TransLiteral Foundation

नासिकेतोपाख्यान - अध्याय १०

महीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .


अध्याय १०

श्रीगणेशाय नमः ॥

नासिकेत म्हणे अवधारा ॥ देखिले धर्माधर्मविचारा ॥ प्राणी नेणोनियां संसारा ॥ भोगिती घोरा दुःखार्णवा ॥१॥

तुम्ही ऐका हो महामुनी ॥ हे स्वर्गलोकींचे सकळही प्राणी ॥ आले मृत्युलोकालागुनी ॥ येथुनी क्षणे जातील ॥२॥

तमासारिखी अज्ञाननिशी ॥ वोढवली की कर्मासरिशी ॥ तेथे षडवर्गादिक राक्षसी ॥ नेले सर्वस्वासी हिरोनी ॥३॥

जाहले शिश्नोदरपरायण ॥ ठेली कर्माकर्म आठवण ॥ पुढती जन्म पुढती मरण ॥ दुःख दारुण भोगिती ॥४॥

शुभाशुभ वाडे कोडे ॥ अवश्यमेव भोगणे घडे ॥ हे असो परी आतां पुढे ॥ जे म्या रोकडे देखिले ॥५॥

ऐका तया धर्मसभेत ॥ कवणेपरीचा वृत्तांत ॥ तो मी सांगतो यथार्थ ॥ जे म्यां सांद्यंत देखिला ॥६॥

सिंहासनी वैवस्वत ॥ दूतां प्रती आज्ञापित ॥ कोणी एक महापतित ॥ न्यायविचारार्थ आणावा ॥७॥

रायापुढे आणोनि त्यांसी ॥ पुसती तया प्राणियासी ॥ सत्य सांग रे धर्म सभेसी ॥ काय केलेसी पापपुण्य ॥८॥

तुवां जाऊनि मृत्युलोकासी ॥ काय केले दानधर्मासी ॥ आणि काय कुकर्मे आचरलासी ॥ सत्य सर्वांशी सांगपां ॥९॥

शुभाशुभ कर्म तेथ ॥ काय केले तुवां संचित ॥ ते सांगावे यथार्थ ॥ पुसती दूत निग्रहूनी ॥१०॥

आधी तया प्राणियासी ॥ आणून यमधर्मापासी ॥ चित्रगुप्ते लिहिले वहीसी ॥ तेंच तयासी दाविती ॥११॥

चित्रगुप्त वाचितां लेख ॥ येणे हे संचिले पातक ॥ तेथे धर्माधर्मविचारक ॥ महासभासद बैसले ॥१२॥

सुरवर गंधर्व आदिकरुन ॥ बैसले सर्व ऋषीजन ॥ तपोतेजे दैदीप्यमान ॥ कवण कवण ते ऐका ॥१३॥

वसिष्ठ शक्ति ऋषि पाराशर ॥ अंगिरा रोमहर्षण विश्वामित्र ॥ सभास्थानी ऋषीश्वर ॥ बैसले आणिक ते ऐका ॥१४॥

अत्रि गौतम मैत्रेय ॥ बृहस्पति मुख्य शुक्राचार्य ॥ कश्यप कात्यायन दुर्वास आर्य ॥ जो लोक त्रयी विख्यात ॥१५॥

जन्हुवर्ण व्यासदेव ॥ भारद्वाज महानुभाव ॥ वतन गोभीलादि सर्व ॥ सभेसी पहा हो महाऋषी ॥१६॥

मरीची भृगुऋषि कपिलमुनी ॥ याज्ञवल्क्य आणि जमदग्नी ॥ मार्कंडेय सभास्थानी ॥ सिंहासनी शोभत ॥१७॥

सनत्कुमारादि सकळिक ॥ सुतनु आणि भानुराज देख ॥ पुलस्त्य आणि शुकादिक ॥ सभानायक शोभती ॥१८॥

गर्गाचार्य भुशुंडि अनेक ॥ गालव ऋषि आणि विभांडक ॥ धर्माधर्मविचारक ॥ महर्षि सकळिक बैसले ॥१९॥

ऐसे महाज्ञानी महंत ॥ वेदशास्त्रपारंगत । धर्माधर्मविचारवंत ॥ सुशोभित सभास्थानी ॥२०॥

त्यांमाजी हरिमित्र आणि सुमित्र दोन्ही ॥ प्रभु बैसले मुख्यासनी ॥ त्यांवेष्टित सकळमुनी ॥ रत्नसिंहासनी शोभत ॥२१॥

नानाविभूषणी भूषित ॥ वस्त्राभरणी शोभिवंत ॥ सर्व समर्थ घवघवीत ॥ शोभा अद्भुत साजिरी ॥२२॥

जैसी द्वादशादित्यप्रभा ॥ तैसे दिव्य तेज डवरले नभा ॥ विराजमान सकळ सभा ॥ दिव्य शोभे शोभिवंत ॥२३॥

नानाशास्त्रे श्रुति स्मृती ॥ तर्क मीमांसा राजनीती ॥ सकळशास्त्रप्रयुक्ती ॥ विचार करिती धर्माधर्म ॥२४॥

तयांमाजि धर्मराज ॥ रत्नसिंहासनी तेजःपुंज ॥ तेथील महिमा न वर्णवे मज ॥ महा तेज अद्भुत ॥२५॥

मुकुट कुंडले मेखळा ॥ विचित्र भूषणे ज्वाळामाळा ॥ दिव्य तेजाचा उमाळा ॥ जैसा एकवळा द्वादशादि त्यांचा ॥२६॥

दीर्घकाय विशाळनयन ॥ करीं दंड महादारुण ॥ पुढे उभे महिषवाहन ॥ आरक्तनयन तेजस्वी ॥२७॥

यापरी तो सूर्यपुत्र ॥ महाबाहु परमपवित्र ॥ पापीयांसी तो भयंकर ॥ परममित्र सज्जनांसी ॥२८॥

पुढे उभे ठेले किंकर ॥ अतिविनीत जोडुन कर ॥ कोट्यानुकोटी भयासुर ॥ अतिभीषण विरुपाक्ष ॥२९॥

यमधर्म सिंहासनातळी ॥ शंकित पापी बद्धांजुळी ॥ ऐसिया सभामंडळी ॥ पुसती तयावेळी दोषीयांसी ॥३०॥
महादारुण पातकी थोर ॥ जानोनिया सूर्यकुमार ॥ क्रोधायमान दृष्टि वक्र ॥ पापिया समोर अवलोकित ॥३१॥

तंव ते येऊनि यमदूत ॥ घोरकर्मी महाद्भुत ॥ करी दंड प्रेरुनि तेथ ॥ क्रोधे पुसती पापियांसी ॥३२॥

तुंवा काय केले सुकृत दुष्कृत ॥ सत्य सांग रे त्वरित ॥ या धर्मराजसभेत ॥ सांग की समस्त शुभाशुभ ॥३३॥

यमदूत अति आवेशी ॥ पुसती तया दोषियांसी कांही न बोलतां तयांसी ॥ महाक्रोधे ताडिती ॥३४॥

तंव तो होऊनि भयभीत ॥ सांगे शुभाशुभ समस्त ॥ जे जे सुकृत आणि दुष्कृत ॥ ते ते निवेदी तया पुढे ॥३५॥

नासिकेत ह्मणे ऋषींसी ॥ आधी नेऊनि प्राणियासी ॥ शुभाशुभ कर्मासी ॥ सभेमाजी विचारिती ॥३६॥

यापरी धर्मसभेपुढां ॥ शुभाशुभ कर्माचा निवाडा ॥ होतां देखिला रोकडा ॥ तो म्यां तुम्हांसी सांगितला ॥३७॥

मग त्या पातकियांचे संचित ॥ मनांत आणिती ऋषि समस्त ॥ धर्माधर्मनिर्णय करिती तेथ ॥ नीतिशास्त्रोक्त ज्ञानिये ॥३८॥

अहो तये धर्मसभेप्रती ॥ जैसा अंधारी गभस्ती ॥ उगवला तैसी स्वधर्मनीती ॥ प्रकट बोले प्रबुद्ध ॥३९॥

ऋषि ज्ञानाचे तेजोराशी ॥ करिती धर्माधर्मनिर्णयासी ॥ सकल मनांत करिती विचारासी ॥४०॥

जयांचे जैसे पापपुण्य ॥ ते तैसेच भोगिती आपण ॥ परि स्वमते दंडण सर्वथा जाण असेना ॥४१॥

परिसोनियां नीतिशास्त्रार्थ ॥ यमधर्म आज्ञापी तयां दूतां ॥ अरे हा पातकी सर्वथा कुंभीपाकी घालावा ॥४२॥

ऐसे बोलता प्रेतनाथ ॥ तंव तो प्राणी होतसे भयभीत ॥ तया म्हणती ऋषीमहंत ॥ तोहि वृत्तांत अवधारा ॥४३॥

श्लोक ॥

रे रे मूढ दुराचार मानुष्यं प्राप्य दुर्लभम ॥ कस्मात्पापरतो नित्यं लोभोपहतचेतसा ॥४४॥

टीका ॥

अरे मूढा दुराचारा ॥ मनुष्यदेह पावोनि गव्हरा ॥ सुकृत वेचले शिश्नोदरा ॥ केला मातेरा आयुष्याचा ॥४५॥

नरदेहाची नियां रे मूढमती ॥ सुकृत वेंचिले विषयासक्ती ॥ भगवद्भक्ति चुकलासी ॥४६॥

नाही केले हरिभजन ॥ नाही यज्ञ नाही दान ॥ नाही केले नामस्मरण ॥ कैसेन हे पतन सोसशील ॥४७॥

पहिलेचि नेणसी तत्वतां ॥ दारुण यमपुरीची व्यवस्था ॥ वेदशास्त्र संत सांगता ॥ उन्मादपणे न मानिसी ॥४८॥

आतां काय करिसी प्राणिया ॥ दुष्टकर्म केले वायां ॥ तंव ते क्रूरकर्मी देखोनियां । यमधर्म आज्ञापि दूतांसी ॥४९॥
ऐकोनि ते यमाचे उत्तर ॥ पातकियाप्रती बोलती किंकर ॥ अरे तुज राजाज्ञा अतिदुर्धर ॥ घालावे वक्र कुंभीपाकी ॥५०॥

जैसे शास्त्रोक्त सांगितले ॥ ऋषि महंती आज्ञापिले ॥ तुवा प्राणिया तैसे न केले ॥ तुज घालविले कुंभीपाकी ॥५१॥

ऐसे बोलोनियां यमदूत ॥ तया प्राणियाते धरुनि तेथ ॥ नानापरी पीडा अद्भुत ॥ घोर कृतांत करिताती ॥५२॥

यमधर्म आज्ञाप्रमाण ॥ प्रथम दंडाचे ताडण ॥ पापी क्लेशी होती पूर्ण ॥ सोडवी कोण तयांसी ॥५३॥

नाही सत्य सुकृताचा बोलावा ॥ तरी अंतकाळी कोण सोडवी जीवा ॥ यालागी न येतां मरणगांवा ॥ जोडिजे ठेवा धर्माचा ॥५४॥

दीनवदन हाहाभूत ॥ जांचिता प्राणी देखिती संत ॥ मग बोलती कृपायुक्त ॥ कां रे दुष्कृत आचरलासी ॥५५॥

वेदशास्त्रपुराण ॥ बोलती ते केले अमान्य ॥ आतां यातना हे अतिगहन अनिवार पतन भोगिसी ॥५६॥

कर्मकरितां न भीसी कोणा ॥ झडती देतां केविलवाणा ॥ पहिलेचि कांही न नेणा ॥ यमयातना अनिवार ॥५७॥

ऐसे बोलती कृपाकर ॥ चुकलासी आचारविचार ॥ तंव येउनी यमदूत सत्वर ॥ नेउनी घालिती कुंभीपाकी ॥५८॥

ऐसे बोलतई पाही ॥ नासिकेत रोमांचित जाहला देही ॥ थोर यातना तयेठायी ॥ भोगिता नाही उसंत ॥५९॥

तैसेच आणिक तयेठायी ॥ महारौरव देखिले पाही ॥ जे भोगिता उसंत नाही ॥ कल्पांतीहि प्राणिया ॥६०॥

गोहत्येचा निर्णय तेथ ॥ म्यां देखिला अतिअद्भुत ॥ आणि स्त्रीघात गर्भघात ॥ जे जे करिताती येथ प्राणिगण ॥६१॥

तया दोषियां दुर्जनां ॥ यमदूत गाळिती घाणा ॥ नानापरी दारुण यातना ॥ ते बोलवेना मज वाचे ॥६२॥

जेणे वधिला श्रीगुरुस्वामी ॥ विश्वासघातकी महाअधर्मी ॥ पाशघातकी कुकर्मी ॥ वधी वर्मी वृद्ध बाळक ॥६३॥

ऐसिया दोषियां चांडाळा ॥ म्यां आणितां देखिले डोळा ॥ हात , पाय आणि गळा ॥ दृढ शृंखळा घालोनि ॥६४॥

तयावरी करिते बिकट मार ॥ आणिती यमधर्मासमोर ॥ तयासी कर्माकर्मविचार ॥ पुसती ऋषीश्वर धार्मिक ॥६५॥

चित्रगुप्त तेजोराशी ॥ तप्तकांचनासम शोभा त्यासी ॥ काढुनी सांगे वहीसी ॥ तेणे ऐसी केली कर्मे ॥६६॥

अगम्यी येणे गमन केले ॥ न बोलावे ते अनृत बोलिले ॥ अभक्ष्य जेणे भक्षिले ॥ ते ते समूळ लिहिले वहीसी ॥६७॥

सदा सर्वदा कामासक्त ॥ भोगाविष्ट ज्याचे चित्त ॥ दुरात्मे जे दयारहित ॥ ते ते चित्रगुप्त वाचित ॥६८॥

जेणे केले तस्करकर्म ॥ हिंसक चुंबक कलुषित परम ॥ सुरापानी दोषदुर्गम ॥ दुःखसंभ्रम दोषिया ॥६९॥

मिथ्यावादी जो आपण ॥ निरपराधे ठेवी दूषण ॥ तो तो पापात्मा संपूर्ण ॥ देखिला नग्न नरकार्णवी ॥७०॥

विष्ठाकूपामाझारी ॥ बुडाले असती कर्णनासिकवरी ॥ कृमि कीटक तयाभीतरी ॥ तोडित भारी तडतडां ॥७१॥

जो एकाक्षरपदाकार ॥ तया श्रीगुरुसी न भजे पामर ॥ तो तया नरककूपी असे साचार ॥ जंव होती इंद्र चतुर्दश ॥७२॥

श्रीगुरुंचे विहित कृत्य ॥ जो कोणी न करी आळसयुक्त ॥ गुरुसी जो न सेवित ॥ वादविवादी पाखंडी ॥७३॥

तो तिये नरकनदी माझारी ॥ प्राणी म्यां देखिला नेत्री ॥ ऐसी पापियांची परी ॥ बुडाले अघोरी नरकूपी ॥७४॥

गुरु आणि मातापितरांस ॥ निंदूनि करी तयांचा द्वेष ॥ तयांचा नरककूपी होय वास ॥ जंव पुरे आयुष्य भूमीचे ॥७५॥

ह्मणोनि ऋषिहो निःशेष ॥ न करावा गुरुपितरांचा द्वेष ॥ जीवमात्रा न द्यावा त्रास ॥ दुःख दुर्धर यमपुरीचे ॥७६॥

ऐका सकळ सावधान ॥ आणिक तेथीचे वर्तमान ॥ ताम्रकास्यादिवस्त्रहरण ॥ करिती आपण जे नर ॥७७॥

कन्यादानाच्या समयी ॥ जो नर विघ्न करी पाही ॥ तो देखिला नरकनदीठायी ॥ चिरकाल नाही उसंत ॥७८॥

एकास देतां दान ॥ दुजा अकस्मात करी विघ्न ॥ तयासी असिपत्राचे दंडन ॥ होतां आपण देखिले ॥७९॥

मुनि हो कां ब्रह्मचारी ॥ यांचिया तपसी विघ्न करी ॥ तो यमपुरीच्या दक्षिणद्वारी ॥ ब्रह्मकल्पवरी दुःख भोगी ॥८०॥

दीनजनांचा घातक ॥ मित्रघ्न आणि गुरुतल्पग ॥ त्यासी असिपत्रवनामाजी देख ॥ यमांतक ताडिती ॥८१॥

आपुली जी मातापिता ॥ स्वमुखे निंदी गुरुदेवता ॥ तयासी तप्तांगारामाजी देखा ॥ म्यां भाजितां देखिले ॥८२॥

आणिकही तयालागोनी ॥ हिंडविती ज्वाळावन्ही ॥ दुःखे क्लेशाभिभूत होउनी ॥ आक्रंदोनी रुदन करी ॥८३॥

ऐसे तया असिपत्रवनी ॥ कोट्यानुकोटी पातकी करी भोजन ॥ तयांसी पूयपंकाचे पान करविती यमदूत ॥८४॥

मुनिहो ऐका सावधान ॥ गुरुद्रव्य हरी जो आपण ॥ त्यासी कृमिकीटक वेंटाळून ॥ करिती भक्षण तया वनी ॥८६॥

ऐका ते पापकारी ॥ कार्याकार्यी नसती विचारी ॥ तयांसी बांधोनि यमकिंकरी ॥ असिपत्री ताडितां देखिले ॥८७॥

वेदाविरुद्ध स्थापिती मत ॥ स्वच्छंदे सदा विचरत ॥ तयांसी दीर्घकाक भक्षित ॥ असीपत्रवनामाझारी ॥ ८८॥

भ्रतारवंचका ज्या नारी ॥ अधर्मी रत अनाचारी ॥ तयांसी पूयपंकनदीमाझारी ॥ विक्राळ वनचर भक्षिती ॥८९॥

सांडूनियां वेदविहित ॥ पापकर्मी जाहला रत ॥ परापवादे जो जल्पत ॥ तयाते होत ते गती ॥९०॥

आणिक पावोनि जन्म ब्राह्मण ॥ अस्नातचि करी भोजन ॥ अथवा आहुतीविण भक्षण ॥ करी त्या पतन अवधारा ॥९१॥

तया पूयपंकाचे नदीतीरी ॥ विष्ठेच्या आडामाझारी ॥ कृमिकीटक नानापरी ॥ यातना भारी करिताती ॥९२॥

आणि ब्राह्मणादिकांचे धन ॥ पापात्मा हरी जो आपण ॥ तया प्राणियांचे भक्षण ॥ करिती दारुण कृमिकीटक ॥९३॥

परदाराभिलाषी जाण ॥ अधर्मी रत जयाचे मन ॥ तया पापियांसी पतन ॥ होय दारुण तयेठायी ॥९४॥

ऐका ऋषीजन सकळिक ॥ देवब्राह्मणांचा जो निंदक ॥ त्यासी टोंचिती दीर्घकाक ॥ अक्षय नरकवास कुंडी ॥ ९५॥

जो द्वेषिया धर्मशास्त्रांचा ॥ देहात्मवादी भावार्थ ज्याचा ॥ तो ते नरककुंडी कृमिकीटकांचा ॥ सोशी उपद्रवांचा डोंगरु ॥९६॥

देवतीर्थ ब्राह्मणभोजन ॥ जयासी नाही अतिथीपूजन ॥ तयालागे ते दारुण ॥ देखिले पतन ते ठायी ॥९७॥

जन्मोनि जाहला स्त्रियेसी रत ॥ मातापितरांसी उपेक्षित ॥ तया प्राणियाते यमदूत ॥ छेदिती जाणा करपत्रे ॥९८॥

द्वेषी जो या संतसज्जनां ॥ अधर्मी रत जयाची वासना ॥ तो नरकनदीच्या यातना ॥ दिधला आंदण आकल्प ॥९९॥

परोपकार जयासी न घडे ॥ जयाची चाली अधर्माकडे ॥ साधुनिंदा जयासी घडे ॥ रौरव रोकडा तयासी ॥१००॥

कामलहरी जयाचे अंगी ॥ कार्याकार्य न विचारी जो अभागी ॥ यमयातना तयालागी ॥ तेथे भयानक देखिली ॥१॥

ऐसा तेथील वृत्तांत ॥ ऋषींसी सांगे नासिकेत ॥ अतिदुस्तर तो दक्षिणपंथ ॥ नाही उसंत चालतां ॥२॥

न विचारितां धर्माधर्म ॥ प्राणी आचरती दुष्ट कर्म ॥ झडती घेतसे यमधर्म ॥ कृतकर्मे शुभाशुभे ॥३॥

यालागी नरदेह पावून ॥ ईश्वरभजनी सावधान ॥ तयासी भवबंधन ॥ दुःख दारुण त्यासी नाही ॥४॥

येथे नाही अनुमान ॥ प्रत्यक्ष देखिले म्यां आपण ॥ दारुणयमपुरीचे पतन ॥ धर्मे प्राणिगण तरताती ॥५॥

मिळोनियां ऋषि विख्यात ॥ तयांप्रती हा वृत्तांत ॥ सांगे ऋषि नासिकेत ॥ पुढील कथा अवधारा ॥६॥

तुका म्हणे सुंदरदास ॥ हरिहरभजनी विमुख जो पुरुष ॥ तयासी यमजाचणीचे क्लेश ॥ महादुर्धर भोगितां ॥१०७॥

॥ इति श्रीनासि०प्राणिपातकविचारो नाम दशमोऽध्यायः ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-09-03T21:37:29.6630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ammonite

  • न. Geol. (a fossil) ऍमोनाइट 
  • न. अमोनाइट 
  • पु. Geol. अमोनाइट 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.