ॥ धर्मे कीर्ती धर्मे मान ॥ पुण्यपरायण पावती ॥५९॥ श्लोक ॥

द्विचरणी ॥ तस्मात्सर्वप्रयत्नेन कार्य धर्मस्य रक्षणम ॥ टीका ॥

यालागी सर्वप्रयत्नेकरुन ॥ करावे धर्मकार्यसंरक्षण ॥ निजधर्माचे अव्हेरण जाण ॥ भोगवी पतन अनिवार ॥६०॥

ऐसी पुण्यपावन चरित्र ॥ धर्मकीर्तन अति पवित्र ॥ महा पातकियां करी पवित्र ॥ जे सुक्षेत्र स्वधर्माचे ॥६१॥

हे धर्माधर्मविवेचना ॥ श्रवणद्वारे आणी जो मना ॥ तो त्यागोनि अधर्मवासना ॥ आचरे जाण स्वधर्म ॥६२॥

दीपाधारे वर्ततां ॥ अडखळोनि न पडे सर्वथा ॥ तैसे हे धर्मशास्त्र संरक्षितां ॥ अधर्म सर्वथा नाचरे तो ॥६३॥

म्हणोनि हे पुण्यश्रवण ॥ जैसे पां डोळां पडे अंजन ॥ मग तो पृथ्वीतळीचे निधान ॥ देखे आपण दैवगती ॥६४॥

तेवींच या शास्त्राधारे ॥ जो पुण्यात्मा कोणी आचरे ॥ तो विरुद्ध त्यजूनी पुण्ये अपारे ॥ इतरां उरे प्रमाण ॥६५॥

ऐसे यमपुरीचे वर्तमान ॥ नासिकेत सांगे आपण ॥ पुण्यावेगळे फळ गहन ॥ सर्वथा जाण असेना ॥६६॥

वैशंपायन म्हणे जनमेजयास ॥ ऐसी दिव्यकथा परम सुरस ॥ श्रवणमात्रे हरती दोष ॥ निजधर्मास साह्य करी ॥६७॥

आतां यावरी जे निरुपण ॥ ते निजधर्माचे आयतन ॥ ऋषि नासिकेतोपाख्यान ॥ श्रोते सज्जन परिसोत पै ॥६८॥

तुका सुंदर रामी शरण ॥ श्रोती द्यावे अवधान ॥ कथा भारती परम पावन ॥ निरुपण यथामती ॥६९॥

॥ इति श्रीनासिकेतोपाख्याने यममार्गनिर्णयोनाम अष्टादशोऽध्यायः ॥१८॥ ओव्या ॥६९॥ श्लोक ॥३॥

॥श्रीसदाशिवार्पणमस्तु ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-09-03T21:37:30.3370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

विहंगम II.

RANDOM WORD

Did you know?

चांदणी चोळी म्हणजे काय
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.