मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन १ ते २०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन १ ते २०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.



नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् ।
देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ॥
अकाले कृत्यामारब्धं कर्तुर्नार्थाय कल्पते । पर्व अध्याय श्लोक
तदेव काल आरब्धं महतेऽर्थाय कल्पते ॥ १२।१३८।९५॥
कोणतेंही कार्य भलत्याच वेळीं आरंभिलें असता त्यापासून कर्त्याचें मनोगत सिध्द होत नाहीं. तेंच योग्य वेळीं केलें तर तेणेंकरुन मोठा लाभ होतो.


अगोप्तारश्च राजानो बलिषड्भागतस्करा: ।
समर्थाश्चाप्यदातारम् ते वै विरयगामिन: ॥१३।२३।८०॥
प्रजेचें रक्षण न करतां तिच्यापासून उत्पन्नाचा सहावा हिस्सा कर मात्र घेणारे राजे व सामर्थ्य असून दान न करणारे खचित नरकास जातात.


अग्नौ प्रास्तुं तु पुरुषं कर्मान्वेति स्वयं कृतम् ।
तस्मात्तु पुरुषो यत्नाध्दर्मं संचिनुयाच्छनै: ॥५।४०।१८॥
(मरणोत्तर) अग्नींत टाकून दिलेल्या मनुष्याबरोबर त्याने केलेलें (बरें वाईट) कर्म तेवढे येत असतें. ह्यासाठींच मनुष्यानें हळू हळू पण यत्नपूर्वक धर्माचा (पुण्याचा) संचय केला पाहिजे.


अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मन: ॥६।२८।४०॥
अज्ञ असून श्रध्दा न ठेवणारा असा संशयखोर मनुष्य सर्वथा नाश पावतो, अशा संशयात्म्याला ना इहलोक, ना परलोक, ना सुख.


अज्ञानतिमिरान्धस्य लोकस्य तु विचेष्टत: ।
ज्ञानाञ्जनशलाकाभिर् नेत्रोन्मीलनकारकम् ॥१।१।८४॥
अज्ञान अंधकारानें डोळ्यांवर झापड येऊन धडपडणार्‍या लोकांच्या डोळ्यांत ज्ञानरुपी अंजन घालून त्यांना दिव्य दृष्टि देणारें (असें हें महाभारत आहे).


अञ्जलि: शपथ: सान्त्वं शिरसा पादवन्दनम् ।
आशाकरणमित्येवं कर्तव्यं भूतिमिच्छता ॥१।१४०।६७॥
हात जोडणें, शपथ घेणें, मधुर भाषण करणें, पायांवर डोकें ठेवणें, लालूच दाखविणें ह्या सर्व गोष्टी उत्कर्षेच्छु पुरुषानें केल्या पाहिजेत.


अतिक्रान्तं हि यत्कार्यं पश्चाच्चिन्तयते नर: ।
तच्चास्य न भवेत्कार्यं चिन्तया च विनश्यति ॥८।३१।२९॥
गोष्ट होऊन गेल्यानंतर तिच्याविषयीं जो मागाहून चिंता करीत बसतो, त्याचें तें कार्य तर होत नाहींच, पण चिंतेनें नाश मात्र होतो.


अति धर्माद्बलं मन्ये बलाध्दर्म: प्रवर्तते ।
बले प्रतिष्ठितो धर्मो धरण्यामिव जड्गमम् ॥१२।१३४।६॥
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) मला वाटतें, बळ हें धर्मापेक्षां श्रेष्ठ आहे. कारण, बळापासूनच धर्माची प्रवृत्ति होते. सर्व जंगम पदार्थ ज्याप्रमाणें पृथ्वीच्या आधारानें राहतात, त्याप्रमाणें बळाच्या आधारानेंच धर्म राहतो.


अतियोगमयोगं च श्रेयसोऽथीं परित्यजेत् ॥१२।१२७।२४॥
कल्याणाची इच्छा करणार्‍या मनुष्यानें (आहारविहारादिकांचें) अतिशय सेवन करणे व मुळींच सेवन न करणें ह्या दोहोंचाही सर्वथा त्याग करावा.

१०
अतितेष्वनपेक्षा ये प्राप्तेष्वर्थेषु निर्ममा: ।
शौचमेव परं तेषां येषां नोत्पध्यते स्पृहा ॥१३।१०८।१०॥
द्रव्य नष्ट झालें असतां जे शोक करीत नाहींत व प्राप्त झालें असतां त्याच्या ठिकाणीं जे आसक्त होत नाहींत आणि ज्यांच्या अंत:करणांत लोभ उत्पन्न होत नाहीं ते अत्यंत शुचिर्भूतच होत.

११
अतो हास्यतरं लोके किंचिदन्यन्न विध्यते ।
यत्र दुर्जनमित्याह दुर्जन: सज्जनं स्वयम् ॥१।७४।९५॥
स्वत: दुर्जन असलेल्यानें उलट सज्जनालाच दुर्जन म्हणावें, ह्यापेक्षां जगांत अधिक हास्यापद गोष्ट दुसरी कोणतीच नसेल !

१२
अथवा जायमानस्य यच्छीलमनुजायते ।
श्रूयते तन्महाराज नामृतस्यापसर्पति ॥३।८।११॥
(व्यास महर्षि धृतराष्ट्र राजाला म्हणतात) हे राजा, प्राणी जन्मत:च जो स्वभाव बरोबर घेऊन येतो, तो मरेपर्यंत त्याला सोडून जात नाहीं असें ऐकण्यांत येतें.

१३
अथवा वसतो राजन् वने वन्येन जीवत: ।
द्रव्येषु यस्य ममता मृत्योरास्ये स वर्तते ॥१२।१३।१०॥
(सहदेव धर्मराजाला म्हणतो) हे राजा, वनांत राहून कंदमुळांवर उपजीविका करीत असतांनाही ऐहिक वस्तूंविषयीं ज्याला ममत्वबुध्दि वाटते, तो खरोखर मृत्यूच्या जबडयांत पडला आहे असें समजावें.

१४
अदत्तस्यानुपादानं दानमध्ययनं तप: ।
अहिंसा सत्यमक्रोध इज्या धर्मस्य लक्षणम् ॥१२।३६।१०॥
कोणी देईल तेवढयाचाच स्वीकार करणें, दान, अध्ययन, तप, अहिंसा, सत्य भाषण, क्रोध नसणें आणि यज्ञ करणें हीं धर्माचीं लक्षणें होत.

१५
अद्रोहसमयं कृत्वा चिच्छेद नमुचे: शिर: ।
शक्र:, साभिमता तस्य रिपौ वृत्ति: सनातनी ॥२।५५।१३॥
(दुर्योधन शकुनीला म्हणाला) ‘मी तुझ्याशीं द्रोह करणार नाहीं’ अशी प्रतिज्ञा करुन इंद्राने नमुचि दैत्याचा शिरच्छेद केला. शत्रूशीं वागण्याची ही त्याची रीति पूर्वापार चालत आलेली असून सर्वसंमत आहे.

१६
अद्रोह: सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा ।
अनुग्रहश्च दानं च शीलमेतत्प्रशस्यते ॥१२।१२४।६६॥
कृतीनें, मनानें व वाणीनें कोणत्याही प्राण्यास त्रास न देणें, परोपकार करणें आणि दान करणें ह्या प्रकारचें शील प्रशस्त होय.

१७
अद्रोहेणैव भूतानाम् अल्पद्रोहेण वा पुन: ।
या वृत्ति: स परो धर्मस् तेन जीवामि जाजले ॥१२।२६२।६॥
(तुलाधार वैश्य जाजलि ब्राह्मणाला म्हणतो) हे जाजले, कोणत्याही प्राण्यास मुळींच उपद्रव न देतां, अथवा (प्रसंगच पडल्यास) अगदीं थोडी पीडा देऊन आपला निर्वाह करणें हा श्रेष्ठ प्रकारचा धर्म होय, त्याचेंच अवलंबन करुन मी राहत असतों.

१८
अधनं दुर्बलं प्राहुर् धनेन बलान्भवेत् ।
सर्वं धनवता प्राप्यं सर्वं तरति कोशवान् ॥१२।१३०।४९॥
निर्धनाला दुबळा समजतात, धनानें मनुष्य बलसंपन्न होतो. धनसंपन्न असलेल्याला सर्व कांहीं प्राप्त करुन घेतां येतें. द्रव्याचा खजिना ज्याच्यापाशीं आहे तो सर्व (आपत्ति) तरुन जातो.

१९
अधनाध्दि निवर्तन्ते ज्ञातय: सुहृदो द्विजा: ।
अपुष्पादफलाव्दृक्षाद् यथा कृष्ण पतत्र्त्रिण: ॥५।७२।२०॥
(युधिष्ठिर म्हणतो) हे कृष्णा, ज्याप्रमाणें पक्षी पुष्परहित व फलरहित वृक्षाचा त्याग करतात, त्याप्रमाणें दरिद्री मनुष्याचे नातलग, इष्टमित्र व ब्राह्मण त्याला सोडून जातात.

२०
अधर्म: क्षत्रियस्यैष: यच्छय्यामरणं भवेत् ॥१२।९७।२३॥
अंथरुणावर पडून मरणें हा क्षत्रियाचा धर्म नव्हे.

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP