प्रकरण चौदावे – अद्वैतानुभव
सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा, सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.
नित्य सावध राही नरा ! नित्यानित्य विवेक पाही बरा।
सत्य असत्याचिये विचारा। लागे वेगी ॥१॥
जरी ख्यातिच व्हावी जगी। तरी मायिक प्रेम धरी वेगी।
अनुभवणे असे स्वरूपालागी। तरी सत्संग धरावा ॥ २ ॥
जाऊनि गुरूसी शरण। पुसावे स्वामी मी कोण? ।
आलो कासया कारण? जगामाजी कोण माझे? ॥३॥
जरी धरिशी फार हट्ट। की सांगावी इतुकी गोष्ट ।
तेणे कळेल स्पष्ट स्पष्ट। स्वरूप तुझे ॥४॥
भक्त कोण, देव कोण । हेचि पाहावे आधी जाण ।
मग शास्त्रांची गुंतवण। न लागेचि ॥५॥
विवेके शोधावे अंतरी । त्या महावाक्याचा अर्थ धरी।
स्वतः बह्म कैसिया परी। आहे मी हो! ॥६॥
स्वरूप शाश्वत पाहावया। अशाश्वत सोड माझे सखया!।
लक्ष लावी सत्य ठाया। शुद्ध जीवन करोनि ॥७॥
पाहावया भगवंताकारण । क्षणिक नको वैराग्य
ज्ञान । अष्टधा प्रकृतीचे महिमान । दुर सारी ॥८॥
दृष्टी दिसे जे जे काही। विवेके सांडी सर्व पाही।
मायिकांचे सूक्ष्म लक्षण तेहि। दूर करी ॥९॥
जेथे नसे पंचभूत । कल्पनातीत तत्त्व अद्भुत ।
निर्विकार स्वसंवित। तेचि जाण स्वठायी ॥१०॥
सत्य काय आहे बापा! त्वरित पाही, घेई मापा ।
असत्याच्या निवारी पापा। स्वस्वरूपा जाण सख्या! ॥११॥
बोधरहित बुद्धीने घुसती। अंधारी अद्वैत न होती।
ते जरी स्वरूप शोधती। तरी होती तेचि ते ॥१२॥
जरी गड्या! घेशील शोधा। तरी न लगे द्वैतबाधा।
फोडीत सर्व अंध बंधा। प्रकाश पडे सर्वत्र ॥१३ ॥
जे जे असत्य अनात्म बंध। तेहि चैतन्यचि नटले विशद्ध।
अन्य भासे हा कल्पना-बाध । स्वयंसिद्ध नातरी तू ॥१४ ॥
येथे दुजे कोठूनि आले? जे बंधासि कारण झाले।
ही तो स्वरूपसागरावरी फुले । फुलली जणु गारांची ॥१५॥
हे अनुभवी तोचि मुक्त। देही असोनि देहातीत ।
जन्मोनीहि अजन्मा निश्चित। आत्मदृष्टी ॥१६॥
लक्ष चौऱ्यांशी जाण योनि । मुक्त होशील त्यांतूनि।
बोलणे सत्य घे जाणूनि । गुरुकृपे ॥१७॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार
तुकड्यादास विरचिते । चतुर्दश प्रकरण संपूर्णम् ॥१४॥
N/A
References : N/A
Last Updated : August 10, 2026

TOP