मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ४०१ ते ४२०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ४०१ ते ४२०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


४०१
धर्मे तिष्ठन्ति भूतानि धर्मो राजनि तिष्ठति ।
तं राजा साधु य: शास्ति स राजा पृथिवीपति: ॥१२।९०।५॥
धर्माच्या आधारानें प्राणी राहतात, धर्म राजाच्या आधारानें राहतो, त्या धर्माचें पालन जो राजा उत्तम प्रकारें करितो तो राजा सर्व पृथ्वीचा स्वामी होतो.

४०२
धर्मे ते धीयतां बुध्दिर् मनस्तु महदस्तु च ॥१५।१७।२१॥
(कुंती युधिष्ठिराला म्हणते) तुझी बुध्दि धर्माच्या ठिकाणीं स्थिर होवो आणि तुझें मन मोठें असो.)

४०३
धर्मे मतिर्भवतु व: सततोत्थितानां
स ह्येक एव परलोकगतस्य बन्धु: ।
अर्था: स्त्रियश्च निपुणैरपि सेव्यमाना
नैवाप्तभावमुपयान्ति न च स्थिरत्वम् ॥१।२।३९१॥
(सौति शौनकादिक ऋषींना सांगतो) सतत प्रयत्नपूर्वक धर्मानुष्ठान करण्याकडे तुमची प्रवृत्ति असूं दे. कारण तोच एकटा परलोकीं गेल्यावर आपल्या उपयोगी पडणारा आहे. कनक आणि कांता हयांची निष्णात लोकांनीं सेवा केली तरी तीं कामास येत नाहींत. तीं चिरकाल टिकतही नाहींत.

४०४
धर्मेऽसुखकला काचित् धर्मे तु परमं सुखम् ॥१२।२७१।५६॥
धर्माचरणांत थोडेसे कष्ट वाटले तरी अत्यंत श्रेष्ठ सुख धर्मांतच आहे.

४०५
धर्मो हि परमा गति: ॥१२।१४७।८॥
धर्म हाच उत्कृष्ट प्रकारच्या गतीचें साधन होय.

४०६
धर्म्याध्दि युध्दाच्छ्रेयोऽन्यत्
क्षत्रियस्य न विध्यते ॥६।२६।३१॥
धर्मयुध्दासारखें श्रेयस्कर क्षत्रियाला दुसरें कांहींच नाहीं.

४०७
धारणाध्दर्ममित्याहुर् धर्मेण विधृता: प्रजा: ।
य: स्याध्दारणसंयुक्त: स धर्म इति निश्चय: ॥१२।१०९।११॥
धारण करतो म्हणून धर्म म्हणतात. धर्मानेंच लोकांना धारण केलें आहे. धारण करण्याच्या गुणानें जो युक्त असेल तोच धर्म असा सिध्दान्त आहे.

४०८
धिक् तस्य जीवितं राज्ञो राष्ट्रं यस्यावसीदति ।
अवृत्त्यान्यमनुष्योऽपि यो वैदेशिक इत्यपि ॥१२।१३०।३४॥
ज्याचें राष्ट्र क्षीण दशेप्रत पावतें आणि परदेशांत राहणारा अन्य मनुष्यही ज्याच्या राष्ट्रांत उपजीविका न झाल्यामुळें नाश पावतो त्या राजाच्या जीविताला धिक्कार असो !

४०९
धिगस्त्वधनतामिह ॥१२।८।११॥
ह्या लोकामध्यें दारिद्र्याला धिक्कार असो !

४१०
धूमायन्ते व्यपेतानि ज्वलन्ति सहितानि च ।
धृतराष्ट्रोल्मुकानीव ज्ञातयो भरतर्षभ ॥५।३६।६०॥
(विदुर म्हणतो) हे भरतश्रेष्ठा धृतराष्ट्रा, लाकडाचीं कोलितें एकएकटीं असलीं असलीं म्हणजे नुसतीं धुमसत राहतात; पण तींच एकत्र असलीं म्हणजे त्यांच्यापासून ज्वाला उत्पन्न होते. त्याचप्रमाणें नातलगांची गोष्ट आहे.

४११
धूमो वायोरिव वशे बलं धर्मोऽनुवर्तते ।
अनीश्वरो बले धर्मो द्रुमे वल्लीव संश्रिता ॥१२।१३४।७॥
धूर वार्‍याच्या अंकित राहतो तसा धर्म बळाच्या पाठोपाठ येतो. (बळावांचून) असमर्थ असलेला धर्म वृक्षाच्या आश्रयानें राहणार्‍या लतेप्रमाणें बळावर अवलंबून असतो.

४१२
धृतिर्दाक्ष्य संयमो बुध्दिरात्मा
धैर्यं शौर्यं देशकालप्रमाद: ।
अल्पस्य वा बहुनो वा विवृध्दौ ।
धनस्यैतान्यष्ट समिन्धनानि ॥१२।१२०।३७॥
संथपणा, दक्षता, मनोनिग्रह, बुध्दिमत्ता, विचारशीलता, धैर्य, शौर्य व स्थलकालाविषयीं सावधगिरी, हीं मूळचें थोडें किंवा पुष्कळ असलेलें धन वाढविण्याची आठ साधनें होत.

४१३
धेनुर्वत्सस्य गोपस्य स्वामिनस्तकरस्य च
पय: पिबति यस्तस्या धेनुस्तस्येति निश्चय: ॥१२।१७४।३२॥
गायीवर वासराची, गवळ्याची, मालकाची, (प्रसंगविशेषीं) चोराचीही सत्ता असते. पण ज्याला तिचें दूध प्राशन करण्यास मिळतें त्याचाच तिजवर खरा हक्क होय हें निश्चित.

४१४
न कश्चिज्जात्वतिक्रामेत् जरामृत्यु हि मानव: ।
अपि सागरपर्यन्तां विजित्येमां वसुंधराम् ॥१२।२८।१५॥
समुद्रवलयांकित ही सर्व पृथ्वी जिंकूनसुध्दां कोणीही मनुष्य म्हातारपण आणि मृत्यु ह्यांचें अतिक्रमण करुं शकत नाहीं.

४१५
न कश्चित् कस्यचिन्मित्रं न कश्चित् कस्यचित् सुहृद् ।
अर्थतस्तु निबध्यन्ते मित्राणि रिपवस्तथा ॥१२।१३८।११०॥
मुळांतच कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा सखा नसतो. कार्याच्याच अनुरोधानें मित्र आणि शत्रु हे होत असतात.

४१६
न कश्चिन्नापनयते पुमानन्यत्र भार्गवात् ।
शेषसंप्रतिपत्तिस्तु बुध्दिमस्त्स्वेव तिष्ठति ॥५।३९।३०॥
(नीतिशास्त्रप्रणेत्या) शुक्राचार्यांव्यतिरिक्त दुसरा कोणीही मनुष्य कधीं चुकत नाहीं असें नाहीं. परंतु चूक झाल्यावर पुढें काय करावयाचें ह्याचें ज्ञान बुध्दिमान् पुरुषांच्याच ठायीं असतें.

४१७
न कालो दण्डमुध्यम्य शिर: कृन्तति कस्यचित् ।
कालस्य बलमेतावत् विपरीतार्थदर्शनम् ॥२।८१।११॥
विनाशकाल प्राप्त झाला म्हणजे तो कांहीं प्रत्यक्ष दंड उगारुन कोणाचें डोकें उडवीत नाहीं. तर बुध्दीला भ्रंश पाडून विपरीत प्रकार भासविणें हेंच त्याचें बळ.

४१८
न कुलं वृत्तहीनस्य प्रमाणमिति मे मति: ।
अन्तेष्वपि हि जातानां वृत्तमेव विशिष्यते ॥५।३४।४१॥
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) दुर्वर्तनी माणसाच्या कुलीनपणाला कांहीं किंमत देतां येत नाहीं असें मला वाटतें. हीन कुळांत जन्मलेल्यांच्यासुध्दां शीलालाच महत्त्व आहे.

४१९
न कृतस्य तु कर्तुश्च सख्यं संधीयते पुन: ।
हृदयं तत्र जानाति कर्तुश्चैव कृतस्य च ॥१२।१३९।३६॥
अपराध करणारा आणि त्याचें प्रायश्चित्त देणारा ह्या उभयतांमध्यें पुनरपि मैत्री जडत नसते. कारण, परस्परांचा संबंध काय आहे हें प्रायश्चित्त देणारा व अपराध करणारा ह्या उभयतांचें अंत:करणच जाणत असतें.

४२०
न कोश: शुध्दशौचेन न नृशंसेन जातुचित् ।
मध्यमं पदमास्थाय कोशसंग्रहणं चरेत् ॥१२।१३३॥३॥
अगदीं सोवळेपणानें राहून संपत्ति मिळत नसते; तशीच ती दुष्टपणानेंही कधींच मिळत नाहीं. ह्यास्तव मध्यम मार्गाचा अवलंब करुन संपत्तीचा संग्रह करावा.

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP