मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन २०१ ते २२०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन २०१ ते २२०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


२०१
एकान्तेन हि विश्वास: कृत्स्नो धर्मार्थनाशकः ।
अविश्वासश्च सर्वत्र मृत्युना च विशिष्यते ॥१२।८०।१०॥
ठेविल्यानें धर्म व अर्ह्त हयांचा नाश होतो. उलट, कोणाचाच विश्वास न धरणें हें मरणापेक्षां दु:खदायक होय.

२०२
एकान्तेन हि सर्वॆषां न शक्यं तात रोचितुम् ॥१२।८९।१९॥
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) बाबारे, (एकच व्यक्ति) सर्वांना सर्वथा आवडणें शक्य नाहीं.

२०३
एतज्ज्ञानं विदुर्विप्रा ध्रुवमिन्द्रियधारणम् ॥५।६९।२०॥
खरोखर इंद्रियें ताब्यांत ठेवणें ह्यालाच ज्ञाते पुरुष ज्ञान असें म्हणतात.

२०४
एतत्पृथिव्याममृतम् एतच्चक्षुरनुत्तमम् ।
यद् ब्राह्मणमुखाच्छास्त्रम् इह श्रुत्वा प्रवर्तते ॥१३।३६।१०॥
ब्राह्मणाच्या तोंडून शास्त्रार्थ ऐकून त्याप्रमाणें वर्तन करणें हें पृथ्वीवरील अमृत होय, हेंच सर्वोत्कृष्ट दिव्य ज्ञान होय.

२०५
एतावानेव पुरुष: कृतं यस्मिन् न नश्यति ॥१।१५७।१४॥
ज्याच्या ठिकाणीं केलेला उपकार व्यर्थ जात नाहीं तोच मनुष्य म्हणावयाचा.

२०६
एतावानेव पुरुषो यदमर्षी यदक्षमी ॥५।१३३।३३॥
अपमान व अपकार जो सहन करीत नाहीं, तोच पुरुष.  

२०७
ऐकगुण्यमनीहायाम् अभाव: कर्मणां फलम् ।
अथ द्वैगुण्यमीहायां फलं भवति वा न वा ॥५।१३५।२८॥
उद्योगरहित राहिलें असतां उद्योगानें प्राप्त होणारें जें फळ त्याचा अभाव हा एकच प्रकार संभवतो. परंतु उद्योग करीत राहिलें असतां, फळ प्राप्त होणें व न होणें असे दोन प्रकार संभवतात.

२०८
ऐश्वर्यमदमत्तो हि नपतित्वा विबुध्यते ॥५।३५।५३॥
ऐश्वर्यमदानें धुंद झालेला मनुष्य ऐश्वर्यापासून भ्रष्ट झाल्याशिवाय शुध्दीवर येत नाहीं.

२०९
क: कस्य चोपकुरुते कश्च कस्मै प्रयच्छति ।
प्राणी करोत्ययं कर्म सर्वमात्मार्थमात्मना ॥१२।२९२।१॥
कोण कोणावर उपकार करणार ? आणि कोण कोणाला देणार ? जो तो प्राणी सर्व कांहीं स्वत:करितां करीत असतो.

२१०
कच्चिच्छारीरमाबाधम् औषधैर् नियमेन वा ।
मानसं वृध्दसेवाभि: सदा पार्थापकर्षसि ॥२।५।८९॥*
(नारदमुनि विचारतात) बा युधिष्ठिरा, शारीरिक पीडा औषधानें व नियमित आचरणानें आणि मानसिक पीडा वृध्द जनांची सेवा करुन तूं नेहमीं दूर करितोस ना ?
* श्लोक २१० ते २१६ नारदमुनींनीं युधिष्ठिराला विचारलेल्या ‘कच्चित् प्रश्नांतील’ आहेत.

२११
कच्चित्कृतं विजानीशे कर्तारं च प्रशंससि ।
सतां मध्ये महाराज सत्करोषि च पूजयन् ॥२।५।११९॥
राजा, तूं केलेला उपकार स्मरतोस ना ? आणि उपकारकर्त्याची प्रशंसा करितोस ना ? त्याप्रमाणें चांगल्या लोकांसमोर त्याचा गौरव करुन सत्कार करितोस ना ?

२१२
कच्चिते सर्वविद्यासु गुणतोऽर्चा प्रवर्तते ॥२।५।९६॥
(हे राजा,) तूं सर्व विद्यांचा त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणें परामर्श घेतोस ना ?

२१३
कच्चित् सहस्त्रैर् मूर्खाणाम् एकं क्रीणासि पण्डितम् ।
पण्डितो ह्यर्थकृच्छ्रेषु कुर्यान्नि:श्रेयसं परम् ॥२।५।३५॥
हजारों मूर्ख देऊन त्यांच्याबद्द्ल एक पंडित तूं विकत घेतोस का ? कारण अडीअडचणीच्या प्रसंगीं पंडिताचा फार उपयोग होईल.

२१४
कच्चिद्‍ द्वौ प्रथमौ यामौ रात्रे: सुप्त्वा विशांपते ।
संचिन्तयसि धर्मार्थौ याम उत्थाय पश्चिमे ॥२।५।८५॥
हे राजा, रात्रींच्या दुसर्‍या व तिसर्‍या ह्या दोन प्रहरांत झोप घेतोस ना ? शेवटच्या (चौथ्या) प्रहरीं उठून तूं धर्मार्थाचें चिंतन करितोस ना ?

२१५
कच्चित् राष्ट्रे तडागानि पूर्णानि च बृहन्ति च ।
भागशो विनिविष्टानि न कृषिर् देवमातृका ॥२।५।७७॥
(नारदमुनि युधिष्ठिराला विचारितात) तुझ्या राज्यांत पाण्यानें तुडुंब भरलेले मोठाले तलाव जागोजाग खोदलेले आहेत ना ? शेती केवळ पावसावर अवलंबून नाहीं ना ?

२१६
कच्चिद्विध्याविनीतांश्च नरान् ज्ञानविशारदान् ।
यथार्हंअ गुणतश्चैव दानेनाभ्युपपध्यसे ॥२।५।५३॥
विद्याविनयसंपन्न व कलाकुशल गुणी जनांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणें व गुणाप्रमाणें पारितोषिकें देऊन त्यांचा गौरव करितोस ना ?

२१७
कपाले यद्वदाप: स्यु: श्वदृतौ च यथा पय: ।
आश्रयस्थानदोषेण वृत्तहीने तथा श्रुतम् ॥१२।३६।४२॥
ज्याप्रमाणें मस्तकाच्या कवटींत ठेवलेलें पाणी किंवा कुत्र्याच्या कातड्याच्या पिशवींत घातलेलें दूध आश्रयस्थान वाईट असल्यामुळें दूषित होतें, त्याप्रमाणें आचारहीन मनुष्याचें ज्ञान व्यर्थ होतें.

२१८
करिष्यन् न प्रभाषेत कृतान्येव तु दर्शयेत् ॥५।३८।१६॥
एकादी गोष्ट करण्याचें मनांत असतांच उगाच बोलूं नये. काय तें करुनच दाखवावें.

२१९
कर्णिनालीकनाराचान् निर्हरन्ति शरीरत: ।
वाक्शल्यस्तु न निर्हर्तुं शक्यो हृदिशयो हि स: ॥५।३४।७९॥
शरिरांत रुतलेले कर्णी, नालीक ह्या प्रकारचे बाण उपटून काढतां येतात. परंतु वाग्बाण मात्र उपटून काढतां येत नाहीं कारण तो हृदयांत खोल शिरुन बसलेला असतो.

२२०
कर्तव्यमिति यत्कार्यं नाभिमानात् समाचरेत् ॥३।२।७६॥
कर्तव्य म्हणून जें करावयाचें तें अहंकारबुध्दीनें करुं नये.

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP