TransLiteral Foundation

नासिकेतोपाख्यान - अध्याय १६

महीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .


अध्याय १६

श्रीगणेशाय नमः ॥

आता यावरी जे निरुपण ॥ ऋषि हो ऐका सावधान ॥ तये यमपुरीचे वर्तमान ॥ सांगे तपोधन नासिकेत ॥१॥

पापपुण्याची झडती ॥ समूळ घेवोनि प्राणियांप्रती ॥ केले कर्म भोगविती ॥ ते म्यां निश्चिती देखिले ॥२॥

जो येथे करी सुवर्णदान ॥ तो सूर्यलोकाप्रति करी गमन ॥ स्वये वर्ते सुखसंपन्न ॥ विराजमान दिव्यदेही ॥३॥

जयासी घडे वस्त्रदान ॥ तो चंद्रलोकाप्रति करी गमन ॥ जयासी घडे अन्नदान ॥ तो पूज्यमान अमरावतीये ॥४॥

यालागी संसारी ॥ दान श्रेष्ठ सर्वप्रकारी ॥ धर्म अंतकाळीचा साह्यकारी ॥ निजनिर्धारी जाणावा ॥५॥

एक ते दयाधर्मविहीन ॥ या लोकी भोगिती पतन ॥ जयांसी नाही धर्मरक्षण ॥ तेही पचती नरकार्णवी ॥६॥

कर्णनासिकापर्यंत ॥ उभे असती नरकांत ॥ कृमिकीटक तयां देत ॥ उपद्रविती नानापरी ॥७॥

असोत ते पातकीजन ॥ जयांसी नाही धर्मरक्षण ॥ आता देखिले धर्मस्थान ॥ तेही सांगेन अवधारा ॥८॥

जेथे वसती संतसज्जन ॥ जे कां धार्मिक पुण्यपरायण ॥ अतिरमणीय ते उत्तम स्थान ॥ सुख समाधान ते ठायी ॥९॥

पुण्यपुष्पोदका नामे तेथ ॥ पवित्र नदी असे वाहत ॥ आचमन करिती जे समस्त ॥ ते सुखिये होती सर्वकाळ ॥१०॥

तया पुण्यसरिते आंत ॥ सुवर्णवालुका सुशोभित ॥ शंखचक्राचे पर्वत ॥ पद्मांकित दोही तीरी ॥११॥

कल्पतरु पारिजात ॥ नाना वृक्षजाती समस्त ॥ पुष्पी फळी सदा फळित ॥ शोभिवंत दोही तीरी ॥१२॥

नाना विहंगम पक्षिजाती ॥ मयूर सारस क्रीडा करिती ॥ सिद्ध गंधर्व ऋषींच्या पंक्ती ॥ सुखे क्रिडती स्वानंद ॥१३॥

तयांसी दिव्य भोजने ॥ क्षीर घृत नाना पक्वान्ने ॥ धर्मराजे तयाकारणे ॥ अनुकूळ केले सर्वही ॥१४॥

ठायी ठायी धर्मशाळा ॥ रत्नखचित अति विशाळा ॥ माजी सिद्धऋषि तापसां सकळां ॥ स्वानंदसोहळा होतसे ॥१५॥

एक सुवर्णवाळवेवरी विराजती ॥ एक ते जलक्रीडा करिताती ॥ एक ते मधुरपय सेविती ॥ सुखे विचरती ते ठायी ॥१६॥

ऐशा सौख्यकर ते स्थानी ॥ अति रमणीय उद्यांनी ॥ बैसले सिद्ध ऋषि मुनी ॥ दिव्याभरणी भूषित ॥१७॥

शीतळ सुगंध झळके पवन ॥ दिव्य सौंदर्यांचे उद्यान ॥ ऐसे ते रमणीय स्थान ॥ सुख संपन्न ते ठायी ॥१८॥

ऐशी तेथे रमणीय शोभा ॥ रविरश्मीअंगीची प्रभा ॥ बाला प्रौढा आणि प्रगल्भा ॥ नटी रंभा विलासिनी ॥१९॥

रत्नाभरणी सालंकारी ॥ दिव्यवस्त्रे नानापरी ॥ देवकन्या गंधर्वकुमारी ॥ आलाप सप्तस्वरी करिताती ॥२०॥

गीत नृत्य वीणे करी ॥ सुंदर गायने रागोद्धारी ॥ म्यां तयां धार्मिकांलागी सुंदरी ॥ नानापरी उपासिती ॥२१॥

एवं तये पुष्पोदकानदीच्या तीरी ॥ म्या देखिली नवलपरी ॥ महापुरुष धर्माधिकारी ॥ पूर्वपुण्यकारी वसताती ॥२२॥

अनन्यभावे जे आपण ॥ नित्य करिती देवपूजन ॥ ते वसती सुखसंपन्न ॥ पुण्यपरायण तेठायी ॥२३॥

सेवेसी सुंदर देवांगना ॥ विशाळनयनी चंद्रवदना ॥ सर्वाभरणी सुलक्षणा ॥ ऋषि तपोधनां उपासिती ॥२४॥

तया पुरुषांचे सेवेसी ॥ धर्मराजे ठेविले त्यांसी ॥ सेवा करिती लावण्यराशी ॥ कामिनी तिष्ठती तत्पर ॥२५॥

एवं ते महानदीचे तटी ॥ तये सुवर्णाचे वाळुवंटी ॥ ऋषि तापस सुखसंतुष्टी ॥ कोट्यानुकोटी विराजती ॥२६॥

जयां सर्वांभूती दया पूर्ण ॥ भावे करिती देवपूजन ॥ जयांसी अनन्य श्रीगुरुभजन ॥ ते विराजमान तेठायी ॥२७॥

जो दीनाचा आर्ति हरी ॥ अनाथजनांचा साह्यकारी ॥ सर्वांविषयी परोपकारी ॥ तो त्या तीरी देखिला पै ॥२८॥

अकिंचनाचे कार्य करिती ॥ आणि केलेपणाचा गर्व न धरिती ॥ ते पुष्पोदकनदीच्या तीरी जाती ॥ क्रीडा करिती स्वइच्छे ॥२९॥

आणि सकळ शास्त्रप्रवीण ॥ प्रज्ञाप्रबुद्ध विमलज्ञान ॥ ते ते वसती आपण ॥ सुखसंपन्न ते ठायी ॥३०॥

त्रैलोक्यी अति विख्यात ॥ जे पुण्यात्मे संतमहंत ॥ ते धर्मराज ठेविले तेथ ॥ रत्नखचित हेमभुवनी ॥३१॥

क्षुधेतृषेची वेदना ॥ तयां स्वप्नीहि असेना ॥ ते स्थळ तयां सज्जनां ॥ धर्मपरायणां धार्मिकां ॥३२॥

दुःखदैन्यांचा लेश ॥ सर्वथा नाही तयांस ॥ त्रिविध ताप न बाधी त्यांस ॥ सावकाश निजनिष्ठे ॥३३॥

यापरी सत्य सुकृती नर ॥ तीरी वसती अपार ॥ ईश्वरभजनी निरंतर ॥ परमार्थपर चित्त जयांचे ॥३४॥

जे या भूलोकी जाण ॥ तपे करिती गात्रशोषण ॥ ते त्या स्थळी आपण ॥ सुखसंपन्न वसताती ॥३५॥

उभय उद्वेगरहित ॥ समसाम्यसुखभरित ॥ भक्त ज्ञानी जीवन्मुक्त ॥ विचरती ते स्वइच्छे ॥३६॥

ऐसे ते उत्तम स्थान ॥ जेथे सर्वदा सुख वर्धमान ॥ तेथे ते पुण्यपरायण ॥ वसती आपण स्वानंदे ॥३७॥

आणि परलोका पातकी येती ॥ नाना दुःखे दुःखी होती ॥ तयांते देखोनि कंटाळती ॥ स्वये निंदिती ते ऐका ॥३८॥

॥ श्लोक ॥ रे रे मूढा दुराचारा मानुष्यं प्राप्य दुर्लभम ॥ कस्मात्पापं कृतं देहलोभोपहतबुद्धिभिः ॥१॥ टीका ॥

रे रे मूढा दुराचारा ॥ दुर्लभा पावोनि नरशरीरा ॥ केला आयुष्याचा मातेरा ॥ योनिद्वारा विषयासक्ती ॥३९॥

पावोनियां नरदेहप्राप्ती ॥ वृथा पाप कां आचरलेती ॥ देहलोभे नाडलेती ॥ आत्महितासी विसरोनी ॥४०॥

आता यातना हे दुर्धर भारी ॥ निस्तराल कवणेपरी ॥ स्वहित चुकोनियां संसारी ॥ दुःखसागरी निमग्न ॥४१॥

॥ श्लोक ॥ क्षणमेकं सुखार्थाय कल्पांतनरकाय च ॥ न चिरं तिष्ठते कायः किमर्थं पापसंग्रहः ॥२॥ टीका ॥

क्षणएक सुखासाठी ॥ यातना भोगणे कल्पकोटी ॥ मरमर चुकलेती राहटी ॥ यातना मोठी भोगितां ॥४२॥

जाणोनि शरीर नाशिवंत ॥ पाप आचरलेती किमर्थ ॥ ऐसे बोलती संतमहंत ॥ पापिये क्लेशित देखोनी ॥४३॥

यापरी ते धार्मिकजन ॥ तयां प्राणियांते देखोन ॥ दयाद्रवित बोलती वचन ॥ ते म्यां आपण देखिले ॥४४॥

नासिकेत म्हणे ऋषीते ॥ ऐसे परम अद्भुत देखिले तेथे ॥ प्राणी आचरती दुष्कृते ॥ तया महा पापाते नेणोनि ॥४५॥

यालागी न येतां मरणगांवा ॥ जोडिजे सत्यस्वधर्माचा बोलावा ॥ जेणे पाविजे सुखविसावा ॥ त्या सदाशिवा शरण जावे ॥४६॥

ऐसी हे पुण्यवान कथा ॥ नासिकेत सांगे ऋषींसमस्तां ॥ भाव आणितां श्रवणपंथा ॥ पावन तत्त्वता ते होती ॥४७॥

तुका सुंदररामी शरण ॥ पवित्र कथा कीर्तन ॥ श्रवणे निरसे भवबंधन ॥ श्रोती सावधान परिसतां ॥ ४८॥

॥ इति श्रीनासिकेतोपाख्याने पुष्पोदकावर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥ ओव्या ॥४८॥ श्लोक ॥ श्रीउमामहेश्वरार्पणमस्तु ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-09-03T21:37:30.1030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

antheriferous

  • परागकोशधारी 
  • अनेक परागकोश धारण करणारा (दांडा किंवा नलिका) 
  • उदा. जास्वंद 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.