नासिकेतोपाख्यान - अध्याय ६

महीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .


श्रीगणेशाय नमः ॥

उद्दालक तपोराशी ॥ राये बोळवूनि तयासी ॥ सपत्नीक पाठविला आश्रमासी ॥ पुढे कथा कैसी वर्तली ॥१॥

जनमेजय म्हणे गा मुनी ॥ धन्य धन्य हे तुझी वाणी ॥ निवालो कथामृतपानी ॥ तूं सुखदानी सर्वांसी ॥२॥

अगाध कथेचे नवल अभिनव ॥ श्रवणेंद्रियाचे उदेले दैव ॥ श्रोतयां जोडली सदैव ॥ कथा पावन त्रिजगती ॥३॥

तरी ते सांगाजी निश्चित ॥ पित्याने कां शापिला नासिकेत ॥ कैसेन यमपुरी जाहली प्राप्त ॥ समूळ वृत्तांत सांगावा ॥४॥

देखोनिया तयाचा श्रवणादर ॥ वैशंपायन जाहला सादर ॥ म्हणे ऐके राया सविस्तर ॥ अगम्य चरित्र हरिचे ॥५॥

महापावन महादुभुत ॥ ऐसा तपोनिधि नासिकेत ॥ ऐका तयाचे चरित्र ॥ अति विख्यात तिहीं लोकी ॥६॥

भार्येसहित उद्दालक ॥ तप करितां अलोकिक ॥ भार्या अनुकूल शुद्ध सात्विक ॥ अधिकाधिक तर ऋषिभजनी ॥७॥

ऐसी ती असतां आश्रमासी ॥ नासिकेत पितृभजनासी ॥ नित्य अनुरक्त अहर्निशी ॥ सावधान निजनिष्ठे ॥८॥

नित्य जाऊनियां वनासी ॥ फळे मूळे आणि कुशदर्भासी ॥ घेऊनि येतसे शिवार्चनासी ॥ पितृसेवेसी तत्पर ॥९॥

असो कोणे एके काळी ॥ स्वभावे विचरतां वनस्थळी ॥ तंव शोभायमान पुष्पफळी ॥ निवास स्थळ देखिले ॥१०॥

अतिरम्य निवासस्थान॥ पुष्पी फळी शोभायमान ॥ नानापक्षी करिती कूजन ॥ समाधान जीवशिवां ॥११॥

सारिका बोलती शुभशकुन ॥ चकोर वसती सुखसंपन्न ॥ हंस मयूर आपण ॥ निर्वैर जाण वसताती ॥१२॥

द्रुम वाढले अतिसरळ ॥ खर्जूरफळ विशाळ तमाळ ॥ वसंती कुंजती कोकिळ ॥ निर्मळ जळ सरितांचे ॥१३॥
मंद सुगंध मलयानिळ ॥ नाना पुष्पजातींचे परिमळ ॥ देखोनि विश्रांतियोग्य स्थळ ॥ जाहले निश्चळ तेठायी ॥१४॥

बिल्व चंदन नागचंपक ॥ देवदारु वृक्ष अनेक ॥ पुष्पे गळती पारिजातक ॥ अलौकिक वनशोभा ॥१५॥

ते देखूनिया नासिकेत ॥ विश्रांतियुक्त जाहले चित्त ॥ परमानंदे अतितृप्त ॥ आनंदभरित जाहला ॥१६॥

मग करुनियां गंगास्नान ॥ तेथे आरंभिले शिवार्चन ॥ सांग करुनिया पूजन ॥ धरुनि ध्यान बैसला ॥१७॥

स्वरुपोन्मुख दृढ मानस ॥ चित्त परब्रह्मी जाहले समरस ॥ जाहला समाधिस्थ सावकाश ॥ गेले यापरि षण्मास पै ॥१८॥

देहभाव नाठवे तया ॥ समाधी लागली योगिया ॥ विसरुनियां जगत्कार्या ॥ समाधिसुखे डुल्लत ॥१९॥

यापरी समाधिसुखे संपन्न ॥ नाठवे देहादिक प्रपंचभान ॥ तेथे नाही मीतूंपण ॥ आपणा आपण विसरला ॥२०॥

ऐसा सार्धवर्षपर्यंत ॥ समाधिस्थ बैसला नासिकेत ॥ पितृसेवेलागी उदित ॥ झाली अवचित देहस्मृती ॥२१॥

तेणे विसर्जूनियां ध्यान ॥ उघडूनि पाहे नयन ॥ स्वये होऊनि सावधान ॥ आला झडकरी आश्रमा ॥२२॥

फळे मूळे पुष्पजाती ॥ विचित्र कमळे अतिप्रीती ॥ कुश इंधने दर्भ समिती ॥ पितृपूजनार्थ आणिले ॥२३॥

पुढे ठेवून पूजासंभार ॥ ऋषीसी केला नमस्कार ॥ तै देखोनियां निजपुत्र ॥ क्रोधे दुर्धर ऋषि बोले ॥२४॥

म्हणे रे पुत्रा परियेसी ॥ आजवरी कोठे होतासी ॥ तुवां बुडविले स्वधर्मासी ॥ जाहलासी वैरी महाखळ ॥२५॥

तुवां बुडविले ब्रह्मकर्म ॥ बुडविला नित्य नैमित्यिक धर्म ॥ वंशी जहलासी परमधाम ॥ मनस्वी नियम आचरसी ॥२६॥

आम्ही ब्रह्मऋषि ब्राह्मण ॥ त्रिकाल गायत्रीचे अनुष्ठान ॥ करुनिया संध्यावंदन ॥ नित्य यज्ञ सारितो ॥२७॥

नित्य करावे अग्निहोत्र ॥ तेणे तृप्त होती देवपितर ॥ ब्रह्मादिक सुरवर ॥ संतोषती अग्नीमुखे ॥२८॥

यज्ञे तृप्त सूर्यसोम ॥ आणि संतोषती इंद्रमय ॥ तो बुडवूनिया नित्यनेम ॥ झालासी अधम पापमती ॥२९॥

माझिया कर्माचा लोप केला ॥ नित्य यज्ञ तुवा बुडविला ॥ तुज पाहिजे दंड केला ॥ नव्हसी भला आपमती ॥३०॥

ऐकूनियां पितृवचन ॥ नासिकेत म्हणे आपण ॥ अग्निहोत्रादिक कर्मे जाण ॥ भवबंधनदायके ॥३१॥

श्लोक ॥

अग्निहोत्रादिकं कर्म सर्गसंसारबंधनम ॥ योगाभ्यासात्परं नास्ति संसारार्णवतारकम ॥३२॥

टीका ॥

अग्निहोत्रादिक कर्माचरण ॥ येणे न चुके जन्ममरण ॥ भवबंधानासी कारण ॥ आहे जाण ऋषिवर्या ॥३३॥

तरावया भवसागर ॥ करावा योग्याभ्यास निरंतर ॥ आणिक नित्यानित्य विचार ॥ तत्वसार शोधावे ॥३४॥

योगाभ्यासापरते कांही ॥ भवमुक्तीसी साधन नाही ॥ यज्ञादिक कर्मे पाही ॥ संसारप्रवाही घालिती ॥३५॥

जे शतावधि यज्ञ करिती ॥ ते पुण्यसामग्रीने स्वर्गा जाती ॥ तेचि सरलिया पुण्यसंपत्ती ॥ लोटिजेती माघारे ॥३६॥

नवमास मातेच्या उदरी ॥ पुरीषमूत्रजंतूंच्या कुहरी ॥ जन्ममरणभरोवरी ॥ दुःखसागरी होती निमग्न ॥३७॥

ऐके स्वामी ऋषिनाथा ॥ यज्ञादिकर्मे अनुष्ठितां । उसंत नाही जन्मतां मरतां ॥ दुःख भोगितां अनिवार ॥३८॥

तरावया भवसागर ॥ कीजे नित्यानित्यविचार ॥ तेथे त्यजूनियां असार ॥ नित्य ते सार सेवावे ॥३९॥

नित्य तो परमात्मा जाण ॥ अनित्य प्रपंच मिथ्याभान ॥ ते त्यागूनियां सर्वज्ञ ॥ नित्य परिपूर्ण प्ररब्रह्म होती ॥४०॥

ब्रह्मादिदेवतात्रय ॥ नित्य सेविती चिन्मय ॥ स्वस्वरुपी व्हावया लय ॥ हाचि उपाय ऋषिवर्या ॥४१॥

साधूनियां अध्यात्मज्ञान ॥ करावे तत्त्वविवरण ॥ स्वये होईजे ब्रह्म पूर्ण ॥ कर्मबंधन तेथे कैचे ॥४२॥

जिये चुके पुनरावृत्ती ॥ ते साधावी निजात्मस्थिती ॥ करुनि संसारनिवृत्ती ॥ परब्रह्मप्राप्ति साधावी ॥४३॥

ज्ञानाभ्यासे निरंतर ॥ हृदयी ध्यावा चिदचिन्मात्र ॥ इतुकेनी संसारसागर ॥ अतिदुस्तर तरावा ॥४४॥

तेथे अग्निहोत्रादि कर्म ॥ संसारफलादायक दुर्गम ॥ संसार हा महाभ्रम ॥ हाचि नेम वेदशास्त्री ॥४५॥

यालागी जी ताता ॥ निरसूनि हे संसारव्यथा ॥ स्वानुभव पाविजे तत्वतां ॥ वेदशास्त्रार्थ सम्मते ॥४६॥

ऐकोनि पुत्राचे वचन ॥ उद्दालक म्हणे आपण ॥ महर्षि जे तपोधन ॥ वेदविधान आचरती ॥४७॥

भृगुप्रमुख सप्तऋषि ॥ नित्य अनुष्ठिती यज्ञकर्मासी ॥ तृप्त करितीए त्रिदशदेवांसी ॥ ते तूं उच्छेदिसी किमर्थ ॥४८॥
यालागी सांडूनि आपमत ॥ वेदविहितासी व्हावे रत ॥ यज्ञादिकर्म समस्त ॥ तुवां निश्चित आचरावे ॥४९॥

करितां देवांचे अर्चन ॥ ते फळ देती संतोषून ॥ दिव्यभोग अतिगहन ॥ भोगिजे आपण यथेच्छ ॥५०॥

यालागी वेदविरुद्ध मत ॥ तुवां त्यागावे समस्त ॥ कराव्या यज्ञादिक्रिया उचित ॥ सांडि समस्त पाखंड ॥५१॥

नासिकेत म्हणे आपण ॥ वेदी बोलिले ते प्रमाण ॥ परी कर्ममार्गी होतां निमग्न ॥ संसारबंधन चुकेना ॥५२॥

धरितां कर्ममार्गाची प्रवृत्ती ॥ न चुके संसारपुनरावृत्ती ॥ न भेदतां हृदयग्रंथी ॥ संसारगुंती उगवेना ॥५३॥

संसाराऐसा वैरी ॥ अन्य नाही चराचरी ॥ जन्ममरणभरोभरी ॥ करी दुःखसागरी निमग्न ॥५४॥

करावी संसारनिवृती ॥ याचेच नांव तपःस्थिती ॥ येणेविणे यज्ञादिक्रिया समस्ती ॥ संसारपंथी जुंपीजे ॥५५॥

पाहतां घाण्याचिया बैला ॥ तो म्हणे मी गेलो दिगंतराला ॥ झोपडी काढिता तयाला ॥ असे जुंपीला तेथेची ॥५६॥

तेवी यज्ञादिक क्रिया समस्त ॥ भोवंडी स्वर्गसंसाराचे पंथ ॥ उसंत नाही दिवसरात ॥ पाडी आवर्ती भवचक्री ॥५७॥

तेथे राहाटमाळेचिया परी ॥ पडूनि हिंडावे स्वर्गसंसारी ॥ उसंत नाही तिळभारी ॥ सांगा अग्निहोत्री काय फळ ॥५८॥

यालागी आत्मनिष्ठी राखोनि मन ॥ ईश्वरभजनी जो सावधान ॥ तयासी नाही जन्ममरण ॥ समाधान सुखसिद्धि ॥५९॥

एकेश्वरप्राप्तिविण ॥ यज्ञादिकर्म निष्कारण ॥ ऐसे ऐकोनि पुत्रवचन ॥ क्रोधायमान ऋषि जाहला ॥६०॥

वैशंपायन म्हणे जनमेजया ॥ ऐसे बोलणे ऐकोनियां क्रोध आला ऋषिवर्या ॥ दारुण शाप तया दीधला ॥६१॥

बोलसी पाखंड अविहित ॥ म्हणूनि खंडावया स्वमत ॥ तुज यमपुरी हो कां प्राप्त ॥ क्रोधे संतत शापिला ॥६२॥

शाप देतां क्रोधे भारी ॥ मूर्छित पडिला धरणीवरी ॥ निश्चेष्टित प्रेतानुकारी ॥ प्राण सांवरी योगबळे ॥६३॥

पुत्र पडतां मूर्छागत ॥ ऋषि जाहला भयभीत ॥ हाहाकार प्रवर्तला तेथ ॥ ऋषि समस्त गजबजिले ॥६४॥

शोकाकुलित विव्हळ ॥ उद्दालक जाहला व्याकुळ ॥ मोहे माता करी कोल्हाळ ॥ हलकल्लोळ प्रवर्तला ॥६५॥

ऐसा क्षणैक जाहला व्याकुळ काळे ॥ प्राण सांवरिला योगबळे ॥ नासिकेते तयेवेळे ॥ उघडूनियां डोळे पाहिले ॥६६॥

मग होऊनियां सावधान ॥ बोले पितयाप्रति वचन ॥ तुझे वचने मी आपण ॥ सदेह जाईन यमलोका ॥६७॥

आतां शोक न करी कांही ॥ मजवरी कृपा असो देई ॥ जाईन मी निःसंदेही ॥ यमधर्माचिया लोका ॥६८॥

ऐसे बोलतां नासिकेत ॥ उद्दालक जाहला शोकाकुलित ॥ तो ऋषि मिळाले समस्त ॥ भयचकित तेही जाहले ॥६९॥

उद्दालक महामुनी ॥ शोक करित आक्रंदोनी ॥ हाहा पुत्रा मुगुटमणी ॥ विरुद्ध करणी म्यां केली ॥७०॥

शायशी सहस्त्र वरुषे वरी ॥ तप म्यां केले दुर्धर भारी ॥ तो मी क्रोधे क्षणमाझारी ॥ सर्वे परी नाडलो ॥७१॥

क्रोध कामाचा संगाती ॥ तेणे माझिया हृदयी केली वस्ती ॥ बुडाली माझी तपसंपती ॥ क्रोध परमार्थी घातक ॥७२॥

माझिया तपाची ख्याती ॥ देवदानव ऋषि वाखाणिती ॥ तो मी क्षणार्धे क्रोधा हाती ॥ अतिविरक्त नाडलो ॥७३॥

कामक्रोधाची अगाध प्रौढी ॥ पितापुत्रांत केली ताडातोडी ॥ आपुल्या सामर्थ्ये नेली जोडी ॥ विचित्र करणी क्रोधाची ॥७४॥

ऐसे बोलून उद्दालक ॥ रुदन करी अधोमुख ॥ न सहावे पुत्रशोक ॥ अनिवार दुःख घटेना ॥७५॥

पापकारी मी अपार ॥ शाप दिधला अतिउग्र ॥ यमपुरीमार्ग अतिघोर ॥ कैसा पुत्र क्रमील ॥७६॥

जेथे राजा वैवस्वत ॥ घोर वैतरणी जेथे वाहत ॥ देखतां प्राणी हाहाकरित ॥ केवी तेथे जासी पुत्रा ॥७७॥
तेथींचा मार्ग ज्वालाकुलित ॥ कृमिनरकांचे पर्वत ॥ जेथे मार्ग धूमांकित ॥ केवी तेथे जासी पुत्रा ॥७८॥

होऊनियां शोकसंतप्त ॥ पुनः पुन्हां असे बोलत ॥ दुर्धर यमपुरीचा पंथ ॥ कैसा तेथे जासी पुत्रा ॥७९॥

पुनरपि ह्मणे आपण ॥ पापिया मी दयाहीन ॥ ऐहिकपरत्रा मुकलो जाण ॥ जाहलो निमग्न दुःखार्णवी ॥८०॥

ऐसा मोहाच्या महापुरी ॥ आंदोळे शोकार्णवाच्या लहरे ॥ नासिकेत तये अवसरी ॥ काय वैखरी अनुवदे ॥८१॥
ह्मणे जी स्वामी ताता ॥ कासया शोक वायां करितां ॥ तुमचे वचन अन्यथा ॥ सहसा विधाता करुं न शके ॥८२॥

पुरुषे करुनियां प्रयत्न ॥ सत्य आपुले करावे जतन ॥ सत्य सोडिलिया जाण ॥ तृणासमान तो नरु ॥८३॥

सत्याचेनि बळे अवधारी ॥ सूर्य तपत आहे अंबरी ॥ सत्ये मेघ वर्षाव करी ॥ सत्य संसारी दुर्लभ ॥८४॥

सत्य अग्नीस दीपन ॥ सत्य वायुसी चलनवलन ॥ सत्ये सोमाअंगी शीतळपण ॥ सत्य सर्वांभूती भगवंत ॥८५॥

सत्य आवरिला अपांपती ॥ सत्यबळे धरिली क्षिती ॥ सत्य प्रेरिले बुद्धिमंती ॥ सत्य सर्वांभूती भगवंत ॥८६॥

सत्य स्वधर्मस्थिती ॥ सत्य पाविजे परागती ॥ सत्य मेधा रक्षिती ॥ ते नर होती नारायण ॥८७॥

सत्य सर्वात्मा सर्वोत्तम ॥ सत्यमेव परब्रह्म ॥ सत्य आपुले करावे जतन ॥ सत्य पाविजे परमार्थ ॥८८॥

यालागी पुरुषे करुनि प्रयत्न ॥ सत्य आपुले करावे जतन ॥ सत्ये पाविजे स्वर्गभुवन ॥ सत्य संपूर्ण परमगती ॥८९॥

सत्य करुनियां धुरेसी ॥ प्राणी होती वैकुंठवासी ॥ सत्ये पाविजे परमगतीसी ॥ सत्य सर्वांसी तारक ॥९०॥

सत्यधर्माविण संसारी ॥ नरक भोगी आकल्पवरी ॥ यालागी स्वये सत्य अंगीकारी ॥ शोक न करी सर्वथा ॥९१॥

शोक केलिया अशेष ॥ सत्याचा होईल नाश ॥ म्हणूनियां शोक त्यजी निःशेष ॥ सत्यधर्मासी अंगीकारी ॥९२॥

होणार ते जाहले अचुक ॥ शोक करणे तो निरर्थक ॥ तुझेनि सामर्थ्ये देख ॥ पावेन यमलोक येचि देहि ॥९३॥

शोकसंताप न करी कांही ॥ अनुद्वेगे आश्रमी राही ॥ मी जाऊनियां स्वदेही ॥ भेटेन पायी यमधर्मा ॥९४॥

ऐसे बोलूनि नासिकेत ॥ साष्टांगी केला प्रणिपात ॥ पितृचरण नमस्कारित ॥ ऋषि शोकाकुलित स्वये जाहला ॥९५॥

कांही न बोलवे वचन ॥ शोकसंतापे दीनवदन ॥ प्रभावती करी रुदन ॥ पुत्रनिधान अंतरले ॥९६॥

शोके व्याकुळ जाहली माता ॥ तिची देखोनी दुःखावस्था ॥ येरे चरणी ठेविला माथा ॥९७॥

एवं नमस्कारुनि मातापिता ॥ अनुक्रमे ऋषिसमस्तां ॥ मग निघाला यमपंथा ॥ तेही कथा अवधारा ॥९८॥

सदाशिवस्मरणी सावचित्त ॥ शिवमंत्र हृदयी जपत ॥ शिवशंकर नामे गर्जत ॥ असे जात यमभुवन ॥९९॥

ज्ञानस्वरुपानुसंधान ॥ परब्रह्मावबोधे होऊनि लीन ॥ परमानंद आनंदघन ॥ जातसे आपण मनोवेगी ॥१००॥
सदाशिवनामाची जपमाळी ॥ अविस्मरण जपताहे हृदयकमळी ॥ नाम तारक जळी ॥ नाम समेळी परब्रह्म ॥१॥

नामस्मरणी श्रद्धा अढळ ॥ त्यासी बाधेना कळिकाळ ॥ नामे काळ होय कृपाळ ॥ नाम केवळ परब्रह्म ॥२॥

नाम बोलतां वैखरी ॥ यम आज्ञा वंदी शिरी ॥ नाम पावन चराचरी ॥ उद्धरती महादोषी ॥३॥

ऐसिया नामाच्या आवृत्ती ॥ ऋषि ध्यात निघाला चित्ती ॥ देखूनि त्याची अंतरभक्ती ॥ विस्मय करिती सुरसिद्ध ॥४॥
यापरी निजसामर्थ्ये जाण ॥ दिव्य तेजे विराजमान ॥ न लगतां अर्धक्षण ॥ आला तपोधन यमपुरीसी ॥५॥

जेथे राजा वैवस्वत ॥ दिव्यसिंहासनी सुशोभित ॥ धर्माधर्मनिर्णय जेथ ॥ तेथे नासिकेत आला ॥६॥

वैशंपायन ह्मणे गा भारता ॥ कथा जाण हे पुण्यसरिता ॥ दैवे आली श्रवणपंथा ॥ तूं सुभाग्य श्रोता देखोनी ॥७॥

यावरी गा नृपोत्तमा ॥ भेटी होईल ऋषि आणि यमधर्मा ॥ तिये कथेचा अगाध महिमा ॥ श्रवणग्रामा व्यापील ॥८॥

श्रोती व्हावे एकाग्रचित्त ॥ परम पावन कथामृत ॥ श्रवणे समूळ नासे दूरित ॥ प्राप्त परमार्थ अनायासे ॥९॥

श्रीगुरुस्वामीचे मनोगत ॥ देशभाषी करावा ग्रंथ ॥ तेणे मूर्खाच्या माथां ठेवूनि हस्त ॥ आज्ञा समर्थ बोलवी ॥११०॥

तेचि आतां यथामती ॥ निरुपीन श्रोतयां प्रती ॥ कृपा करुनि साधुसंती ॥ द्यावे ग्रंथी अवधान ॥११॥

भारतींचा इतिहास ॥ वैशंपायन सांगे जनमेजयास ॥ विनवी तुका म्हणे सुंदरदास ॥ सज्जनी अवकाश मज द्यावा ॥११२॥

॥ इति श्रीनासिकेतोपाख्याने यमपुरीगमनं नाम षष्ठो‍ऽध्यायः ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP