मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ३६१ ते ३८०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ३६१ ते ३८०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


३६१
दुरन्वयं दुष्प्रधर्षं दुरापं दुरतिक्रमम् ।
सर्वं वै तपसाभ्येति तपो हि बलवत्तरम् ॥१३।१२२।८॥
दुस्तर, अजिंक्य, प्राप्त होण्यास कठीण, अनुल्लंघनीय असें सर्व कांहीं तपाच्या योगानें साध्य होतें. खरोखर तप हें अत्यंत सामर्थ्यवान् आहे.

३६२
दुर्वसं चैव कौरव्य जानता राजवेश्मनि ॥४।४।११॥
(धौम्य मुनि युधिष्ठिराला म्हणतात) हे कुलकुलोत्पन्ना, राजगृहीं वास्तव्य करणें हें ज्ञात्या मनुष्यालाही कठीण जातें.

३६३
दूता: किम् अपराध्यन्ते
यथोक्तस्यानुभाषिण: ॥५।१६२।३९॥
सांगितलेला निरोप कळविणार्‍या दूतांचा तसें करण्यांत काय बरें अपराध आहे ?

३६४
देशकालौ समासाध्य विक्रमेत विचक्षण: ।
देशकालव्यतीतो हि विक्रमो निष्फलो भवेत् ॥१२।१४०।२८॥
देशकालांची अनुकूलता पाहून शहाण्यानें पराक्रम गाजवावा. कारण योग्य देश आणि योग्य काळ निघून गेल्यावर केलेला पराक्रम निष्फळ होतो.

३६५
दैवी संपत्ति मोक्षाला व आसुरी संपत्ति बंधनाला कारणीभूत होते.

३६६
दोष्कुलेयाश्च लुब्धाश्च नृशंसा निरपत्रपा: ।
ते त्वां तात निषेवेयुर् यावदार्द्रकपाणय: ॥१२।८३।७॥
(भीष्म सांगतात) बा युधिष्ठिरा, हलक्या कुळांत जन्मलेले, लोभी, दुष्ट, निर्लज्ज असे जे लोक आहेत, ते त्यांचा हात ओला होत आहे (अर्थात् त्यांना द्रव्यादिक पोचत आहे) तोंपर्यंतच तुझी सेवा करितील.

३६७
द्रव्यागमो नृणां सूक्ष्मं पात्रे दानं तत: परम् ।
काल: परतरो दानात् श्रध्दा चैव तत: परा ॥१४।९०।९४॥
द्रव्य संपादन करणें ही गोष्ट कमी महत्त्वाची आहे. सत्पात्रीं केलेल्या दानाची योग्यता त्याहून जास्त आहे. सत्पात्रीं केलेल्या दानाची योग्यता त्याहून जास्त आहे. योग्य काळीं दान करणें हें त्यापेक्षांही श्रेष्ठ आणि श्रध्दा ही तर त्याहीपेक्षां श्रेष्ठ आहे.

३६८
द्वावम्भसि निवेष्टव्यौ गले बध्दा दृढां शिलाम् ।
धनवन्तमदातारं दरिद्रं चापतपस्विनम् ॥५।३३।६५॥
धनवान् असून दान न करणारा आणि दरिद्री असून तपश्चर्या न करणारा ह्या दोघांना गळ्यांत मोठी धोंड बांधून पाण्यांत बुडवून टाकावें.

३६९
द्वाविमौ कण्टकौ तीक्ष्णौ शरीरपरिशोषिणौ ।
यश्चाधन: कामयते यश्च कुप्यत्यनीश्वर: ॥५।३३।६१॥
निर्धन असून चैनीची इच्छा करणें व अंगांत सामर्थ्य नसतां रागावणें हे दोन शरीरांतील रक्त अगदीं नाहींसें करुन टाकणारे तीक्ष्ण कांटे होत.

३७०
द्वे कर्मणी नर: कुर्वन् अस्मिँल्लोके विरोचते ।
अब्रुवन् परुषं किंचित् असतोऽनर्चयंस्तथा ॥५।३३।५९॥
दोन गोष्टी करणारा मनुष्य ह्या लोकीं योग्यतेस चढतो. यत्किंचित् ही कठोर बोलणें आणि दुर्जनांचा गौरव न करणें.

३७१
द्वेष्यो न साधुर्भवति न मेधावी न पण्डित: ।
प्रिये शुभानि कार्याणि द्वेष्ये पापानि चैव ह ॥५।३९।४॥
जो ज्याच्या द्वेषास पात्र झालेला तो त्याला सज्जन, बुध्दिमान् अथवा शहाणा वाटत नाहीं. कारण, प्रिय असलेल्या मनुष्याचीं कृत्यें सर्व कांहीं चांगलीं आणि द्वेषास पात्र झालेल्या मनुष्याचीं कृत्यें सर्व कांहीं वाईट (समजणें ही सामान्य लोकांची रीतच आहे.)

३७२
द्वेष्यो भवति भूतानाम् उग्रो राजा युधिष्ठिर ।
मृदुमप्यवमन्यन्ते तस्मादुभयमाचरेत् ॥१२।१०२।३३॥
(भीष्म महाराज) ये युधिष्ठिरा, राजा नेहमीं कठोर वागूं लागला तर सर्व लोक त्याचा द्वेष करितात आणि सौम्य रीतीनें वागूं लागला तर त्याचा द्वेष करितात. म्हणून प्रसंगाप्रमाणें राजानें कठोर व्हावें व सौम्यही व्हावें.

३७३
व्ध्यक्षरस्तु भवेन्मृत्यु: त्र्यक्षरं ब्रह्म शाश्वतम् ।
ममेति च भवेन्मृत्युर् न ममेति च शाश्वतम् ॥१२।१३।४॥
दोन अक्षरें म्हणजे मृत्यु व तीन अक्षरें म्हणजे शाश्वत ब्रह्म होय. ‘मम’ म्हणजे माझें असें मानिल्यानें मृत्यु आणि ‘न मम’ म्हणजे माझें नव्हे असें मानिल्यानें शाश्वत ब्रह्मपद प्राप्त होतें.

३७४
धननाशेऽधिकं दु:खं मन्ये सर्वमहत्तरम् ।
ज्ञातयो ह्यवमन्यते मित्राणि च धनाच्च्युतम् ॥१२।१७७।३४॥
(वैराग्यसंपन्न मंकि म्हणतो) मला वाटतें, द्रव्यनाशाचें दु:ख सर्वांत अत्यंत अधिक, कारण नातलग व मित्रही द्रव्य नष्ट झालेल्याचा अपमान करितात.

३७५
धनमाहु: परं धर्मं धने सर्वं प्रतिष्ठितम् ।
जीवन्ति धनिनो लोके मृता ये त्वधना नरा: ॥५।७२।२३॥
धन मिळविणें हा श्रेष्ठ धर्म होय असें म्हणतात. धनावरच सर्व कांहीं अवलंबून आहे. धनसंपन्न लोकच जगांत जिवंत असतात. धनहीन पुरुष मेल्यांतच जमा.

३७६
धनात् कुलं प्रभवति धनाध्दर्म: प्रवर्धते ।
नाधनस्यास्त्ययं लोको न पर: पुरुषोत्तम ॥१२।८।२२॥
(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) हे नरश्रेष्ठा, धनाच्या योगानें कुळाचा उत्कर्ष होतो. धन असेल तर धर्माची वाढ होते. निर्धनाला ना इहलोक ना परलोक.

३७७
धनेन किं यन्न ददाति नाश्नुते
बलेन किं येन रिपुं न बाधते ।
श्रुतेन किं येन न धर्ममाचरेत्
किमात्मना यो न जितेन्द्रियो वशी ॥१२।३२१।९३॥
ज्याचा दान करण्याकडे किंवा भोगण्याकडे उपयोग केला जात नाहीं तें धन काय कामाचें ? ज्याच्या योगानें शत्रूला त्रास दिला जात नाहीं त्या बळाचा काय उपयोग ? धर्मानुष्ठान नाहीं तर विद्येची काय किंमत ? आणि जो जितेंद्रिय, मनोनिग्रही नाहीं तो मनुष्य काय करावयाचा ?

३७८
धनेनाधर्मलब्धेन यच्छिद्रम् अपिधीयते ।
असंवृतं तभ्दवति ततोऽन्यवदीर्यते ॥५।३५॥७०॥
अन्यायानें मिळवलेल्या द्रव्यानें एकादें व्यंग झाकलें तर तें खरोखर झाकलें जात नाहींच, परंतु त्यापासून दुसरें व्यंग उत्पन्न होतें.

३७९
धन्यानामुत्तमं दाक्ष्यं धनानामुत्तमं श्रुतम् ।
लाभानां श्रेय आरोग्यं सुखानां तुष्टिरुत्तमा ॥३।३१३।७४॥
धन मिळविण्याच्या साधनांत दक्षता सर्वांत श्रेष्ठ आहे. धनांमध्यें उत्तम धन विद्या. सर्व लाभांत उत्कृष्ट लाभ म्हणजे आरोग्य आणि सर्व सुखांत संतोष श्रेष्ठ.

३८०
धर्म एको मनुष्याणां
सहाय: पारलौकिक: ॥१३।१११।१७॥
एकटा धर्मच मनुष्यांचा परलोकांतील सोबती आहे.

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP