मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|
राजकन्या आणि तिची दासी

राजकन्या आणि तिची दासी

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


"प्रेम तयावर होतं तर मग तुमचं ना भारी ?"

"छे छे ! कसलं ? लेक नृपाची मी, तो व्यापारी !"

"कुंवरजीस दावितां जवाहिर तो, तुम्हि त्यावरती

दृष्टि रोखिली स्नेहें वरचेवर हळु कां तर ती ?"

"छे छे ! भलतं ! खुळे, तयावर का रत्‍नावर ग ?"

"खुळीच मी, मज कशीं कळावीं मनांतलीं बिंगं ?

बोलुं लागतां कान दिला जरि चपापलां स्वांतीं !

डोळ्यावरुनी गालीं कितिदा क्षणिं झळके कांती !"

"कळेच ना मज, तुझ्याच मनिंचे हे सारे चाळे !"

"खुळीस का मज शक्य नृपाच्या लेकिस जें जाळे ?

तुम्हांस दावावया जवाहिर येतां कां त्याला

जा जा ! वदलां मुखें, न नयनें ? लालि खुले गालां ?

कां ओशाळ्या झालां ? लज्जित जणुं कवणा झालां ?

का पाण्याला रत्‍नाच्या का डोळ्यांच्या बोला."

"कधिं ग लाजलें ? कधीं पाहिलं मीं तेव्हां खालीं ?

नको जवाहिर म्हणुनि म्हणालें. जा ! कसली लाली ?"

"काय अतांशा झालं तर मग तुमच्या जीवाला ?

कोमेजूं कां गाल लागले ?- तो येथुनि गेला !

उगिच बसोनी कां वार्‍याला कान कधी देतां ?

उगिच कुणाचा भास होउनी किति फुगतां फुलतां ?

हात ठेवुनी दारावर किति वेळ उभ्या असतां ?

जणुं उघड्ल कुणि दार ! गवाक्षीं कां ढुंकित बसतां ?"

"कधिं ग दिला कुणिं कान ? कुणाला कधिं ग भास झाला?

"कळेल कैसं देउनि चुकतां ह्रदयचि दुसर्‍याला ?"

"घे घे सटवे, आळ घेशि तर भलता मजवरती !

जा म्हण, बसलं मन त्यांवर, चल, निघ येथुनि परती !

"कंवराणीजी, कां रागवतां ? ही लोचट दासी -

क्षीण अवयवीं किति तरि खुलते छबि ही आतांशी !

संचरलं तें वारं, स्मर कीं काय म्हणति ज्याला,

बहार उसळे किती चहुंकडे शरीरवेलीला !

खैरपूरच्या गुणवयरूपें योग्य कुमाराला

राणाजी ते देतां म्हणता 'ना' कां मग त्याला?"

"खैरपूर किति धनाढ्य ! त्यांना योग्य अम्ही का ग ?"

"कंवराणीजी, किती लपवितां मन ? किति हीं सोंगं ?

किति भोळ्या तुम्हि ! खैरपुरेशचि ते, न व्यापारी,

वेष पालटुनि आले इकडिल बघण्या ही स्वारी."

"काय पुन्हा ते खैर-तेच-व्या-का-कूवरची ते?"

"मी खोटी, मी सटवी लुब्री ? उर कां धडधडतें ?"

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - पतितपावन

ठिकाण - इंदूर

दिनांक -२३ जुलै १९०४

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP