मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ९२१ ते ९४०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ९२१ ते ९४०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


९२१
सत्यं दमस्तपो दानम् अहिंसा धर्मनित्यता ।
साधकानि सदा पुंसां न जातिर्न कुलं नृप ॥३।१८१।४३॥
(अजगर झालेला नहुषराजा युधिष्ठिराला म्हणतो) हे राजा, सत्यभाषण, इंद्रियनिग्रह, तप, दान, अहिंसा आणि नित्य धर्माचरण हींच नेहमीं मनुष्यांच्या उपयोगी पडणारीं आहेत. जातीचा कांहीं उपयोग नाहीं आणि कुलाचाही नाहीं.

९२२
सत्यस्य वचनं श्रेय: सत्यज्ञानं तु दुष्करम् ।
यद्भूतहितमत्यन्तम् एतत्सत्यं ब्रवीम्यहम् ॥१२।२८७।२०॥
(नारद गालवाला म्हणतात) सत्य बोलणें चांगलें खरें, पण सत्याचें निभ्रान्त ज्ञान होणें कठीण. ज्याच्या योगानें जीवांचें अत्यंत कल्याण होतें त्यालाच मी सत्य म्हणतों.

९२३
सत्यस्य वदिता साधुर्न सत्याद्विध्यते परम् ।
तत्त्वेनैव सुदुर्ज्ञेयं पश्य सत्यमनुतिष्ठतम् ॥८।६९।३१॥
(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) सत्य सांगेल तो साधु. सत्यापरतें श्रेष्ठ कांहीं नाहीं. परंतु सत्याचें आचरण करितांना वास्तविक सत्य कोणतें हें समजणेंच अत्यंत कठीण आहे.

९२४
सत्येन रक्ष्यते धर्मो विद्या योगेन रक्ष्यते ।
मृजया रक्ष्यते रुपं कुलं वृत्तेन रक्ष्यते ॥५।३४।३९॥
सत्यानें धर्माचें रक्षण होतें, व्यासंगाच्या योगानें विद्या जिवंत राहते. स्वच्छता ठेविल्यानें रुप टिकून राहतें आणि सदाचरणानें कुलाचें रक्षण होतें.

९२५
सत्येन विधृतं सर्वं ।
सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ॥१२।२५९।१०॥
सर्व कांहीं सत्याच्या पायावर उभें आहे. सर्व कांहीं सत्याच्या आधारानें राहतें.

९२६
सन्त: परार्थं कुर्वाणा ।
नावेक्षन्ति परस्परम् ॥३।२९७।४९॥
परोपकार करणारे सज्जन प्रत्युपकाराची अपेक्षा करीत नाहींत.

९२७
सन्ति पुत्रा: सुबहवो दरिद्राणामनिच्छताम् ।
नास्ति पुत्र: समृध्दानां विचित्रं विधिचेष्टितम् ॥१२।२८।२४॥
दरिद्री लोकांना इच्छा नसतां पुष्कळ मुलगे होतात आणि कित्येक श्रीमंतांना मुलगा नसतो. दैवाची लीला विचित्र आहे !

९२८
संतोषो वै श्रियं हन्ति ह्यभिमानं च भारत ।
अनुक्रोशभये चोभे यैर्वृतो नाश्नुते महत् ॥२।४९।१४॥
(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) अल्पसंतुष्ट राहिल्यानें ऐश्वर्याचा व स्वाभिमानाचा नाश होतो. दया आणि भय ह्यांचीही गोष्ट अशीच. ह्यांचा मनुष्यावर पगडा बसला म्हणजे मोठेपणाचें नांवच घ्यावयास नको.

९२९
संनिमज्जेज्जगदिदं गम्भीरे कालसागरे ।
जरामृत्युमहाग्राहे न कश्चिदवबुध्यते ॥१२।२८।४४॥
जरामृत्युरुपी मोठमोठया नक्रांनीं व्याप्त असलेल्या खोल अशा कालसागरांत हें सर्व जग (एक दिवस) बुडून जाईल हें कोणाच्याच लक्षांत येत नाहीं !

९३०
सपत्नसहिते कार्ये कृत्वा संधिं न विश्वसेत् ।
अपक्रामेत्तत: शीघ्रं कृतकार्यो विचक्षण: ॥१२।१४०।१४॥
जें कार्य केलें असतां शत्रूचें आणि आपलें सारखेंच हित होईल त्या कार्यापुरता शत्रूशीं समेट करावा. तथापि त्याजवर विश्वास ठेवूं नये आणि कार्य झालें म्हणजे सुज्ञ मनुष्यानें लागलेंच शत्रूपासून दूर व्हावें.

९३१
समत्वं योग उच्यते ॥६।२६।४८॥
(सुखदु:ख, यशापयश, इत्यादि व्दंव्दांविषयीं सारखी बुध्दि ठेवणें अशा प्रकारच्या) समत्वबुध्दीला योग असें म्हणतात.

९३२
समुच्छ्रये यो यतते स राजन् परमो नय: ॥२।५५।११॥
(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, भाग्योदय करण्याकडे जिची प्रवृत्ति असते तीच नीति श्रेष्ठ होय.
 
९३३
संपन्नतरमेवान्नं दरिद्रा भुञ्जते सदा ।
क्षुत्स्वादुतां जनयति सा चाढ्येषु सुदुर्लभा ॥५।३४।५०॥
दरिद्री लोक नेहमींच अतिशय मिष्ट अन्न भक्षण करीत असतात. कारण भुकेनें तोंडाला चव येत असते आणि ती तर श्रीमंतांना फारच दुर्लभ.

९३४
संप्रीतिभोज्यान्यन्नानि ।
आपभ्दोज्यानि वा पुन: ॥५।९१।२५॥
प्रेम असल्यास अथवा कांहीं आपत्ति असल्यास एकानें दुसर्‍याकडचें अन्न भक्षण करावें>

९३५
संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥६।२६।३४॥
संभावित पुरुषाची अपकीर्ति होणें मरणापेक्षां वाईट.

९३६
संभोजनं संकथनं संप्रश्नोऽथ समागम: ।
एतानि ज्ञातिकार्याणि न विरोध: कदाचन ॥५।६४।११॥
एकत्र भोजन करणें, एकत्र गप्पागोष्टी करणें, एकमेकांस प्रश्न विचारणें आणि भेट देणें ह्या गोष्टी ज्ञातिबांधवांनीं (अवश्य) करीत जाव्या. केव्हांहीं परस्परांशी विरोध करुं नये.

९३७
सर्वकालं मनुष्येण व्यवसायवता सदा ।
पीडाकरममित्राणां यत्स्यात्कर्तव्यमेव तत् ॥७।१४३।६८॥
ज्या ज्या गोष्टीमुळें शत्रूंना पीडा होईल ती प्रत्येक गोष्ट मनुष्यानें सर्वकाळीं मुद्दाम यत्नपूर्वक केली पाहिजे.

९३८
सर्वं जिह्यं मृत्युपदम् आर्जवं ब्रह्मण: पदम् ।
एतावाञ्ज ज्ञानविषय: किं प्रलाप: करिष्यति ॥१२।७९।२१॥
कपटानें युक्त असलेलें सर्व कांहीं मरणाला कारण होतें. सरळपणांत ब्रह्मप्राप्ति आहे. जें काय जाणावयाचें तें एवढेंच. जास्त बोलण्यांत काय अर्थ ?

९३९
सर्वतीर्थेषु वा स्नानं सर्वभूतेषु चार्जवम् ।
उभे त्वेते समे स्याताम् आर्जवं वा विशिष्यते ॥५।३५।२॥
सर्व तीर्थांत स्नान करणें आणि सर्वांशी निष्कपट वागणें ह्या दोहोंची योग्यता सारखीच. कदाचित् निष्कपटपणाच श्रेष्ठ ठरेल.

९४०
सर्वथा धर्ममूलोऽर्थो धर्मश्चार्थपरिग्रह: ।
इतरेतरयोर्नितौ विध्दि मेघोदधी यथा ॥३।३३।२९॥
(भीम युधिष्ठिराला म्हणतो) अर्थ हा सर्वस्वी धर्ममूलक असून धर्म हा अर्थावर अवलंबून आहे. सारांश, मेघ व समुद्र ह्यांप्रमाणें धर्म व अर्थ हे परस्परांवर अवलंबून आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP