मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|
प्रीतीचा वास

प्रीतीचा वास

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


प्रीति ना वसे कधींहि उंच त्या गडावरी,

उतर उतर ये-प्रीति हवि तरी !

रुचति खालच्याचि तिला मोकळ्या निळ्या दरी. ध्रु०

चंद्र एकलाच वरी

चांदण्या अनंत तरी

झुरति कोपर्‍यांत दुरी !

प्रीति काय ही खरी ? १

पक्ष पक्ष भेट दे न,

येतो तैं रागवून;

पडति फिक्या वक्त्र बघुन;

भीति त्यां भरे उरीं. २

घन राया, विमल झरे,

प्रीतिचीं इथेच घरें;

संचरे अदृश्य येथ

तृप्त देवि, अंतरीं. ३

नीरस ते वर महाल,

सरस या दर्‍या विशाल;

रक्तें ते लाल लाल,

विमल या दर्‍या परी. ४

कारंजें कृत्रिम वरि,

वारिपात येथ परी

झोकितो हिरे तुषारि,

प्रीतिवसति ही खरी. ५

वेश्यांचें गान वरी,

पक्षि गाति गोड सुरीं,

त्या नादें घुमति दरी,

उतर उतर सुंदरी. ६

हार जडचि तेथ तुला,

बाहु सजिव मी अपुला

अर्पिन सप्रेम गळां;

अधिक काय गे सरी ? ७

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - अरुण

राग - भूप

ठिकाण -देवास

दिनांक -२२ फेब्रुवारी १९०३


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP