मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ९८१ ते १००८

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ९८१ ते १००८

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


९८१
सुखार्थिन: कुतो विद्या ।
नास्ति विध्यार्थिन: सुखम् ॥५।४०।७॥
सुखेच्छु पुरुषाला विद्या कोठून प्राप्त होणार ? आणि विदयेची इच्छा करणार्‍याला सुख कोठून मिळणार ?

९८२
सुखे तु वर्तमानो वै दु:खे वापि नरोत्तम ।
सुवृत्ताध्यो न चलते शास्त्रचक्षु: स मानव: ॥१२।२९५।३१॥
(पराशरमुनि जनकाला म्हणतात) हे पुरुषश्रेष्ठा, सुखांत किंवा दु:खांत असतांनादेखील जो मनुष्य सद्वर्तनापासून चलित होत नाहीं, त्यालाच खरी शास्त्रदृष्टि प्राप्त झाली.

९८३
सुतेषु राजन् सर्वेषु हीनेष्वभ्यधिका कृपा ॥३।९।१९॥
(व्यासमुनि धृतराष्ट्राला म्हणतात) हे राजा, सर्व मुलांत जे गुणहीन असतील त्यांची (आईबापांना) काळजी अधिक.

९८४
सुपूरा वै कुनदिका सुपूरो मुषिकाञ्जलि: ।
सुसंतोष: कापुरुष: स्वल्पकेनैव तुष्यति ॥५।१३३।९॥
लहानसा ओढा पाण्यानें तेव्हांच भरुन जातो. उंदराची ओंजळ सहज भरते. त्याप्रमाणें क्षुद्र मनुष्यही सहज संतुष्ट होत असून त्याचें थोडक्यानेंच समाधान होतें.

९८५
सुप्रज्ञमपि चेच्छूरम् ऋध्दिर्मोहयते नरम् ॥३।१८१।३०॥
तीव्र बुध्दीच्या शूर पुरुषाला देखील ऐश्वर्याचा मोह पडत असतो.

९८६
सुप्रणीतौ बलौघो हि कुरुते कार्यमुत्तमम् ।
अन्धं बलं जडं प्राहु: प्रणेतव्यं विचक्षणै: ॥२।२०।१६॥
शक्तीचा ओघ कुशलतेनें वळविला म्हणजे त्याच्याकडून उत्तम प्रकारचें कार्य होतें. बळ हें आंधळें असून अचेतन आहे. त्याचा शहाण्यानें (इष्टकार्याकडे) उपयोग करुन घेतला पाहिजे.

९८७
सुप्राकृतोऽपि पुरुष: सर्व: स्त्रीजनसंसदि ।
स्तौति गर्वायते चापि स्वमात्मानं न संशय: ॥१२।२८४।२७॥
कोणीही अगदीं सामान्य प्रतीचासुध्दां पुरुष स्त्रीजनांच्या समुदायांत आपली आपणच स्तुति करुन प्रौढी मिरवतो ह्यांत संशय नाहीं.

९८८
सुबध्दस्यापि भारस्य पूर्वबन्ध: श्लथायते ॥१।२२१।१७॥
(अर्जुनसुभद्राविवाहानंतर आपल्या नव्या सवतीला उद्देशून द्रौपदी अर्जुनाला म्हणते) ओझें एकदां घट्ट बांधलें असलें, तथापि त्यास जर पुन: दुसरी दोरी बांधिली, तर पहिली दोरी सैल पडावयाचीच !

९८९
सुमन्त्रिते सुविक्रान्ते सुकृते सुविचारिते ।
सिध्यन्त्यर्था महबाहो दैवं चात्र प्रदक्षिणम् ॥३।३६।७॥
(युधिष्ठिर भीमसेनाला म्हणतो) हे महाबाहो, चांगल्या तर्‍हेची सल्लामसलत, चांगल्या तर्‍हेचा पराक्रम, चांगल्या तर्‍हेचा विचार आणि चांगल्या तर्‍हेचें कर्तृत्व ह्यांच्या योगानें मनोरथ सिध्दीस जातात, परंतु ह्या ठिकाणीं दैवाचीही अनुकूलता असावी लागते.

१९०
सुलभा: पुरुषा राजन् सततं प्रियवादिन: ।
अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ: ॥५।३७।१५॥
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, सतत प्रिय भाषण करणारे पुष्कळ आढळतात; परंतु अप्रिय असलें तरी हितकर असेल तेंच सांगणारा विरळा आणि ऐकणाराही विरळा.

९९१
सूक्ष्मा गतिर्हि धर्मस्य दुर्ज्ञेया ह्यकृतात्मभि: ॥१३।१०।३८॥
धर्माचें स्वरुप अत्यंत सूक्ष्म आहे. मनोजय ज्यांनीं केलेला नाहीं, त्यांस तें समजणें कठीण.

९९२
सेनापतौ यशो गन्ता ।
न तु योधान्कथंचन ॥५।१६८।२८॥
यशाचें श्रेय नेहमीं सेनापतीला मिळणार, सैनिकांना कधींच नाहीं.

९९३
सोपानभूतं स्वर्गस्य मानुष्यं प्राप्य दुर्लभम् ।
तथात्मानं समादध्याद् भ्रश्यते न पुनर्यथा ॥१२।३२१।८०॥
स्वर्गास जाण्याचा (जणूं) जिनाच अशा दुर्लभ मनुष्यजन्माला येऊन परमात्म्याकडे असें ध्यान लावावें कीं जेणेंकरुन स्थानभ्रष्ट होण्याचा प्रसंग पुनश्च येणार नाहीं.

९९४
सौहृदान्यपि जीर्यन्ते कालेन परिजीर्यत: ॥१।१३१।६॥
कालान्तरानें मनुष्य जीर्ण होतो तसा स्नेहसुध्दां कमी होत असतो.

९९५
स्थापयेदेव मर्यादां जनचित्तप्रसादिनीम् ।
अल्पेऽप्यर्थे च मर्यादा लोके भवति पूजिता ॥१२।१३३।१३॥
लोकांचीं अंत:करणें प्रसन्न राहतील अशाच प्रकारचे नियम केले पाहिजेत. लहानसहान गोष्टींतसुध्दां नियम असलेला लोकांना मान्य होतो.

९९६
स्त्रियो यत्र च पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: ॥१३।४६।५॥
जेथें स्त्रियांचा गौरव होतो तेथें देवता रममाण होतात.

९९७
स्वबाहुबलमाश्रित्य योऽभ्युज्जीवति मानव: ।
स लोके लभते कीर्तिं परत्र च शुभां गतिम् ॥५।१३३।४५॥
आपल्या बाहुबळाचा आश्रय करुन जो मनुष्य आत्मोध्दार करुन घेतो, त्याची इहलोकीं कीर्ति होऊन त्याला परलोकीं उत्तम गति मिळते.

९९८
समर्थं य: परित्यज्य परार्थमनुतिष्ठति ।
मिथ्याचरति मित्रार्थे यश्च मूध: स उच्यते ॥५।३३।३६॥
जो स्वत:चें कर्तव्य सोडून देऊन दुसर्‍याच्या उलाढाली करीत राहतो आणि मित्रकार्यामध्यें खोटें आचरण करतो त्याला मूढ असें म्हणतात.

१०००
स्वमांसं परमांसेन यो वर्धयितुमिच्छति ।
नास्ति क्षुद्रतरस्तस्मात् न नृशंसतरो नर: ॥१३।११६।११॥
दुसर्‍याचें मांस भक्षण करुन आपलें मांस वाढविण्याची जो इच्छा करतो, त्याच्यासारखा नीच कोणी नाहीं. तो मनुष्य अत्यंत दुष्ट होय.

१००१
स्वयमुत्पध्यते जन्तु: स्वयमेव विवर्धते ।
सुखदु:खे तथा मृत्युं स्वयमेवाधिगच्छति ॥१२।२८८।१६॥
प्राणी स्वत:च जन्म घेतो स्वत:च वाढतो. तसेंच सुखदु:खें आणि मृत्यु त्याला स्वत:लाच प्राप्त होत असतात.

१००२
स्वयं प्राप्ते परिभवो भवतीति विनिश्चय: ॥१३।८२।१४॥
(दुसर्‍यानें न बोलावितां) आपण होऊन जर कोणी दुसर्‍याकडे गेला तर त्याचा अपमान होतो, हें अगदीं निश्चित होय.

१००३
स्ववीर्यं य: समाश्रित्य समाह्वयति वै परान् ।
अभीतो युध्यते शत्रून् स वै पुरुष उच्यते ॥५।१६३।३॥
स्वत:च्या सामर्थ्याचा आश्रय करुन जो शत्रूंना युध्दाला आव्हान करतो आणि न भितां लढतो तोच खरा पुरुष म्हणावयाचा.

१००४
स्वार्थे सर्वे विमुह्यति येऽपि धर्मविदो जना: ॥४।५१।४॥
स्वार्थाचा मोह सर्वांना, जे धर्म जाणणारे त्यांनासुध्दां, पडत असतो.

१००५
स्वे स्वे कर्मण्यभिरत: संसिध्दिं लभते नर: ॥६।४२।४५॥
आपआपलें कर्तव्य आनंदानें करीत राहिल्यानें मनुष्यास परमसिध्दि प्राप्त होते.

१००६
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठु कौन्तेय युध्दाय कृतनिश्चय: ॥६।२६।३७॥
(श्रीकृष्ण सांगतात) हे अर्जुना, तुला जर युध्दांत मरण आलें तर स्वर्ग मिळेल आणि तुझा जय झाला तर सार्‍या पृथ्वीचें राज्य तूं भोगशील. ह्यासाठीं, हे कुंतीपुत्रा, युध्दाचा निश्चय करुन ऊठ.

१००७
हर्षो योधगणस्यैको जयलक्षणमुच्यते ॥६।३।७५॥
सर्व सैनिकांना लढण्याचा हुरुप वाटणें ही एक गोष्ट जय मिळण्याचें लक्षण होय.

१००८
हितं यत्सर्वभूतानाम् आत्मनश्च सुखावहम् ।
तत्कुर्यादीश्वरे ह्येतन्मूलं सर्वार्थसिध्दये ॥५।३७।४०॥
सर्व भूतानां जें हितकर आणि स्वत:लाही सुखावह तेंच ईश्वरार्पणबुध्दीनें करीत असावें. कारण, हेंच सर्व गोष्टी सिध्दीस जाण्याचें मूळ आहे.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP