मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन १०१ ते १२०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन १०१ ते १२०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


१०१
अशुश्रूषा त्वरा श्लाघा विध्याया: शत्रवस्त्रय: ॥५।४०।४॥
दुर्लक्ष, त्वरा व स्तुति हे तीन विद्येचे  शत्रु होत.

१०२
अशोचन्प्रतिकुर्वीत यदि पश्येत्पराक्रमम् ।
भैषज्यमेतद्दु:खस्य यदेतन्नानुचिन्तयेत् ॥११।२।२७॥
पराक्रम करतां येईल असें दिसेल तर शोक न करतां प्रतिकार करावा, दु:खावर औषध हेंच कीं, त्याचें एकसारखें चिंतन करीत बसूं नये.

१०३
अश्नाम्याच्छादयामीति प्रपश्यन्पापपूरुष: ।
नामर्षं कुरुते यस्तु पुरुष: सोऽधम: स्मृत: ॥२।५०।१७॥
अन्न आणि आच्छादन आपल्याला मिळत आहे, एवढ्यावरच नजर देऊन (शत्रूच्या उत्कर्षाविषयीं) ज्याला चीड येत नाहीं तो पुरुष अधम पापी, असें म्हटलें आहे.

१०४
अश्रध्दा परमं पापं श्रध्दा पापप्रमोचनी ।
जहाति पापं श्रध्दावान् सर्पो जीर्णामिव त्वचम् ॥१२।२६४।१५॥
अश्रध्दा हें मोठें पाप आहे. श्रध्दा ही पापापासून मुक्त करणारी आहे. जसा सर्प जीर्ण झालेली कात टाकून देतो तसा श्रध्दावान् मनुष्य पातकाचा त्याग करतो.

१०५
अश्रुतुश्च समुन्नध्दो दरिद्रश्च महामना: ।
अर्थांश्चाकर्मणा प्रेप्सुर मूढ इत्युच्यते बुधै: ॥५।३३।३५॥
अध्ययन नसतांनाही गर्विष्ठ, दरिद्री असून मोठमोठया खर्चाच्या गोष्टी मनामध्यें आणणारा आणि उद्योग न करितां द्रव्यप्राप्तीची इच्छा करणारा अशाला शहाणे लोक मूढ म्हणतात.

१०६
अश्वमेधसहस्त्रं च सत्यं च तुलया धृतम् ।
अश्वमेधसहस्त्रादि सत्यमेव विशिष्यते ॥१२।१६२।२६॥
सहस्त्र अश्वमेध आणि सत्य हीं तराजूंत घातलीं तर सहस्त्र अश्वमेधांपेक्षां सत्यच अधिक भरेल.

१०७
अष्टादश पुराणानि धर्मशास्त्राणि सर्वश: ।
वेदा: साड्गास्तथैकत्र भारतं चैकत: स्थितम् ॥१८।५।४६॥
अठरा पुराणें, सर्व धर्मशास्त्रें (स्मृति) आणि साड्ग वेद एका बाजूला व एकटें भारत एका बाजूला (एवढी भारताची योग्यता आहे.)

१०८
अष्टौ गुणा: पुरुषं दीपयन्ति
प्रज्ञा च कौल्यं च दम: श्रुतं च ।
पराक्रमश्चाबहुभाषिता च
दानं यथाशक्ति कृतज्ञता च ॥५।३३।१०४॥
बुध्दि, कुलीनता, इंद्रियनिग्रह, विद्या, पराक्रम, पुष्कळ न बोलणें, यथाशक्ति दान आणि कृतज्ञता हे आठ गुण मनुष्याला योग्यतेला चढवितात.

१०९
असंशयं दैवपर: क्षिप्रमेव विनश्यति ॥१२।१०५।२२॥
दैववादी मनुष्य सत्वर सर्वथा नाश पावतो ह्यांत संशय नाहीं.

११०
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥६।३०।३५॥
(भगवान् श्रीकृष्ण म्हणतात) हे महाबाहो अर्जुना, खरोखरच मन हें चंचल असून त्याचा निग्रह करणें अति कठीण आहे. तरी पण अभ्यासानें व वैराग्यानें तें ताब्यांत आणतां येतें.

१११
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोनि पूरुष: ॥६।२७।१९॥
आसक्ति न ठेवतां कर्म करणारा मनुष्य परमपद खचित प्राप्त करुन घेतो.

११२
असतां प्रतिषेधश्च सतां च परिपालनम् ।
एष राज्ञां परो धर्म: समरे चापलायनम् ॥१२।१४।१६॥
दुष्टांचें निवारण करणें, सज्जनांचें परिपालन करणें आणि युध्दांत शत्रूला पाठ न दाखविणें हा राजांचा श्रेष्ठ धर्म होय.

११३
असतां शीलमेतद्वै परिवादोऽथ पैशुनम् ॥१२।१३२।१३॥
दुसर्‍याची निंदा करणें आणि चहाडी करणें हा दुर्जनांचा स्वभावच आहे.

११४
असदुच्चैरपि प्रोक्त: शब्द: समुपशाम्यति ।
दीप्यते त्वेव लोकेषु शनैरपि सुभाषितम् ॥१२।२८७।३२॥
अयोग्य भाषण मोठ्या जोरानें केलें तरी त्याचें तेज पडत नाहीं आणि योग्य भाषण हळू केलें तरी लोकांत त्याचें तेज पडतेंच.

११५
असंतोष: श्रियो मूलम् ॥२॥५५।११।
असंतोष हें उत्कर्षाचें मूळ आहे.

११६
असंत्यागात्पापकृतामपापान्
तुल्यो दण्ड: स्पृशते मिश्रभावात् ।
शुष्केणार्द्रं दह्यते मिश्रभावात् ।
तस्मात्पापै: सह संधिं न कुर्यात् ॥५।३४।७०॥
पापी लोकांचा त्याग केला नाहीं, तर त्यांच्याशीं मिसळल्यामुळें निर्दोषी माणसांनाही त्यांच्या बरोबरीनें दंड सोसावा लागतो. सुक्याबरोबर मिसळल्यामुळें ओलेंही जळून जातें. ह्यास्तव, पापी लोकांशीं संबंध ठेवूं नये.

११७
असभ्या: सभ्यसंकाशा: सभ्याश्चासभ्यदर्शना: ।
दृश्यन्ते विविधा भावास् तेषु युक्तं परीक्षणम् ॥१२।१११।६५॥
पुष्कळ असभ्य मनुष्यें सभ्य असल्यासारखीं दिसतात व सभ्य असलेलीं असभ्य दिसतात व सभ्य असलेलीं असभ्य दिसतात. नानाप्रकारच्या वस्तु दिसतात (त्या तशाच असतात असें नाहीं) ह्यास्तव, त्यांची नीट परीक्षा करणें युक्त आहे.

११८
असंभवे हेममयस्य जन्तो:
तथापि रामो लुलुभे मृगाय ।
प्राय: समासन्नपराभवाणां
धियो विपर्यस्ततरा भवन्ति ॥२।७६।५॥
सोन्याचा मृग असणें संभवत नाहीं, असें असतांही श्रीरामचंद्राला सुवर्णमृगाचा मोह पडला (ह्यावरुन असें दिसतें कीं) बहुतकरुन विनाशकाल जवळ आला कीं, माणसांच्या बुध्दीला भ्रम होतो.

११९
असम्यगुपयुक्तं हि ज्ञानं सुकुशलैरपि ।
उपलभ्यं चाविदितं विदितं चाननुष्ठितम् ॥५।३९।३४॥
जें समजून घेणें अशक्य आहे तें जर समजून न घेतलें अथवा समजल्यावरही त्याप्रमाणें वर्तन ने केलें तर अतिनिपुण पुरुषांनींही केलेला ज्ञानाचा उपदेश व्यर्थ जाणार.

१२०
अस्मिन्महामोहभये कटाहे
सूर्याग्निना रात्रिदेवेन्धनेन ।
मासर्तुदर्वीपरिघट्टनेन
भूतानि काल: पचतीति वार्ता ॥३।३१३।११८॥
असें म्हणतात कीं अतिशय मोह पडणार्‍या ह्या जगद्रूपी कढईंत दिवसरात्ररुपी सर्पणानें सूर्यरुपी अग्नीवर मास-ऋतुरुप पळीनें ढवळीत ढवळीत, काल हा सर्व प्राण्यांना शिजवीत आहे.

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP