मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
प्रस्तावना

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - प्रस्तावना

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.



लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला. ह्यामध्ये चतुर्विध पुरुषार्थांचें प्रतिपादन पूर्णपणें केलें असून आबालवृध्द स्त्रीपुरुषांना कर्तव्याचा मार्ग स्पष्टपणे दाखविला आहे, त्याप्रमाणेंच ह्या ग्रंथामध्यें आर्यसंस्कृतिही सांठविली आहे. एक लक्ष श्लोकांचा एवढा मोठा विस्तृत ग्रंथ संस्कृत भाषेवांचून इतर कोणत्याही भाषेंत नाहीं. महाभारताची भाषा समजण्याला सोपी असून संस्कृत भाषेचें उत्तम जिवंत स्वरुप ह्या ग्रंथामध्यें चांगल्या प्रकारचें आढळतें. ह्या महाभारतातींल, सर्व लोकांना उपयोगीं पडणारीं, सुबोध, निवडक १००८ संस्कृत सुभाषित वचनें प्रस्तुत पुस्तकांत घेतलीं आहेत आणि प्रत्येक वचनाच्या खालीं त्याचें मराठी भाषान्तर दिलें आहे. हीं ओजस्वी वचनें विद्यार्थ्यांनीं तोंडपाठ केल्यास त्यांचें संस्कृत भाषेचें ज्ञान वाढून त्यांना चांगले स्फूर्तिदायक विचार समजतील आणि पुढील आयुष्यांत व्यवहारांतील अनेक प्रसंगीं योग्य रीतींने वागण्यास ते समर्थ होतील. श्रोत्यांच्या मनावर महाभारतांतील वचनांचा ठसा अधिक उमटतो ह्यासाठीं प्रतिपादनाच्या वेळीं हरिदास, पुराणिक ह्यांना ह्या सिध्दान्तरुप वचनांचा विशेष उपयोग होईल. वक्ते व लेखक ह्यांनाही हीं मार्मिक वचनें बरींच उपयोगी पडतील. तसेंच संस्कृत भाषेची अभिरुचि असणार्‍या सामान्य वाचकांनाही ह्या वचनांचा उपयोग होईल. वचनें वर्णक्रमानें दिलीं असून शेवटीं मुख्य विषयांची सूची जोडिली आहे. वचनांच्या डावीकडे क्रमांक घातले आहेत आणि उजवीकडे स्थलनिर्देश केला आहे. स्थलनिर्देशांतील डावीकडून पहिला अंक पर्वाचा, दुसरा अध्यायाचा व तिसरा श्लोकाचा समजावा. ज्या वचनांत जो विषय आला, त्या वचनाचा क्रमांक त्या विषयापुढें सूचीमध्यें घातला आहे. धार्मिक शिक्षण देण्याच्या कामीं हें सुभाषितांचे अनुवाद उपयोगीं पडतेात.

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP