मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ९०१ ते ९२०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ९०१ ते ९२०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


९०१
श्रियो बलममात्यांश्च बलवानिह विन्दति ।
यो ह्यनाढय: स पतितस्तदुच्छिष्टं यदल्पकम् ॥१२।१३४।४॥
ऐश्वर्य, सामर्थ्य आणि अमात्य हें सर्व बलसंपन्न असलेल्याच प्राप्त होतें. जो बलसंपन्न नसेल तो खरोखर पतित होय. अल्पशी सत्ता असणें हें केवल उच्छिष्टच होय.

९०२
श्रीमान् स यावद्भवति तावद्भवति पूरुष: ॥५।७२।३६॥
कोणीही संपत्तीनें युक्त असेल तोंपर्यंतच खरोखर पुरुष गणला जातो.

९०३
श्रीर्हता पुरुषं हन्ति पुरुषस्याधनं वध: ॥५।७२।१९॥
लक्ष्मी नष्ट झाली असतां पुरुषाचा वध होतो. कारण, निर्धनता हा पुरुषाचा वधच होय.

९०४
श्रुतमाप्नोति हि नर: सततं वृध्दसेवया ॥१३।१६२।४९॥
वृध्दजनांचा सतत समागम केल्यानें मनुष्याला ज्ञान प्राप्त होतें.

९०५
श्रुतं प्रज्ञानुगं यस्य प्रज्ञा चैव श्रुतानुगा ।
असंभिन्नार्यमर्याद: पण्डिताख्यां लभेत स: ॥५।३३।३४॥
बुध्दीला अनुरुप ज्याचें अध्ययन आहे, अध्ययनाला अनुरुप ज्याचे विचार आहेत आणि आर्य पुरुषाच्या मर्यादेचें ज्याच्या हातून उल्लंघन होत नाहीं त्याला पंदित ही संज्ञा प्राप्त होते.

९०६
श्रुतेन तपसा वापि
श्रिया वा विक्रमेण वा ।
जनान् योऽभिभवत्यन्यान्
कर्मणा हि स वै पुमान् ॥५।१३३।२५॥
विद्येनें किंवा तपानें, संपत्तीनें किंवा पराक्रमानें जो इतरांवर मात करतो, तो आपल्या कर्तृत्वामुळें खरा पुरुष ठरतो.

९०७
श्रेयान् स्वधर्मो विगुण: परधर्मात् स्वनुतिष्ठात् ।
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: ॥६।२७।३५॥
(श्रीकृष्ण सांगतात) आचरण्यास सोप्या अशा परधर्मापेक्षां सदोष असला तरीही स्वधर्मच श्रेष्ठ होय. स्वधर्मांत राहून मरण आलें तरी तें चांगलें, (कारण) परधर्माचा स्वीकार करण्यांत मोठें भय आहे.

९०८
श्रेष्ठो हि पण्डित: शत्रुर्न च मित्रपण्डित: ॥१२।१३८।४६॥
शहाणा शत्रु पत्करला, पण मूर्ख मित्र नको.

९०९
श्रोतव्यं खलु वृध्दानाम् इति शास्त्रनिर्दर्शनम् ।
न त्वेव ह्यतिवृध्दानां पुनर्बाला हि ते मता: ॥५।१६८।२६॥
वृध्दांचें अवश्य् ऐकावें असें शास्त्र सांगतें; पण अतिवृध्द झालेल्यांचें ऐकूं नये. कारण त्यांची गणना पुनरपि बाल झालेल्यांतच केली पाहिजे.

९१०
श्व:कार्यमध्य कुर्वीत पूर्वाण्हे चापराह्णिकम् ।
न हि प्रतीक्षते मृत्यु: कृतं वास्य न वा कृतम् ॥१२।३२१।७३॥
उद्यांचें कार्य आज करावें, तिसर्‍या प्रहरीं करावयाचें तें सकाळीं करावें. कारण मृत्यु कोणाचें काम झालें अथवा न झालें हें पाहत बसत नाहीं.

९११
षड्‍ दोषा: पुरुषेणेह हातव्या भूतिमिच्छता ।
निद्रा तन्द्री भयं क्रोध आलस्यं दीर्घसूत्रता ॥५।३३।८३॥
आपलें बरें व्हावें असें इच्छिणार्‍या पुरुषानें सहा दोष टाळावे. फार झोप, सुस्ती, भय, क्रोध, आळस व दीर्घसूत्रीपणा.

९१२
स एव धर्म: सोऽधर्मो देशकाले प्रतिष्ठित: ।
आदानमनृतं हिंसा धर्मो ह्यावस्थित: स्मृत: ॥१२।३६।११॥
योग्य वेळीं आणि योग्य स्थळीं जो धर्म ठरतो, तोच अयोग्य वेळीं आणि अयोग्य स्थळीं अधर्म होतो. चौर्यकर्म, असत्यभाषण, हिंसा ह्या सर्वांची गोष्ट अशीच आहे. धर्म हा परिस्थितीप्रमाणें ठरवावा लागतो.

९१३
संयोगा विप्रयोगान्ता जातानां प्राणिनां ध्रुवम् ।
बुब्दुदा इव तोयेषु भवन्ति न भवन्ति च ॥१२।२७।३०॥
जन्माला आलेल्या प्राण्यांच्या संयोगांची अखेर वियोगांतच होत असते. पाण्यावरील बुडबुडयांप्रमाणें, ते एकसारखे उत्पन्न होतात आणि नाहींतसे होतात.

९१४
संवासाज्जायते स्नेहो जीवितान्तकरेष्वपि ।
अन्योऽन्यस्य च विश्वास: श्वपचेन शुनो यथा ॥१२।१३९।४०॥
आपला प्राण घेणार्‍यांशींसुध्दां सहवासानें स्नेह जडतो आणि एकमेकांना विश्वास वाटतो. उदाहरणार्थ, कुत्र्याचें मांस खाणारा चांडाळ आणि कुत्रा.

९१५
संसारयति कृत्यानि सर्वत्र विचिकित्सते ।
चिरं करोति क्षिप्रार्थे स मूढो भरतर्षभ ॥५।३३।३९॥
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे भरतश्रेष्ठा, जो स्वत: करावयाचीं कामें दुसर्‍यांवर सोंपवितो, प्रत्येक बाबतींत फाजील चिकित्सा करीत बसतो आणि जें कार्य लवकर झालें पाहिजे त्याला दिरंगाई करितो तो मूढ होय.

९१६
संहता हि महाबला: ॥८।३४।७॥
संघ करुन एकत्र राहिलेले लोक अत्यंत बलाढय होतात.

९१७
सख्यं सोदर्ययोर्भ्रार्दम्पत्योर्वा परस्परम् ।
कस्यचिन्नाभिजानामि प्रीतिं निष्कारणामिह ॥१२।१३८।१५३॥
सख्खे बंधु अथवा पतीपत्नी ह्यांच्यामध्यें जो परस्पर स्नेह असतो तोही कारणामुळेंच होय. कांहीं तरी कारण असल्यावांचून जगांत कोणाचें कोणावर प्रेम असल्याचें पाहण्यांत नाहीं !

९१८
संक्षेपो नीतिशास्त्राणामविश्वास: परो मत: ॥१२।१३८।१९७॥
सर्व नीतिशास्त्रांचें थोडक्यांत सार हेंच कीं कोणाचा विश्वास म्हणून धरुं नये.

९१९
स चेन्निकृत्या युध्येत निकृत्या प्रतियोधयेत् ।
अथ चेध्दर्मतो युध्येत् धर्मेणैव निवारयेत् ॥१२।९५।९॥
प्रतिपक्षी जर कपटानें लढेल तर आपणही उलट कपटानेंच लढावें आणि तो जर धर्मयुध्द करील तर आपणही धर्मानेंच लढून त्याचें निवारण करावें.

९२०
सत्यं स्वर्गस्य सोपानं पारावारस्य नौरिव ॥५।३३।५२॥
समुद्र तरुन जाण्यास जशी नाव, तसा सत्य हा स्वर्गास जाण्याचा जिना आहे.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP