मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ७२१ ते ७४०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ७२१ ते ७४०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


७२१
यथा शरीरं न ग्लायेत् नेयान्मृत्युवशं यथा ।
तथा कर्मसु वर्तेत समर्थो धर्ममाचरेत् ॥१२।२६५।१४॥
ज्याप्रकारें शरीराला थकवा येणार नाहीं आणि तें मृत्युवश होणार नाहीं, अशा प्रकारें कर्मांचे आचरण करावें. समर्थ राहून धर्माचरण करावें.

७२२
यथा समुद्रो भगवान् यथा हि हिमवान् गिरि: ।
ख्यातावुभौ रत्नविधी तथा भारतमुच्यते ॥१८।५।६५॥
जसा भगवान् समुद्र आणि जसा पर्वतराज हिमालय हे रत्ननिधि म्हणून प्रसिध्द आहेत तसेंच महाभारत हेंही आहे.

७२३
यथा हि पुरुष: शालां पुन: संप्रविशेन्नवाम् ।
एवं जीव: शरीराणि तानि तानि प्रपध्यते ॥१२।१५।५७॥
मनुष्यानें (एक घर सोडून) पुन: दुसर्‍या नव्यां घरांत प्रवेश करावा, तसा जीव हा निरनिराळ्या देहांत प्रविष्ट होत असतो.

७२४
यथा ह्यामिषमाकाशे पक्षिभि: श्वापदैर्भुवि ।
भक्ष्यन्ते सलिले मत्स्यै: तथा सर्वत्र वित्तवान् ॥३।२।४०॥
ज्याप्रमाणें आकाशामध्यें पक्षी, भूतलावर श्वापदें आणि पाण्यामध्यें मासे आमिषावर झडप घालीत असतात, त्याप्रमाणें सर्वत्र द्रव्यवान् पुरुषाची स्थिति असते. (त्याला लुबाडण्याकरितां सर्व ठिकाणीं लोक टपून बसलेले असतात.)

७२५
यदतप्तं प्रणमते नैतत्संतापमर्हति ।
यत्स्वयं नमते दारु न तत्संनामयन्त्यपि ॥१२।६७।१०॥
तापविल्याशिवायच जें लवते तें तापविण्याची गरज नाहीं. जें लाकूड आपोआपच वाकतें तें (तापवून) वाकविण्याच्या भरीस कोणी पडत नाहीं.

७२६
यदन्येषां हितं न स्यात् आत्मन: कर्म पौरुषम् ।
अपपत्रेत वा येन न तत् कुर्यात् कथंचन ॥१२।१२४।६७॥
आपला जो प्रयत्न किंवा जी कृति दुसर्‍याच्या हिताची होणार नाहीं, अथवा जें केल्यानें आपली आपल्यालाच लाज वाटेल तें केव्हांही करुं नये.

७२७
यदन्यैर्विहितं नेच्छेत् आत्मन: कर्म पूरुष: ।
न तत्परेषु कुर्वीत जानन्नप्रियमात्मन: ॥१२।२५९।२०॥
जें दुसर्‍यांनीं आपल्यासंबधानें करुं नये असें मनुष्याला वाटतें, तें आपल्याला अप्रिय आहे, हें लक्षांत वागवून, आपणही दुसर्‍यासंबंधानें करुं नये.

७२८
यदर्थो हि नरो राजन् तदर्थोऽस्यातिथि: स्मृत: ॥१५।२६।३७॥
(धृतराष्ट्र युधिष्ठिराला म्हणतो) राजा, मनुष्याजवळ जी सामग्री असेल तिनेंच अतिथीचा सत्कार करावा, असें म्हटलें आहे.

७२९
यदा तु कश्चिज्ज्ञातीना बाह्य: प्रार्थयते कुलम् ।
न मर्षयन्ति तत्सन्तो बाह्येनाभिप्रधर्षणम् ॥३।२४३।३॥
जेव्हां कोणी परका मनुष्य भाऊबंदांच्या कुळावर उठतो, तेव्हां परक्याकडून आपल्या कुळाचा होत असलेला तो अपमान सज्जन सहन करीत नाहींत.

७३०
यदा मानं लभते माननार्ह:
तदा स वै जीवति जीवलोके ।
यदावमानं लभते महान्तं
तदा जीवन्मृत इत्युच्यते स: ॥८।६९।८१॥
सन्मान्य पुरुष जोंपर्यंत आदर मिळवितो, तोंपर्यंतच ह्या जगांत तो खरोखर जिवंत असतो. एकदां त्याचा मोठा अनादर झाला कीं तो जिवंत असूनही मेल्याप्रमाणेंच झाला !

७३१
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥६।२८।७॥
(भगवान् श्रीकृष्ण सांगतात) अर्जुना, ज्या ज्या वेळीं धर्माला ग्लानि येते व अधर्माचा उत्कर्ष होतो त्या त्या वेळीं मी अवतार घेत असतों.

७३२
यदा संहरते चायं कूर्मोऽड्गानीव सर्वश: ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्य: तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥६।२६।५८॥
कासव जसें आपले सर्व अवयव आंत ओढून घेतें त्याप्रमाणें जेव्हां मनुष्य आपलीं सर्व इंद्रियें त्यांच्या विषयांपासून आवरुन धरतो, तेव्हां त्याची बुध्दि स्थिर झाली असें म्हणतात.

७३३
यदिदं ब्रह्मणो रुपं ब्रह्मचर्यमिति स्मृतम् ।
परं तत्सर्वधर्मेभ्य: तेन यान्ति परां गतिम् ॥१२।२१४।७॥
(परब्रह्माच्या प्राप्तीचें साधन असल्यामुळें) ब्रह्मचर्य हें परब्रह्माचें केवळ स्वरुपच आहे असें सांगितलें आहे. तें सर्व प्रकारच्या धर्मनियतांपेक्षां श्रेष्ठ आहे. त्याच्या योगानेंच अत्यंत श्रेष्ठ गति प्राप्त होते. (मोक्ष मिळतो)

७३४
यदि नात्मनि पुत्रेषु न चेत्पौत्रेषु नप्तृषु ।
नहि पापं कृतं कर्म सध्य: फलति गौरिव ॥१२।९१।२१॥
आपल्या पापकमोंच प्रायश्चित्त आपल्याला भोगावें लागलें नाहीं, तर आपल्या मुलांना, त्यांना नाहीं तर त्यांच्या मुलांना-नातवांना-तरी भोगावें लागेल. कारण गायीला खाणें घातलें असतां ती लगेच जास्त दूध देते, त्याप्रमाणें पापकर्माचें फळ ताबडतोब मिळतें असें नाहीं. (‘गो’ म्हणजे भूमि असा अर्थ घेऊन ह्या श्लोकाच्या दुसर्‍या ओळीचा पुढीलप्रमाणें दुसराही अर्थ टीकाकारांनीं केलेला आहे-भूमींत धान्य पेरिलें कीं तें लागलेंच जसें पिकत नाहीं, तसेंच केलेल्या पापकर्माचें फळ तत्काळ मिळूं शकत नाहीं.)

७३५
यदि नैवंविधं जातु कुर्यां जिद्महं रणे ।
कुतो वा विजयो भूय: कृतो राज्यं कुतो धनम् ॥९।६१।६४॥
(श्रीकृष्ण पांडवांस म्हणतात) युध्दांत (भीष्मद्रोणादिकांना मारण्याच्या कामीं) अशा प्रकारचें कपट जर मीं केलें नाहीं तर तुम्हांला जय कसा मिळेल ? पुन: राज्य कसें मिळणार ? धन कोठून मिळणार ?

७३६
यदिष्टं तत्सुखं प्राहु: द्वेष्यं दु:खमिहेष्यते ॥१२।२९५।२७॥
इहलोकीं जें इष्ट वाटतें तें सुख आणि जें द्वेष्य वाटतें तें दु:ख असें मानिलें जातें.

७३७
यदि संन्यासत: सिध्दिं राजा कश्चिदवाप्नुयात् ।
पर्वताश्च द्रुमाश्चैव क्षिप्रं सिध्दिमवाप्नुयु: ॥१२।१०।२४॥
एकाद्या राजाला जर संन्यासानें सिध्दि प्राप्त होती तर (निष्क्रिय अशा) पर्वतांना व वृक्षांनासुध्दां सिध्दि तत्काळ मिळाली असती !

७३८
यदि स्यात्पुरुष: कर्ता शक्रात्मश्रेयसे ध्रुवम् ।
आरम्भास्तस्य सिध्येयु: न तु जातु पराभवेत् ॥१२।२२२।१८॥
(स्थानभ्रष्ट व पाशबध्द झालेला प्रल्हाद इंद्राला म्हणतो) इंद्रा, आत्मकल्याण साधून घेणें ही गोष्ट जर निश्चयेंकरुन पुरुषाच्याच हातची असती, तर त्याचे सर्व उद्योग सिध्दीस गेले असते; त्याला केव्हांही अपयश आलें नसतें>

७३९
यदैव शत्रुर्जानीयात् सपत्नं त्यक्तजीवितम् ।
तदैवास्मादुद्विजते सर्पाद्वेश्मगतादिव ॥५।१३५।३६॥
आपला प्रतिपक्षी जिवावर उदार झाला असें जेव्हां शत्रूला समजून येतें, तेव्हांच त्याला घरांत शिरलेल्या सर्पासारखी त्याची भीति वाटूं लागते.

७४०
यद्दुरापं दुराम्नायं दुराधर्षं दुरन्वयम् ।
तत्सर्वं तपसा साध्यं तपो हि दुरतिक्रमम् ॥१४।५१।१७॥
जें जें म्हणून असाध्य, अज्ञेय, अत्यंत भयंकर किंवा अत्यंत दुस्तर असें असेल तें सर्व तपानें साध्य होतें. तपाचें अतिक्रमण करणें खरोखरच कठीण आहे.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP