TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ५८

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५८

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


अध्याय ५८

श्रीगणेशाय नमः ॥

णकार साकारातकादी ॥ ऋकारासह षकार मधी ॥ ती मम चित्ताकर्षण कधी ॥ करील आपुलेकडे हो ॥१॥

ऐसा सदा निजध्यास ॥ धरोनि आता ऐका कथेस ॥ संगमापासाव कृष्णतीर्थास ॥ दोन बाणांतर असे ॥२॥

स्नान करोनि कृष्णतीर्थी ॥ कृष्णचरणासि जे वंदिती ॥ कृष्णलोकासि ते सुमती ॥ जाति कार्तिक म्हणतसे ॥३॥

कृष्णा तेथोनि वाहे पुढे ॥ सिद्धादि सेवित श्रीगिरिकडे ॥ अमरगणांचे जेथे वाडे ॥ गगनचुंबित शोभती ॥४॥

अंबिकेसह शूलपाणी ॥ जेथ राहे निजध्यानी ॥ तोचि पर्वत देखोनि नयनी ॥ कृष्णावेणी चालली ॥५॥

तदा गिरीचे तीरावरती ॥ उभे राहोनि देव म्हणती ॥ वळवी बाजूने आपुली गति ॥ ऐक आमुचे वचन हे ॥६॥

हे सर्वगे कृष्णावेणी ॥ सर्व लोकैकपावनी ॥ तुझे सत्त्वासि होईल हानी ॥ येता सरळ पंथे हो ॥७॥

सिद्धयोगी जयावरी ॥ वास करिती तो हा गिरी ॥ मंत्रे अभेद्य पाहता नेत्री ॥ करी दहन पातके ॥८॥

म्हणोनि उजवी यासि घाली ॥ ऐसी ऐकता देव बोली ॥ कृष्णाबाई शीघ्र कोपली ॥ शैलासि भेदी सहज हो ॥९॥

गुहेत शिरली फोडोनि नगा ॥ म्हणोनि बोलती पाताळगंगा ॥ देव म्हणती क्षमा करी गा ॥ सान्निध्य देई आम्हांते ॥१०॥

बरे बोलोनि ती कृष्णा ॥ होय आकाशगंगाभिधाना ॥ गंगा भूवरी त्रिपथगा जाणा ॥ नाना लहरी उसळती ॥११॥

भोगावती ती पाताळ गंगा ॥ यमुना येत त्रिपथगासंगा ॥ मुनी बोलती नीलगंगा ॥ तया नगा निकट पै ॥१२॥

गुप्तरूपा सरस्वती ॥ मिळे येवोनि कृष्णेप्रती ॥ तुंगभद्रा भीमरथी ॥ वेत्रवती मिळाली ॥१३॥

मलापहा पंचगंगा ॥ सर्वही कृष्णेचिया संगा ॥ करिती म्हणोनि बोलती गंगा ॥ नीला कल्लोला जिला ॥१४॥

तदा देव सिद्ध मुनी ॥ स्तवन करिती साष्टांगनमनी ॥ येणे परी हस्त जोडोनी ॥ तेचि ऐका मुनी हो ॥१५॥

जयजय भक्तप्रियकारिणी ॥ ब्रह्मवादिनी कृष्णावेणी ॥ देववंद्ये पतितपावनी ॥ जटाजूटोद्भवे गे ॥१६॥

स्नानमात्रेचि तमनाशिनी ॥ गिरिकंदरी पंचरूपिणी ॥ सर्वाघौघ विकर्षिणी ॥ गंगा गंगेति बोलता ॥१७॥

ज्ञानविज्ञानरूपिणी ॥ देवि पर्वतगर्वहारिणी ॥ लीन जाहलो तुझे चरणी ॥ शुभे वरदे सदय हो ॥१८॥

ऐकोनि यापरी अमरस्तुती ॥ बोले हांसोनि माउली ती ॥ ऐका देव हो कारणाप्रती ॥ पर्वत भेदावयाचे ॥१९॥

पूर्वी मार्कंडेय मुनी ॥ तोषवावया मजलागुनी ॥ तपा बैसला पद्मासनी ॥ या गिरिवरी देव हो ॥२०॥

जो का होता पाताळ विवरी ॥ शिवरूप पाहे ह्रदयांतरी ॥ प्रेमे जयाचे पिनाकधारी ॥ लिंगरूपी पातला ॥२१॥

जरी लिंग की तीर्थ येथे ॥ नसेल तरी मग कैसे भवाते ॥ तरतील मानव म्हणोनि तेथे ॥ करी तपाते जो मुनी ॥२२॥

यापरी वर्षे दिव्य सहस्त्र ॥ होता तोषोनि मी अपार ॥ आले पहाया मुनिवर ॥ डोळा आपुले म्हणोनी ॥२३॥

परोपकारार्थ आपुली काया ॥ झिजवी तयाचे वंदिता पाय ॥ पुनीत होईल मम पय ॥ म्हणोनि आले देव हो ॥२४॥

तैसेचि भक्तदुरितहरण ॥ तो हा पहावा मल्लिकार्जुन ॥ जो का पापगजपंचानन ॥ लिंगरूपी महेश ॥२५॥

ऐसे कृष्णामधुरबोल ॥ ऐकोनि वंदिती देव सकल ॥ तदा ती बोलते कृपाल ॥ पुनरपि अमरगणासी ॥२६॥

जे का राहती माझिये तटी ॥ ते माझिये पदा पावती ॥ बोलोनि ऐसे अमरांप्रति ॥ करीत गर्जना जातसे ॥२७॥

स्कंद बोले मुनिजनांसी ॥ जावोनि जो का श्रीगिरीसी ॥ पाहे पाताळगंगेसी ॥ त्यासी पापे कदा न स्पर्शती ॥२८॥

कृष्णा सर्वत्र सुलभा जरी ॥ चतुःस्थानी दुर्लभा तरी ॥ छाया शूर्पाल संगमावरी ॥ चौथा श्रीगिरि जाणिजे ॥२९॥

तत्रापि दुर्लभ सितासिता ॥ नीलगंगा जाण तत्त्वता ॥ प्रेमे जियेचे नाम घेता ॥ ठाव दोषांसि नुरेचि ॥३०॥

श्रीशैल सर्व क्षेत्रमय ॥ मल्लिकार्जुन देवमय ॥ कृष्णा सर्व तीर्थमय ॥ बोले तनय शिवाचा ॥३१॥

निजमंडलापासाव धरणी ॥ वरी उतरले चंद्रतरणी ॥ नमोनि कृष्णेसि उभयतांनी ॥ स्तवोनि मेळविले वर ॥३२॥

पाताळ गंगेमाजि नर ॥ स्नान करोनि चंद्रेश्वर ॥ आणि पूजिता सूर्येश्वर ॥ पूर्ण मनोरथ होतसे ॥३३॥

सप्तनदी भेद जेथ ॥ तेथील तीर्थ चमूनाथ ॥ सांगे करिता स्नान तेथ ॥ पापमुक्त होतसे ॥३४॥

केदारतीर्थी उदकपान ॥ तैसेचि काशीमाजी मरण ॥ तथा श्रीशैल्यशिखरदर्शन ॥ होता जन्म नयेचि ॥३५॥

ऐकोनि यापरी सकळ ऋषी ॥ प्रश्न करिती कार्तिकासी ॥ अहो प्रतीति कवणासी ॥ ऐसी आली पाहता ॥३६॥

परिसोनि यापरी शंकरात्मज ॥ म्हणे देश जो का कान्यकुब्ज ॥ तेथे पापिष्ठ सात द्विज ॥ होते लुब्धक चोर जे ॥३७॥

जन्ममात्र ब्राह्मणाचे ॥ कर्म करिती अंत्यजाचे ॥ वाळित ठेविती ग्रामस्थ त्यांचे ॥ साताजणांसि तेधवा ॥३८॥

तदा पश्चात्ताप साता ॥ होवोनि दैवासि साष्टांगपाता ॥ करोनि म्हणती उद्धारा आता ॥ पापसमुद्रापासुनी ॥३९॥

ऐसे ऐकोनि दीन वचन ॥ म्हणती सातांसि ते ब्राह्मण ॥ घ्यावे श्रीशैल्यशिखरदर्शन ॥ निष्पाप व्हावया कारणे ॥४०॥

परिसोनि यापरी ब्राह्मणोक्ती ॥ सातही निघाले द्विज त्वरिती ॥ हिंडोनि तीर्थे सर्व शेवटी ॥ श्रीगिरिसी निघाले ॥४१॥

मार्गी भक्षण यांना करावे ॥ म्हणोनि राक्षस त्यांसवे ॥ गुप्त होते ते आघवे ॥ भस्म जाहले सवेंचि ॥४२॥

हे सातही ब्राह्मण मग ॥ श्रुंगासहित तो लक्ष्मीनग ॥ डोळा देखोनि साष्टांग ॥ नमन करिती भक्तीने ॥४३॥

होता शिखराग्री दर्शन ॥ गेली पापेधने जळोन ॥ नीलगंगानदीस्नान ॥ करिती ते द्विज सातही ॥४४॥

श्रीगिरिवरी मल्लिकार्जुन ॥ करिती तयाचे मग पूजन ॥ तदा तेथील जे ब्राह्मण ॥ सातांजणांसि बोलती ॥४५॥

तुह्मी निष्पाप जाहला ॥ परी संदेह जरी असला ॥ तरी नंदीला गवत घाला ॥ किंवा धान्यासि विप्र हो ॥४६॥

तेणे भक्षिता मनी उमजा ॥ पाप गेले उठा जा जा ॥ ऐसे सांगता सातही द्विजा ॥ सवेंचि उठले सर्वही ॥४७॥

धान्य घेवोनिया हाती ॥ जावोनि नंदीपुढे ठेविती ॥ तदा अहो ती पाषाणमूर्ति ॥ खाय गबगबा धान्य ते ॥४८॥

देखोनि मग ते जाश्वनीळ ॥ कोपोनि म्हणे तू नंदी केवळ ॥ आता नको हा धान्यकवळ ॥ घेउ वृषभवरारे ॥४९॥

ऐसा देखोनि अगाध महिमा ॥ सकळ म्हणती आलिया जन्मा ॥ हेचि सार्थक पुण्यसीमा ॥ धन्य आम्ही धन्य हो ॥५०॥

हा अध्याय ऐकता कानी ॥ पूर्ण होईल चिंतिले मनी ॥ पुढे बोलेल सेनानी ॥ आणीक कृष्णाचरित्र ॥५१॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ अठावन्नावा अध्याय हा ॥५२॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये मल्लिकार्जुनवर्णनं नामाष्टपंचाशत्तमोऽध्यायः ॥५८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-09-26T23:28:30.0470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धुंधु

  • n. एक राक्षस । यह मधुकैटभों का पुत्र, एवं ‘उदकाराक्षस’ था [म.व.१९५.१] । देवताओं एवं हिरण्याक्ष राक्षस के युद्ध में, यह हिरण्याक्ष के पक्ष में शामिल था [पद्म सु.६५] । उज्जालक नामक वालुकामय प्रदेश में खुद अपने को वालूका में दबा कर यह रहता था । इसकी तपस्या से संतुष्ट हो कर, ब्रह्मदेव ने इसे अवध्वत्व प्रदान किया । उस वरदान से उन्मत्त हो कर, यह सबको सताने लगा । सूर्यवंशीय कुवलाश्व राजा के पुत्रों को इसने दग्ध किया । फिर उत्तंक ऋषि की प्रेरणा से कुवलाश्व ने इसका वध किया [वायु. ८८];[ विष्णुधर्म. १.१६];[ ब्रह्मांड. ३.६३.३१];[ ब्रह्म.७.५४.८६];[ विष्णु.४.२];[ ह. वं.१.११];[ भा.९.६]; कुवलाश्व देखिये । इस अररु का पुत्र भी कहा गया है [ब्रह्मांड.३.६.३१] 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.