नासिकेतोपाख्यान - अध्याय ८

महीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .


श्रीगणेशाय नमः ॥

वैशंपायन म्हणे गा भारता ॥ पुढे कैसी वर्तली कथा ॥ नासिकेत आला मागुता ॥ गेली वार्ता दिगंतरा ॥१॥

जो कोणी यमपंथे गेला ॥ तो मागुता नाही परतला ॥ आश्र्चर्य वाटले सकळाला ॥ म्हणती मागुता आला नासिकेत ॥२॥

ऐकोनियां ते वार्ता ॥ झाले आश्चर्य समस्तां ॥ नासिकेत गेला यमपंथा ॥ तो परतोनि मागुता स्वये आला ॥३॥

हेचि वार्ता दिगंतरी ॥ ऐकोनि थोरथोर ऋषीश्वरी ॥ सकळ तापसांमाझारी ॥ नवल भारी वर्तले ॥४॥

लोकविश्रुत झाली मात ॥ ऐकोनिया वृत्तांत ॥ ऋषि मिळाले असंख्यात ॥ अतिविख्यात तपोनिधी ॥५॥
काळा अजित महाऋषी ॥ आले तापस मासोपवासी ॥ पंचाग्निसाधने जयांसी ॥ आले तापसी अतिवृद्ध ॥६॥

कित्येक काळावरी एक ॥ तपे तपती अधोमुख ॥ तेही ऐकोनि कौतुक ॥ आले सकळिक आश्रमा ॥७॥

एकांसी वायूचे भक्षण ॥ एक ते निरोधक निरन्न ॥ एक ते सत्यव्रत परायण ॥ आले तपोधन विख्यात ॥८॥
एका अंगुष्ठावरी ॥ घोर तप करिती भारी ॥ एक ते शुष्कपर्णाहारी ॥ आले यमपुरी श्रवणार्थ ॥९॥

एकासी सूर्याअराधना ॥ अति तेजस्वी दैदीप्यमान ॥ एकाचे निरालंबी आसन ॥ ध्यान विसर्जून तेही आले ॥१०॥

चांद्रायणव्रत एकासी ॥ एक ते ऊर्ध्वपाद तापसी ॥ सदा कपालासन जयांसी ॥ आले संन्यासी दंडधारी ॥११॥
जपी तपी नखी मौनी ॥ नग्न निःसंग ब्रह्मज्ञानी ॥ ऐसे देशोदेशीचे महामुनी ॥ आले ऋषि आश्रमा ॥१२॥

आले देखोनि ऋषिपंक्ती ॥ नासिकेते प्रमप्रीती ॥ पूजा करुनियां यथास्थिती ॥ सकळांप्रति सन्मानिले ॥१३॥

मिळोनियां सकळ मुनी ॥ नासिकेत बैसविला आसनी ॥ म्हणती आलासी यमपुरी पाहुनी ॥ ऐकिले श्रवणी दिगंतर ॥१४॥

ऐकूनि तुझी अद्भुत ख्याती ॥ ऋषीवर आले श्रवणार्थी ॥ तरी सांगावी यथास्थिती ॥ कैसी रीति यमलोकींची ॥१५॥

ते सांगे गा महामुनी ॥ कैसी आहे ते यमराजधानी ॥ प्रेतमार्गतरंगिणी ॥ कैसे नयनी देखिले ॥१६॥

कैसा देखिला यमलोक ॥ काय तेथील वर्तणूक ॥ यमदूत कैसे कित्येक ॥ ते सकळिक सांग पा ॥१७॥

कैसे देखिले राजमंदिर ॥ काय ते लोकींचा आचार ॥ कैसे आहे यमनगर ॥ सांगे समग्र ऋषिवर्या ॥१८॥

तेथींचा कैसा गृहवास ॥ कैसा आहे वनप्रदेश ॥ कैसे ज्ञान कैसा उपदेश ॥ स्थिती सर्वांशी केवी आहे ॥१९॥

कैसे देखिले यमधर्मास ॥ कैसे आहेत काळपाश ॥ यमदंड म्हणती ज्यास ॥ कैसा आम्हांस तो सांगे ॥२०॥

कैसे चित्रगुप्ताचे मंदिर ॥ कैसा आहे तो चित्रगुप्त ॥ कैसे आहेत त्याचे किंकर ॥ नरक घोर तो कैसा ॥२१॥

योगी तपस्वी ब्राह्मण ॥ त्यांचे कैसे आचरण ॥ आणि येथे करावे पापपुण्य ॥ ते कैसे आपण भोगावे ॥२२॥

संसारयोगे भयभीत ॥ होउनि काळा आड करुं पाहत ॥ तयांसी काय करणे विहित ॥ बोलिले येथे कर्मविपाकी ॥२३॥

आणि कोण कर्माचा विपाक ॥ न पाविजेतो यमलोक ॥ यावेगळे आणिक ॥ जे तुवां सकळिक देखिले ॥२४॥

ते ते वर्तमान आवघे ॥ सकळांप्रति निवेदावे ॥ तूं आथिलासी ज्ञानदेव ॥ इहपर ठावे तुज आहे ॥२५॥

यालागी हे मिळोन ॥ आले देशोदेशींचे तपोधन ॥ तुझे ऐकोनि पुनरागमन ॥ हे आश्चर्य पूर्ण समस्ता ॥२६॥

ऐसे सकळहि हर्षयुक्त ॥ ऋषी पुसतां वृत्तांत ॥ ते ऐकोनि नासिकेत ॥ स्वानंदयुक्त सवे जाहला ॥२७॥

देखोनि त्यांचा श्रवणादर ॥ ऋषीने केला नमस्कार ॥ ह्मणे ऐकावया सादर ॥ साप्रत विचार देखिला ॥२८॥

पितृशापे मी आपण ॥ सदेह केले स्वर्गी गमन ॥ सदाशिव नामे चिंतन ॥ न बाधी कदां विघ्न सर्वथा ॥२९॥

सदाशिवनामे परागत ॥ स्वये आले आनंदभरित ॥ जे म्यां देखिले अति अद्भुत ॥ तेंही समस्त अवधारा ॥३०॥

पितृशाप नव्हे ते वरदान ॥ त्वरित तेथे केले गमन ॥ रत्नसिंहासनी विराजमान ॥ आपण यमधर्म देखिला ॥३१॥

सूर्यतेजासमान ॥ देखोनि म्यां केले स्तवन ॥ तेणे धर्मराज संतोषोन ॥ दिधले वरदान मज तेणे ॥३२॥

कृपेने तुष्टला यमराणा ॥ म्हणे मागे ऋषीब्राह्मणा ॥ तया म्यां मागितले जाणा ॥ की यमपुरी आपण दावावी ॥३३॥

तेणे सवे देऊनियां दूत ॥ धाडिले चित्रगुप्त होता तेथ ॥ त्याचेही दूत घेऊनि समवेत ॥ पुरी समस्त पाहिली ॥३४॥

पाहोनि ते सकळ पुरीसी ॥ मागुता आलो यमधर्मापासी ॥ तेणे दयाद्रवितमानसी ॥ निजाश्रमासी पाठविले ॥३५॥

आतां अवधारा जी समस्त ॥ जे म्यां पाहिले अत्यद्भुत ॥ यमपुरींचा वृत्तांत ॥ जो म्यां सांप्रत पाहिला ॥३६॥

शतयोजन विस्तीर्ण ॥ सकळ यमपुरीचे प्रमाण ॥ वने उपवने शोभा गहन ॥ विराजमान राजधानी ॥३७॥

नानाद्रुम दाट सरळ ॥ नानावृक्षजाती सकळ ॥ झंकार देती अलिकुळ ॥ सर्वकाळ ते ठायी ॥३८॥

कल्पतरु पारिजातक ॥ देवदार नागचंपक ॥ दिव्य तरु अलौकिक ॥ वने अनेक शोभती ॥३९॥

असो हा वृक्षविस्तार ॥ बोलतां वाढेल अपार ॥ आतां पुरीप्रश्नादर ॥ संक्षेपाकार अवधारा ॥४०॥

चहूंदिशां चारी द्वारे ॥ पंचयोजने रुंदी सविस्तरे ॥ दशयोजन उंची तपाकारे ॥ ग्रंथाधारे निरोपिली ॥४१॥

पताका तोरणे आणि मखरे ॥ शोभायमान अतिसुंदरे ॥ रत्नखचित दामोदरे ॥ नानाविचित्रे शोभती ॥४२॥

तयामाजी महाजन ॥ दिव्यतेजे विराजमान ॥ त्यामाजी राजभुवन ॥ दैदीप्यमान तेजस्वी ॥४३॥

तयामाजी धर्मराज ॥ रत्नसिंहासनी तेजःपुंज ॥ तयासभोवते ऋत्विज ॥ योगीराज महाऋषी ॥४४॥

आणिक गणगंधर्व विद्याधर ॥ देवदानव यक्षकिन्नर ॥ तेथे बैसले सुरवर ॥ नाग विखार समस्त ॥४५॥

ऐसे पुरी वर्तमान ॥ म्यां देखिले अतिगहन ॥ आतां कोण द्वारे येताती कोण ॥ तेंहि संपूर्ण अवधारा ॥४६॥

पूर्वद्वारे ते येती ॥ सत्यवादी जे दृढव्रती ॥ जयांशी प्रिय शिवभक्ती ॥ जे धर्ममूर्ति धार्मिक ॥४७॥

वसंतकाळी जे आपण ॥ करिती शीतळ पानदान ॥ माघमासी इंधन ॥ शीतनिवारणा जे देती ॥४८॥

विप्रव्याधी जे निवारिती ॥ जे दुःखिताते सुख देती ॥ घडे परोपकार जयांप्रती ॥ ते ते येती पूर्वद्वारे ॥४९॥

नित्य घडे ज्या गंगास्नान ॥ स्वधर्मी रत जयाचे मन ॥ अक्रोधी निर्लोभी जे संपूर्ण ॥ तयां आगमन पूर्वद्वारे ॥५०॥

दानशीळ शुचिष्मंत ॥ भगवद्भजनी नित्य रत ॥ परदुःखे दुःखी होत ॥ तो पुण्यात्मा येत पूर्वद्वारे ॥५१॥

आणि देवाचिया ऐसे ॥ जो मातापितरांसी भजत असे ॥ तो पूर्वद्वारे प्रवेशे ॥ येत असे विमानी ॥५२॥

जयासी अनन्य गुरुमूर्ती ॥ श्रीगुरुभजनी परम प्रीति ॥ ऐसे आथिले जे जे दैवगती ॥ ते ते येती पूर्वद्वारे ॥५३॥

श्रीगुरुचे चरण ॥ तेचि कैवल्याचे अधिष्टान ॥ ऐसा ज्यांचा निश्चयपूर्ण ॥ ताती गायन ॥ वीणा घेऊन सप्तस्वरी ॥५४॥

विमानरुढ आपण ॥ सवे महर्षी आणि देवगण ॥ गंधर्व करिताती गायन ॥ वीणा घेऊन सप्तस्वरी ॥५५॥

ऐसे ते पूर्वद्वारी ॥ प्रवेशती जन अधिकारी ॥ आतां जे येती उत्तरद्वारी ॥ तेही परी अवधारा ॥५६॥

अति स्थिर जगी दृढभाव ॥ अतिथी मानिती देवाधिदेव ॥ भगवद्भजनी लाविती जीव ॥ ते येतात उत्तरद्वारे ॥५७॥

॥ श्लोक ॥ ब्रह्मविष्णुसुसंभक्तास्तीर्थस्नानरताश्च ये ॥ ज्ञानाभ्यासरता नित्यं शिवार्चनरतास्तथा ॥१॥

टीका ॥

ब्राह्मणभजनी नित्यादर ॥ लिंगपूजा करिती निरंतर ॥ सदाशिवभजनी जे तत्पर ॥ ज्ञानाभ्यासी अलंकृत ॥ शुचिष्मंत दयाळू ॥५९॥

जयासी घडे शिवार्चन ॥ शिवचरणी जो सावधान ॥ तो शिवगणांसहवर्तमान ॥ येतसे आपण उत्तरपंथे ॥६०॥

विष्णुपरमात्मा कैवल्यमूर्ती ॥ नाममात्रे तारी त्रिजगती ॥ पुण्यपावन जयाची किर्ती ॥ पुराणी ख्याती निरंतर ॥६१॥

अन्नदाता जो शयनदानी ॥ गौकाजी वेंचला रणी ॥ तो उत्तरद्वारी विमानी ॥ येत नयनी देखिला ॥६२॥

गोग्रास प्रतिपाळीत ॥ आपत्काळी अनाथां सांभाळित ॥ स्वामिकाजी वेंचले जीवित ॥ ते नर येती उत्तरपंथे ॥६३॥

जे नर विधिविहिताचरणी ॥ देवतीर्थेब्राह्मणभजनी ॥ ते परमपदालागोनी ॥ येताति सुरगणी वेष्टित ॥६४॥

बैसोनि पुष्पक विमानी ॥ अलंकृत दिव्यसुमनी ॥ गीत नृत्य वाद्यध्वनी ॥ येताति नाचती नाचणी स्वर्गानना ॥६५॥

ऐसे ते धार्मिक जन ॥ ईश्वरभक्तिपरायण ॥ धर्मप्रसादे करुन ॥ येती आपण विमानरुढ ॥६६॥

आतां पश्चिमद्वारेकरुन ॥ येती जे पुण्यपरायण ॥ तयांचेहि धर्मकीर्तन ॥ ऐका सांगेन ऋषीश्वरहो ॥६७॥

सत्यधर्मे जे प्रतिष्ठित ॥ सत्यवादी जे दृढव्रत ॥ षट्शास्त्रा जे मान देत ॥ जाणा येताती पश्चिमद्वारे ॥६८॥

सत्यमेधा जे हरिभजन ॥ सदाचारासी जो मंडण ॥ परापवादा जो मावळे जाण ॥ तया आगमन पश्चिमपंथे ॥६९॥

शमदमादि साधानयुक्त ॥ अहिंसा आणि सत्यव्रत ॥ देह वेंचिती परोपकारार्थ ॥ ते पुण्यजन येती पश्चिमद्वारे ॥७०॥

परदारा आणि परधन ॥ जे मानिती वमनासमान ॥ जयांसी घडे भगवद्भजन ॥ ते येती पुण्यजन येणे पंथे ॥७१॥
ज्ञानी संत विष्णुभक्त ॥ शैव वैष्णव आणि विरक्त ॥ सदाचारी शुचिष्मंत ॥ ते ते येती पश्चिमपंथे ॥७२॥

जे कां जनांचे कार्य करिती ॥ हरिभक्तांचा मान रक्षिती ॥ परपीडा निवारिती ॥ ते येती पुण्यमूर्ती येणे ॥७३॥

दिव्यविमानी सालंकार ॥ सवे गणगंधर्व विद्याधर ॥ देव करिती जयजयकार ॥ सुमन संभार वर्षती ॥७४॥

नानावाद्ये शंख भेरी ॥ ध्वजपताका छत्रे वरी ॥ देवगंधर्वाच्या कुमरी ॥ चामरे करी ढाळिती ॥७५॥

ऐसियापरी धर्मिष्ठ ॥ होती येणे पंथे प्रविष्ट ॥ आतां दक्षिणद्वारची वाट ॥ परमधन दुर्घट ते ऐका ॥७६॥

जे पापियांचे भोगयातना ॥ निस्तरती पाप दुष्टजन ॥ तेही ऐकाहो ऋषी तपोधन ॥ जे म्यां आपण देखिले ॥७७॥

॥ श्लोक ॥ अन्ये च दक्षिणद्वारे प्रविष्टाः पुरुषाधमाः दुराचारा दुरात्मानो दुःशीला रौद्रकर्मिणः ॥१॥

टीका ॥

सर्वात्मा पूर्ण सर्वांतरी ॥ असोनि जयांसि झाला दूरी ॥ ऐसे दुरात्मे जे संसारी ॥ तयां दक्षिणद्वारी प्रवेशू ॥७८॥

स्वधर्माचार जो आपुला ॥ देहमदे दुराविला ॥ तोचि दुरात्मा येथ बोलिला ॥ येतां देखिला दक्षिणद्वारे ॥७९॥

दुराग्रही जो दुःशील ॥ रौद्रकर्मी अमंगळ ॥ असत्यवादी सर्वकाळ ॥ पाषी केवळ दयादीन ॥८०॥

वेदशास्त्रपुराणां निंदी ॥ मिथ्याज्ञानी अल्पवादी ॥ संतभजनाते विरोधी ॥ राहाटी दुर्बुद्धी कुकर्मी ॥८१॥

गुरुभजनी परांगमुख ॥ देवपितरी सेवाविमुख ॥ परपिडा दुःखदायक ॥ ये येती दक्षिणपंथे ॥८२॥

नाइके पुराण न वेंचे तीर्था ॥ न पूजी लिंग नाइके कथा ॥ जयांसी स्वधर्मवार्ता ॥ ते येती यमपंथा दक्षिणद्वारे ॥८३॥

वापीकूपाआराम मोडी ॥ देवउद्यान वृक्ष तोडी ॥ राहाटी कर्मे आपरवडी ॥ ते कोटीच्या कोटी येताती ॥८४॥

असत्यवादी गुरुनिंदक ॥ मातृपितृभजनी विमुख ॥ दयाहीन दुःखदायक ॥ ते येती देख दक्षिणद्वारे ॥८५॥

ऐका महर्षिजन समस्त ॥ दक्षिणद्वारींचा घोर पंथ ॥ ऐसे सांगे नासिकेत ॥ झाले रोमांचित सर्वांनी ॥८६॥

काळ्या काजळाचे पर्वत ॥ घोरकर्मी यमदूत ॥ दुःखदायक जे मूर्तिमंत ॥ प्राणिया पीडित नानापरी ॥८७॥

अति उग्र भयानक ॥ काळ कृतांताचे कंटक ॥ ऐसे यमदूत नेणो कित्येक ॥ आणिती देख प्राणियां ॥८८॥

मारिती हांका करिती शंख ॥ मार्ग अंधकारे भयानक ॥ माजी प्राणियां टोंचिती काक ॥ ने ये ते दुःख बोलता ॥८९॥

कृमि कीटक आणि कंटक ॥ मार्ग उध्वस्त भयानक ॥ माजी प्राणियासी अंतक ॥ तेही कौतुक अवधारा ॥९०॥

जिव्हानेत्रशिस्नासकळ ॥ सर्वांगा लाविले वृश्चिक व्याळ ॥ यमदूत अति विक्राळ ॥ हलकल्लोळ करिताती ॥९१॥

हाती पायी दृढ शृंखळा ॥ वरी दूत मारिती लोहार्गळा ॥ हाहाभूत प्रेतपाळा ॥ आणिती विशाळा वनांतरा ॥९२॥

जेथे सिंहशार्दूलांच्या दाटणी ॥ रीसव्याघ्राचिया आटणी ॥ ऐसे तया महावनी ॥ आणिती बांधोनी प्राणियां ॥९३॥

ताडिती मुद्गलाच्या घायी ॥ लोहदंडे मारिती पाही ॥ दृढबंधन हाती पायी ॥ उसंत नाही ताडिता ॥९४॥

यापरी दक्षिणमार्गी जाण ॥ महारौरव अति पतन ॥ म्या देखिले अन्नावीण ॥ तेंहि अवधाने अवधारा ॥९५॥

नरककुंडे बहुत दुःखास ॥ बरली तेथे आसपास ॥ त्यांमाजी घालिती प्राणियास ॥ कासावीस अतिदुःखे ॥९६॥

प्राणिया देखोनि ते अतिपतन ॥ म्हणती हाहा करिती रुदन ॥ त्यावरी यमदूत टाकिती धरुनि नरककुंडी ॥९७॥

तया पुढे कुंभीपाक ॥ महाघोर दुःखदायक ॥ ते देखोनि पापिये अनेक ॥ मारुनि हाक आक्रंदती ॥९८॥

तया कुंभीपाकामाजी नेणो किती ॥ अमित प्राणी उकडती ॥ निर्झर वारोनि बुजती ॥ दुःख ते किती सांगावे ॥९९॥

तेथूनि बहु भयानक ॥ मार्ग चालता भयानक ॥ प्राणियाते विदारिती कृमी कीटक ॥ महा अटक ते ठायी ॥१००॥

घेऊं न देती श्वासोच्छवास ॥ प्राणी पावती परम क्लेश ॥ दूत म्हणता तयांस ॥ कांरे धर्मासी अव्हेरिले ॥१॥

तयापुढे अति दारुण ॥ असिपत्रांचे दीर्घ वन ॥ तयामाजि प्राणिगण ॥ नेऊनि ताडण दूत करिती ॥२॥

पापिये दुःखी होती तेथ ॥ असो ते दुःख न बोलवे अद्भुत ॥ कृमीकीटकांचे पर्वत ॥ प्राणिया तोडित तडातड ॥३॥

उसंत नाही दिनरजनी ॥ प्राणिया होत आहे थोर जाचणी ॥ ऐसे दारुण तये वनी ॥ म्यां प्रत्यक्ष नयनी देखिले ॥४॥

तयापुढे अति अद्भुत ॥ पूयपंकाची नदी वाहत ॥ त्यामाजी जीव असंख्यात ॥ तयांते भक्षित कृमिकीटक ॥५॥

उसंत नाही अहोरात्री ॥ जाती तळी उसळती वरी ॥ नरककूपा दोही तीरी ॥ तया माझारी प्राणिये ॥६॥

कर्णनासिकपर्यंत ॥ तयामाजी प्राणी पडत ॥ कृमिकीटक तोडिती तेथ ॥ नाही उसंती सर्वथा ॥७॥

तेथूनि मार्ग अति कठिण ॥ भयानक अंधकार दारुण ॥ माजी धूम्रे निर्बुजती प्राण ॥ तोडिती जाण कृमिकीटक ॥८॥

धूम्रमार्गे यातना अद्भुत ॥ ज्वालाकुलित अति संतप्त ॥ तयामाजी प्राणी आक्रंदत ॥ हाहाभूत प्रेतमेळा ॥९॥

तेथूनि मार्ग अति कठीण ॥ शीतबाधा आक्रंदन ॥ त्यामाजी नेतां प्राणिगण ॥ करिती ताडन यमदूत ॥१०॥

विशाळ पर्वत देखिला तेथ ॥ शूळ रोविले लखलखित ॥ तयांवरी प्राणी असंख्यात ॥ तळमळती अतिदुःखे ॥११॥

तया विशाळ महापर्वती ॥ शूळी दिधले नेणो किती ॥ एका छेदिती एका भेदिती ॥ एका भाजिती अग्निमाजी ॥१२॥

दूत कराळ विक्राळ ॥ सिंहवदन तांबडे जाळ ॥ सिंहगर्जना हलकल्लोळ ॥ करिती कोल्हाळ तया ठाई ॥१३॥

ऐसे अमित यमदूत ॥ तये मार्गी चौताळत ॥ पातकी प्राणियाते तोडित ॥ स्वये नेत यमलोका ॥१४॥

ऐसे असता अति कठीण ॥ प्राणी न होती सावधान ॥ जयांसी नाही धर्मरक्षण ॥ ते दुःख दारुण भोगिती ॥१५॥

यालागी पावोनिया नरदेही ॥ धर्माधर्मविचार नाही ॥ कटकटा तो करील काई ॥ बांधला पाई काळपाशी ॥१६॥

ऐसा दक्षिणद्वारचा वृत्तांत ॥ ऋषींसी सांगे नासिकेत ॥ म्हणे संसारमय परमाद्भुत ॥ परी त्रास न घेती प्राणिये ॥१७॥

म्हणोनि क्षणभंगुर संसार ॥ किमर्थ पाप आचरती नर ॥ केले भोगिती दुस्तर ॥ नाही परमार्थ यदर्थी ॥१८॥

वैशंपायन म्हने गा भारता ॥ ऐसी यमपुरींची वार्ता ॥ नासिकेत महावक्ता ॥ सांगे समस्तां ऋषींप्रती ॥१९॥

म्हणे तुका सुंदरदास ॥ माझे नमन श्रोतयांस ॥ धर्मकथा हे अतिसुरस ॥ श्रोती अवकाश मज दीजे ॥१२०॥

॥ इति श्रीनासिकेतोपाख्याने नरकवर्णनंनाम अष्टमोध्यायः ॥८॥ ओंव्या ॥१२०॥

॥ इति नासिकेतोपाख्याने अष्टमोऽध्यायः समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP