मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ३०१ ते ३२०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ३०१ ते ३२०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


३०१
गुरुलाघवमादाय धर्माधर्मविनिश्चये ।
यतो भूयांस्ततो राजन् कुरुष्व धर्मनिश्चयम् ॥३।१३१।१३
(ससाण्याच्या रुपानें आलेला इंद्र शिबि राजाला म्हणतो) हे राजा, धर्म कोणता व अधर्म कोणता, ह्याचा निर्णय करितांना तारतम्य पाहून त्यांतल्या त्यांत जो अधिक श्रेयस्कर दिसेल तोच धर्म, असें निश्चित समज.

३०२
गुरुशुश्रूषया ज्ञानं शान्तिं योगेन विदन्ति ॥५।३६॥५२॥
गुरुशुश्रूषेनें ज्ञान आणि योगानें शांति मिळते.

३०३
गुरुणामवमानो हि वध इत्यभिधीयते ॥८।७०।५१॥
गुरुजनांचा अपमान करणें म्हणजे त्यांचा वधच करणें होय !

३०४
गुरोरप्यवलिप्तस्य कार्याकार्यमजानत: ।
उत्पथप्रतिपन्नस्य न्याय्यं भवति शासनम् ॥१।१४०।५४॥
गर्वानें फुगून गेलेला, कार्य कोणतें व अकार्य कोणतें हें न जाणणारा आणि दुर्मार्गानें चालणारा गुरु जरी असला तरी त्याला शिक्षा करणें न्याय्य आहे.

३०५
गृध्रदृष्टिर् बकालीन: श्वचेष्ट: सिंहविक्रम: ।
अनुद्विग्र: काकशड्की भुजड्गचरितं चरेत् ॥१२।१४०।६२॥
(कार्यसाधु पुरुषानें) खिन्न होऊन न बसतां, गिधाडासारखी दूरदृष्टि ठेवावी, बगळ्याप्रमाणें निश्चल राहावें, कुत्र्यासारखें सावध असावें, सिंहासारखा पराक्रम गाजवावा, कावळ्याप्रमाणें साशंक असावें आणि सर्पासारखें वर्तन ठेवावें. (सर्प जसा आयत्या बिळांत शिरतो, त्याप्रमाणें शत्रूंच्या साधनांचा उपयोग करुन घ्यावा.)

३०६
गृहस्थस्त्वेष धर्माणां सर्वेषां मूलमुच्यते ॥१२।२३४।६॥
गृहस्थाश्रमी पुरुष हा सर्व धर्मांचा मूळ आधार आहे.

३०७
गौरवेण परित्यक्तं नि:स्नेहं परिवर्जयेत् ।
सोदर्यं भ्रातरमपि किमुतान्यं पृथग्जनम् ॥१२।२९२।२॥
सख्खा भाऊ जरी असला तरी त्याचें पूर्वीचें महत्त्व जाऊन तो शुष्क पडला, त्याचें द्रव्य संपले म्हणजे इतर बांधव त्याच्या वार्‍यासही उभे राहत नाहींत. मग इतर सामान्य लोकांची गोष्ट कशाला ?

३०८
ग्रस्यतेऽकर्मशीलस्तु सदानर्थैरकिंचन: ॥१२।१३९।८३॥
उद्योग न करणार्‍या दरिद्री मनुष्यावर संकटें नेहमीं कोसळत असतात.

३०९
चञ्चलं हि मन: कृष्ण प्रमाथि बलवदृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥६।३०।३४॥
(अर्जुन म्हणतो) हे श्रीकृष्णा, मन हें चंचल, (इंद्रियांना विषयांकडे) जबरदस्तीनें ओढून नेणारें बलिष्ठ व दृढ आहे. त्याचा निग्रह करणें हें वार्‍याची मोट बांधण्याप्रमाणें मला अत्यंत कठीण वाटतें.

३१०
चण्डालत्वेऽपि मानुष्यं
सर्वथा तात शोभनम् ॥१२।२९७।३१॥
(पराशर मुनि जनक राजाला म्हणतात) बाबा रे, चांडालयोनींत कां होईना, पण मनुष्याचा जन्म घेणें हें सर्वांत उत्तम.

३११
चतुर्वेदोऽपि दुर्वृत्त: स शूद्रादतिरिच्यते ॥३।३१३।१११॥
चारही वेद पडलेला दुर्वर्तनी असेल तर तो शूद्रापेक्षांही कनिष्ठ समजावा.

३१२
चत्वारि यस्य द्वाराणि सुगुप्तान्यमरोत्तमा: ।
उपस्थमुदरं हस्तौ वाक् चतुर्थी स धर्मवित् ॥१२।२९९।२८॥
(हंसरुपानें आलेला ब्रह्मदेव म्हणतो) देव हो, उपस्थ, उदर, हात व चौथी वाणी हीं चार द्वारें जो दावांत ठेवितो तो धर्म जाणणारा होय.

३१३
चराणामचरा ह्यन्नम् अदंष्ट्रा दंष्ट्रिणामपि ।
आप: पिपासतामन्नम् अन्नं शूरस्य कातरा: ॥१२।९९।१५॥
स्थावर पदार्थ हें जंगम प्राण्यांचें अन्न होय. तसेंच दाढा नसलेले प्राणी दाढा असलेल्यांचें अन्न. पाणी हें तहानेलेल्यांचे अन्न. तसेंच भित्रे लोक शूराचें भक्ष्य होत.

३१४
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश: ॥६।२८।१३॥
(भगवान् श्रीकृष्ण म्हणतात) गुण आणि कर्म ह्यांच्या अनुरोधानें चातुर्वर्ण्य मींच उत्पन्न केलें.

३१५
चारै: पश्यन्ति राजान: ॥५।३४।३४॥
राजे लोक हेरांच्या द्वारें पाहत असतात.

३१६
चिरं ह्यपि जड: शूर: पण्डितं पर्युपास्य ह ।
न स धर्मान् विजानाति दर्वी सूपरसानिव ॥१०।५।३॥
जो बुध्दीचा जड तो धिमेपणानें फार दिवस जरी एखाद्या पंडिताजवळ राहिला तरी, पक्वान्नांतील पळीला पक्वान्नाची गोडी जशी कळत नाहीं, तसा त्याला धर्मतत्त्वांचा बोध म्हणून होत नाहीं !

३१७
जरामृत्यू हि भूतानां खादितारौ वृकाविव ।
बलिनां दुर्बलानां च हृस्वानां महतामपि ॥१२।२८।१४॥
सबळ दुर्बळ, लहान थोर, सर्व प्राण्यांना म्हातारपण व मरण हीं लांडग्याप्रमाणें खाऊन टाकितात.

३१८
जरा रुपं हरति हि धैर्यमाशा
मृत्यु: प्राणान् धर्मचर्यामसूया ।
क्रोध: श्रियं शीलमनार्थसेवा
ह्रियं काम: सर्वमेवाभिमान: ॥५।३५।५०॥
वार्धक्य रुपाचा नाश करतें; आशा धैर्याचा, मृत्यु प्राणांचा, मत्सर धर्माचरणाचा, क्रोध लक्ष्मीचा, दुर्जनसेवा शीलाचा, विषयेच्छा लज्जेचा आणि अभिमान सर्वस्वाचा नाश करितो.

३१९
जलौकावत् पिबेद्राष्टं मृदुनैव नराधिप: ।
व्याघ्रीव च हरेत् पुत्रान् संदशेन्न च पीडायेत् ॥१२।८८।५॥
एकाद्या जळूप्रमाणें राजानें सौम्यपणानेंच राष्ट्रांतील द्रव्य कराच्या रुपानें घ्यावें. वाघीण जशी पिलांना आपले दांत लागूं न देतां उचलून नेते, त्याप्रमाणें राजानें प्रजेला त्रास न होईल अशा बेतानें तिजपासून कर घ्यावा.

३२०
जातस्य हि ध्रुवो मृत्युर् ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥६।२६।२७॥
(श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना,) जन्मास आलेल्याला मरण ठेवलेलेंच आहे; तसेंच मेलेल्याला पुन: जन्म ठेवलेलाच. ह्यासाठीं, ह्या अपरिहार्य असलेल्या गोष्टीबद्दल शोक करणें तुला शोभत नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP