नासिकेतोपाख्यान - अध्याय ७

महीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .


श्रीगणेशाय नमः ॥

वैशंपायन म्हणे नृपनाथा ॥ तूं परमपावन महा श्रोता ॥ तुझिया प्रसंगे पावनकथा ॥ आली वाग्पथा माझिया ॥१॥

तरी तपोनिधि नासिकेत ॥ दिव्यतेज अतिअद्भुत ॥ पावला यमपुरी त्वरित ॥ पुढील वृत्तांत अवधारी ॥२॥

शिवस्मरणी सावधान ॥ पुरीमाजी आला आपण ॥ मुखी नामाचे स्मरण ॥ विराजमान निजतेजे ॥३॥

नाममहिमा अति अद्भुत ॥ द्वंद्वदुःखविनिर्मुक्त ॥ सदा शिवनामे गर्जत ॥ सभेमाजी प्रवेशला ॥४॥

नामनिष्ठ बाणली ज्यासी ॥ निर्गमी गमन होय त्यासी ॥ कळिकाळ वंदी त्या भक्तासी ॥ नामापासी वसे मोक्ष ॥५॥

या परी तो नासिकेत ॥ परमानंद नित्य तृप्त ॥ सदा शिवनामे गर्जत ॥ सभे आंत चालिला ॥६॥

जेथे राजा वैवस्वत ॥ रत्नसिंहासनी विराजित ॥ जाणो उगवला बालादित्य ॥ सभा मंडित सुरगणी ॥७॥

तेथे महाऋषींची स्थाने ॥ अधिकार परत्वे असती सन्माने ॥ ठायी ठायी विताने ॥ वस्त्राभरणी भूषित ॥८॥

अक्राळ विक्राळ यमदूत ॥ जैसे अवयाविले पर्वत ॥ नानाशस्त्री लखलखित ॥ श्वेत आरक्त सुनीळ ॥९॥

आतां असो हा सभेचा वृत्तांत ॥ पुढे बोलणे आहे बहुत ॥ जेथे बसला सूर्यसूत ॥ नासिकेत तेथे पातला ॥१०॥

दिव्यतेजे लखलखित ॥ विराजमान घवघवीत ॥ ऐसा दिसे सभेआंत अतिअद्भुत तेजस्वी ॥११॥

कीं तो विजूचा उमाळा ॥ अथवा दिव्यप्रकाशाचा गोळा ॥ प्रज्ञाबुद्ध अतर्क्य लीळा ॥ सकल झाले विस्मित ॥१२॥

जैसा कैलासींचा शिवगण ॥ नातरी आला वैकुंठीहून ॥ की ब्रह्मभुवनींचा ब्राह्मण ॥ आला आपण सभेसी ॥१३॥

ऐसा देखोनियां नासिकेत ॥ सकळ सभा झाली विस्मित ॥ ऋषींने देखुनि प्रेतनाथ ॥ स्तुति अद्भुत आरंभिली ॥१४॥

म्हणे जयजयाजी नाथा ॥ नमो नमस्ते सूर्यसुता ॥ नमस्ते सकललोकनाथा ॥ तूं महापिता त्रिभुवनी ॥१५॥

नमो कृतांत कालाग्निरुद्रा ॥ नमस्ते सकळगुणवैढूवर्यसमुद्रा ॥ नमोनमस्ते सत्याधारा ॥ नमस्ते क्रूराक्रूररुपां ॥१६॥

मार्कंडेयऋषिप्रकाशार्का ॥ नमस्ते धर्माधर्म विचारका ॥ सद्बुद्धिदायका ॥ अंतकांतका नमो नमो ॥१७॥

स्वयंभूसमरुपा स्वशक्ती ॥ नमो नमस्ते प्रजापती ॥ नमो धर्मादिकारणमूर्ती ॥ बहुरुपाकृते नमो नमो ॥१८॥

नमो धर्माधर्मप्रवर्तका ॥ नमो पापताप शोधका ॥ नमो अज्ञानाज्ञानदायका ॥ सुखोन्मुखा नमो नमो ॥१९॥

ऐसी दिव्यस्तोत्री सुवाणी ॥ ऐकोनि तोषला दंडपाणी ॥ म्हणे कल्याण गा महामुनी ॥ आलासी कोठुनी विप्रराया ॥२०॥

काय अपेक्षा धरुनि चित्ती ॥ तूं येथे आलासि पुण्यकीर्ती ॥ ती ती पावसी निश्चिती ॥ सांगे यथार्थ आपुली ॥२१॥

ऐकोनियां धर्मवचन ॥ बोले नासिकेत आपण ॥ स्वामीनी दिधले वरदान ॥ यमपुरीदर्शन करावे ॥२२॥

मज पितृशाप जाहला अद्भुत ॥ तुज यमपुरी हो कां प्राप्त ॥ पितृशापे आलो येथ ॥ आज्ञा समर्थ प्रभूची ॥२३॥

कोठे राहती सत्य सुकृती ॥ दुष्कृतियां कैसी कोण गती ॥ ते ते पहावया यथास्थिती ॥ आलो निश्चिती यमनाथा ॥२४॥

ऐसी ऐकोनि ऋषीची कथा ॥ यमधर्म आज्ञापि स्वये दूता ॥ सवे घेवोनिया नासिकेता ॥ पुरी तत्त्वतां दावावी ॥२५॥

सत्यव्रतपरायण ॥ वेदशास्त्री अतिसंपन्न ॥ यासी न्यावे यत्नेकरुन ॥ पुरी आपुली पहावया ॥२६॥

पितृशापास्तव जाण ॥ येथे आला हा तपोधन ॥ यासी नेवोनियां आपण ॥ पुरी संपूर्ण दावावी ॥२७॥

ऐकतां धर्मराजवचन ॥ किंकरी साष्टांग केले नमन ॥ सवे घेउनी तपोधन ॥ निघाले आपण झडकरी ॥२८॥

चौघे दूत समवेत ॥ सवेग निघाला नासिकेत ॥ जेथे असे चित्रगुप्त ॥ जो शुभाशुभ लिहित सकळांचे ॥२९॥

तेथे येवोनि शीघ्रगती ॥ निरोप पाठविला द्वारपाळाहाती ॥ यमधर्मे या द्विजाप्रती ॥ पुरी दर्शनार्थ पाठविले ॥३०॥

ऐसे यमदूत सांगती ॥ द्वारपाळ सांगे वचन ॥ धर्मराजे पाठविला ब्राह्मण ॥ सवे यमदूत चौघेजण ॥ द्वारी आपण तिष्ठत्ती ॥३२॥

चित्रगुप्त सांगे द्वारपाळाशी ॥ भीतरी येऊं दे तयासी ॥ धर्मराये पाठविले त्यासी ॥ कवण्या कार्यासी ते आला ॥३३॥

शिरी वंदुनी स्वामींचे वचन ॥ द्वारपाळ येऊनियां जाण ॥ सवे यमदूत दोघेजण ॥ देऊनि ब्राह्मण पाठविला ॥३४॥

येतां देखुनि यमदूतांसी ॥ चित्रगुप्त पुसे तयांसी ॥ आलेति कोण्या उद्देशी ॥ येरु वृत्तांत्तासी सांगती ॥३५॥

द्विजोत्तम हा तपोराशी ॥ धर्मराजे पाठविले स्वामीपाशी ॥ यमधर्माची आज्ञा ऐसी ॥ पुरी यासी दावावी ॥३६॥

ऐसे ऐकोनि दूत वचन ॥ चित्रगुप्त म्हणे आपण ॥ कोण्याकार्ये तुझे आगमन ॥ सांगे संपूर्ण द्विजोत्तमा ॥३७॥

धर्मराज आज्ञा समर्थ ॥ ते आम्हासी करणे त्वरित ॥ परि तुज काय अपेक्षित ॥ सांगे यथार्थ आपुले ॥३८॥

ऐसे पुसतां चित्रगुप्त ॥ हर्षे गर्जे नासिकेत ॥ म्हणे जय जय देवसमर्थ ॥ महिमा अद्भुत दर्शनाचा ॥३९॥

यमधर्मासमान ॥ शोभे तुझे महिमान ॥ गुप्त शुभाशुभ करिसी लेखन ॥ जे कां प्राणिगुप्त आचरती ॥४०॥

तुवां चित्रिले भूतमात्र ॥ त्याचे शुभाशुभ जाणसी समग्र ॥ महावीर्य ज्ञानपवित्र ॥ गुणसागर नमो नमो ॥४१॥

कायिक वाचिक मानसिक ॥ जे कांही आचरति लोक ॥ ते ते तुज विदित सकळिक ॥ करिसी लेखन तयाचे ॥४२॥

ऐसे ऐकोनि त्याचे स्तवन ॥ चित्रगुप्त प्रसन्न वदन ॥ म्हणे माग गा वरदान ॥ प्रज्ञापूर्ण द्विजोत्तमा ॥४३॥

जे जे तुझे मनोगत ॥ ते ते पावती सांप्रत ॥ यावरी बोले नासिकेत ॥ स्वामी वृत्तांत अवधारा ॥४४॥

पितृपाश अतिअद्भुत ॥ तुज यमपुरी हो कां प्राप्त ॥ यास्तव मी आलो येथ ॥ पुरी समस्त पहावया ॥४५॥
पुसोनियां यमधर्मासी ॥ तेणे सवे दीधले दूतांसी ॥ पाठविले तुम्हापासी ॥ कृपादृष्टीने अंगीकारा ॥४६॥

सुखदुःखरुप नाना स्थाने ॥ स्वर्ग नरक असती कवणे माने ॥ कैसा फळती पापपुण्ये ॥ समूळ आपण पहावी ॥४७॥

याचि कार्यास्तव जाण ॥ जाहले येथवरी आगमन ॥ झडकरी द्यावे आज्ञापन ॥ पुरीदर्शक करावया ॥४८॥
ऐसे नासिकेत सांगता ॥ चित्रगुप्त म्हणे दूतां ॥ सवे घेऊनि नासिकेता ॥ पुरी तत्त्वता दावावी ॥४९॥

ऐसी बोलतां वैखरी ॥ स्वामीची आज्ञा वंदूनि शिरी ॥ दावावया सकळ पुरी ॥ दूत झडकरी निघाले ॥५०॥

घेऊनि उभयतांचे दूत ॥ सवेग निघाला नासिकेत ॥ समस्त पुरी असे पाहत ॥ आश्रर्ययुक्त होऊनियां ॥५१॥

सम विषम नाना स्थाने ॥ नाना चर्या नाना वने ॥ नाना लोक नाना भुवने ॥ सकळही तेणे पाहिली ॥५२॥

कवण स्वर्ग कवण नरक ॥ कवण्यापापे कवण दुःख ॥ ऐसे पाहुनियां सकळिक ॥ परम विस्मय पावला ॥५३॥

दूतांसह पाहोनि पुरीसी ॥ मागुता आला चित्रगुप्तापासी ॥ दूती सांगितले तयासी ॥ पुरी द्विजासी दाविली ॥५४॥

चित्रगुप्त सांगे दूतांसी ॥ यासी न्यावे धर्मापासी ॥ आज्ञा देऊनियां तयासी ॥ धर्म भेटीसी पाठविला ॥५५॥

पुनरपि तो बालऋषी ॥ आला धर्मराजभेटीसी ॥ यमधर्मे आपणापाशी ॥ सन्मानेसी बैसविला ॥५६॥

अर्ध्यपादादिक पूजा ॥ आवडीने करी धर्मराज ॥ रत्नसिंहासनी वोजा ॥ पूजिला तपोधन यथाविधि ॥५७॥

दिव्य अलंकार परमप्रीती ॥ नानापरिमळ पुष्पजाती ॥ द्विज पूजोनि यथानिगुती ॥ प्रेमे प्रेतपति बोलत ॥५८॥

म्हणे ऐक गा महाऋषी ॥ जया कार्यासी तूं आलासी ॥ ते समस्त आणिले की मनासी ॥ पुरवासी लोकचर्या ॥५९॥

शुभाशुभ कर्म जेथ ॥ तुवां देखिले की यथाभूत ॥ देखिला तो चित्रगुप्त ॥ शुभाशुभ लिहिता प्राणियांचा ॥६०॥

ऋषि म्हणे धर्मराजा ॥ तुझे धर्म देखिले वोजा ॥ तुज देखताचि सहजा ॥ मनोरथ झाला सुफळित ॥६१॥

तुझेनि प्रसादे यमनाथा ॥ सकळ पाहिली व्यवस्था ॥ तरी आज्ञा दीजे तत्त्वतां ॥ जावया आता मृत्युलोकी ॥६२॥

माझे दुःख दुःखित ॥ माता पिता शोकाकुलित ॥ अतिदुःखे हाहाकरित ॥ जाईन तदर्थ तवाज्ञे ॥६३॥

धर्मराज म्हणे बालऋषी ॥ सुखे जावे मृत्युलोकासी ॥ भेटोनि माता पितरांसी ॥ स्वसुखे पूर्ण असावे ॥६४॥

माझे घेई वरदान ॥ तुज नाही जन्ममरण ॥ स्वदेही असावे सुखसंपन्न ॥ ऐसे देऊनि आशीर्वचन ॥ म्हणे आपण शीघ्र जावे ॥६५॥

वैशंपायन म्हणे जनमेजया ॥ ऐसे वरदान देऊनि तया ॥ आज्ञा दिधली जावया ॥ मृत्युलोकी आश्रमासी ॥६७॥

अगाध ऋषींची ख्याती ॥ स्वर्गी सुस्वर वाखाणिती ॥ भूतळी वानिती ऋषींच्या पंक्ती ॥ पावनकीर्ति तिही लोकी ॥६८॥

क्षणार्धे तो तपोधन ॥ भूमंडळासी आला आपण ॥ दिव्यतेजे दैदीप्यमान ॥ शोभायमान तिही लोकी ॥६९॥

दुःखाकुलित मातापिता ॥ पुत्रशोके करिती चिंता ॥ तंव स्वर्गपंथे अवचिता ॥ आश्रमाजवळी उतरला ॥७०॥

दिव्यतेजे विराजमान ॥ दिव्यसुमनी शोभायमान ॥ देखोनि पुत्राचे आगमन ॥ मूर्च्छा आली उभयतां ॥७१॥

देखोनियां निजपुत्रा ॥ रोमांच उठला मुनिवरा ॥ नेत्री अश्रूंचिया धारा ॥ आनंदे थरथरां कापत ॥७२॥

नासिकेते येऊनि आपण ॥ केले पितरांसी प्रदक्षिणा ॥ घालूनियां लोटांगण ॥ दीधले आलिंगन उभयतां ॥७३॥

पुत्र देखूनियां दृष्टी ॥ जाहल्या हर्षाचिया कोटी ॥ सकळां झाली सुखसंतुष्टी ॥ वोळंगली सृष्टी स्वानंदे ॥७४॥

ऋषि करिती जयजयकार ॥ वर्षती सुमनांचे संभार ॥ उद्दालकासी आल्हाद थोर ॥ आनंदे निर्भर बोलत ॥७५॥

आजि माझा सफळ जन्म ॥ आजि माझे सफळ कर्म ॥ आजि माझा सफळ धर्म ॥ सफळ नियम आजि माझा ॥७६॥

निरपराधे अभिशाप ॥ निजपुत्रावरी केला कोप ॥ मी पापिया पापरुप ॥ जाहलो निष्पाप तुझेनि ॥७७॥

तूं कुळभूषण सत्पुत्र ॥ मी दोषास झालो पात्र ॥ तुवां कीर्ति केली अपार ॥ संसारताप तरावया ॥७८॥

पुत्र देखोनियां माता ॥ धांवोनि आली उल्हासचित्ता ॥ सप्रेमे आलिंगिले सुता ॥ दुःखवार्ता विसरली ॥७९॥

आनंदाश्रु स्त्रवती नयन ॥ पुनः पुन्हां देई आलिंगन ॥ वारंवार मुखचुंबन ॥ मस्तकावघ्राण करीत पै ॥८०॥

पितयांसमुख तुझिया योगाचे सामर्थ्य अद्भुत ॥ दुर्धर यमपुरीचा पंथ ॥ क्रमूनियां आलासि येथ ॥ थोर तुझे सामर्थ्य निजपुत्रा ॥८२॥

तंव तेथे मिळाले समस्तऋषी ॥ तपोनिधि वनवासी ॥ परमाश्चर्य सकळांसी ॥ नासिकेतासी देखोनियां ॥८३॥

उद्दालक हर्षयुक्त ॥ तेणे प्रार्थिला नासिकेत ॥ कैसा क्रमूनियां यमपंथ ॥ आलासी मागुती इहलोकी ॥८४॥

महाश्चर्य महाद्भुत ॥ केवी जाऊनि आलासी येथ ॥ कैसा यमपुरीचा पंथ ॥ सांग वृत्तांत आम्हासी ॥८५॥

कैसी देखिली यमनगरी ॥ कवण चर्या कवण परी ॥ कैसा राजा राज्य करी ॥ दंडधारी यमनाथ ॥८६॥

सांगे सकळ वृत्तांत ॥ कैसे लोक वर्तती तेथ ॥ कैसा देखिला वैवस्वत ॥ चित्रगुप्त तो कैसा ॥८७॥

तुवां कैसे केले गमन ॥ काय तेथे भोजनपान ॥ जे तुवां देखिले वर्तमान ॥ ते संपूर्ण सांगपा ॥८८॥

ऐकोनि पित्याचे वचन ॥ नासिकेते केले नमन ॥ स्वामियांचे प्रसादेकरुन ॥ देखिले ते अवधारा ॥८९॥

अमरावती समसरी ॥ शोभायमान यमपुरी ॥ मार्ग कठिण अत्यंत भारी ॥ त्वरेसी तेथे पातलो ॥९०॥

रत्नसिंहासनी सुशोभित ॥ देखिला राजा वैवस्वत ॥ ऋषिगण गंधर्वसहित ॥ बैसले तेथ सुरवर ॥९१॥

देखिला तेथे चित्रगुप्त ॥ जो जगाची शुभाशुभे लिहित ॥ आणि देखिले ते यमदूत ॥ काळ कृतांत भयंकर ॥९२॥

अतिक्रूर भयानक ॥ देखिला तेथे स्वर्गनरक ॥ विविध रचना अलोकिक ॥ नांदती सकळिक ते ठायी ॥९३॥

तेथे जाऊनियां आपण ॥ केले यमधर्माचे स्तवन ॥ तेणे धर्मराज संतोषून ॥ दीधले वरदान ते ऐका ॥९४॥

तुज न बाधी जरामरण ॥ अजरामर होसी तूं आपण ॥ यापरी देऊनियां वरदान ॥ धाडिले तेणे मज येथे ॥९५॥

तुझेनि प्रसादे ताता ॥ मज प्राप्त परलोकता ॥ म्हणोनि चरणी ठेविला माथा ॥ साष्टांगी पिता वंदिला ॥९६॥

ऐसे सकळ वर्तमान ॥ पितयासी केले निरुपण ॥ आश्रमी पितरांसह वर्तमान ॥ सुखसंपन्न राहिला ॥९७॥

तेथे येऊनि तपोधन ॥ करितील यमपुरीचा प्रश्न ॥ ते पुढे रसाळ निरुपण ॥ श्रोती सावधान परिसावे ॥९८॥

त्रिलोकी पावन हे चरित्र ॥ श्रवणे जग करी पवित्र ॥ कथा अभिनव विचित्र ॥ होय जगदुद्धार परिसता ॥९९॥
वैशंपायन म्हणे जनमेजयासी ॥ आतां येऊनिया महाऋषी ॥ पाहुनियां नासिकेता अतिहर्षी ॥ सादरे प्रश्न करतील ॥१००॥

तेथे कथेचा भावार्थ ॥ समूळ स्वर्गीचा वृत्तांत ॥ ऋषींसी सांगेल नासिकेत ॥ देखोनि सांप्रत जो आला ॥१॥

तेचि आतां श्लोकसंमती ॥ निरुपीन यथामती ॥ कृपा करुनिया साधुसंती ॥ द्यावे ग्रंथी अवधान ॥२॥

यापरी हे व्याख्यान ॥ जाहले पूर्वार्ध संपूर्ण ॥ येथूनि उत्तरार्ध निरुपण ॥ कथा पावन अवधारा ॥३॥

तुकासुंदररामी शरण ॥ जाहले नासिकेता पुनरागमन ॥ पुढील कथानुसंधान ॥ सावधान परिसावे ॥१०४॥

॥ इति श्रीनासिकेतोपाख्याने नासिकेतपुनरागमनं नाम सप्तमोऽध्यायः ॥७॥

॥ इति नासिकेतोपाख्याने सप्तमोऽध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP