मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन १२१ ते १४०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन १२१ ते १४०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


१२१
अहं वो रक्षितेत्युक्त्वा यो न रक्षति भूमिप: ।
स संहत्य निहन्तव्य: श्वेव सोन्माद आतुर: ॥१३।६१।३३॥
‘मी तुमचें रक्षण करीन’ असें म्हणून जो राजा त्याप्रमाणें प्रजेचें रक्षण करीत नाहीं त्याला, सर्वांनीं एक होऊन, सडक्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणें ठार करावें.

१२२
अहन्यहनि भूतानि गच्छन्तीह यमालयम् ।
शेषा: स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमत:परम् ॥३।३१३।११६॥
रोजच्यारोज मृत्युलोकांतील प्राणी यमसदनास जात असूनही बाकीचे लोक चिरंजीव आहों असें समजतात, ह्यापरतें आश्चर्य तें कोणतें !

१२३
अहिंसो परमो धर्म: ॥३।२०७।७४॥
अहिंसा हा परमश्रेष्ठ धर्म होय.

१२४
अहिंसायां तु निरता यतयो द्विजसत्तम ।
कुर्वन्त्येव हि हिंसां ते यत्नादल्पतरा भवेत् ॥३।३०८।३४॥
(धर्मव्याध ब्राह्मणाला म्हणला) हे द्विजश्रेष्ठा, अहिंसेकरितां झटणार्‍या यतींच्या हातून देखील हिंसा घडतेच; मात्र ती टाळण्याचा त्यांचा प्रयत्न असल्यामुळें फार थोडी घडते.

१२५
अहिंसार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम् ।
य: स्यादहिंसासंयुक्त: स धर्म इति निश्चय: ॥१२।१०९।१२॥
प्राण्यांना पीडा होऊं नये एवढयासाठींच धर्म सांगितला आहे. जो अहिंसेनें युक्त असेल तोच धर्म, हा सिध्दान्त आह.

१२६
अहिंसा सत्यवचनं सर्वभूतेषु चार्जवम् ।
क्षमा चैवाप्रमादश्च यस्यैते स सुखी भवेत् ॥१२।२१५।६॥
अहिंसा, सत्य भाषण, सर्वांशीं सरळपणाची वागणूक, क्षमा व सावधानता हे गुण ज्याच्यापाशीं असतील तो सुखी होईल.

१२७
अहो बत महत्कष्टं विपरीतमिदं जगत् ।
येनापत्रते साधु: असाधुस्तेन तुष्यति ॥३।२।६४॥
अरेरे ! मोठी दु:खाची गोष्ट कीं, ह्या जगाची रीत विपरीत आहे. ज्याच्या योगानें सज्जनाला खेद होतो त्यानेंच दुर्जनाला संतोष वाटतो.

१२८
अहो ह्यनित्यं मानुष्यं जलबुब्दुदचञ्चलम् ॥७।७८।१७॥
पाण्यावरील बुडबुडयाप्रमाणें मनुष्याचें जीवित किती क्षणभंगुर आहें !

१२९
आकिंचन्ये न मोक्षोऽस्ति किंचन्ये नास्ति बन्धनम् ।
किंचन्ये चेतरे चैव जन्तुर्ज्ञानेन मुच्यते ॥१२।३२०।५०॥
दारिद्र्यांत मोक्ष नाहीं किंवा श्रीमंतीत बंधन नाहीं. श्रीमंतीत काय आणि गरिबींत काय, मनुष्य ज्ञानानें मुक्त होत असतो.

१३०
आगमानां हि सर्वेषाम् आचार: श्रेष्ठ उच्यते ।
आचारप्रभवो धर्मो धर्मादायुर्विवर्धते ॥१३।१०४।१५६॥
सर्व शास्त्रांत आचार हाच श्रेष्ठ म्हटला आहे. आचारापासून धर्माची उत्पत्ति होते. धर्माचरणानें आयुष्य वाढतें.

१३१
आत्मदोपैर्नियच्छन्ति सर्वे दु:खसुखे जना: ॥१।७८।३०॥
सर्व लोकांना स्वत:च्या कर्मामुळेंच सुख किंवा दु:ख प्राप्त होत असतें.

१३२
आत्मनो बलमज्ञाय धर्मार्थपरिवर्जितम् ।
अलभ्यमिच्छन् नैष्कर्म्यात् मूढबुध्दिरिहोच्यते ॥५।३३।४३॥
आपलें सामर्थ्य न जाणून धर्म व अर्थ ह्यांना सोडून असलेली न मिळण्याजोगी वस्तु उद्योग न करितां मिळविण्याची इच्छा करणारा मूर्ख होय.

१३३
आत्मा जेय: सदा राज्ञा ततो जेयाश्च शत्रव: ।
अजितात्मा नरपतिर् विजयेत कथं रिपून् ॥१२।६९।४॥
राजानें नेहमीं प्रथम आपलें मन जिंकावें म्हणजे मग त्याला शत्रूंवर जय मिळवितां येईल. ज्यानें स्वत:चें मन जिंकलें नाहीं तो राजा शत्रूंना कसा जिंकणार ?

१३४
आत्मानं क: समुब्दध्य कण्ठे बध्दा महाशिलम् ।
समुद्रं तरते दोर्भ्यां तत्र किं नाम पौरुषम् ॥४।४९।१६॥
स्वत:स जखडून घेऊन आणि गळ्यांत मोठी धोंड बांधून नुसत्या बाहूच्या जोरावर समुद्र तरुन जाण्याच्या भरीस कोण पडेल ! असलें साहस करण्यांत पुरुषार्थ कसला ?

१३५
आत्मानमसमाधाय समाधित्सति य: परान् ।
विषयेष्विन्द्रियवशं मानवा: प्रहसन्ति तम् ॥१२।२६७।२७॥
आपलें मन स्वाधीन न ठेवतां जो दुसर्‍यांना आपल्या ताब्यांत ठेवूं पाहतो, अशा विषयासक्त इंद्रियाधीन पुरुषाचा लोक उपहास करतात.

१३६
आत्मा पुत्र: सखा भार्या ।
कृच्छ्रं तु दुहिता किल ॥१।१५९।११॥
(बकासुराकडे मी जातें असें म्हणणार्‍या मुलीचे उद्गार) पुत्र म्हणजे आपला आत्माच होय. भार्या हा मित्र होय. परंतु मुलगी म्हणजे मात्र खरोखर संकट होय !

१३७
आत्मार्थे संततिस्ताज्या ।
राज्यं रत्नं धनानि च ॥१२।१३८।१७९॥
स्वत:करितां संततीचा, राज्याचा, रत्नांचा व सर्व प्रकारच्या द्रव्याचा त्याग करावा.

१३८
आत्मा सर्वस्य भाजनम् ॥९।४।४२॥
जीव हाच सर्व गोष्टींचा आधार आहे. (आधीं जीव जगेल तर सर्व कांहीं अनुकूल होईल.)

१३९
आत्मैव ह्यात्मन: साक्षी ।
कृतस्यापकृतस्य च ॥१३।६।२७॥
आपला आत्माच आपल्या बर्‍या वाईट कृत्यांचा साक्षी आहे.

१४०
आत्मैवादौ नियन्तव्यो ।
दुष्कृतं संनियच्छता ॥१२।२६७।२९॥
दुष्टांचें नियम करुं इच्छिणार्‍यानें प्रथम आपल्या मनाचें नियमन केलें पाहिजे.

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP