मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन २२१ ते २४०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन २२१ ते २४०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


२२१
कर्मणा येन केनैव मृदुना दारुणेन च ।
उध्दरेद्दीनमात्मानं समर्थो धर्ममाचरेत् ॥१।१४०।७२॥
सौम्य किंवा तीव्र कोणत्याही उपायानें प्रथमत: आपला हीन स्थितींतून उध्दार करावा आणि समर्थ होऊन धर्माचरण करावें.

२२२
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भू: मा ते सड्गोऽस्त्वकर्मणि ॥६।२६।४७॥
(अर्जुना,) फक्त कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे, कर्मफलाच्या इच्छा करुं नकोस. तसेंच कर्म न करण्याचाही आग्रह धरुं नकोस.

२२३
कर्मभूमिरियं ब्रह्मन् फलभूमिरसौ मता ॥३।२६१।३५॥
(देवदूत मुद्गल मुनींना म्हणतो) हे ब्रह्मन्, मृत्युलोक ही कर्मभूमि असून परलोक ही फलभूमि आहे, असें म्हणतात.

२२४
कल्योत्थानरतिर् नित्यं गृहशुश्रूषणे रता ।
सुसंमृष्टक्षया चैव गोशकृत्कृतलेपना ॥१३।१४६।४८॥
(गृहिणीनें) सकाळीं लवकर उठून दक्षतेनें घरकाम करावें. सर्व घर उत्तम प्रकारें झाडून स्वच्छ करावें आणि गायीच्या शेणानें सारवून काढावें.

२२५
कश्चित्तरति काष्ठेन सुगम्भीरां महानदीम् ।
स तारयति तत्काष्ठं स च काष्ठेन तार्यते ॥१२।१३८।६२॥
एकादा प्राणी लाकडाच्या ओंडयाचा आश्रय करुन अति खोल व विस्तीर्ण नदी तरुन जातो. (त्यासमयीं तो त्या लाकडाला नदीपार करतो व लाकूडही त्याला तारुन नेतें.

२२६
कामक्रोधग्राहवतीं पञ्चेन्द्रियजलां नदीम् ।
नावं धृतिमयीं कृत्वा जन्मदुर्गाणि संतर ॥५।४०।२२॥
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) काम व क्रोध ह्या जिच्यांतील सुसरी आहेत आणि चक्षुरादि पांच इंद्रियें हें जिच्यांतील उदक आहे, अशी ही संसाररुप नदी ज्ञानरुप नौकेचें अवलंबन करुन जन्ममरणपरंपरारुप धोक्याचीं स्थळें चुकवून तरुन जा.

२२७
कामचारी तु कामेन य इन्द्रियसुखे रत: ।
ब्रह्मचारी सदैवैष य इन्द्रियजये रत: ॥१४।२६।१५॥
विषलालसेनें जो इंद्रियसुखांत गढून जातो तो कामचारी होय. जो सदैव इंद्रियांचें दमन करण्यांत आनंद मानतो तो ब्रह्मचारी होय.

२२८
कामं नैतत्प्रशंसन्ति सन्त: स्वबलसंस्तवम् ।
गुणसंकीर्तनं चापि स्वयमेव शतक्रतो ॥१।३४।२॥
(गरुड म्हणतो) हे इंद्रा, स्वत:च्या बळाची स्तुति करणें आणि आपणच आपलें गुणवर्णन करणें हें सज्जनांना मुळींच प्रशस्त वाटत नाहीं.

२२९
कामे प्रसक्त: पुरुष: किमकार्यं विवर्जयेत् ॥१२।८८।२१॥
कामासक्त पुरुष कोणतें अकार्य वर्ज्य करील ?

२३०
काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदु: ।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणा: ॥६।४२।२॥
(भगवान् श्रीकृष्ण सांगतात) सकाम कर्मांचा त्याग करणें ह्यालाच ज्ञाते पुरुष संन्यास असें म्हणतात आणि सर्व कर्मांच्या फळाचा म्हणजे फलाशेचा त्याग करणें ह्यालाच शहाणे लोक त्याग म्हणतात.

कारणात् प्रियतामेति
द्वेष्यो भवति कारणात् ।
अर्थार्थी जीवलोकोऽयं
न कश्चित् कस्यचित् प्रिय: ॥१२।१३८।१५२॥
कोणी झाला तरी कांहींतरी कारणानेंच प्रिय वाटतो व कारणानेंच द्वेष्य वाटतो. हें जग सगळें स्वार्थी आहे, (खरोखर निष्कारण) कोणी कोणाला प्रिय नसतो.

२३२
कारणाध्दर्ममन्विच्छेत् न लोकचरितं चरेत् ॥१२।२६२।५३॥
हेतूकडे लक्ष देऊन धर्माचरण करावें, केवळ लोकांनीं केलें म्हणून आपणही तसें करुं नये.

२३३
कार्यापेक्षा हि वर्तन्ते
भावस्निग्धा: सुदुर्लभा: ॥१२।१११।८६॥
कार्याच्या अपेक्षेनेंच लोक प्रेमानें वागतात. खरोखर स्वभावत:च प्रेमळ असे लोक अत्यंत दुर्लभ.

२३४
काल: कर्षति भूतानि सर्वाणि विविधान्युत ।
न कालस्य प्रिय: कश्चित् न द्वेष्य: कुरुसत्तम ॥११।२।८॥
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे कुरुश्रेष्ठा, निरनिराळ्या प्रकारच्या सर्व प्राण्यांना काळ ओढून नेतो. काळाला कोणी प्रिय नाहीं, कोणी द्वेष्य नाहीं.

२३५
काल: पचति भूतानि काल: संहरते प्रजा: ।
काल: सुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रम: ॥११।२।२४॥
काळ प्राण्यांना शिजवून काढतो, काळ प्रजेचा संहार करितो, सर्व प्राणी झोपीं गेले असतां काळ जागा राहतो. खरोखर काळाचें अतिक्रमण करणें कठीण आहे.

२३६
काल: पचति भूतानि सर्वाण्येवात्मनात्मनि ।
यस्मिंस्तु पच्यते कालस् तं वेदेह न कश्चन ॥१२।२३९।२५॥
काळ स्वत: सर्व प्राण्यांना आपल्या पचनीं पाडतो, परंतु काळा जो पचनीं पाडतो त्या परमात्म्याला कोणीच जाणत नाहीं.

२३७
कालमूलमिदं सर्वं भावाभावौ सुखासुखे ॥१।१।२४७॥
जन्म आणि मृत्यु, सुख आणि दु:ख हीं काळावर अवलंबून आहेत.

२३८
काले काले तु संप्राप्ते मृदुस्तीक्ष्णोऽपि वा भवेत् ॥३।२८।२४॥
जसजशी वेळ येईल त्याप्रमाणें सौम्य किंवा कठोर वृत्तीनें वागावें.

२३९
कालेन पादं लभते तथार्थं
ततश्च पादं गुरुयोगतश्च ।
उत्साहयोगेन च पादमृच्छेत्
शास्त्रेण पादं च ततोऽभियाति ॥५।४४।१६॥
प्रथमत: गुरुंपासून चतुर्थांश विद्या प्राप्त होते; नंतर आपल्या बुध्दिवैभवानें चतुर्थांश; कालान्तराने विचार परिपक्वतेमुळें चतुर्थांश आणि आपल्या बरोबरच्या लोकांशीं चर्चा केल्याच्या योगानें (विचारविनियमानें) चतुर्थांश विद्या प्राप्त होते. (ह्या श्लोकांत पाठक्रमाहून अर्थक्रम भिन्न आहे असें टीकाकारांनीं म्हटले आहे त्याला अनुसरुन वरील अर्थ दिला आहे.)

२४०
कालेन रिपुणा संधि: काले मित्रेण विग्रह: ।
कार्य इत्येव संधिज्ञा: प्राहुर्नित्यं नराधिप ॥१२।२३८।२०८॥
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) हे राजा, प्रसंगानुसार शत्रूशींही संधि करावा, मित्राशींही विरोध करावा, असेंच संधिवेत्ते लोक सदैव सांगत असतात.

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP