मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन १८१ ते २००

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन १८१ ते २००

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


१८१
उन्मत्ता गौरिवान्धा श्री: क्वचिदेवावतिष्ठते ॥५।३९।६६॥
उन्मत्त गायीप्रमाणें, अविचारी लक्ष्मी कोठें तरी राहत असते !

१८२
उपस्थितस्य कामस्य प्रतिवादो न विद्यते ।
अपि निर्मुक्तदेहस्य कामरक्तस्य किं पुन: ॥५।३९।४६॥
प्राप्त झालेल्या विषयाचा त्याग, देहाची पर्वा न करणार्‍या जीवनमुक्ताच्याही हातून होणें शक्य नाहीं. मग विषयलंपट पुरुषाची गोष्ट कशाला पाहिजे !

१८३
ऊधश्चिन्ध्यात्तु यो धेन्वा: क्षीरार्धी न लभेत्पय: ।
एवं राष्ट्रमयोगेन पीडितं न विवर्धते ॥१२।७१।१६॥
दुधाच्या आशेनें जो गायीची कास कापील त्याला दूध कधींच मिळणार नाहीं. त्याचप्रमाणें अयोग्य रीतीनें (कर वगैरे लादून) राष्ट्राला पीडा दिली असतां राष्ट्राचा उत्कर्ष होत नाहीं.

१८४
ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्चिच्छृणोति मे ।
धर्मादर्थश्च कामश्च स किमर्थं न सेव्यते ॥१८।५।६२॥
(महर्षि व्यास म्हणतात) मी बाहु उभारुन मोठयानें ओरडून सांगतों आहें पण कोणीच माझें ऐकत नाहीं. बाबांनो, धर्मापासूनच अर्थ व काम प्राप्त होतात, त्या धर्माचें आचरण तुम्ही कां करीत नाहीं ?

१८५
ऊर्ध्वं प्राणा हुत्क्रामन्ति यून: स्थविर आयति ।
प्रत्युत्थानाभिवादाभ्यां पुनस्तान्प्रतिपध्यते ॥५।३८।१॥
कोणी वृध्द पुरुष जवळ येऊं लागला कीं तरुणाचे प्राण वर जाऊं लागतात. त्याला सामोरें जाऊन वंदन केल्यानें ते तरुणाला पुन: प्राप्त होतात.

१८६
ऋणशेषमग्निशेषं शत्रुशेषं तथैव च ।
पुन:पुन: प्रवर्धन्ते तस्माच्छेषं न धारयेत् ॥१२।१४०।५८॥
ऋण, अग्नि व शत्रु ह्यांचा थोडासा भाग जरी शिल्लक राहिला तरी तो पुन: पुन: वाढूं लागतो, ह्यास्तव त्यांचा कांहीं अवशेष ठेवूं नये.

१८७
ऋषीणां च नदीनां च कुलानां च महात्मनाम् ।
प्रभवो नाधिगन्तव्य: स्त्रीणां दुश्चरितस्य च ॥५।३५।७२॥
ऋषिन, नद्या व थोर लोकांचें कूळ, त्याचप्रमाणें स्त्रियांचें दुश्चरित्र ह्यांचे मूळ शोधण्याच्या भरी पडूं नये.

१८८
एक एव चरेध्दर्मं नास्ति धर्मे सहायता ।
केवलं विधिमासाध्य सहाय: किं करिष्यति ॥१२।१९३।३२॥
केवळ धर्मविधीचा आश्रय करुन स्वत: एकटयानेंच धर्माचें आचरण करावें. धर्माचरणांत दुसर्‍याच्या साहाय्याची अपेक्षाच नाहीं. मग साहाय्यकर्त्याचा उपयोग काय ?

१८९
एकं विषरसो हन्ति शस्त्रेणैकश्च वध्यते ।
सराष्ट्रं सप्रजं हन्ति राजानं मन्त्रविप्लव: ॥५।३३।५०॥
विष एकालाच ठार मारतें आणि शस्त्रानेंसुध्दां एकाचाच घात होतो. परंतु राजाच्या गुपत मसलतींत कांहीं बिघाड झाला, तर तो प्रजा व राष्ट्र ह्यांसहवर्तमान राजाच्या नाशाला कारणीभूत होतो.

१९०
एकं हन्यान्न वा हन्यात् इषुर्मुक्तो धनुष्मता ।
बुध्दिर्बुध्दिमतोत्सृष्टा हन्याद्राष्टं सराजकम् ॥५।३३।४८॥
तिरंदाजानें सोडलेला तीर एका प्राण्याचा वध करील न करील परंतु बुध्दिमान् पुरुषानें टाकिलेला बुध्दीचा डाव राजासह सर्व राष्ट्राचा घात करील.

१९१
एक: क्रुध्दो ब्राह्मणो हन्ति राष्ट्रम् ॥५।४०।८॥
क्रुध्द झालेला एक ब्राह्मण सर्व राष्ट्राचा नाश करुं शकेल.

१९२
एक: क्षमावतां दोषो द्वितीयो नोपपध्यते ।
यदेनं क्षमया युक्तम् अशक्तं मन्यते जन: ॥५।३३।५३॥
क्षमाशील पुरुषांच्या ठायीं एकच दोष आढळतो, दुसरा नाहीं. तो दोष एवढाच कीं त्याच्या सहनशीलतेमुळें लोक त्याला दुर्बल समजतात.

१९३
एक: पापानि कुरुते फलं भुड्क्ते महाजन: ।
भोक्तारो विप्रमुच्यन्ते कर्ता दोषेण लिप्यते ॥५।३३।४७॥
एकजण पाप करतो व त्याचें फळ पुष्कळ लोकांना उपभोगण्यास मिळतें. परंतु हे उपभोग घेणारे अजीबात सुटून जातात आणि कर्त्याला मात्र पापाचा दोष लागतो.

१९४
एकत्र चिरवासो हि न प्रीतिजनननो भवेत् ॥३।३६।३६॥
एकाच ठिकाणीं फार दिवस राहणें सुखावह होत नाहीं.

१९५
एकमेव हि लोकेऽस्मिन् आत्मनो गुणवत्तरम् ।
इच्छन्ति पुरुषा: पुत्रं लोके नान्यं कथंचन ॥७।१९४।५॥
ह्या जगांत एक पुत्रच तेवढा आपल्यापेक्षां अधिक गुणवान् व्हावा, असें लोक इच्छीत असतात; दुसरा कोणीही असा वरचढ व्हावा अशी इच्छा करीत नाहींत.

१९६
एकशत्रुवधेनैव शूरो गच्छति विश्रुतिम् ॥५।१३४।२३॥
शत्रूचा वध करणें ह्या एका गोष्टीनेंच शूराची प्रसिध्दि होत असते.
१९७
एक: शत्रुर्न द्वितीयोऽस्ति शत्रु:
अज्ञानतुल्य: पुरुषस्य राजन् ॥१२।२९७।२८॥
(पराशरमुनि जनकाला म्हणतात) हे राजा, मनुष्याचा एकच शत्रु आहे, अज्ञानासारखा दुसरा कोणताच शत्रु नाहीं.

१९८
एकस्मिन्नेव जायेते कुले क्लीबमहाबलौ ।
फलाफलवती शाखे यथैकस्मिन् वनस्पतौ ॥५।३॥३॥
एकाच वृक्षावर ज्याप्रमाणें फळांनीं भरलेली व फलरहित अशा दोनही प्रकारच्या फांद्या असतात, त्याप्रमाणें एकाच कुळांत अति बलिष्ठ व अत्यंत दुर्बळ पुरुष जन्माला येतात.

१९९
एकस्मिन्नेव पुरुषे सा सा बुध्दिस्तदा तदा ।
भवत्यकृतधर्मत्वात् सा तस्यैव न रोचते ॥१०।३।१३॥
मनावर धर्माचा संस्कार झालेला नसल्यामुळें एकाच मनुष्याच्या ठिकाणीं समयानुरुप निरनिराळे विचार उत्पन्न होतात व पुढें ते त्याचे त्यालाच आवडतनासे होतात.

२००
एकान्ततो न विश्वास: कार्यो विश्वासघातकै: ॥१२।१३९।२८॥
विश्वासघात करणार्‍यांवर पूर्ण विश्वास टाकूं नये.

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP